कभी अलविदा ना कहेना

कभी अलविदा ना कहेना 

घरी आलेले पाहुणे जायला लागले की रडणारे, हट्ट करून लक्ष वेधणारे मूल तुम्ही पाहिले आहे का? माझी गणना त्या मुलांमध्ये होते. मोठे झाले तरी एकंदर कुणी दूर जाणार या भावनेनं मला कसंस होत. एकंदरीत निरोप घेणे वा देणे या दोन्ही गोष्टी माझ्याकरता तितकया सोप्या नसतात. प्रवासाच्या निमित्त्याने भेटणारी माणसे, मित्रमंडळी, नातेवाईक अशा कोणत्याही निरोपाच्या वेळी मला कमी अधिक अस्वस्थता जाणवली आहे. आज मात्र एकंदर या भेटीगाठींनी समृध्द केले आहे याबाबत दुमत नाही. टोकाची संवेदनशीलता आता बोचत नाही.

अमेरिकेतून येत असतांना जेव्हा मुंबई एअरपोर्टवर विमान उतरते तेव्हा डोळे भरून येतात. भारतातून परततांना नेहमी एक विचित्र उदासवाणं वाटत. या दोन्ही गोष्टींची तीव्रता जरी कमी झाली असली तरी मी या दोन्ही गोष्टी टाळू शकलेले नाही. भारतातला मुक्काम कसा होता यावर बरंच काही अवलंबून असतं. फक्त नातेवाईकांना भेटण्यासाठी केलेल्या वा-या अर्थातच जास्त हळवे करतात या शंका नाही. नातेवाईकांना आणि मला दोघांनाही होणारा हा भावनिक त्रास कमी व्हावा म्ह्णून एअरपोर्टवर म्ह्णून आताशा मी एकटीच एअरपोर्टवरून जाणे येणे करते. त्यामुळे काही तास आधीपासूनच मनाची दूरच्या प्रवासाची तयारी झालेली असते. गेल्या दोन तीन ट्रीप्स मात्र वेगळ्या होत्या. अगदी निघेपर्यंत मित्रमैत्रिणींच्या गाठीभेठी सुरु होत्या. त्यामुळे ऐनवेळेवर बॅग भरणे असा नवा अनुभव घेता आला. त्याचा उलट परिणाम मात्र असा झाला की एअरपोर्टवर एकदमच एकटे वाटायला लागले.

 माझ्या भोवती असलेली माणसे भारतीय असतात त्यामुळे नकळत एक सहजता वागण्यात येते हे मी अनेकदा पाहिले आहे. मुंबईत आणि पुण्याला टॅक्सी किंवा रिक्षाने शहरात भटकंती करणे मला स्वत: ड्राईव्ह करण्यापेक्षा सोयीचे वाटते. माझ्या बोलण्यामुळे वा उच्चारामुळे मी भारताबाहेर असते हे समजत नाही.पण बदलत गेलेल्या वस्तीच्या, जागेच्या खुणा परिसर अनोळखी असल्याचे माझ्या चेह-यावरून सहज दाखवत असाव्यात. अशावेळी गप्प राहण्यापेक्षा ड्रायव्हरशी बोलणे मी पसंत करते. 
एक स्त्री आपल्याशी बोलते याचा आश्चर्यापेक्षा इतर कोणताही अर्थ सुदैवाने अजून कुणी घेतला नाही. अमेरिकेत मात्र असे बोलणे व्हायला वेळ लागतो.  अमेरिकेत असतांना कितीही उत्सुकता आणि आगाऊपणा अंगात असला तरी त्याला मुरड घालून मी चारचौघात वावरते. या भारतभेटीमधले तीन चार किस्से सांगण्यासारखे आहेत. पुण्यात एका ड्रायव्हर ला दोन तीनदा सारखा फोन आला. त्याने तो बंद केला. शेवटी मी
म्हणाले घे अर्जंट असेल काही. आवाज स्त्रीचा असावा. त्याने तिला काय करायचे ते सांगितले.
  आई की .. मी प्रश्न केला.
बायकोच आहे, लग्न झालं आहे माझं.
"एवढ्यात झालेलं दिसत आहे?" मी विचारलं
नाही.वर्ष झालं.
तुझ्या आणि तिच्या बोलण्यावरून असं वाटलं नाही मला,.
तो हसला. पळवून आणलं तिला. मग लग्न केल,.
मी चटकन दोघांची वयं विचारली.
 " जातीबाहेर लग्न केल का?" माझा पुढचा प्रश्न 
"नाही. माझा धंदा पसंत नाही तिच्या घरच्यांना "
"काय चुकलं त्यांचं? रात्री बेरात्री येणार जाणार तू, किती कमवतोस, किती खर्च करतोस, शिवाय नशापाणी .तिच्या घरच्यांना काळजी वाटेल ना?" मी उगाच मुलीकडच्यांची बाजू घेत म्हणाले.
"तिला माहिती आहे की . नशापाणी काही नाही. प्रेम करतो तिच्यावर. "
माझी बोलती बंद. भारतीय समाजात विशेषत: शहरातच एका वर्गात एकीकडे विचारपूर्वक लग्न न करणारे, लग्नाशिवाय एकत्र राहणारे, वेगळे होणारे अशी उदाहरणे वाढीस लागली आहेत असे वाटते तर दुसरीकडे हे असे एकमेकांसाठी जीव देईन वगैरेची भाषा करणारे..अजूनही आहेत. 
--

मुंबईत असतांनाची गोष्ट. आधी एकही टॅक्सीवाला तयार होईना. मग शेवटी एकजण यायला तयार झाला.  संध्याकाळची वेळ असल्याने ट्रॅफिकमध्ये सापडले. दादरहून गोरेगावला जाईपर्यंत दीड तास की दोन तास किती लागतील ते फक्त बघत बसायचे. ड्रायव्हर मुसलमान असावा. वयाने साठीच्या आसपासचा. कधीपासून टेक्सी चालवता? मी प्रश्न केला. अर्थात हिंदीत.
"१९७६."
 ड्रायव्हर म्हणून याचे वय आणि माझे वय एकच.
 बोलता बोलता तो म्हणाला तुमचा विश्वास बसणार नाही. पण मला खूप प्रसिद्ध माणसे भेटली आहेत. इंदिरा गांधी, धिरूभाई अंबानी आणि अमिताभ बच्चन यांच्याशी त्याची भेट कशी झाली याच्य़ा कहाण्या त्याने सांगितल्या. त्याने मोजून सहा वेळा विमानाचा प्रवास कसा केला , तेव्हा त्याला काय वाटले होते ते सुद्धा सांगितले. मी त्याला एकदाही उलटा प्रश्न केला नाही तेव्हा तोच म्हणाला ,’मी खोटे बोलतो असे वाटत का? काय मिळवेन मी असं सांगून? "
तरीही मी गप्पच होते त्यावर तो म्हणाला,’ कोण केव्हा कुणाला भेटेल ते सांगता येत नाही. एखाद्याची भेट झाली म्हणून काय फरक पडतो ?मोठी माणसे तर विसरून जातात माझ्यासारख्या सामान्य माणसाला भेटलो ते. आपल्याला असं होईल हे माहितीच असत, म्हणून  आपणही  फार मनावर घ्यायच नाही की झालं. मी हसले. किती सहजतेने मह्त्त्वाची गोष्ट सांगून गेला होता तो.
गोष्ट सांगण्याचं त्याच कसब वाखाणण्यासारखं होत. विमान कसं उडत, विमान आकाशात जात तेव्हा नेमकं काय वाटत हे त्यानं त्याच्या अनुभवविश्वाशी जोडून घेत सांगितलं. एवढ्या वेळा विमान प्रवास केल्या अशा सगळ्या थापा असतील तरी विश्वास बसावा अशी मांडणी. भाषा, लहेजा आणि त्यामधील काळाचा हिशोब अगदी पक्का. कोणत्याही कथेत एखाद्या पात्राची ओळख, त्याची भाषा आणि एकंदर मांडणी कशी असावी याचे जिवंत उदाहरण. काय कटकट असे म्हणून टॅक्सीत बसले असतांना, अगदी अचानक हे सर्व त्याच्यामुळे उलगडलं गेल. तुम्ही गुजराथी आहात की पंजाबी अशा त्याच्या शंकेच निरसन मात्र मी केलं. मी महाराष्ट्रीयन आहे यावर त्याचा विश्वास बसायला जरा वेळ लागला. 
----

मी ऑकलोहोमा या राज्यातल्या नॉर्मन गावी राहते. माझ्याबरोबर एक जोडप  आहे. माझ्याच गावातल ओळखीच. खरं हे गाव सोडून मी फार कुठे गेले नाही. ती सांगत होती., चर्चच्या कामाकरता जगभर आताशा प्रवास सुरु केला आहे. 
एखादी व्यक्ती एकाच गावात जवळ जवळ सहा दशकांहून अधिक काळ राहते हे आमच्यासारख्या संगणक क्षेत्रात जगभर जाऊन नोकरी करणा-यांना जवळजवळ अशक्य वाटतं.
 त्या गावातल्या तीन पिढ्या पाहिल्या आहेस तू? काय बदल झाले आहेत असं तुला वाटत? 
"स्पर्धा वाढली.  लोकांकडे मोबाईल आहे, इंटरनेट आले. आता लोक त्यांच्या फोनवर असतात. प्रत्यक्ष माणसे भेट्णे कमी होते आहे. मला कागदावर लिहायला वाचायला आवडते. माझ्या बहिणीच्या नातवंडांचे असे नाही. ती आजची पिढी आहे. आमच्या गावात कृष्णा नावाची भारतीय बाई आहे. तिच्या मुलीबरोबर राह्ते. गेली वीस वर्षे. ती भारतीय जेवण करते. तू पण करतेस का?
कुठल्याही प्रवासात सहप्रवासी कसा आहे यामुळे अनेक कडूगोड अनुभव येतात. परतीच्या प्रवासात माझ्याशेजारची एक सीट मोकळी आणि त्याशेजारच्या सीटवर एक गोरी अमेरिकन स्त्री होती. तिचे वय ७० तरी नक्की असावे. चेह-यावरूनच अनेकदा काही अंदाज बांधता येतात आणि ते थोड्याबहुत प्रमाणात बरोबरही असतात.काही स्त्रिया बिलकूलच दाद देणार नाही अशा वाटतात आणि त्या असतातही तशाच. ही मात्र थोडेफार संभाषण करेल असं वाटलं होतं.
आणि झालंही तसंच.
मी मध्येमध्ये डोळे मिटून चक्क झोपत होते. उठले की आमच्या गप्पा सुरु होत्या. एकदा तर तिने चक्क हलवून मला जागे केले आणि मी काही खावे अशी सूचनाही केली.
झोपमोड झाल्याने मी गोंधळले होते. तशी ती म्ह्णला मी तुझ्या अंगाला हात लावणार नाही. फक्त उठवायचे होते तुला. मी हसले. इतक औपचारिक वागू नकोस असे तिला म्हणाले. त्यावर तिने तुला भेटून मला आनंद झाला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. मग काय तुला राग येणार नाही ना अस म्हणत मी तिला अनेक प्रश्न विचारले. 
"एकटं वाटत नाही का?"
"नाही. लग्न केले नाही पण मला मित्र मंडळी आहेत खूप. माझ्या वडिलांना जरा राग आला होता तेव्हा पण तेवढंच. दोनदा डेटींग केले आणि मग तर खात्रीच झाली की लग्नाचा विषय नकोच."
ती म्हणाली लग्न केल की नव-यात अडकायंच, मुले आणि नातवंडातही..
रिटायरमेंट नाही असच ना? मी तिचे वाक्य पुर्ण केले होते.
त्यावर ती खळखळून हसली. 

---
सहप्रवासी बदलणार असतात. तशीच काही वेळा जिवाभावाची मित्रमंडळी, नातेवाईकही दूर जातात. कधी कधी कायमचेच. निरोप घेणे ही सोपे गोष्ट नाही. लवकर माणसांत गुंतणा-या लोकांकरता जास्तच जड.
पण प्रवासात अशी विविध पर्याय स्वीकारणारी, कठीण प्रसंगांना सामोरं जाणारी माणसे भेट्णे नशीबच म्हणायला हवे. त्यांचे जगणे मला नवीन दिशा देत आले आहे. समाधानी आयुष्याची गुरुकिल्ली आपण मिळवायची असते हे मनापासून पटले आहे. मनमोकळा संवाद करणे ही त्याची एक पायरी आहे असे मी मानते. कभी अलविदा ना कहेना असे मनात म्हणत निरोप घेणे त्यामुळे सुकर होते हे खरेच आहे, नाही का? 

-सोनाली

About the Author

सोनाली's picture
सोनाली

मिळून सा-याजणी, मेनका , रोहिणी, अक्षर मासिकातून लेखन प्रसिद्ध.

लोकमत, लोकसत्ता, सकाळ, मटा या पेपरातून कविता, लेख 

शक्यतेच्या परिघावरून कविता संग्रह