ऑटिझमची सर्वसामान्य लक्षणे! (भाग ३)

कल्पनाशक्तीचा अभाव (Impairment in Imagination) आणि काही जगावेगळ्या आवडीनिवडी (obsessions)

बऱ्याच मुलांच्या आवडीच्या अशा खास वस्तू/गोष्टी ह्या फारच थोड्या असतात आणि त्याही बऱ्याचदा जगावेगळ्या असतात. त्यामुळे त्यांच्या कल्पनाशक्तीलाही बर्याचदा मर्यादा पडतात. तसेच काही खास वस्तू, घटना अथवा व्यक्तींना त्यांच्या दृष्टीने असाधारण महत्व प्राप्त झाल्यामुळे त्या गोष्टी न मिळाल्यास मुलांना फार त्रास होऊ शकतो आणि त्याचे पर्यवसान त्यांच्याकडून काही चुकीचे वर्तन (Bad behaviours) होण्यात होते.

काही जगावेगळे, भन्नाट छंद (obsessions) आणि अकारण भीती ह्यामुळे अशा मुलांकडून घडणारे चुकीचे वर्तन (inappropriate behaviour) खालीलप्रमाणे असते:

सर्वसाधारण मूल एखाद्या खेळण्याशी ज्या प्रकारे खेळेल त्या प्रकारे न खेळता काही तरी वेगळ्याच पद्धतीने खेळणे.

(एखादे मूल गाडी उलटी करून त्याची चाकेच फिरवत राहील, तर दुसरे मूल तीच गाडी जमिनीवर सतत आपटत राहील आणि त्याचे भाग सुट्टे करेल, तर कुणी तीच गाडी नुसतीच हाताच्या मुठीत घट्ट धरून ठेवेल. पण सर्वसामान्य मुलांप्रमाणे खेळणार नाहीत.)

अगदीच क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींबद्दल अतोनात आकर्षण वाटणे.

(जसे की, बाटल्यांची झाकणे, बटन्स, झाडाची काटकी, वायरचा तुकडा, रिबिनीचा तुकडा, बांगडी, इत्यादी. हे आकर्षण इतके जबरदस्त असते की कायम त्या वस्तू स्वतःजवळ ठेवण्याचा आग्रह केला जातो. जर का कुणी ते बळजबरीने काढून घेण्याचा प्रयत्न केलाच तर रडून, ओरडून आकांत मांडला जातो.)

कुठलीही खेळणी अथवा वस्तू एका ओळीत मांडणे.

(कुठल्याही गोष्टी जमिनीला समांतर आडव्या रेषेत अथवा एकावर एक अशा उभ्या रेषेत ठेवण्यावर काहींचा कल असतो. त्यासाठी लाकडी ठोकळे, डब्बे, कॅसेट कव्हर्स, शाम्पूच्या बाटल्या, एवढेच नाही तर चक्क घरातील फर्निचर देखील खेचत, ओढून आणून एका रेषेत लावणे हा कित्येकांचा छंद असतो. आणि त्यात ते कितीही वेळ रमू शकतात. आणि ह्या मांडलेल्या गोष्टी जर कुणी हलवायचा प्रयत्न केलाच तर मग विचारायलाच नको. अगदी रात्री झोपताना मांडलेल्या गोष्टी देखील जर सकाळी उठल्यावर दिसल्या नाहीत तर मग दिवसाची सुरुवात फारच कठीण होऊ शकते.)

  आसपासच्या वातावरणात अथवा रोजच्या दिनक्रमात काही कारणाने जराही, अगदी मामुलीसा जरी बदल झाला तरी प्रचंड अस्वस्थ होणे, प्रसंगी रागाने बेकाबू होणे.

(त्यांना कोणत्याही गोष्टीची सवय खूप लवकर लागते. आणि अशी एखाद्या गोष्टीची एकदा का सवय त्यांना झाली की मग कोणत्याही कारणाने ती सवय मोडणे फारच कष्टप्रद होते. अशा प्रसंगी त्यांना होणारा उद्वेग फारच तीव्र स्वरूपाचा असतो. उदा. एखादा मुलगा रोज शाळेत एखाद्या विशिष्ट रस्त्याने जात असेल आणि एखाद्या दिवशी तो रस्ता दुरुस्तीवगैरेसारख्या काही कारणाने बंद असेल आणि शाळेत जायला दुसरा रस्ता घ्यावा लागला तर झालेल्या बदलामुळे मुलाला खूपच त्रास, मनस्ताप होऊ शकतो.)

  शरीराला सतत डोलवणे (rocking), हाताचे पंजे हवेत उडवत राहणे (hand flapping), हाताला लागेल ती वस्तू गोलगोल फिरवत राहणे, अशा काही क्रिया सतत अथवा रिकामे बसले असताना करत रहाणे.

(असे करणे ही त्यांच्या शरीराची ‘सेन्सरी’ गरज असते. असे केल्याने त्यांना शांत वाटून ते करत असलेल्या कामावर अथवा अभ्यासावर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकतात. तसेच नवीन, अपरिचित अशा तणावपूर्वक परिस्थितीमध्ये आपल्या मनावर काबू ठेवणे त्यांना सोपे जाते. अर्थात हळूहळू प्रयत्नपूर्वक ह्या गोष्टींचे प्रमाण, तीव्रता कमी करता येऊ शकते, तसेच त्या क्रियेला हळूहळू सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्ह क्रियेमध्ये परिवर्तन करता येऊ शकते; जेणेकरून त्यांच्या दैनंदिन जीवनात अडथळा येणार नाही आणि सामाजिकदृष्ट्याही ते फारसे विचित्र दिसणार नाही. उदा. एखादा मुलगा खूप आनंद झाल्यामुळे जर हात हवेत उडवत असेल (hand flapping) तर त्याला टाळ्या वाजवायला उद्युक्त करणे.)

वस्तूंचा, पदार्थाचा आणि कधी कधी तर दुसऱ्या व्यक्तींचा देखील वास घेणे.

(त्यांच्या घ्राणेन्द्रियांची क्षमता ही काही व्यक्तींमध्ये सर्वसामान्यांपेक्षा कमजोर असते आणि अशा वेळेस वासाची पुरेशी जाणीव उद्दीपीत होण्यासाठी त्यांना खूप अधिक प्रमाणात वास घ्यावा लागतो. त्यामुळेच त्यांची वास घेण्याची प्रक्रिया सर्वसामान्यांच्या तुलनेमध्ये अधिक प्रमाणात होते. तसेच काहींसाठी, त्यांच्या भवतालच्या गोष्टींचे ज्ञान घेण्याचे नाक हे महत्वाचे आणि प्रभावी माध्यम असते.)

चवीच्या आणि अन्नपदार्थाच्या पोताच्या (texture) काही विशिष्ट आवडी, नावडी असणे.

(काही मुलांच्या जिभेला चिवड्यासारख्या खरखरीत पोत असलेल्या खाद्यपदार्थांचा त्रास होतो तर कुणाला खिरीसारख्या गिळगिळीत पदार्थांसारख्या पोताचा त्रास होऊन ते असे पदार्थ खाणे नाकारतात अथवा त्यांना उलटीची भावना होऊ शकते. काहीजणांना भात चावायला अथवा गिळायला त्रास होऊ शकतो त्यामुळे ते भात खाणे टाळतात. काही मुले डाळभात सुद्धा मिक्सरमध्ये फिरवून बारीक केल्याशिवाय खाऊ शकत नाहीत. एकंदरीत बऱ्याच जणांच्या खाण्याच्या काही ना काही तक्रारी असतात.)

साध्या, दैनंदिन गोष्टीबद्दल काही मुलांच्या मनात काही खास कारणाशिवाय भय असते.

(उदा. दात घासणे, नखे कापणे, डोके धुणे अशा रोजच्या साध्या साध्या गोष्टींबद्दलही काही मुलांच्या मनात अतोनात भय असते. केस कापण्यासाठी सलून मध्ये गेल्यावर देखील त्यांना तो कंगवा, कात्रीचा हलका स्पर्श, पाण्याचा हलका फवारा ह्यांमुळे त्रास होऊन ते त्या जागेपासून ते प्राणपणाने दूर पळून जाण्याचा प्रयत्न करतात.)

अर्थात ही झाली काही निवडक आणि अधिक प्रमाणात बघण्यात आलेली काही उदाहरणे. याशिवाय इतरही अनेक गोष्टींचा उल्लेख करता येऊ शकतो, कारण प्रत्येक मूल वेगळे असते त्यामुळे त्याला येणाऱ्या अडचणी तसेच त्या मुलाला आवडणाऱ्या गोष्टी ह्यादेखील वेगवेगळ्या असतात, वैशिष्ट्यपूर्ण असतात. योग्य मार्गदर्शक मिळाला तर सामाजिकदृष्ट्या अयोग्य हालचालींना योग्य दिशा देता येते. जसे कि एखाद्या मुलाला डोलायची (rocking) इच्छा झाली तर त्याला एखाद्या झुलत्या आरामखुर्चीत (Rocking Chair) अथवा झोपाळ्यावर बसायला द्यायचे; किंवा जेव्हा एखादे मूल अतीव आनंद झाल्यामुळे हात हवेत उडवत (hand flapping) करत असेल तर त्याला त्याऐवजी टाळ्या वाजवायला प्रवृत्त करायचे. जेणेकरून त्या क्रिया सामाजिकदृष्ट्या विचित्र वाटणार नाहीत.

- मेधा पुजारी

"Kaizen" Intervention Center for Autism, Pune

Mobile: +917798895363

email: kaizenforautism@gmail.com

 

About the Author

Medha Pujari