इंतजार का फल

इंतजार का फल
"इंतजार का फल मीठा होता है" हे वाक्य लहानपणी ऐकल तेव्हा माझ्या वर्गातला एक मुलगा म्हणाला होता "म्हणजे डायबेटीस झालेल्या लोकांच्या काही कामाच नाही ते!"

 सगळा वर्ग हसला होता. बाई त्याला आणि आम्हालाही रागावल्या होत्या. त्यांनी त्याचा अर्थ समजाऊन सांगितला होता. पुढे जेव्हा जेव्हा खूप प्रयत्न करून एखादी गोष्ट घडत नाही म्हणून निराश व्हायची वेळ येत असे तेव्हा कुणी तरी या मिठ्या फलाची आठवण करून देणार भेटत गेल.

आपल काम लवकर पूर्ण व्हाव अस वाटत असत.  ते पुर करण्याची अनेकांना घाई सुद्धा असते. कधी कधी त्या करता आपण चटकन निर्णय घेतो. मग ते निर्णय चुकले अस जाणवत. त्यावेळी वाटत जरा थांबलो असतो, वाट पाहिली असती, नीट निर्णय घेता आला असता का? अभ्यासक्रमाची निवड, जोडीदाराची निवड, नोकरी अशा महत्त्वाच्या घटनां कधी चटकन होतात तर कधी रखडत जातात. त्या मनासारख्या आणि लवकर झाल्या तर वाट बघावी लागत नाही. पण जर ते निर्णय चुकले तर वाट बघितली वा का बघितली नाही या दोन्हीवर आपण बराच वेळ विचार करतो. अनेकदा पश्चात्ताप करतो. कुणाला तरी मनातले बोलून दाखवतो, आधार शोधतो. आपल्या सहनशक्तीच्या पलिकडे वाट बघावी लागते आहे हे नमूद करतो. अशावेळी कुणी तरी म्हणत इंतजार का फल मीठा होता है!

ते वाक्य अशावेळी काहीही आधार देत नाही तर जखमेवर मीठ चोळत! चाळीशीच्या उंबरठ्यावर असलेली अर्धी जनता आधीच्या दोन पिढ्यांसारखी मनाच्या कोप-यात कुठतरी या वाट बघण्यावर विश्वास ठेवते आहे. पण मनात तिलाही त्यातला फोलपणा ठाऊक आहे. परवाच एक मैत्रीण म्हणाली वाट बघून बघून इंतजारचा अतिरेक झालाय- फल मिळेल त्याआधीच डायबेटीसने मरण येईल!

लहानपणापासून वाट बघण्याचा अतिरेक आणि अतिघाई यामधला फरक कसा करायचा याचे शिक्षण देणे आवश्यक आहे. त्याने कृती करतांना एक जबाबदारीची जाणिव होईल. वागण्यात योग्य ठिकाणी संयम आणता येईल. त्यामुळे आपल्या हक्कांसाठी योग्य वेळेआधी चुकीचा मार्ग कदाचित आपण टाळू शकू.  त्यामुळे इतरांवर अन्याय होणार नाही. हे सर्व वाचायला सुद्धा कितपत योग्य वाटत? थांबण्याचा, वाट बघण्याचा अतिरेक झाल्यामुळे आता संयम हा शब्द हद्दपार होऊ लागला आहे. तर दुसरीकडे अन्याय मान्य करण्याची हतबलता वाढली आहे.  दोन टोकाचे विचार स्वीकारणे सोपे जाते त्याचा परिणाम असावा. त्यापेक्षा सुवर्णमध्ये काढणे नेहमीच अवघड असते.

सुदैवान हे वाट बघण सुद्धा किती वेगवेगळ आहे! ते सरसकट क्लेशकारक नाही.  आपल्या प्रिय व्यक्तीची वाट बघणारे, वाहनाची वाट बघणारे, एखादी आनंदाची बातमी येईल म्हणून वाट बघणारे आहेत. योग्य संधीची वाट बघणारे आहेत. काहीच करता येत नाही, कोणतच काम नाही, वेळ कसा घालवायचा म्हणून ताटकळत वाट बघणारेही अनेक आहेत. घराच्या खिडक्या, बाल्कन्या, अंगण आणि गच्चीवर ताटकळणारी अनेक माणस या वाट बघण्याचा अविभाज्य घटक आहेत.  हे वाट बघण एका काळाच्या घटकाशी बांधलेल आहे. तास, दिवस, महिने वर्ष ..नेमकी किती काळ वाट बघायची त्यावरून हे वाट बघण आनंदाच की दु:खाच ते आपण ठरवतो. जेव्हा हा काळ खूप असतो,  जेव्हा सहनशक्ती संपते तेव्हा हे वाट बघण मात्र आनंददायी राहत नाही. अनेकदा वाट बघण्याच्या यातनाचा सहन कराव्या लागतात.म्हणूनच  सिनेमा, कथा आणि गाण्याच्या, जाहिरातीच्या माध्यमातून आपण हे वाट  बघण खूपच सेलेब्रेट केले आहे.

वाट बघणारी, ताटकळणारी अनेक आयुष्य जन्माला येतात. ताटकळत जगतात. नको असत पण मरणाची वाट बघतात. प्रत्येकाच वाट बघत राहण तस त्याच्या दृष्टीन योग्य किंवा अयोग्य असत. काहींना हे वाट बघणे योग्य अयोग्य असण्याची जाणीव नसते. तेवढा विचार करण्याची मुभा त्यांना घेत येत नाही. याच लोकांना आपल्यावर अन्याय होतो ते सुद्धा कळत नाही. कळले तरी काही करता येत नाही. अनेक प्रयत्न करणारी  आयुष्ये  यश मिळाले नाही म्हणून असमाधानी असतात. पण तरी वाट बघत राहतात.  मग त्यांच्या निराशेचे आणि या असमाधानाचे परिणाम विविध प्रकारे दिसतात. एका पिढीकडून दुसरीकडे खूप वाट बघणे ते एकदम हक्कासाठी कृती अशी टोकाची मूल्ये जातात. अशी आयुष्य़ पाहिल्यावर माझा तर या इंतजार का फल वगैरेवर विश्वास राहिलेला नाही.

 लहानपणापासून मला एखादया गोष्टीचा अतिरेक म्हणजे काय हेच मुलांना समजाऊन सांगावे असे वाटते.  असमाधान हक्क मिळाला नाही की वाढत. ताणतणावांचे मूळ असमाधान आहे. जीवनशैली आणि आरोग्याचा त्याच्याशी थेट संबंध आहे. अनेक कारणांमुळे डायबेटीसच प्रमाण हल्ली खूप वाढल आहे, लोकांचे हृदय तर एवढे नाजूक झाले आहे की त्याला चाळीशीपासूनच जपावे लागते. मी कशालाच अपवाद नसेन. बदलत्या वातावरणानुसार त्या फळाची चवही बदलावी अस मला वाटत. असच अनेक पालकांनाही वाटत असाव. ती चव बदलायची म्हणजे सर्व सूत्र हातात असलेला शक्तीशाली गट व्हायचे असे नाही. वाट बघायची पण त्याचा अतिरेक वा  त्यातला स्वप्नाळूपणा मात्र नक्कीच दूर करायला हवा. दुसरीकडे संयम नाही अशी गत आहे त्यावरही तोडगा हवाच आहे.

 घरात वाढणारे लहान मूल जी निवड करत ती आईवडिलांचे अनुभव, संस्कार आणि त्यांच्या इच्छा या सर्वांच फलित असत.आताच्या काळात हिंदी गाणी, डायलॉग आणि थोर लोकांचे सुविचार ऐकून मूल मग शाळेत जात. तिस-या वर्षीच शाळेत घालण्याआधी त्या चिमुरड्याला त्या सुविचारांचा वापर फक्त भाषणात आणि इंप्रेस करायला करायचा असतो हा अर्थ चांगलाच माहिती असतो. ज्याच्या हाती सत्ता असते, पॉवर असते त्याला कोणताही इंतजार करावा लागत नाही हे त्याच्या बालमेंदूत ठसत जाते. पूर्वी कॉलेजात गेल्यावर हक्क वगैरेचा विचार करणारी मुले आता शाळेतच हक्काची भाषा बोलू लागली आहेत. मुलांनी हक्काची भाषा सुरू केली मग त्याच वेळी जिवंत असलेल्या दोन पिढ्यांच्या हक्काचे काय होणार?ती माणसे सुद्धा हक्क मिळाला नाही असेच म्हणतात. कुठेतरी गोची आहे हे नक्की!

 साधारण पंचविशीला नोकरी व्यवसाय सुरु करणारी मंडळी साठीला रिटायर होतात. सक्तीची निवृत्ती काहींना घ्यावी लागते.  त्यांना त्यात समाधान नसते. दुसरीकडे सर्व माणसे रिटायर  होतात का? नाही. हे रिटायर होणे कुणाला लागू आहे? त्यात समानता आहे का? सत्तरीच्या आईवडिलांचे बोलणे मनावर न घेणारी, त्याकडे दूर्लक्ष करणारी चाळीशीची पिढी आज प्रत्येक घरात आहे. आधी हे चित्र सरसकट असे नव्हते. या चाळीशीच्या पिढीला आपला बॉस रिटायर होण्याची, आईवडील गप्प बसण्याची वाट बघावी लागली. ते झाले नाही तर दूर्लक्ष करण्याचा मार्ग स्वीकारावा लागला.  पण हीच चाळिशीची पिढी साठ ते सत्तर वयोगटातल्या सर्वांना आपला नेता मानायला तयार आहे अस चित्र विसंगत वाटत नाही?जी हुकुमशाही घरात नको आहे ती लोकशाहीच्याच नावाखाली राष्ट्रावर चालेल हे योग्य कसे?  ती देशाकरता आवश्यक आहे अशी मते का तयार होतात? तेथे समान न्याय का नाही?

जरा विचार केला तर लक्षात येईल की वर वर समानता हवी असे आपण म्हणतो पण मुळात आपल्याला समानता नकोच आहे. आपल्याला फक्त आपला हक्क नाही तर हक्कापेक्षाही स्वार्थ

स्वार्थ, समानता, हक्क आणि वाट बघणे याचा जवळचा संबंध आहे. स्वार्थाचा चष्मा लावून आपण ती निवड करतो. कुठला स्वार्थ आणि कुठला हक्क हे समजते पण ते आचरणात आणता येत नाही.  म्हणून विषमता आणि वाट बघणे वाढते. त्याचा अतिरेक झाला की हिंसक वृत्ती सुद्धा!

ज्या गोष्ट समानतेच्या गटात येतात त्या सर्वांना मिळायला हव्यात. ते होत नाही. त्यातही अनेक जात, धर्म, सामाजिक स्थान, आर्थिक कुवत याचा वापर होतो आणि मग वाटणी होते. ती एका गटाकरता अन्यायकारक असते. एकीकडे आपल्याला आता या अन्यायाची सवय झाली आहे. तर दुसरीकडे आपण हिंसेचे बळी आहोत म्हणून तो हिंसक मार्ग अवलंबून आपल्याला विजय चालणार आहे. स्पर्धेचा आणि स्वार्थाचा रेटा यावर विचार करण्याकरताही वेळ देत नाही अस म्हणायच की झाल!

 घरात आणि सामाजिक जीवनात अनेक गोष्टीत विसंगती आपल्याला मान्य आहेत. घरात वा समाजात वावरतांना हिंसेचा मार्ग तर कधी योग्य होऊ शकतच नाही. जे एखाद्या व्यक्तीकरता योग्य नाही ते वागणे, ती निवड एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीकरता योग्य मानतो ही विसंगती नाही का?ही निवड आपण करतो. अशाप्रकारे वाट बघण्याचे आणि विसंगतीचे उदात्तीकरण आपण धन्यता मानत करतो.

एखाद्या उकीरड्याभोवती रेंगाळणारे कुत्रा ,डुकरे वा गायी या प्राण्यांपेक्षा माणसे वेगळी आहेत. म्हणून ती गरजेपेक्षा जास्त साठवतात, मिळवतात. हे दूर्दैव.  ती जास्त विचार करू शकतात. त्याला योग्य कृतीची जोड देऊ शकतात ही सुद्धा वस्तुस्थिती आहेच. प्राण्यांपेक्षा प्रगत मेंदूचा वापर काही हिरावून घेण्यासाठी, हिंसक होण्यासाठी करण अयोग्य आहे. इंतजार का फल हवय पण संयमित वागण्याने हे मुलांना सांगा. कदाचित एका पिढीनंतर हा इंतजार गोड होईल!
Sonali.manasi@gmail.com

 

 

 

About the Author

सोनाली's picture
सोनाली

मिळून सा-याजणी, मेनका , रोहिणी, अक्षर मासिकातून लेखन प्रसिद्ध.

लोकमत, लोकसत्ता, सकाळ, मटा या पेपरातून कविता, लेख 

शक्यतेच्या परिघावरून कविता संग्रह