बोस्टनमधली भटकंती

बोस्टनमधली भटकंती

बोस्टन

मॅराथॉन दरम्यान झालेल्या बॉम्ब स्फोटामुळे बोस्टन हे शहर बातम्यात झळकले होते. त्याआधी सागरी वादळ हे एक निमित्त होतेच ! मुळातच राज्याची राजधानी आणि त्या राज्यातले प्राचीन आणि सर्वात मोठे शहर म्हणून बोस्टन प्रसिद्ध आहेच. त्याला अमेरिकेतील  संपन्न असे आर्थिक, सामाजिक व ऐतिहासिक महत्त्व आहे.  ते प्रथम १६३० मध्ये वसले आणि शहर म्हणून १८२२ पासून मान्यता प्राप्त झाली. एक वसाहत वा समूहाची छावणी म्हणून अस्तित्वात आलेल्या या भागाचे नंतर सामाजिक आणि राजकीय परिवर्तनाची भूमी न्यु इंग्लंड भागात म्हणून ओळ्ख निर्माण झाली. आजच्या घटकेला बोस्टन हे विविध क्षेत्रात अग्रेसर असणारे शहर मानले जाते. यामध्ये मोठी औद्योगिक वसाहत, सायन्स आणि टेक्नोलॉजीचे माहेरघर, अद्ययावत वैद्यकीय़ सेवा आणि त्या क्षेत्रातले संशोधन याचा समावेश होतो. त्याशिवाय विविध सांस्कृतिक आणि क्रिडाक्षेत्राशी निगडित संस्थांची स्थापना वा त्यांची मुख्य शाखा बोस्टनलाच आहे. बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशानानंतर या शहरात भटकंती करण्याची संधी मिळाली. त्यावेळी पाहिलेल्या स्थळांचा आणि अनुभवांचा हा मागोवा.

ऐतिहासिक महत्त्व  व बोस्टन टी पार्टी म्युझियम

बोस्टन बंदरात गेले असतात तिथे टी पार्टी म्युझियम दिसते. इस्ट इंडिया कंपनी आणि ब्रिटीश राज्यकर्त्यांच्या विरोधात वसाहतीतल्या लोकांनी कित्येक टन चहा बोस्टन बंदरामध्ये पाण्यात फेकून दिला होता. चहाची नासाडी झाली अशी ही घटना पुढे १८३४ साली बोस्टन टी पार्टी म्हणून इतिहासात नोंदली गेली.. त्या घटनेचे महत्त्व म्हणून बोस्टनमध्ये टी पार्टी म्युझियम आहे. त्यात महत्त्वाचे फोटो, नोंदी आणि व्हिडीयो आहेत. म्युझियमला भेट देणा-यांना या घटनेचे प्रात्यक्षिक बघता येते वा तसे वेश घालून त्यात भागही घेता येतो.

त्या काळापासून राजकीय बंडखोरीसाठी बोस्टन टी पार्टी हा शब्दप्रयोग अस्तित्त्वात आला.

बोस्टन चिल्डरेन्स म्युझियम

बोस्टन टी पार्टी म्युझियमच्या विरुद्ध बोस्टन चिल्डरेन्स म्युझियमची मोठी इमारत उभी आहे. एखादी गोष्ट शिकण हे अधिक मनोरंजक व्हावे या हेतून या म्युझियमची निर्मिती केली आहे. कोणतेही करिअर करण्याची इच्छा मनात ठेवणा-या प्रत्येक मुलाकरता या म्युझियममध्ये काही ना काही शिकण्यासारखे आहे. इंजिनियर ते आर्टिस्ट काहीही व्हायचे असेल तरी. सोमवार ते शुक्रवार वेगवेगळे उपक्रम तिथे राबवले जातात. उन्हाळ्याच्या सुटीचे भरगच्च असे खास वेळापत्रक असते. आम्ही गेलो तो दिवस सोमवार होता- मेसी मंडे अशा पाट्य़ा तिथे लावल्या होत्या. लहान मुले वेगवेगळ्या रंगांनी भरलेल्या पिचकारी  वा स्प्रे करता येईल अशा बाटल्या घेऊन एक भलेमोठे कापड रंगवत होती. तिन्ही मजल्यावर मुलांची धावपळ सुरु होती. विविध संस्कृती, विविध देश, भाषा आणि कला याची ओळख करून देणारे हे म्युझियम जरूर भेट द्यावे असे आहे.

 

चायनाटाऊन
अमेरिकेच्या जवळजवळ प्रत्येक मोठ्या शहरात चायनाटाऊन नावाचा आशियाई/ ओरिएंटल वस्ती, खाद्यपदार्थ, दुकाने असलेला एक मोठा भाग असतो. बोस्टन त्याला अपवाद नाही. बोस्टनचे चायनाटाऊन अमेरिकेतल्या पहिल्या तीन क्रमांकात येणारे मोठे चायनाटाऊन आहे. पुढच्या महिन्यात तिथे मून फेस्टीवल आहे. त्याच्या तयारी सुरू झाली आहे असे दुकानदारांशी बोलले तेव्हा समजले. भारतात जसे चायनीज फूड प्रसिद्ध आहे  तसेच अमेरिकन मार्केटही या चायनॊज फूड ने काबीज केले आहे. थेट हातगाडीपासून अतिशय महागड्या रेस्टॉरेंटसमध्ये चायनीज रेस्टॉरेंटस येतात. फक्त भारतीय माणसाने जसे चायनीज फूड आपल्या चवीनुसार बदलून घेतले तसाच बदल इथेही झाला आहे. त्यामुळे खास मूळ चायनीज हॉटेले आहेत ती वेगळीच.या चायनाटाऊनमध्ये गेल्यावर किमतीची घासाघीस इत्यादी गोष्टी नजरेस पडतात अमेरिकेत अशा गोष्टी विरळाच!

हार्वर्ड आणि एम आय टी विद्यापिठे

जगभरात नावाजलेली दोन विद्यापिठे बोस्टन शहरापासून जवळ आहेत. ती म्हणजे हार्वड आणि मॅसेच्युसेट्स इन्स्टीटूट ऑफ टेक्नॉलॉजी( एम आय टी). दोन्ही विद्यापिठांना भेट द्यायचा योग जुळून आला.

कला, साहित्य,  विद्न्यान आणि तंत्रड्न्यान या सर्व विषयात अग्रेसर असलेले आणि संशोधनाचे माहेरघर असलेले एम आयटी बघतांना एक गोष्ट जाणवली ती म्हणजे इथे येणारे मंडळी शिकण्याचा ध्यास घेऊन आली आहेत. केवळ पैसा हे शॉर्ट टर्म ध्येय न ठेवता या मुलांना या विद्यार्थांना संशोधनात, शिकण्यात त्या क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यात खरा रस आहे. ठिकठिकाणी विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक यांचा संवाद सुरु होता, विदयार्थी एकटयाने वा समूहाने बसून चर्चा करत होते, अभ्यास करत होते. त्याच वेळी आमच्यासारखे भेट देणारे लोक कुतूहलाने सर्व विभाग,सर्व विद्यापीठ बघत होते. विविध राज्यातून , विविध देशातून इथे विद्यार्थी येतात. जगातील विविध समस्यांवर इथे चर्चा, संशोधन सुरु असते आणि उपाय सुद्धा सुचवले जातात.

हार्वर्ड विद्यापिठाची लॉ स्कूल आणि मेडिकल स्कूल विशेष प्रसिद्ध आहे. या इमारतींचे मूळ बांधकाम पाहिले तर ब्रिटीशकालीन इमारतींची आठवण होते. आपल्याकडचे मुंबई विद्यापीठ्, पुणे विद्यापीठ, पुण्याचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय .. फक्त ही विद्यापिठे खूप मोठी आणि पसरलेली आहेत. त्यात अनेक विभाग आणि शाखा आहेत. जागोजागी पर्यावरण विषयी सजग असे वातावरण होते. ज्याला फॉर्मल म्हणू असे वातावरण नसले तरी एक शिस्त होती.

या दोन्ही विद्यापिठात आम्हाला भारतीय विद्यार्थी आढळले. पण त्यांची संख्या भरमसाठ वगैरे नाही. या विद्यापिठात प्रवेश मिळणे ही अतिशय अवघड गोष्ट आहे. अमेरिकेत राहणारे आणि अमेरिकाबाहेरचे असे दोन्ही भारतीय विद्यार्थी एकमेकांशी त्याकरता स्पर्धा करतात असे म्हटले जाते. या विद्यापिठांनी मुद्दाम त्याचे वैशिष्ट्य जपले आहे. तिथले फर्निचर, प्रत्येक वस्तू, त्याची आखणी मांडणी यामागे विचार केला आहे आणि बघणा-या तो स्पष्ट दिसतो.

उन्हाळ्यात कडक ऊन आणि उरलेले वर्षभर कडाक्याची थंडी, हिवाळ्यात खूप बर्फ असे बोस्टनचे हवामान आहे. इथे वसंत आणि सर्व ऋतू ठळकपणे दिसतात. निसर्ग अतिशय विलोभनीय आहे. शहरात अनेक ठिकाणी छोट्या छोट्या टेकड्यांवर घरे बांधलेली आहेत.

इतर ठिकाणांपेक्षा बोस्टनला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. पण त्याचबरोबर प्रचंड महागाई, वाढती लोकसंख्या आणि गर्दी, ताणतणाव आणि वेग आहे. त्याच बरोबर अटळ असा वाहतुकीचा खोळंबा आहे. बोस्टनचे कारचालक अमेरिकेत कुशल कारचालक म्हणून तर ओळखले जातात.  पण त्याच बरोबर इथे अतिशय धोकादायक पद्धतीने ड्रायव्हींग होते ते सुद्धा पटते. हे जगातील कोणत्याही मोठ्या शहरात असलेले चित्र बोस्टनला लागू आहे. विद्यापिठे आणि शहराचे काही भाग यामध्ये फिरतांना सायकल चालवणारे दिसतात. आधुनिकता आणि आर्थिक सुबत्तेच्या प्रदर्शनाबरोबर - टोकाची गरीबी इथे आहे. या दोन जीवनशैलीत असलेली दरी स्पष्ट आहे. शहरातले काही भाग बकाल आहेत. काही डोळ्याचे पारणे फिटेल एवढे संपन्न आणि अत्याधुनिक. तरूण मुले बोस्टन , सॅन फ्रान्सिस्को, न्य़ू यॉर्क अशा प्रथम श्रेणीच्या शहरात येतात, तिथे स्थाईक होतात, अर्थार्जन करतात आणि रिटार्यंमेंट नंतर अनेकजण मात्र दुस-या तिस-या श्रेणीच्या शहरात वा आपल्या खेडेगावात जाणे पसंत करतात असे आढळते ते उगाच नाही.

 रस्त्यावर भिकारी दिसले ते बोस्टनच, मर्सिडीज आणि इतर कार दिसल्या तेही बोस्टन. आपल्या मोबाईलवर , आयपॅड्वर मग्न लोक दिसले, तसेच शहराच्या मध्यभागी झाडाखाली बसून बुद्धीबळ खेळणारे लोक दिसले ते सुद्धा बोस्टनमध्येच!

 

 

About the Author

सोनाली's picture
सोनाली

मिळून सा-याजणी, मेनका , रोहिणी, अक्षर मासिकातून लेखन प्रसिद्ध.

लोकमत, लोकसत्ता, सकाळ, मटा या पेपरातून कविता, लेख 

शक्यतेच्या परिघावरून कविता संग्रह