कार, कुकीज आणि किसमिस

कार, कुकीज आणि किसमिस
     त्यावेळी आम्ही अमेरिकेत "बॅटन रूज" या गावी राहत होतो. मला अमेरिकेत येऊन जेमतेम आठवडा झाला होता. अजून ड्रायवर्स लायसन्स मिळाले नव्हते.  डिसेंबर महिना होता. ख्रिसमस जवळ आला होता. इमारती, ऑफिसेस, मॉल्समधे रोषणाई आणि सजावट होती. ल्युसियाना स्टेट युनिव्हर्सिटीपासून ५ मैलांवर आमचे अपार्टमेंट होते. एक बसस्टॉप जवळच होता. कुठे एकट्याने फिरायचे असेल तर माझ्यापुढे बसने जाणे अथवा चालत जाणे हे दोनच मार्ग होते.  रोज फिरण्याकरता टॅक्सी परवडणार नव्हती. घरी कंम्युंटर, इंटरनेट नव्हते. (आजच्या काळात ही दुसरी गोष्ट डिव्होर्स होण्याकरता पुरेशी असते म्हणतात. असो.) 
            ईमेल्स आणि युनिवर्सिटीसाईटस अभ्यास , लर्नर्स लायसन्स परीक्षा असा भरगच्च अजेंडा घेऊन मी अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या बिझनेस सेंटरमधे जात असे. तिथल्या पब्लिक कंम्प्यूटरवर दिवसाचे तीन चार तास घालवायचे.. त्या अपार्टमेंट रेंटल ऑफिसमधल्या मुली माझ्या सभोवताली वावरायच्या. माझ्याकडे एक कटाक्ष टाकून त्या पुढे जात.  अपार्टमेंट भाड्याने घेण्याकरता बाहेरची माणसे या ऑफिसात यायची. महिन्याचे भाडे देण्याकरता, दुरुस्ती वा अपार्टमेंटबद्दल तक्रारी घेऊन तिथे राहणारे लोक येत असत. "तेव्हा हाय? हाऊ आर य़ू? गुड मोर्निंग" असे ह्या मुलींचे ठरवलेले चाकोरीतले बोलणे मी बघितले होते. आलेली माणसे गेली की मग दबक्या आवाजात या मुली त्यांच्याविषयी चर्चा करत. 
 दोन अडीच आठवडे गेले होते. त्यानंतर मग आमचा थोडा परिचय वाढला होता. त्या कॉम्प्लेक्समध्ये एक भारतीय कुटुंब आहे एवढी माहिती मला त्यांनी दिली होती. प्रायवसी राखण्यासाठी इतर कोणतेही डिटेल्स मला सांगितले नव्हते. प्रदेश, लोक, त्यांच्या चालीरीती यांची विशेष माहिती न घेता मी अमेरिकेत आले. त्यामुळे अनेक प्रश्न पडत, काही गोष्टी शिकण्यात वेळ जाई. पण खूप गमती झाल्या. इथे राहण्याची लज्जत वाढली यात शंका नाही. 
     "अमुक एखादी गोष्ट घडली तर आम्ही जबाबदार नाही" अशा डिस्क्लेमरची आता मला सवय झाली होती. तरी पावलो पावली कुणीतरी आपल्यावर केस करेल अशा भीतीच्या छायेत इथली काही माणसे असतात असे मला जाणवले होते. कडक कायदे आणि अंमलबजावणी इथे असते हे मी ठिकठिकाणी वाचत होते. फर्निचर, फ्रेम्स, शोपिसेस यांची निवड ऑफिसच्या डेकोरला शोभेल अशी होती. म्हणूनच तिथे एका ट्रेमधे रचून ठेवलेल्या कुकीज फक्त शोभेच्या असाव्यात असा माझा समज होता. त्या कुकीज सेंटेड असतील ही शक्यताही मनात आली होती. पण एकदा तिथे आलेल्या एका माणसाने कुकी उचलून खायला सुरुवात केली. ते बघून मी आश्चर्यचकित झाले होते. दुकानात, मॉलमध्ये एरवी कोणत्याही वस्तूवर काहीतरी फ्री वा सेलच्या मागे जाणारी जनता मी पाहिली होती. तिथे त्या ट्रेवर कुणाची पाळत होती असे नाही. पण आठवडाभर मी होते तोवर तरी त्या ट्रेमधल्या कुकीज कधी संपल्या नव्हत्या. किमान ते माझ्या लक्षात आले नव्हते. वागण्यात दिसतं शिस्त आणि हे लोक शिष्टाचार कसोशीने पाळतात असे वारंवार जाणवले होते. जी लहान मुले तिथे वावरत असत तीही शिस्तीत. एक तर मुले स्ट्रोलरमधे असत. त्यांच्या तोंडात पॅसिफायर असे. ती पालकांच्या इशाऱ्यानुसार वागत असे दिसे.  एखाद्या मुलाने ऑफिसात ज्यूस सांडला असेल तोच काय तो अपवाद. बाहेर असणाऱ्या स्विंमिंगपूलवर वा टेनिस कोर्टावर थोडाफार गलका असायचा. विकेंड पार्टीज म्हणजे मोकळे वातावरण.! थोडक्यात सांगायचे तर  शांतता, खूप कमी माणसे दिसणे, कमी बोलणे या सर्वाची सवय करून घ्यावी लागणार असे दिसत होते. 
 महिना संपत आला होता.  त्या मुलींशी जुजबी बोलणे होऊ लागले होते.  महिनाभरात मी कुठून आले, किती काळ इथे राहणार, केव्हा आले ही माहिती त्यांनी करून घेतली होती. त्यांच्याविषयीही मला थोडी माहिती मिळाली होती. "अरेंज्ड डेट" ठीक आहे पण तशाप्रकारे लग्न करण्याची कल्पना त्या मुली करू शकत नव्हत्या असे एक जण म्हणाली. ब्रेकअप बद्दल सहज बोलता येण्याइतके ते अपेक्षित असावेत असे मला त्यांच्या बोलण्यावरून वाटले.
थोडे सावकाश आणि शब्दांवर जोर देऊन बोलले की यांना आपले बोलणे कळते हे माझ्या लक्षात आले होते. त्यामुळे मी सहज संवाद सुरू करत होते. एक दोन शब्दांचे उच्चार त्यांना कळले नाहीत तेव्हा चक्क कागद पेन घेऊन मी काही शब्द लिहून दाखवले.  भारतातून आलेल्या माणसांचे इंग्रजी उच्चार ब्रिटिशांसारखे असतात म्हणे. अर्थात तेव्हा याचा गंधही नव्हता. थोडक्यात टीव्हीवर दिसणारी माणसे, त्यांचे बोलणे आणि प्रत्यक्षात भेटणाऱ्या माणसांचे उच्चार जरा वेगळे होते हे उमगले. भाषा सारखी असली तरी उच्चारांना प्रादेशिक फ्लेवर, शब्दांच्या अर्थछटा, वापर वेगळा होता हे हळूहळू समजले. 
 "LA "असा शोर्ट फॉर्म असलेले ल्युझियाना राज्य, "लॉज अ‍ॅंजेलीस" मनात ठेवून आलेल्या प्रत्येकाचा भ्रमनिरास होईल एवढे छोटे आहे.  तसे फार प्रगत नसलेले आणि बरेचसे जुन्या वळणाचे!  तिथे असणारी आफ्रिकन अमेरिकन, मेक्सिकन लोकसंख्या नजरेत भरेल इतकी आहे. या आणि इतर गोष्टी तिथे येणाऱ्या लोकांच्या बोलण्यातून कळत. काही माहिती इंटरनेटवरून मिळाली होती. 
              मध्यभागी आणि अगदी गेटजवळ असलेल्या रेंटल ऑफिसमध्ये ज्या जागेवर मी बसत असे तिथे एक दोन मोठ्या खिडक्या होत्या त्यातून गेटमधून आत आलेले प्रत्येकजण दिसे असे म्हटले तरी चालेल. याउलट माझ्या अपार्टमेंटच्या बाल्कनीतून फक्त या मोठ्या वस्तीचा एक कोपरा दिसत असे.  आठवड्यातून दोन वेळा सकाळी दहाच्या दरम्यान कचरा नेणाऱ्या गाड्या येत. अनेक इमारतींपैकी कुठेतरी लॉनची निगा, झाडांना आकार देणे, फुलांची रोपे लावणे असे बागकाम करणारे येत. दुपारी बाराच्या आत मेलमन सगळ्यांची पत्र, पार्सले घेऊन येई.  या सगळ्यांच्या वेळा ठरलेल्या होत्या. दुपारी एकच्या दरम्यान एक मर्सिडिज अपार्टमेंट कॉम्प्लेक्स्च्या गेटमधून आत येई. ती आली की त्या मुली एकमेकींकडे इशारे करत, तिथल्या एका मुलीला चिडवत. साधारण तासभराने तीच कार बाहेर जाई. गेट उघडता उघडता हात बाहेर काढून एकजण बाय करत असे. त्या दिवशी बहुतेक शुक्रवार होता. एक दोनदा सहज बोलता बोलता त्या मुलींनी मला कुकी हवी का असे विचारले होते. त्या दिवशी एकीने चक्क ट्रे उचलून आणला. मी नुकत्याच त्या कुकीज गरम केल्या आहेत की माहितीही दिली. ती आनंदात असावी. तिने पुढे केलेली कुकी मी घेतली. पगाराचा दिवस हे आनंदाच कारण असेल का? मी गप्प राहिले. पण विचार मात्र सुरू होते. 
 आमच्या अपार्टमेंटपासून अर्ध्या मैलावर एक बुकस्टोअर होते.  एक छोटा मॉल होता. तिथे मी दोन एक तास जायचे. ते अंतर चालून जाणारे फार कुणी दिसले नव्हते. मध्ये एक छोटा पूल आणि त्या रस्त्यावरून वाहने वेगाने जात. ५० मैल ताशी वेग हा तेव्हा माझ्यादृष्टीने जास्तच होता.  अनुभव आणि पुस्तकाचे वाचन या दोन्हीतून माणसाचे वागणे उलगडत जाते असे मला वाटते. वाचनाची आवड असण्याचे हेही एक कारण होते. मी त्या बुकस्टोअरकडे चालत जातांना वाहनांतून लोक चमत्कारिक नजरेने बघत हे अजूनही लक्षात आहे. जॉगिंग वा सायकलचा ट्रॅक नसेल तर चालत जाणाऱ्या माणसाकडे लोक विचित्र नजरेने पाहतात हे मी ऐकले होते. " एक तर ही व्यक्ती वेडी आहे, भिकारी आहे वा गुंड आहे की काय ". असे भाव लोकांच्या नजरेत स्पष्ट दिसत. पण माझ्या मनात मात्र उलट भीती होती! क्रेडिट कार्ड आणि थोडी कॅश बरोबर घेऊन जाता जाता कधीतरी मनात यायचे आपल्याला काही झाले तर?
                  तेव्हा एखादे आयकार्डही माझ्याजवळ नव्हते, पासपोर्ट कुणी चोरला तर या विचाराने तो दरवेळी नेणे जास्तच रिस्की वाटे. सेल फोनचा  प्रश्नच नव्हता. पण नवीन शिकण्याची ओढ जास्त होती. एकदा त्या मॉलच्या गेटमधून आत शिरले की सुरक्षित वाटे.  तिथल्या बुकस्टोअरमधे मी अनेक उत्तम पुस्तके शांतपणे बसून वाचली आहेत. कॉफी शॉप्स, सॅन्डविच प्लेसेस, रेस्टॉरेन्टसमधल्या वातावरणाची ओळख त्या दोन एक तास एकट्याने फिरण्यामुळे झाली..  एकही ओळखीची व्यक्ती नसतांना तिथे असणारी वर्दळ, गोंगाट, रहदारीची मला सोबत वाटे. मी अनेकदा बघितले होते की एकमेकांना ओळखणारी माणसे चटकन गालावर, कपाळावर ओठ टेकवून स्वागत करत, वा निरोप घेत. प्रेम आणि प्रेमाचे जाहीर प्रदर्शन हा एक वेगळाच मुद्दा! त्याकरता जगाची लाज बाळगावी लागत नाही हे अमेरिकेत फिरताना मॉल्स, बुकस्टोअर्स सगळीकडे जाणवत होते..प्रेमात आकंठ बुडालेले प्रेमी बघण्याची सवय झाली होती. पण एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला तसे बघणे हा विचार मनात येताच संकोच वाटायचा. त्या दिवशी चालता चालता अचानक मी थबकले- एक मुलगी ओळखीची आहे असे वाटले. तिच्या भोवती हात टाकून एकजण चालत होता. ती रेंटल ऑफिसमधली- कुकी देणारीच मुलगी होती. ती दोघे पार्कींगलॉट मधल्या मर्सिडिजकडे गेली. त्याने तिच्याकरता कारचे दार उघडले, तिचा चेहरा त्याच्या जवळ आला.. तेवढ्यात रिव्हर्स घेत एक गाडी समोर आली. नंतर मला फक्त जाणारी मर्सिडिज दिसली. नंबर प्लेट ओळखीची होती हे वेगळे सांगायला नको. 
त्यानंतर तो मुलगा त्याच्या आजीला भेटायला आमच्या कॉम्प्लेक्समध्ये यायचा इत्यादी अनेक गोष्टी समजल्या. माझे "वेलकम टू अमेरिका" या अपार्टमेंटमुळे झाले एवढे नक्की. 
चॉकलेट कुकी जिभेवर ठेवतांना वा मर्सिडिस कार समोर आली की आजही त्या मिस केलेल्या Kiss ची आठवण येते. 
सोनाली जोशी
sonali.manasi@gmail.com
 

About the Author

सोनाली's picture
सोनाली

मिळून सा-याजणी, मेनका , रोहिणी, अक्षर मासिकातून लेखन प्रसिद्ध.

लोकमत, लोकसत्ता, सकाळ, मटा या पेपरातून कविता, लेख 

शक्यतेच्या परिघावरून कविता संग्रह