ऑटिझमची सर्वसामान्य लक्षणे (भाग २)

सामाजिक कौशल्याचा अभाव (Impairment in Socialisation)

  • नजरेला नजर मिळवणे त्रासदायक होते त्यामुळे ते टाळले जाते.

ऑटिझम असलेल्या मुलांच्या मेंदूमधील भाव-भावनांशी संबंधित केंद्र पुरेसे विकसित झालेले नसते. त्यामुळे त्यांना स्वतःच्या तशाच इतरांच्या भावना समजून घेणे बऱ्याचदा अवघड जाते. तशात माणसाच्या चेहऱ्यावरचे भाव तर क्षणोक्षणी बदलत असतात. ह्यामुळे गोंधळून जाउन ते माणसाच्या चेहऱ्याकडे बघणे अथवा नजरेला नजर मिळवणे टाळतात.

  • स्वतःच्याच विश्वात राहणे पसंत करतात. एकटेच खेळत बसणे अधिक आवडते.

सर्वसाधारणपणे ऑटिझम असलेल्या मुलांचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन हा सर्वसामान्यांपेक्षा सर्वस्वी वेगळा असतो. ह्या विरोधाभासामुळे त्यांच्यात आवश्यक ते सामाजिक भान नैसर्गिकपणे येत नाही. परिणामस्वरूप ते आपल्याच जगात (comfort zone) रमणे पसंत करतात.

  • आपले नाव काय आहे आणि त्या नावाला प्रतिसाद देणे ह्याची कल्पनाच नसते.

कायम आपल्याच जगात राहिल्यामुळे त्यांना आपले असे काही स्वतंत्र अस्तित्व आहे तसेच आपले काही विशिष्ट नाव आहे हे त्यांच्या खिजगणतीतच नसते. त्यामुळे ते त्यांना हाक मारल्यावर प्रतिसाद देत नाहीत. लोकांना प्रसंगी त्यांच्यात श्रवणदोष असावा अशी शंकाही येऊ शकते. पण त्यांच्या श्रवणक्षमतेची चाचणी घेतली असता ते स्पष्ट होते. 

  • इशारे आणि खाणाखुणा ह्यांची भाषा समजतच नाही.

एक तर आपल्याच विश्वात रमल्यामुळे त्यांचे आजूबाजूला लक्षच नसते. त्यामुळे कुणाच्या खाणाखुणा आधी त्यांच्या नजरेतच येत नाहीत. आणि चुकून त्यांचे लक्ष गेलेच तर शाब्दिक आणि सांकेतिक हे दोन्हीही भाषाप्रकार पुरेसे विकसित झालेले नसल्यामुळे त्यांचा नेमका अर्थ समजून त्याप्रमाणे कृती करणे हे त्यांच्यासाठी फारच अवघड असते.

  • इतरांकडे आपल्या भावना अथवा गरजा व्यक्त करणे जमत नाही

सर्वात प्रथम आपल्याला जाणवणारी भावना ही नेमकी कसल्या प्रकारची आहे - म्हणजे आनंद आहे कि दुःख आहे, तहान आहे की भूक, वेदना आहे की आणि काय ह्याची नेमकी जाणीव नसल्यामुळे त्याचे केवळ त्यांच्या आकलनाप्रमाणे प्रकटीकरण करणे एवढेच ते करू शकतात. जसे की, रडणे, ओरडणे, हसणे, वस्तूंची फेकाफेकी, मारहाण असे आक्रमक पद्धतीने व्यक्त होणे हे अधिक वेळा घडत असते. तसेच आपली एखादी गरज दुसर्याला सांगून भागवणे, अथवा आपल्याला होणारा एखाद्या प्रकारचा त्रास दुसऱ्याच्या निदर्शनास आणून दूर करण्याचा प्रयत्न करावा हे त्यांच्या लक्षातच येत नाही.

  • समाजात वावरताना इतरांपासून किती अंतर राखायचे ह्याची जाणीव नसते

आपल्या जवळच्या तसेच परक्या माणसांबरोबर संभाषण करताना नेमके किती अंतर ठेवणे सामाजिक संकेतांनुसार योग्य आहे ह्याची त्यांना स्पष्ट कल्पना नसते. कुणी दीड दोन फूट लांब उभा राहील तर कुणी चक्क दुसऱ्याच्या पावलावर पाउल ठेउन उभा राहील.

  • त्यांची स्पर्शाची गरज ही दोन टोकांची असते.

कुणी खूप जवळ येण्याचा प्रयत्न करतो, अगदी दुसऱ्याच्या अंगावर उड्या मारेल तर कुणी दुसऱ्याच्या हलक्याश्या   स्पर्शानेही अस्वस्थ होऊ शकतो.

  • आपल्याप्रमाणेच दुसऱ्यालाही काही मते / विचार / भावना / गरजा आहेत, आणि त्या आपल्यापेक्षा वेगळ्या असू शकतात ह्याची त्यांना जाणीव नसते. जे आपल्याला वाटते तेच दुसऱ्यालाही वाटत असते असे त्यांच्याकडून सहसा गृहीत धरले जाते.

ह्याला इंग्लिश मध्ये ‘Mind Blindness’ म्हणतात. त्यामुळे प्रसंगी ते स्वार्थी अथवा निष्ठूर वाटू शकतात. पण मुळात त्यांचा तो उद्देश्य नसतो. उदा. एखाद्या माणसाला जर ताप आला आहे म्हणून जर त्या खोलीतला पंखा बंद केलेला असेल आणि त्याच खोलीतल्या ऑटिझम असलेल्या व्यक्तीला उकडत असेल तर त्यांना त्या दुसऱ्या व्यक्तीच्या त्रासाची कल्पना न आल्यामुळे सरळ पंखा चालू करतील. तसेच एखाद्या व्यक्तीला ‘डायनोसॉर’बद्दल अतोनात आकर्षण असेल तर समोरच्या व्यक्तीला त्याबद्दल आवड असो वा नसो, ते त्याबद्दल बोलतच राहतील. मग समोरचा ते ऐकतोय कि नाही किंवा तो जांभया देतोय हे त्यांच्या गावीही नसते.

थोडक्यात काय, तर मनुष्य हा नेहमीच समाजप्रिय प्राणी आहे, आणि आपल्या समाजाचे काही अलिखित नियम आहेत. हे नियम नवीन जन्माला आलेले प्रत्येक मूल जसजसे मोठे होत जाते तसतसे अनुकरणाने शिकत जाते आणि त्यामुळे त्याला आपल्या समाजाचा एक हिस्सा बनणे सहज शक्य होते. पण ऑटिझम असलेल्या मुलाला ह्या सामाजिक कौशल्यांचा अभाव असल्यामुळे हे नियम समजणे आणि आत्मसात करणे तितकेसे सोपे जात नाही. तो अशा परिस्थितीत गांगरून जाऊ शकतो. पर्यायाने तो स्वतःच्याच विश्वात (comfort zone) रमणे अधिक पसंत करतो. अर्थात हे नियम शिकवल्यावर तो ते नक्कीच शिकू शकतो. आणि हे आवश्यक सामाजिक संकेत आपण ऑटिझम असलेल्या मुलाला जितक्या लवकर शिकवायला सुरुवात करू तितक्याच लवकर आणि अधिक परिणामकारकपणे ते मूल आपल्या समाजाचा एक हिस्सा बनू शकते.

- मेधा पुजारी

आधीचा लेख- संभाषण कौशल्याचा अभाव

 

"Kaizen" Intervention Center for Autism, Pune
Mobile:
+917798895363
email:
kaizenforautism@gmail.com

 

 

About the Author

Medha Pujari