शोकमग्न व्यक्तीशी असे वागा

 

जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती एक दिवस मृत्यूला सामोरे जाणार आहे हे आपल्याला माहिती आहे. तरीही व्यक्ती गेल्याचे दु:ख होणे स्वाभाविक आहे. काही वेळा एखादया व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या जिवलगांना, नातेवाईकांना त्या व्यक्तीच्या असण्याचे महत्त्व कळते. 

काही माणसे या दुखवट्यातून लवकर बाहेर पडतात काही जणांना अनेक दिवस, महिने ती घटना विसरता येत नाही. सतत त्याच दु:खाची आठवण होत राहिली की त्या व्यक्तीचे इतर सहकारी, मित्र  वा दूरचे नातेवाईक सुद्धा त्यात ओढले जातात. इच्छा नसतांना त्यांच्यावर ते दु:खाचे सावट पसरते. अशा वेळी राग येणे, कटकट वाटणे ती दु:ख व्यक्त करणारी व्यक्तीच नकोशी वाटू लागते असेही घडते.

जिवलग व्यक्तीचे निधन झाले असेल तर त्या घरातल्या इतर व्यक्तींशी आपण कसे वागावे हे अनेकदा उमगत नाही. त्यांच्याशी वागतांना पुढील गोष्टी ध्यानात ठेवा

काळ हेच दु:खावरचे औषध आहे याची आठवण करून देऊ नका

आपल्या सर्वांनाच काळ हे दु:खावरचे औषध आहे हे माहिती आहे. पण गेलेल्या व्यक्तीचे आयुष्यातले स्थान, त्याचे प्रेम इतके महत्त्वाचे असू शकते की शोक आवरणे अवघड जाते. अगदी खाणे पिणे कोणतीही छोटी साधी गोष्ट करतांना स्त्री पुरुष दोघांनाही गेलेल्या व्यक्तीच्या अगदी शुल्लक गोष्टी, सवयी आठवतात. त्यामुळे दु:खावरची खपली पुन्हा पुन्हा निघते. त्या व्यक्ती सगळं आयुष्य शोक करणार नसतात. पण काही काळ नक्की जाऊ द्यावा लागतो. हा काळ प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. म्हणूनच काळ हे दु:खावरचे औषध आहे हे सांगणे तुम्ही टाळा. फक्त त्या व्यक्तींबरोबर राहा. गप्प राहून, वाद न घालता साथ द्या. तुमचं तिथं असणं हे सर्वात महत्वाचे आहे.

 

शोक करणे एकदम थांबत नाही, कालावधी लोटू द्या.

अतिशय प्रिय व्यक्तीचा आणि कायमचा दुरावा सहन करणे ही सोपी गोष्ट नाही. मेमोरिअल सर्विस झाली किंवा दहावा वा तेरावे झाले की लोक दु:ख विसरतील अशी धारणा असते. ते दैनंदिन व्यवहार सुरु करतात. प्रत्येक धर्मात, समाजात याच्या साधारण संकल्पना वेगळ्या आहेत. पण तो कालावधी एकदा पार पडला की गेलेल्या व्यक्तीची आठवण येणे बंद होते असे नाही. ती व्यक्ती गेल्याचे दु:ख, तिचा शोक सुद्धा एकदम बटन दाबून थांबतो असे नाही. अगदी वर्ष झाले तरी एकदम साधी गोष्ट आठवून लोक भावुक झालेले मी पाहिले आहेत. तुमच्या मित्राला, सहका-याला वा अगदी जोडीदाराला शोकातून बाहेर पडण्याकरता जास्त वेळही लागू शकतो. म्हणूनच संयम ठेवा.

 

शोक करणारी व्यक्तीचे वागणे समजून घ्या

कुणी गेले आहे म्हणून माणसे कायम उपाशी राहत नाहीत, जेवतात, दैनंदिन व्यवहार करतात. पण ती नेहमीसारखी वागतील असे नाही. दु:खात बुडाल्याने माणसे थकतात हे लक्षात घ्या. त्यांचा जगण्यातला रसही कमी होऊ शकतो. ती रागवतात, तुसड्यासारखी वागतात, ठरलेले बेत बदलतात असे वागणे शोक करणा-या व्यक्तींबाबत नेहमी पहायला मिळते. अगदी आवडत्या व्यक्तीशी, जोडीदाराशीसुद्धा या शोकमग्न व्यक्ती नीट वागत नाहीत. पार्ट्या, सणसमारंभ यात सहभागी होतील याची खात्री नसते.

हे त्यांचे वागणे समजून घेणे आवश्यक आहे. त्याचा त्रास स्वत:ला करून घेणे टाळा, त्यांना बोलणे रागावणे सुद्धा योग्य नाही.

उत्तम जगण्य़ाकरता, प्रेमाकरता दु:खाचा सामना करावा लागतो

शोकमग्न व्यक्तीमुळे तुमचे आयुष्य अतिशय रटाळ, निरस झाले आहे असे वाटू शकते. तुम्ही त्या व्यक्तीला तुम्ही महत्त्वाचे वाटत नाही असा समजही करून घेऊ शकता. त्या व्यक्तीच्या दु:खाचे तुम्हालाही ओझे वाटू शकते. पण दु:खामुळे माणसे आत्मपरिक्षण करतात. दु:खात असतांना कोण साथ देत, कोण टाळत हे सुद्धा समजत. दु:खामुळे असलेली नाती बळकट होतात. गेलेल्या व्यक्तीचे महत्त्व उमजते. गेलेली व्यक्ती कधी प्रेरणादायी सुद्धा वाटू शकते. त्यातून माणसे मोठी ध्येये गाठ्तात. दु:ख वा शोकमग्न साथीदार हे संकट मानू नका. उत्तम जगण्याकरता आणि प्रगल्भ होण्याकरता त्याची गरज आहे हे ध्यानात असू दया.

माणसे हसतात, उत्साहाने काही करतात म्हणजे त्यांना दु:ख झाले नाही असे नाही.

शोकमग्न माणसे कायम रडतात, सुकलेले चेहरे घेऊन असतात असे नाही. शोकातून बाहेर पडण्याचा तीही प्रयत्न करत असतात. जशी चिडचिडणारी, रडणारी माणसे असतात तशी काही माणसे उघडपणे वाईट वाटते आहे हे दाखवत नाहीत. दोन्ही गटातली माणसे गेलेल्या व्यक्तीच्या चांगल्या आनंदी गोष्टी आठवून हसू शकतात. आठवांमुळे काही गोष्टी उत्साहाने करू शकतात. अशावेळी ह्यांना दु:ख झाले नाही असा गैरसमज करून घेऊ नका. दु:ख व्यक्त करण्याची आणि शोक करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. जी प्रिय व्यक्ती गेली तिच्या काही चांगल्या आठवणींना उजाळा देणे यात काहीच गैर नाही. अशा काही आठवणी ओठावर हसू सुद्धा आणू शकतात. अशाप्रकारे हसणारी माणसे दु:ख विसरण्याचा नकळत प्रयत्न करत असतात. त्या हसण्याचा चुकीचा अर्थ लावू नका.

 

कुणी गेले हे कानावर आले तर काय करायचे जाऊन? मला नाही आवडत नाटक, उगाचच काही पद्धती अशी शेरबाजी करण्याएवजी नात्याचा मान, नात्यातली जवळीक कायम राहावी म्हणून भेटायला जा. आपण गेल्यावर कोण भेटायला येणार वा येणार नाही याचा विचार करायची गरज नाही. कुणी गेल्यावर भेटायला जाणे, जमेल त्या प्रकारे तुमच्यासाठी जी व्यक्ती गेली/ ज्या शोकमग्न आहेत ती माणसे महत्त्वाची आहे हे कृतीतून दाखवणे माणुसकी आहे. तुम्ही काही बोलणे अपेक्षित वा महत्त्वाचे नाही. तुमचे तिथे असणे जास्त महत्त्वाचे आहे हे ध्यानात ठेवा.

-सोनाली ​

 

 

 

Category: 

About the Author

सोनाली's picture
सोनाली

मिळून सा-याजणी, मेनका , रोहिणी, अक्षर मासिकातून लेखन प्रसिद्ध.

लोकमत, लोकसत्ता, सकाळ, मटा या पेपरातून कविता, लेख 

शक्यतेच्या परिघावरून कविता संग्रह