फेसबुक आणि Unfriend करणे

फार ओळख नाही, प्रत्यक्ष काही संबंध नाही, त्या वक्तीपासून काही व्यावसायिक फायदा नाही अशा एखाद्या मित्र/ मैत्रिणीने सोशलमेडियावर/ फेसबुकवर अनफ्रेंड केले तर आपल्याला त्याबद्दल काय वाटते?
अनेकांना त्याचा काहीच त्रास होत नाही. आपल्या फ्रेंडलिस्टमधून काही माणसे कमी होणे/ काही जमा होणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यात धक्कादायक काही असू नये.

सात आठ वर्षे सोशल मिडिया आणि सोशल फोरम्सवर असणा-या अनुभवी व्यक्तीकरता तरी ही सवयीची बाब आहे. पण ज्या व्यक्तीला आपण महत्त्वाचे मानतो( कारण काही असू दे), महत्त्व देतो, त्या व्यक्तीचे आपल्या लिस्टमधे असणे आपल्याकरता मोठी बाब असते अशा व्यक्तीने अनफ्रेंड केले तर मानसिक त्रास होतो ही वस्तुस्थिती आहे. एखाद्या व्यक्तीला आपण काही त्रास दिला नाही असे असतांना आपण अनफ्रेंड केले गेले असेल तर त्याचा मनस्ताप होतो. शिवाय जास्त संवेदनशील असलेल्या व्यक्तीला अनफ्रेंड करण्याचा त्रास अधिक होऊ शकतो.

ब्लॉक करणे हा अनेकदा घाईघाईने वा रागाच्या भरात घेतलेला निर्णय असतो. ब्लॉक करणारी मंडळी एखाद्या सोशल सर्कलमध्ये त्याबद्दल प्रसिद्ध असतात. ही बाब आपल्याला माहिती असते. त्याउलट अनफ्रेंड करतांना ते विचारपूर्वक केले असण्याची शक्यता जास्त असू शकते. कदाचित म्हणून ब्लॉक करण्यापेक्षा अनफ्रेंड करणे जास्त जिव्हारी लागते असे आढळले आहे.

माणसे आहारविहारात बदल करतात, त्यांच्या आवडीनिवडी बदलतात. व्यवसाय नोकरी बदलतात. तसेच फ्रेंडलिस्टही बदलू शकतात. त्या बदलात कधी आपला पत्ता कटू शकतो. हे मनात ठेवायला हवे. शिवाय तो पत्ता कोण काटणार आहे ते आपल्याला साधारण माहिती असते ही सुद्धा महत्त्वाची बाब आहे. आपली एखादी कृती / अनेक गोष्टी त्याला कारणीभूत असू शकतात. आपले चुकले असे आपल्याला वाटत नसेल तर दुस-याला तसे वाटू शकते. ते वाटणे आपल्या हातात नसते. हीच खरी गोची आहे! समान आवडीनिवडीची लोक एकत्र येतात, आपल्या आवडीनिवडीबद्दल इतरांचा अंदाज चुकला की लोक दुरावतात हे इतकं सोप समीकरण आहे.

विरुद्ध मत असणारी माणसे आपल्या मित्रयादीत ठेवणारी माणसे तशीही कमी असतात. टोकाचे ध्रूवीकरण करण्याच्या जमान्यात मधला मार्ग घेणे हीच एक चूक झाली आहे. फ्रेंड्लिस्ट जेवढी मोठी तेवढा गुंता जास्त. धर्म, राजकारण, स्त्रीवाद या विषयांवर व्यक्त होतांना आपल्या मित्रयादीचे विभाजन गटात होते ते तटस्थपणे बघणेही कधी अशक्य होते अशी परिस्थिती आहे. कोणताही वाद, मतप्रवाह यावर व्यक्त होतांना एक बाजू घेतली तरी पंचाईत, काठावर बसून राहिलो तरी गोची! आपण दर वेळी प्रत्येकाला खूश करू शकत नाही हे ओघाने आलेच. त्यामुळे ब्लॉक वा अन्फ्रेंड करणे हे ओघाने येत जाते.

त्याशिवाय काही पर्याय आहेत का?अनफ्रेंड वा ब्लॉक करण्याआधी इतर काही वर्गवारी करता येते का याचा जरूर विचार करावा. ते शक्य नसेल तर हे दोन पर्याय आहेतच.व्यक्ती जवळची असेल तर आता एकत्र वावर शक्य नाही हे साध्या सोप्या शब्दात सांगून/ मेसेज पाठऊन मग अनफ्रेंड वा ब्लॉक करावे. हे सांगणे वा त्याचे स्पष्टीकरण देणे यापैकी दोन्ही/ एक गोष्ट आवश्यक आहे असे नाही. पण ते केले तर आपल्या कृतीची जबाबदारी आपण घेतो आहोत हे स्वच्छपणे समोर असते. ते मला अधिक योग्य वाटते. काही न बोलता काही न कळवता अनफ्रेंड / ब्लॉक करता येतेच. हे दोन्ही करता येत असतांना अनेक माणसे नकोश्या माणसांना/ माणसांच्या यादीत असतात ही वस्तुस्थिती आहे!

यासर्वांकडे आणखी एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघते आहे. इथे माणसे शक्तीप्रदर्शन करायला येत असतात. इतरांना जोखायला येत असतात. त्यामुळे मित्र नको आहेत, अनुयायी हवे आहेत हे लक्षात घ्या. त्याकरता मित्रगट हा फसवा शब्द आहे. फेसबुकाने मित्रांचे वर्गीकरण करण्याचे पर्याय दिले आहेत. एखाद्याला आपल्या पोस्ट दिसत नाहीत, ती व्यक्ती आपल्याला प्रतिसाद देत नाही यामागे अनेक कारणे असतात. फेसबुकचे बदलते अलोरिदम हे एक कारण आहे. पोस्ट पाहण्याची वर्गवारी, मित्रयादीची वर्गवारी ही सुद्धा त्यामागे कारणे आहेत. (मी रात्रभर फेसबुक बघत नाही. दूरदेशीचा मित्रयादीत भरणा आहे. अनेक गोष्टींवर माझे प्रतिसाद वरातीमागून घोडे असे असतात हे मी बघते आहे. अनेक उत्सवप्रिय , आनंदी पोस्टस सुद्धा मी १२ तासांनी पाहिल्या आहेत. अनेक संदर्भ मला माहिती नसतात. अशावेळी प्रतिसाद द्यायचा का? त्याचा अर्थ काय निघेल अशा विचारात मी अडकते. असे अनेकांचे होऊ शकते. त्यामुळे गैरसमज होतात.त्यापलिकडे जाऊन किती लोक तुमच्या तुमच्या वावराकडे
पाहू शकतात? )अशी माणसे यादीत नसतील तर ब्लॉक / अनफ्रेंड पासून सुटका नाहीच.

फेसबुकाने स्पर्धक, विरोधक अशी प्रकारची वर्गवारी दयायला हवी. ती दिली नसली तरी ती आपण करू शकतो. मित्रयादी एकदा अशा चश्म्याने तपासा. एखाद्याने अनफ्रेंड करण्याचे दु:ख वा त्रास काही क्षणात कमी होईल. प्रत्यक्ष जगात स्पर्धक टाळता येत नाहीत, व्यवसायात स्पर्धा टाळता येत नाही. त्याकडे अधिक प्रगल्भतेने पहावे लागते. तेच इथे अनफ्रेंड करणे/ होणे याला लागू आहे.

टीनएजर्स पासून जेष्ठ नागरिक असा आपल्या मित्रयादीचा आवाका असतो. त्यात प्रत्येकाची आवडनिवड बदलणार हे गॄहित धरू या
अनफ्रेंड करण्यात अनफ्रेंड+घटस्फोट/ प्रेमभंग असे पॅकेज नसेल तर या अनफेंडला फार महत्त्व देऊ नये. आणि तेच पॅकेज असेल तर घरातल्या गोष्टी घरात राहिलेल्या उत्तम.

आज सोशलमिडियावर वावरणारे टीनएजर्स एकूणात याबाबत घरातील वडिलधा-यांपेक्षा जास्त खमके आहेत. आपण हे बघतो पण ते मान्य करत नाही. अगदी जवळच्या/ महत्त्वाच्या मानलेल्या व्यक्तींकडून अनफ्रेंड होण्याचा अनुभव मी घेतला आहे/ घेते. हा अनुभव आज सोशलमिडियावरील वावराचा एक अविभाज्य घटक झाला आहे. आपला स्वत:चा अजेंडा राबवतांना अशी थोडीफार दुखापत होणारच. आपले रॅगिंग झाले म्हणून पुढच्या बॅचचे रॅगिंग केलेच पाहिजे का?
सिनिकल होणे टाळता आले तर उत्तमच. तुच्छतावादाला मला काहीच पर्याय देता येत नाही. थोडी तटस्थता , विसंवाद मान्य करता यावा. डिजिटल मिडिया/सोशल मिडियात वावरतांना आज मानसिक आरोग्य चांगले राहण्याकरता ब्लॉक / अनफ्रेंड याशिवाय अनेक गोष्टींना खंबीरपणे तोंड देता येणे आवश्यक झाले आहे.

इथे राहून सगळं सहन करायचं असही मला म्हणायचं नाही.मित्रयादीतील कोणीही प्रमाणाबाहेर टिंगळटवाळी करणे, खाजगी आयुष्य़ाचे संदर्भ देऊन नावासकट सोशल मिडियावर मानहानी करणे, जीवे मारण्याच्या वा इतर कोणत्याही धमक्या या / इत्यादी गोष्टी थेट कायदा/ पोलीस यांच्याकडे घेऊन जाण्याच्या आहेत. आभासी विश्वात वा डिजिटल मिडियात आपण एखाद्याबद्दल किती गरळ ओकतो आहोत, किती गलिच्छ भाषा वापरतो आहोतो याचा धरबंध राहिला आहे असे दिसत नाही.एखाद्याचे खाजगी आयुष्य़ चघळणे कुणाचा टाईमपास असतो, ठरवलेला एक अजेंडा असतो हे दुर्दैव आहे. जगभरात कुठेही त्या घडत असतील तरी त्याला अपवाद नसावेत. त्याकरता ब्लॉक वा अनफ्रेंड पर्याय पुरेसे नाहीत. हे दोन्ही पर्याय वापरले तरी या गोष्टी सुरू राहू शकतात हे ध्यानात असू द्या. त्यानुसार त्याला तोंड द्यायला वेळीच कायद्याची मदत घ्या.
(ब्लॉक आणि अन्फ्रेंड फार किरकोळ वाटू लागतील अशी माझी खात्री आहे.)
#Block #Unfriend #SocialMediaHarassment

About the Author

सोनाली's picture
सोनाली

मिळून सा-याजणी, मेनका , रोहिणी, अक्षर मासिकातून लेखन प्रसिद्ध.

लोकमत, लोकसत्ता, सकाळ, मटा या पेपरातून कविता, लेख 

शक्यतेच्या परिघावरून कविता संग्रह