गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचं निधन

सहेला रे, आ मिल गाये,
सप्तसुरन के भेद सुनाये
जनम जनम को संग न भुले,
अब के मिले सो बिछुडा न जाये

सहेला रे म्हटले की समोर नाव येते ते किशोरी आमोणकर. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका ‘गानसरस्वती’ किशोरी आमोणकर यांचं निधन झालं. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील राहत्या घरी सोमवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास किशोरी आमोणकर यांची प्राणज्योत मालवली. किशोरी आमोणकर या जयपूर घराण्याच्या शैलीत गायन करत असत. गायन क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या किशोरी आमोणकर यांना ‘गानसरस्वती’ असं म्हटलं जातं.

किशोरी आमोणकर यांचा जन्म 10 एप्रिल 1931 रोजी मुंबईत झाला. प्रख्यात गायिका मोगूबाई कुर्डीकर या त्यांच्या आई, तर माधवदास भाटिया हे त्यांचे वडील. आईकडूनच संगीताचं ज्ञान घेतलेल्या किशोरी आमोणकर यांनी पुढे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिका म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली.

कंठसंगीतावर वर्षानुवर्षे कठोर परिश्रम, सराव व अंगभूत प्रतिभेमुळे किशोरीतार्इंचे गाणे कसदार झाले. त्यांनी देशोदेशी संगीत कार्यक्रम केले. त्यांनी स्वरार्थरमणी - रागरससिद्धान्त हा संगीतशास्त्रावरील ग्रंथ लिहिला आहे. शास्त्रीय संगीतातील भावप्रधान गायकीचा प्रकार त्यांनी पुनरुज्जीवित केला असे मानले जाते.

किशोरीतार्इंनी इ.स. १९५० चे दरम्यान आपल्या व्यावसायिक कारकीर्दीस प्रारंभ केला. गीत गाया पत्थरोंने ( १९६४) या हिंदी चित्रपटसाठी त्यांनी पार्श्वगायन केले होते. मात्र नंतर त्या शास्त्रीय संगीतातच रमल्या. १९९१ मध्ये ‘दृष्टी’ या हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. 

"तू सरकन् पुढे निघुन जातेस आणि मी स्वरांची गुंतवळ सोडवीत बसतो"
"आणि माझ्या हृदयाच्या खाली पहाटेचे एकचं नक्षत्र आहे याची तुलाही जाणीव नव्हती... ज्या पहाटे झाडांवरून पक्षी उडत नाहीत तिची लागण तू आपल्या परसात केलीस; आणि अंधाराला शिस्त लावण्यात माझे अर्धे आयुष्य संपून गेले...तुझ्या श्वासनि:श्वासातले अंतर मी कसे भरून काढू? पहाटेचे एकचं नक्षत्र आहे माझ्याकडे ते मी तुझ्या श्वासनिःश्वासाच्या रिकाम्या जागेत नाही ठेवणार..."

~ ग्रेस

"किशोरी ताईंचं गाणं मला यातून हमखास वेगळं वाटतं. एखाद्या प्राचीन मंदिराच्या गाभाऱ्यात, मंत्रोच्चाराच्या घुमत्या नादस्वरात, शिवलिंगावर अभिषेक होत राहावा तसा हा अनुभव. सुरुवातीला स्वरमंडलाचे स्वर ऐकू येतात तिथेच याचा आरंभ होतो. मग आलाप, बंदिशीचे बोल यातून रागाचा विस्तार मंदगतीने सुरु होतो. तो सतत पुढे जात राहतो, पण एखाद्या निसर्गरम्य प्रदेशातून एक आगगाडी धीम्या गतीने जात राहावी आणि आपण आजूबाजूच्या सृष्टीचे मुक्तपणे दर्शन घेत राहावे, तसा काहीसा हा अनुभव. स्वरसंगतींचा निरनिराळा अविष्कार आपल्यापुढे उलगडत राहतो पण कुठेही घाई नाही, अनावश्यक हरकती नाहीत. केवळ असीम रसनिष्पत्ती यातून होत राहते. आणि मग पावसाच्या एका थेंबाने जन्म घेणारा धबधबा, त्याच्या वाढत्या जोराने बळ धरून, शेवटी एखाद्या कड्यावरून झेपावा तसा द्रुत मार्गाने जाऊन तो राग आपला परमोच्च क्षण गाठतो. श्रोत्याची चिंब भिजूनही तृषित राहावे अशी अवस्था होते!"मी मांडलेला हा अनुभव काहीसा स्वप्नाळू, रोमांचकारी असेल पण प्रत्येकदा ताईंचं गाणं ऐकताना मला असाच काहीसा आभास होतो.
-सुरेश नायर on his blog

आजच्या रिअ‍ॅलिटी शोच्या जमान्यात मुलांना यशाच्या अनेक संधी खूप लवकर मिळतात. अशा वेळी क्षणिक प्रसिदधिला मह्त्त्व देऊ नका.असा सावधानतेचा इशारा किशोरीताईंनी दिला होता.त्यांच्या अनेक परखड मतांमधून त्यांचे शास्त्रीय संगीत, रियाझ आणि परिश्रम यावरचे प्रेमच सिद्ध झाले आहे. 

"आयुष्याने मला भरभरून दिलं.अमाप प्रकाश लेणी, सोनेरी पंखांचे आकाश पक्षी, लांब तुऱ्यांची असंख्य पिवळी फुलं आणि तितक्याच सर्वदूर प्रदीर्घ पानगळ भरलेल्या निर्गंध वाटा.
आंदन घेतलेल्या क्षणी ठरवलं वेदने सोबतही चिंब राहायचं. सुरांच्या गर्भात खुलत राहायचं, जीवघेण्या आंदोलनाला समोर जायचं, दुसरा क्षण हातचा मिळाला तेव्हा जाणवलं ही तर आवर्तन आहेत, वर्षा गणिक नवा "सा" घेऊन येणारी तेव्हा पासून शोधत राहिले नव्याने उमलणाऱ्या "षड्जाला" !!!"उद्या मी गेले की एक नक्की म्हणा 'हिनं स्वरांची कूस सोडली नाही' , त्या अस्पर्श 'सा' ची आसही सोडली नाही.आयत्या मिळालेल्या क्षणाशी प्रतारणा ही केली नाही"
-किशोरीताई

अक्षरनामा या संकेतस्थळावर निलेश मोहरीर यांनी किशोरीताईंबद्दल लिहिलेला लेख इथे वाचता येईल.
संगीतातलं क्लासिसिझम म्हणजे नक्की काय हा प्रश्न अनेकांना पडतो. त्यावर ताईंनी स्पष्टीकरण दिलं, "सप्तकातले सूर सुरात गाणं किंवा त्याचं सुरेल सादरीकरण करणं म्हणजे क्लासिसिझम नव्हे. सरगमवर प्रभुत्व मिळवून त्याचा दिखावा करणं म्हणजे क्लासिसिझम नव्हे आणि नुसत्या एका मागोमाग एक दाणेदार ताना गळ्यातून गाऊन दाखवणं हेदेखील क्लासिसिझम नव्हे. आपलं गाणं हे हृदयस्पर्शी हवं. आपण जे गातो ते जर श्रोत्यांच्या हृदयाला भिडलं, त्यांच्या मनाला भावलं आणि त्यांच्या बुद्धीला पटून जर त्याला सर्वत्र मान्यता मिळाली तर त्याला आणि फक्त त्यालाच मी क्लासिसिझम असं म्हणेन."-निलेश मोहरीर

त्यांना मिळालेले पुरस्कार :
संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1985पद्मभूषण पुरस्कार, 1987संगीत सम्राज्ञी पुरस्कार, 1997पद्मविभूषण पुरस्कार, 2002संगीत संशोधन अकादमी पुरस्कार, 2002संगीत नाटक अकादमी फेलोशिप, 2009,

साहित्यसंस्कृतीतर्फे त्यांना श्रद्धांजली.

सहेला रे  इथे यू ट्यूब वर  इथे ऐकता येईल.

About the Author

साहित्यसंस्कृती