एअरबीऍन्डबी (Airbnb) आणि विश्वचि माझे घर...

 

यंदाची इटलीची ट्रीप पूर्णपणे Airbnb मध्ये राहून केली. या आधी कामासाठी केलेल्या प्रवासात Airbnb खूप वेळा वापरलं होतं, यंदा पर्सनल ट्रिपसाठी पहिल्यांदाच वापरलं आणि मी (आम्ही) अफाट हॅपी आहोत!

तीनेक वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा Airbnb बद्दल ऐकलं. माझी सध्याच्या कंपनीसाठीची पहिली US ट्रिप होती, बाराएक वर्षांनी US ला येणार होतो आणि माझ्या अमेरिकन सहकाऱ्यांनी Airbnb बुक करायला सांगितलं. तो पहिला अनुभवच भन्नाट होता! बॉस्टनच्या डाऊनटाऊनमधल्या एका उंच इमारतीतला २५व्या मजल्यावरच्या फ्लॅट भाड्यानी मिळाला, जवळपासच्या हॉटेल्सपेक्षा अत्यंत कमी किंमतीत. लै म्हणजे लैच भारी वाटलं तेंव्हा.

मग तेंव्हापासून सर्व प्रवासांसाठी Airbnbच वापरायला लागलो आणि गेल्या तीन वर्षांत वीस-तीस वेळा वापरलं असेल. प्रत्येक वेळचा अनुभव वेगळा होता, पण तरीही यापुढेही कोणत्याही प्रवासासाठी शक्य असेल तिथे Airbnbच वापरीन मी! Airbnb ही फक्त मध्यस्त कंपनी कम वेबसाईट आहे. 'Bed and Breakfast (BnB) ह्या युरोपातल्या लोकप्रिय प्रकारातून ती सुरु झाली. प्रवासाला गेल्यावर खर्चिक हॉटेलमध्ये रहाण्याऐवजी अत्यंत कमी खर्चात कोणाच्यातरी घरी रहाणं ही प्रवाशांची गरज आणि आपल्या घरची एखादी जादाची खोली (किंवा आपलं रिकामं असलेलं सेकंड होम) प्रवाशांना भाड्यानं देऊन थोडे पैसे कमावणं ही घरमालकांची गरज या दोन्हीतून युरोपात BnB कल्पनेचा जन्म झाला. ह्या BnB चं आधुनिक इंटरनेट युगातलं रूप म्हणजे AirBnB.

Airbnb च्या साईटवर घरमालक आपली घरं किंवा घरातल्या खोल्या 'लिस्ट' करतात. (म्हणजे उपलब्ध आहेत असं सांगतात) आणि प्रवासी आपल्या सोयी नुसारच्या खोल्या किंवा घरं शोधून ती बुक करतात. घरमालकांना भाडं मिळतं आणि प्रवाशांना घरापासून दूर आपलं घर मिळतं, तेही हॉटेलपेक्षा अत्यंत कमी किमतीत. Win-win situation!

****

गेल्या तीन वर्षांत चार-पाच देशांमधल्या वीस-तीस AirBnB च्या घरांमध्ये राहिलो. खूप वेगवेगळ्या प्रकारचे घरमालक भेटले. काही अगदी बोलघेवडे, फ्रेंडली खूप मदत करणारे, काही अबोल, खडूस, काटेकोर वागणारे. खूप घरांमध्ये राहिलो. काही अत्याधुनिक, शहराच्या मध्यातली, सर्व सोयी सुविधा असलेली काही जुनीपुराणी, शहरापासून दूर असलेली, बेसिक सुविधाही नसलेली. पण प्रत्येक वेळी मी जितके दिवस रहात होतो तेंव्हा एकदाही घरमालक मला डिस्टर्ब करायला आला नाही. पूर्णवेळ मी त्या देशा-शहरा-गावातलं 'माझं घर' म्हणूनच तिथे रहात होतो!

****

हे विलक्षण भन्नाट आहे! AirBnB मुळे जगातल्या कोणत्याही शहरा-गावात आपल्याला, तात्पुरतं का होईना, पण जसं हवं तसं 'स्वतःचं घर' घेता येणं शक्य झालं आहे... आणि तिथे जाऊन आपलंच घर असल्यासारखं मनसोक्त रहाणंही शक्य झालं आहे...

'जो जे वांच्छिल तो ते लाहो' हेही अनुभवणं शक्य झालं आहे... आणि 'विश्वचि माझे घर' हेही....

अनुभवुन बघा!

-प्रसाद शिरगांवकर

About the Author

प्रसाद शिरगांवकर's picture
प्रसाद शिरगांवकर

Writer, Poet, Photographer, Drupaler!!