‘ऑटिझम’ची काही महत्वाची लक्षणे अधिक विस्तृतपणे

४. ‘ऑटिझम’ची काही महत्वाची लक्षणे अधिक विस्तृतपणे :

  • स्नायूंचा सर्वसाधारण ताणताणाव (muscle tone) हा अनैसर्गिक असतो. कधी खूपच शिथिल तर कधी कधी खूपच ताणलेले अथवा खेचलेले स्नायू असतात.

परिणामस्वरूप त्यांना लिहिणे, कपड्यांची बटणे लावणे, बुटांची लेस बांधणे अशा विशिष्ट गोष्टी करणे अवघड जाते. अर्थात सतत सराव करून घेतल्यास त्यांना ह्या अडचणींवर मात करणे जमू शकते. तसेच एखादी गोष्ट हातात धरताना बोटांचा दाब किती असावा ह्याचा अंदाज त्यांना बऱ्याचदा येत नाही त्यामुळे हातातली गोष्ट एक तर खाली पडते अथवा एखादी काचेसारखी नाजूक गोष्ट पिचून जाईल आणि फुग्यासारखी गोष्ट असेल तर फुटून जाईल.

  • बऱ्याचदा त्यांना अंतराचा, खोलीचा अथवा लांबीचा नेमका अंदाज (depth perception) येणे अवघड जाते.

त्यामुळे हातातली एखादी गोष्ट खाली ठेवताना हात आणि टेबलामधील अंतराचा अंदाज न आल्याने ती वस्तू एकतर जोरात आपटली जाईल अथवा ती वस्तू टेबलावर ठेवण्यापूर्वीच हातातून सुटून खाली टेबलावर पडेल. तूटफूट दोन्ही बाबतीत होऊन मुलाला शिक्षा होण्याचीच शक्यता अधिक. पण त्यात मुलाची वस्तुतः चूक नाहीये हे माहित नसल्यामुळे मुलावर इतरांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते.

तसेच, ऑटिझम असलेल्या बऱ्याच मुलांना पाण्याचे अत्यंत आकर्षण असते. पण समोर दिसतंय ते डबके आहे की खोल तळे आहे ह्याचा अंदाज न आल्यामुळे मूल बुडण्याचा धोका संभवतो. त्यांना सरसकट जमेल तितक्या लवकर पोहायला शिकवणे हा त्यावरचा उत्तम उपाय आहे.

तसेच कुठलाही खेळ खेळताना, चेंडू पकडायचा असो, बॅटने टोलवायचा असो, किंवा पायाने ढकलायचा असो, हीच अडचण येऊ शकते. परिणामस्वरूप मूल खेळाच्या विश्वापासून दूर होते.

  • कधी-कधी ह्या मुलांमध्ये हाताच्या व डोळ्यांच्या स्नायूंचे योग्य संतुलन (eye-hand coordination) नसते.

त्यामुळे त्यांना सुईत दोरा ओवणे, शर्टाची बटणे लावणे, दोन ओळींमध्ये व्यवस्थित लिहिणे, छोटे छोटे ठोकळे घेउन काही रचना बनवणे, चित्र काढणे आणि रंगवणे, खेळताना चेंडू नेमका पकडता येणे अथवा टोलवता येणे अशा काही दैनंदिन क्रिया करणे अवघड जाते.

  • स्पर्श, चव आणि वास ह्यांच्या संवेदनेला त्यांचा मिळणारा प्रतिसाद हा सर्वसामान्य नसतो. एकतर अगदी तीव्र असतो, अथवा त्यांच्या संवेदना बर्याच अंशी बोथट झालेल्या असतात.

त्यामुळे खाण्यापिण्याच्या बाबतीत बऱ्याचदा ह्या मुलांच्या तक्रारी असतात. त्याबरोबरच कपड्यांच्या पोताच्या बाबतीतही ते फारच चोखंदळ असतात. कुणी स्वेटर, बिनबाह्यांचा टी-शर्ट घालणार नाही तर कुणी लांब बाहीचा शर्ट घालणे नामंजूर करेल. कुणी जीन्सची पैंट घालायला नकार देईल तर कुणी हाफपैंट घालायला. पायात बूट /चप्पल सुद्धा विशिष्टच घालायचे ह्यावर त्यांचा कमालीचा आग्रह असतो. जर ते बूट / चप्पल वापरून जुने झाले, फाटले तरीही तेच हवे असतात. तंतोतंत तसेच नवीन आणले तरी ते घालायला त्यांचा कडाडून विरोध असतो.

जिव्हाज्ञान आणि स्पर्शज्ञान ह्यांबरोबरच घ्राणेंद्रियाच्या बाबतीतही ह्यांचे वैशिष्ट्य असे की काही जण एखाद्या विशिष्ट वासाने उत्तेजित होऊ शकतात अथवा काही जणांना एखादा वास कितीही तीव्र स्वरूपाचा असला अथवा दुर्गंधीयुक्त असला तरीही त्यांना त्याची जाणीव होत नाही.

  • ह्या मुलांना एका जागी बसून फार काळ कुठल्याही कामावर लक्ष केंद्रित करणे अवघड असते.

एक तर त्यांचे मन सतत आजूबाजूला घडणाऱ्या घटनांनी विचलित होत असते. ह्याचे कारण मुख्यत्वे त्यांना सांगितलेल्या गेलेल्या अभ्यासात अथवा कामात त्यांना रस नसतो. तसेच काहीतरी करून दाखवून कौतुकास पात्र व्हावे अशी आंतरिक ऊर्मीही त्यांच्या अंगी नसते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला कुणी रागावेल, आपल्याला वाईट वाटेल ही संकल्पनाच मुळी त्यांच्या मनात नसते.

ह्याउलट एखाद्या गोष्टीमध्ये जर त्यांना आवड असेल तर ते त्या गोष्टींमध्ये तासन् तास रमू शकतात; अगदी आजूबाजूच्या जगाला पूर्णपणे विसरून! भले त्या गोष्टी कितीही क्षुल्लक असोत. एखादा रिबिनीचा तुकडा हवेत उडवणे असो की चार डबे एकावर एक ठेवून त्यांची उतरंड रचणे असो.

  • बहुतांश ‘ऑटिझम’ असलेल्या मुलांच्या मनात सर्वसाधारण भीतीची संकल्पना अस्तित्वात नसते त्यामुळे अर्थातच सुरक्षिततेच्या संकल्पनेचा देखील त्यांच्या वर्तनात अभाव असतो. त्याचबरोबर कधीकधी क्षुल्लक गोष्टींबद्दल देखील त्यांच्या मनावर भीतीचा जबर पगडा असतो.

उदाहरणार्थ, कधी कधी भररस्त्यावर वेगाने येणाऱ्या वाहनासमोर एकदम पळत जातील, किंवा उंच इमारतीच्या बाल्कनीच्या कठड्यावर देखील बिनधास्त उभे राहतील. त्यांना भीती वाटणार नाही. मात्र अचानक झालेल्या आवाजामुळे, मग तो मिक्सर अथवा कुकरचा का असेना, ते प्रचंड घाबरतील. तसेच चित्रात एखाद्या सर्वसाधारण दिसणाऱ्या व्यक्तीला अथवा एखाद्या साधारण गाण्याचा छोटासा भाग ऐकून देखील ते अनामिक भीतीने रडायला लागतील किंवा तिथून पळून दूर जाण्याचा प्रयत्न करतील.

  • त्यांचा आपल्या भावनांवर पुरेसा ताबा नसतो.

साहजिकच त्यांच्या भावनांचे प्रकटीकरण अत्यंत तीव्र स्वरूपात होते. एकदा मनात आले की कुठलीही गोष्ट कुठल्याही परिस्थितीत त्या क्षणी करणे अनिवार्य बनून जाते. तसे न झाल्यास त्यांचा प्रचंड उद्वेग होऊ शकतो. अशा वेळेस कधी कधी स्वतःला / इतरांना हानी पोहोचेल असे वर्तन होऊ शकते. त्या क्षणी त्यांच्या मनाची संभ्रमित अवस्था आणि त्यामुळे झालेली मानसिकता कधी कधी अनाकलनीय होउन बसते.

  • त्यांची ‘भूक’ आणि ‘झोप’ ह्या मूलभूत गरजांची जाणीव सर्वसामान्य नसते.

त्यामुळे त्यांच्या जेवणाच्या आणि झोपेच्या वेळा आणि प्रमाण हा त्यांच्या पालकांपुढे नेहमीच एक यक्षप्रश्न असतो. कधी कधी बसल्या बैठकीला ५-६ पराठे संपवतील आणि अजून हवे म्हणून हट्ट करतील नाहीतर कधी दिवस दिवस जेवायला मागणार नाहीत. तीच गोष्ट झोपेची. बऱ्याच मुलांना फार कमी झोप असते. रात्री २-२ वाजेपर्यंत जागून परत भल्या पहाटेपासून उठून बसणार. बरे उठून आपापले शांतपणे काही करत बसतील तर तेही नाही. त्यांना त्यांचे आई/बाबा त्यांच्या बरोबर खेळायला हवे असतात. अशा वेळेस रात्रभर जागरण झालेल्या आईवडिलांचे अतिशय कठीण होऊन बसते.

ही झाली काही महत्वाची लक्षणे. ही लक्षणे वरकरणी जेवढी साधी, सरळ वाटतात तेवढीच लक्षात यायला कठीण आहेत. ह्याचे मुख्य कारण म्हणजे ‘ऑटिझम’ असलेले मूल वरकरणी ‘नॉर्मल’ दिसते पण त्याच्या वागण्यामुळे ते हट्टी आणि हेकेखोर, कसलेही वळण नसलेले वाटू शकते. तसेच प्रत्यक्षात त्या मुलाचे पालक अगदी हताश झालेले असतात कारण त्यांना नेमके त्याला कसे आवरावे हेच बऱ्याच वेळा लक्षात येत नसते. पण त्रयस्थाला मात्र ते बेजबाबदार पालक असावेत आणि त्यांनी आपल्या लाडाने त्या मुलाला बिघडवलेले आहे असे वाटते. म्हणूनच ह्या लक्षणांवर जितक्या लवकर काबू करता येईल तितके त्या मुलाचे शिक्षण आणि त्याचा समाजातील वावर अधिक सोपा होईल.

 

- मेधा पुजारी

"Kaizen" Intervention Centre for Autism, Pune

Mobile: +917798895363

email: kaizenforautism@gmail.com

 

About the Author

Medha Pujari