ट्रोलिंगकडे फार लक्ष देऊ नका!

ट्रोलिंगकडे फार लक्ष देऊ नका!
व्यक्तिगत आवडीनिवडी, धर्म, जात, देव , राजकीय पक्ष याविषयी चर्चा करतांना लोक अधिक भावुक होतात.  भावनेच्या भरात वाद वाढणे, भांडणे होणे , शिवीगाळ करणे हे सर्व सोशल मिडिया व ब्लॉगवर दिसत असते. आपण एखादी भूमिका घेतली की त्याला सुसंगत प्रतिसाद देणे आवश्यक होते. आपले समविचारी शोधण्याकरता वेगवेगळे ब्लॉग, पेजेस, प्रोफाल्सवर आपण आपले विचार मांडत असतो. चर्चा करत असतो. पण विषय ठरलेले असू शकतात. कोणतीही चर्चा आपल्याला हव्या त्या विषयावर नेण्याची क्षमता आपल्यात असू शकते.  अशा ध्यासाने भारलेली मंडळी मग ट्रोल होतात का? नाही. आपले मत इतरांच्या वॉलवर आग्रहाने मांडणे म्हणजे ट्रोलिंग नाही. वाद घालणे म्हणजे ट्रोलिंग नाही. आग्रहाचा अट्टाहास होतो तिथे माणुसकीला सोडून प्रतिसाद सुरु होतात. एखादी व्यक्ती सतत असे माणुसकीला सोडून, एकच विषय धरून, विरोधी मत असलेल्या व्यक्तीला अपमानास्पद प्रतिसाद देते  म्हणजे ट्रोलिंग करते.  

  • ठराविक लोक जेव्हा अशा अनेक मुद्द्यांची बाजू घेऊन, ठराविक गोष्टीचा प्रचार करण्यासाठी, वा एखाद्या गोष्टीची बदनामी करण्यासाठीच सोशलमिडियाचा वापर करतात तेव्हा ते ट्रोलिंग करत असतात.  
  • ते कधीही चूक मान्य करत नाहीत, टीका करतांना सतत व्यक्तिगत आयुष्यावर घसरतात , स्वत:च्या प्रोफाईलपेक्षा इतर ठिकाणी जास्त व्यक्त होतात तेव्हा त्यांचा उद्देश स्पष्ट असतो. ते ट्रोलिंग करत असतात.
  •  दुस-याचा मुद्दा ऐकून न घेणे, न समजता आपले ठराविक प्रतिसाद देत सुटणे,  चर्चेत भाग घेणा-यांना अपमानास्पद प्रतिसाद मुद्दाम आणि सतत देत जाणे, चर्चेत स्वत:ची चूक झाली आहे असे मान्य न करणे म्हणजे ट्रोलिंग आहे.

सोशल मेडिया पेजेस वा प्रोफाईल्स, ब्लॉग , वेबसाईट असा इंटरनेट कम्युनिटीजमध्ये मुद्दाम भांडणे लावणे, लोकांचा अपमान होईल असे प्रतिसाद देणे, व्यक्तिगत माहितीचा गैरवापर करून टीका करणे असे प्रतिसाद आपण पाहत असतो. एखादी व्यक्ती वा काही व्यक्ती ठरवून लोकांच्या प्रोफाईलवर  सतत वातावरण दूषित करणारे, त्रासदायक प्रतिसाद देण्याचेच काम करत असतात. जाहीरपणे ते आपली चूक झाली असे कधी म्हणत नाहीत. किंबहुना ही मंडळी सोशल मिडियावर फक्त धुमाकूळ घालायलाच येतात असे जाणवते. त्याच्या प्रोफाईल्स नीट पाहिल्या तर काही सकारात्मक घडवून आणण्याची त्यांची क्षमता आणि इतरांच्या कामात अडथळा आणणे याचे प्रमाण नेमके व्यस्त असते! त्यांना ट्रोल्स म्हणता येते. 

हे ट्रोल कधी कधी एखाद्या पी आर फर्मचा प्रचाराचा अविभाज्य घटक असतो. थोडक्यात काही लोक (ट्रोल्स) मानधन घेऊन ही कामे करत असतात. तेव्हा त्यांच्या प्रतिसादांना अधिकच धार येते असे दिसते.
कोणताही शहाणा माणूस फुकट सतत आपले मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न करत नाही. महत्त्वाचा मुद्दा बाजूला राहिला तरी चालेल पण अपमान होणार नाही याची काळजी घेत तो वेळेत चर्चेतून बाजूला होतो. आयुष्यात आ आभासी जगात वारंवार अपमान झाला तर पेटून उठून प्रत्यक्ष आयुष्यात खरंच काहीतरी सकारात्मक बदल घडवून दाखवतो. भाडोत्री ट्रोल्स ना ही भीती नसते. एकंदर ट्रोल्स अपमानाचा विचार करत नसतात. ते फक्त लक्ष कसे वेधले वा इतरांना कसा त्रास दिला यावर भर देतात. 

ट्रोलिंग होण्याची शक्यता कुठे असते?
सेलिब्रिटी पेजेस व प्रोफाईल्स,  माध्यमात आहेत असे पत्रकार , माध्यमातील पत्रकार आहेत अशी विविध पेजेस आणि प्रोफाइल्स आहेत प्रमुख लक्ष्ये!  प्रभावी प्रोफाईल असूनही जिथे बहुमताबरोबर विरुद्ध मतांना विशेष अस्तित्त्व असते तिथे ट्रोलिंगची शक्यता जास्त असते. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. 
 ज्या कंपन्या वा लोक विरुद्ध मताला सतत फाट्यावर मारण्याची वागणूक देतात तिथे ट्रोलिंग करण्यात काही आव्हान नसते वा त्या ट्रोलिंगने काही साध्यही होत नाही हे ट्रोलिंग करणा-याला अनुभवाने माहिती असते. व्यसन जसे वाढत जाते तसेच या ट्रोलिंगचे आहे. रोमहर्षक असे काही वाटत नसेल, मूळ उद्देश जर सफल होत नसेल तर ट्रोल करण्यात काही अर्थ नसतो. जिथे उद्देश सफल होण्याची शक्यता असते तिथे ट्रोलिंगची शक्यताही म्हणूनच वाढते. थोडे निरीक्षण केले तर ज्या सोशलमेडिया पेजवर १० हजारपेक्षा जास्त, पर्सनल प्रोफाईलवर ५ हजाराहून अधिक फॉलो करणारे आहेत, तिथे पत्रकारही आहेत , त्यांच्यालेखी उलटसुलट मतांचे अस्तित्त्व आहे असे सर्वजण कधीही ट्रोलिंगला सामोरे जाऊ शकतात हे तुमच्याही ध्यानात आले असेल. 

वाद, भांडणे वा विविध विषयावर उलटसुलट चर्चा या प्रोफाइल्सवर दिसते तिथे  आत शिरायला वाव असतो. लक्ष वेधणे सोपे असते. शिवाय अनेक लोकांच्या प्रतिसादाचा परिणाम चर्चा भरकटणे, मूळ मुद्दा बाजूला ठेऊन इतर मुद्द्यावर भांडाभांडी सुरु होणे असा होणार असतो याची कल्पना असते.  जेव्हा ट्रोलिंग करणारे अशा ठिकाणी येतात तेव्हा ते चटकन सापडत नाहीत. मग लक्ष वेधण्यासाठी  ते विविध पावित्रे घेत होते असे कालांतराने दिसून येते.  हुशार ट्रोल्स विविध प्रकारे वागू शकतात, त्यांना शोधणे अवघड असते.  काही वेळा ते चर्चेत हातभार लावतात, योग्य माहिती देतात आणि मग ट्रोलिंग सुरु करतात. मग काय होते? विसंगत प्रतिसादांचा जास्त भडिमार होतो तेव्हा ज्यांना मूळ विषयावर महत्त्वाचे बोलायचे असते ते अनेकदा त्यातून बाहेर पडतात. किमान हे समाधान तर कित्येकांना आनंद देऊन जाते हे एक वास्तव आहे.
 
आता दोन चारजणच विषयावर बोलत असतात. त्यांच्याशिवाय काही मंडळी मुद्दाम ठराविक चाकोरीचे प्रतिसाद देत असतात.  विषयात काही भर पडत नाही, त्यांच्या प्रतिसादात तार्किकतेचा अभाव असतो, पुरावे नसतात तरीही त्यांचे प्रतिसाद सुरुच असतात.  इतरांनी सभ्य शब्दात सांगून जेव्हा लोकांचे असे प्रतिसाद थांबलेले नसतात.  असे प्रतिसाद म्हणजे ट्रोलिंग आहे.  एक वेळ अशी येते की ट्रोल्सने विषय आणि प्रतिसाद सर्व लक्ष आपल्याकडे वेधून घेतले असते असे म्हणता येते. व्यक्तींचे ट्रोलिंग हाताबाहेर जायला वेळ लागत नाही. त्याचा फटका प्रोफाईल वा कंपनी पेजेसनासुद्धा बसतो. लोक त्यांच्यापासून दूर राहू लागतात. त्याउलट ट्रोलिंग करणारी व्यक्ती नाव वा आय डी बदलून पुन्हा आपले काम चालूच ठेवते ही खरी शोकांतिका आहे.

सोशल मिडिया मॅनेजर म्हणून काम करतांना या ट्रोल्सचा सामना कसा करायचा हे ठरवणे अतिशय महत्त्वाचे असते. मूळ उद्देश प्रोफाईल वर येणा-या व्यक्ती कमी होऊ नयेत उलट वाढाव्या हा असतो.  संबंधित व्यक्ती आणि सोशल मेडिया टीमने हा निर्णय घ्यायचा असतो. त्याचे पालन सर्वांनी करायचे असते. मूळ व्यवसाय वा व्यक्तीचे भले होईल हे ध्यानात ठेऊन सोशल मेडियावर प्रतिसाद द्यावे लागतात वा एडिट करावे लागतात. हे निर्णय घेतांना वा अंमलात आणतांना त्यांच्या कुणाचाच अहंकार मध्ये येऊ नये हे पथ्य टीमला पाळावे लागते. 

ट्रोलिंग करणारे भाडोत्री असोत वा नसोत उद्देश मात्र समान असतात हे लक्षात येईल.ट्रोल्सचा सामना कसा करायचा ते ठरवण्यासाठी प्रथम ट्रोलिंगचा उद्देश काय असतो ते पाहू.

ट्रोलिंग का करतात?
निरुत्साही आणि चाकोरीबद्ध आयुष्य
अनेक लोकांच्या ख-या जगण्यात, दैनंदिन आयुष्यात अनेकदा कोणतीही प्रेरणादायी वा उत्साहवर्धक घटना घडत नसते. ही मंडळी तशी कंटाळलेली असतात.वास्तवातली ही कमतरता ते आभासी जीवनात भरून काढायचा प्रयत्न करतात. आभासी आयुष्यात असे थ्रील सहज मिळवता येते.ही माणसे एवढी असुरक्षिततेच्या भावनेने झपाटलेली असतात की कुणी आपल्याला काही उत्तर देते आहे यामुळे त्यांच्या जगण्याला अर्थ प्राप्त होतो. हे असे जगणे किती केविलवाणे असते याची कल्पना करता येणार नाही. आपली नोंद घ्यावी व आपल्याबद्दल बोलावे ही त्यांची इच्छा असते. इतरांना त्रास दिला की आपल्याला महत्त्व प्राप्त होते असा त्यांचा समज आणि अनुभवसुद्धा असतो. आपल्या हातातले काम टाकून, स्वत:चे नुकसान करून कोणीही ट्रोलिंग करत नाही. आपला मुद्दा पटवून देण्याचा अट्टाहास सुद्धा लोक शेवटी सोडतात. पण ट्रोल तसे नाहीत. त्रास देणे आणि लक्ष वेधणे आणि त्यातून मूळ विषय मागे पडावा हेच त्यांचे काम आहे.
लक्ष वेधणे/सर्व फोकस त्यांच्यावर असावा 
सर्व फोकस त्यांच्यावर असावा अशी मनोवृत्ती ट्रोलिंगमागे असते. ट्रोल जे लिहितील त्या प्रतिक्रिया पुन्हा मांडल्या जाव्या, त्यावर वाद व्हावा, त्यात त्यांचे नाव पुन्हा पुन्हा यावे असे त्यांना वाटत असते. इतरांना त्रास देणे हा मूळ हेतूही असू शकतो. तुम्ही त्यांची वेगळ्या पोस्ट वा ब्लॉगमध्ये दखल घेतली तर उत्तमच! हे सर्व घडून यावे याकरता ट्रोल्स काहीही करू शकतात. तुमची स्तुती करतात, टीका, मुद्दाम भडकवणारे विचार मांडतात, निंदानालस्ती करतात.  कधी कधी अगदी हे किती मूर्ख आहेत असे वाटावे अशा प्रतिक्रियासुद्धा ट्रोल्स देतात.  त्यांना त्यांची चूक दाखवावी वा काही तरी लिहावे याकरता तुम्ही अखेर उद्युक्त होता.विनोदाने, शांतपणे, विचारपूर्वक असे काहीही केले तरी तुम्ही उत्तर देता ही महत्त्वाची बाब बनते हा मूळ मुद्दा आहे त्यामुळे ट्रोलिंग सुरुच राहते.
संयम न ठेवणे,  धडा शिकवण्याचा प्रयत्न आणि उपहासाने ट्रोलिंगला खतपाणी मिळते. ते थांबत नाही. लक्ष वेधता आले आहे आता थोडा जास्त त्रास कसा देता येईल? जास्त वेळ कसा खाता येईल या पुढच्या पाय-या ट्रोलच्या मनात असतात  हे ध्यानात असू द्या. तुमचे लक्ष वेधले की त्यांचा अहंकार सुखावत असतो. 

ट्रोलिंगचा प्रतिसाद कसा द्याल?
वॉलवर आलेल्या प्रतिक्रियेला उत्तर देणे, त्याची नोंद घेणे या आवश्यक बाबी आहेत त्यामुळे तुमची विश्वासार्हता वाढते हे कायम लक्षात असू द्या. पण हे करतांना नकळत ट्रोलिंगला कधी कधी उत्तेजनही दिले जाते हे ओघाने आलेच. मग या ट्रोलिंगपासून कसे बाजूला होता येईल? 
१.उत्तरात पुरावे आणि जे सिद्ध करता येते तेवढे मांडा.
२. वातावरण हलकेफुलके होईल एवढाच विनोदाचा वापर करा.उपहासाचा वापर कमी करा.
३.तुमच्या पेजवर/ प्रोफाईलवर कसा प्रतिसाद असावा याचे नियम मांडा, ते स्वत: पाळा, इतरांना त्याची जाणीव करून द्या.
४.सार्वजनिक मंचावरचे शिष्टाचार सोडून प्रतिसाद देऊ नका, तुमचा तोल जाणे हे ट्रोलना सुवर्णपद्क मिळण्यासारखे आहे!
५. ब्लॉक करणे, अनफ्रेंड करणे हे शेवटचे पर्याय आहेत, योग्य समज द्या आणि दूर्लक्ष करा.
६. ट्रोलला धडा शिकवतांना आपण ट्रोलिंग करत नाही ना हे भान असू द्या.
७. ट्रोल्सकडून जीव घेण्याची धमकी, भीती वा कोणतेही शोषण होण्याची शक्यता असेल तर कायदेशीर इलाज करा. 

तुम्ही सोशल मेडिया संबंधित व्यवसाय वा नोकरीत असलात तर ट्रोल्सचा सामना कसा करायचे ते ठरवावेच लागते. तसेच प्रत्येकाने ठरवावे. ट्रोल्सचा त्रास व्हायला लागला की  जास्त थंड डोक्याने विचार करा. इंटरनेटला सरावलेले लोक ट्रोलिंगलाही सरावतात. जे मानपमान बाजूला ठेऊ शकतात ते शक्यतो ट्रोल्सच्या जाळ्यात अडकत नाहीत व  महत्वाचा वेळ घालवत नाहीत. तुमचा स्वभाव कसा आहे, विरोधी मताचा स्वीकार कसा करता त्यावर तुमची सोशल मिडियावरची प्रतिक्रिया अवलंबून असते. सोशल मेडियावर दिसणारी टीनएजर्स आणि साठीच्या आसपासच्या लोकांची सहनशक्ती  यात खूप फरक आहे. तुमचा सोशलमेडिया वा ब्लॉगवर वावर जेवढा कमी, तुमचे स्थान , दर्जा जेवढा वरचा तेवढा मानाच्या संकल्पना, अस्मिता जास्त धारधार होतात असे दिसते. सोशलमेडियावर होणार  विरोध आणि ट्रोल्स यात फरक करतांना कधी कधी गल्लत होते. त्यातून जास्त मानसिक त्रास संभवतो. तुमच्या घराचे दार उघडे दिसले म्हणून कितीजण आत घुसतात आणि शिवीगाळ करतात? असे काही घडायला सबळ कारण लागते. पण आभासी जगात कुठलेही कारण नसतांना जी शिवीगाळ होते, त्रास दिला जातो तो दूर्लक्ष केले तरच कमी होतो हे पक्के ध्यानात ठेवा.
-सोनाली जोशी

 

About the Author

सोनाली's picture
सोनाली

मिळून सा-याजणी, मेनका , रोहिणी, अक्षर मासिकातून लेखन प्रसिद्ध.

लोकमत, लोकसत्ता, सकाळ, मटा या पेपरातून कविता, लेख 

शक्यतेच्या परिघावरून कविता संग्रह