बस्स एक पल!

बस्स एक पल!

परवा इंटरनेटवर अक्षय इडीकर नावाच्या मुलाने केलेला ‘डोह’ नावाचा एक लघुपट पाहिला. प्रेम, वाट पाहणं आणि कामे वेळेवर होणं हे सर्व विचार मनात होतेच. त्यात डोह पाहिल्यावर मन अधिकच सरभैर झाले. स्पर्धा, असमाधान आणि तणाव असलेली आपली जीवनशैली आणि मग जीवनात आलेलं पहिलंवहिलं प्रेम! त्या लघुपटासारखं अनेकांच्या आयुष्यात होत असेल नाही? त्या प्रेमाचा अनुभव, त्या प्रेमाकरता द्यायला पुरेसा वेळ आहे का आपल्याकडे? तो वेळ नाही म्हणायचं, वाट बघण्याचं उदात्तीकरण करायचं आणि संपर्काची रोज नवीन साधनं फक्त हाताशी ठेवायची? नेमकं काय स्वीकारतो आपण? त्याच अनुषंगाने वेळ कमी का पडतो, असा विचार मनात आला.

सगळ्या माणसांनी त्यांची कामं वेळेवर केली असती तर जगणं सोपं झालं असतं, नाही? मग कुणाला वाटही बघावी लागली नसती. इंतजार का फल या लेखानंतर अनेक प्रतिक्रियांचे ई-मेल्स आले. त्यात आम्हाला वाट बघायला आवडत नाही, असा सूर होता. खरंच आहे ते. वेळ पाळली गेली तर हॉटेलाच्या बाहेर जेवणासाठी ताटकळत उभे राहणारे लोक दिसले नसते, प्रत्येक जाहीर कार्यक्रम वेळेत सुरू झाला असता, वेळेत संपला असता. वेळेत येणारी प्रेयसी, दिलेला शब्द पाळणारा प्रियकर, बराच अवधी देऊन काम पूर्ण करा असे सांगणारा बॉस, मन लावून काम करणारे टीममधले सर्व.. असं चित्र दिसलं असतं. पण असं काही घडणं ही सर्व आदर्श उदाहरणं आहेत. हे आदर्श आहे खरं, पण असं घडणं कधी शक्यसुद्धा आहे, असं मनात आलं आहे का? तसं घडावं म्हणून प्रयत्न करणारे आहेतच की..

तुमच्या-माझ्या आठवणीत वेळ पाळल्याच्या अनेक आठवणी असतील. तशाच ती थोडक्यात चुकली याच्यासुद्धा. ही वेळ पाळणं अनेकदा आपण आपल्या आवडीनिवडीनुसार करत असतो. काही वेळा काही माणसं मुद्दाम वेळ पाळत नाहीत, नियम पाळत नाहीत हेसुद्धा तुम्ही पाहिलं असेल.

‘झाला का लेख?’ असा प्रश्न संपादकांनी विचारायची वेळ लेखकावर येणं ही फार भूषणावह गोष्ट आहे, असं मी मानत नाही. तरीही तीन एक महिन्याने एखाद् वेळी हा प्रश्न मला संपादक विचारतात.. त्यावेळी मग आता पुढच्या वेळी दोन-चार लेखही पाठवून ठेवते, असं मनात म्हणत मी लेखन सुरू करते. सुरुवात तर छान होते. पण नेहमीच ते पूर्ण होतात आणि वेळेत पाठवता येतात, असं घडतं असंही नाही. खरं सांगायचं तर मनात आताशा धाकधूक असते की मधेच हा निश्चय कमी पडेल. शिस्त राहणार नाही. आणि तसं घडतंसुद्धा! अंगावर कामं ओढवून घेणा-या लोकांना नेहमी वेळ कमी पडतो. ज्यांना नाही म्हणता येत नाही, त्यांना वेळ कमी पडतो. ते इतरांना वाट बघायला लावतात, हे मी पाहिलं आहे. आताशा माझ्याकडूनही ती चूक होते. मी लहान होते तेव्हा मात्र अशी नव्हते बरं! शाळेतून घरी आले की आधी अभ्यास करून मग मी इतर गोष्टी करत असे.. कोणत्याही कामाची चालढकल करायची नाही, हे पक्कं ठरलेलं होतं. मग निश्चय कमी पडतो कसा? कालांतराने कुठे गेली ती वेळेआधी काम करायची सवय, हा प्रश्न माझ्या मनात रेंगाळतो आहे.

कोणतेही काम सुरू करताना उत्साह असतो, ते दोन-चार दिवस नीट होतं आणि नंतर मात्र मागे पडतं किंवा अनेक कामं वेळेवर करताच येत नाहीत. अगदी रोज सकाळी फिरायला जाणं अशी साधी गोष्ट नेहमी वेळेत करायला खूप निश्चय लागतो, असं सांगणारे मित्र-मैत्रिणी आहेत. म्हणजे वेळ पाळणं जमत नाही, अशी अडचण असलेले तुम्ही किंवा मी एकटे आहोत असं नाही. ही समस्या सर्व जगात अनेकांना भेडसावते. पण कल करे सो आज, स्टीच इन टाइम वैगरे उपदेश लोकांना करायची संधी खरं आपणच देत असतो! काही जणांना इतरांकडून जास्त भाव लागतो म्हणून ते मुद्दाम उशीर करतात, हेसुद्धा तुम्ही पाहिलं असेलच. पण ती माणसं आणि तो प्रकार वेगळाच!

पाचवी ते सातवीपर्यंत कॉलनीतली सर्व मुलं सिटी बसने शाळेत जात असू. शाळेची बस ही संकल्पना त्यावेळी आमच्या शहरात नव्हती. सकाळी पावणेसात वाजताची बस चुकली की त्यानंतर होणारी धावपळ फारशी मानवणारी नव्हती. बस ड्रायव्हर नेहमी वेळेवर यायचा. उशीर हा शब्द त्याला माहीत नसावा. ही चांगली गोष्ट होती पण त्याचा परिणाम सर्वाना वेळ पाळावीच लागे हा होता. आमची शाळा दूर होती, पायी जाणं शक्य नव्हतं, घरून आईने बस चुकली म्हणून शाळेत सोडायला येणं मनाला पटणारं नव्हतं. सकाळी ऊन-पावसात आणि थंडीत पाठीवर दप्तर घेऊन धावत पळत बस गाठणं हा एक कार्यक्रम होता. मोठय़ा शहरातून अशी बस किंवा लोकल पळत जाऊन गाठणारे दिसले की मला अजूनही ते दिवस आठवतात. कोणतंही काम वेळेत करायचं म्हटलं की डोक्यात त्या कामाआधी करावी लागणारी सर्व तयारी, इतर कामं याची यादी तेव्हापासून मनात तयार होऊ लागली. व्यवस्थापनाचे धडे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने समजायचे हेच वय!

शाळेतून कॉलेजात गेलो तोवर अभ्यास, होमवर्क आणि रोजच्या प्रवासाचं अंतर हे सगळंच वाढलं होतं. कितीही आयोजन केलं तरी एखादी गोष्ट ऐन वेळेवर करावी लागायची. त्यावेळी होणारी धावपळ, त्यात असलेली अनिश्चितता सगळंच हळूहळू अंगवळणी पडलं! आपण करू शकतो हे काम याचा अंदाज आला तसा ती गोष्ट अगदी शेवटपर्यंत मागे ठेवून मग करण्यातली नशासुद्धा उमगली! त्याचबरोबर एखादी गोष्ट झाली नाही म्हणून मिळणारे लेट शेरे, कमी मार्क्स सगळं हळूहळू ‘चलता है’ अशा पद्धतीने घ्यायचं, फार मनाला लावून घ्यायचं नाही असा एक दृष्टिकोन बळावला. प्रत्येक शिक्षक फक्त आपलाच विषय आहे प्रत्येक विद्यार्थ्यांला, अशा थाटात अभ्यास आणि सबमिशनचं काम देत असत. अती झालं की मग शेवटी नाईलाज होतो असं असावं. किमान माझं तसं झालं होतं. सुरुवातीला वाईट वाटलं थोडं. मग त्या लेट असण्याची, कमी मार्क मिळतात याचीसुद्धा सवय झाली. अशी सवय होणं फार चांगली गोष्ट आहे असं मला म्हणायचं नाही.. पण वस्तुस्थिती अशीच होती! त्या सवयीचा प्रभाव आपल्या सगळ्या जगण्यावर पडत नाही ना, याबाबत मी सतर्क होते इतके मात्र नक्की.

अनेक शहरांत पहाटे सकाळीच महानगरपालिकेचं नळाचं पाणी येतं. आता छोटय़ा टाक्यात ते साठवतात. पण अशी टाकी नसेल तर किमान पिण्याचं पाणी घराघरातून पहाटेच भरावं लागतं. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना चालढकल करणं शक्य नसतं. आपल्याला अनेक लहान-मोठय़ा गोष्टी वेळेत झाल्याच पाहिजे, अशा प्रकारे पूर्ण कराव्या लागतात. तुमच्या लक्षात आलं असेल की आपलं मन कुठलं काम लवकर करायचं आणि कुठलं जरा टाळलं तरी चालेल याची लिस्ट करत असतं. कुठलाही बदल, नव्याचा स्वीकार व्हायला वेळ लागतो. पण ती गोष्ट एकदा अंगवळणी पडली की सोपी होते. एखादी गोष्ट वेळेत करणं आणि वेळ न पाळण्याची सवय या दोन्ही गोष्टींना हे लागू आहे. फक्त वेळ पाळायला कष्ट करावे लागतात आणि ती पाळण्यासाठी कोणती कृती करावी लागत नाही! अनेक मतदारांनी आमचं नाव यादीत आहे का, हा प्रश्न वेळेत विचारला असता तर.. असो.

आपल्याला वाट बघायला आवडते का? नाही.. पण मग अशी चालढकल करणं, वेळेत काम न करणं याचा एक परिणाम म्हणजे तुमच्या वागण्यामुळे दुस-या बाजूला एक व्यक्ती वाट बघत राहते हा असतो. ते फारसे आनंददायी मला तरी वाटत नाही. त्यापेक्षा जास्त धोकादायक दुसरा परिणाम म्हणजे वेळेत न गेल्याने तुमचं काम वा प्रोजेक्ट होत नाही, तुमचं नुकसान होतं.. तुम्ही अनेक चांगल्या संधी गमावून बसता! संधी गमावण्यापेक्षा धोकादायक मला त्या वेळेची किंमत नसणं हे वाटतं. तुमचा आणि इतरांचा वेळ-हे दोन्ही महत्त्वाचं आहे. त्याची कदर आपल्याला करता आली पाहिजे. योग्य नियोजनाचा अभाव हा नक्कीच काळजीचा मुद्दा वाटतो. आपल्या वेळेचं नियोजन करत वा न करताच जगणं ही एक जीवनशैली आहे. ती व्यावसायिक आणि व्यक्तिगत पातळीवर जवळजवळ सारख्या रीतीने व्यक्त होते. आपलं समाधान दहा उत्तम कामं करून होत नसतं. त्याचा तणाव येत नाही असं नाही. पण तो ताण आपण घेऊ शकतो, कदाचित जास्त ताणही घेऊ शकतो असं वाटतं. स्पर्धा, असमाधान आणि हाव या गोष्टींचा आपण सामना करत असतो ते वेगळंच. याचा परिणाम असा होतो की, कधी त्या प्रोजेक्टला वेळ जास्त लागतो, कधी गुणवत्ता कमी होते. ताणतणावाखाली जगणं आणि उत्तम दर्जा असलेलं कार्य करणं हळूहळू अवघड होत जातं, हे वेगळं सांगायला नको. ते प्रोजेक्ट तुम्ही एकटय़ाने करत असलात तर ठीक पण ते जर टीमवर्क असेल तर? कुणी एकानं काम वेळेवर करून भागत नसतं. ही सवय टीममधल्या प्रत्येकाला असावी लागते. प्रत्येक जण स्वावलंबी असावा लागतो. म्हणूनच दहा जणांना घेऊन एकत्र काम करणं ही आणखी जास्त अवघड गोष्ट. तुमचं काम इतरांवर अवलंबून असेल तर अनेकदा दुस-याच्या वागण्याचा, सवयीचा फटका बसतो. अशा वेळी किमान आपल्या कर्तव्याची जाणीव ज्यांना असते ते लोक वेळ पाळण्याचा प्रयत्न करतात, हे ध्यानी येतं. एकंदर वेळ पाळणं ही सोपी गोष्ट नाही, ती एकटय़ावर अवलंबून नसते, हेसुद्धा खरं.

आपल्या फायद्याची, महत्त्वाची, थोडक्यात मतलबाची कामं कुणीही आधी करतं! ज्यात कुठल्याही दृष्टीने फायदा नाही ती काम पुढे ढकलतं, असा एक समाजप्रवाह मी पाहिला आहे. असं ही सर्व फायदा पाहणारी माणसं एवढी व्यग्र होतात की त्यांना वेळेचं नियोजन करणं त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं होतं. सवय झाली की त्याचा अतिरेक व्हायला वेळ लागत नाही. संयम आणि समतोल या गोष्टी आचरणात आणणं एकंदर अवघड आहे! वेळ न पाळण्याचा अतिरेक धोकादायक असतो यात शंकाच नाही. पण वेळ पाळण्याचा अट्टहास करणारी मंडळीही तेवढीच असतात आणि तेही वेगळ्या प्रकारे धोकादायक असतं. तुमचा बॉस असा वेळेचा आणि शिस्तीचा भोक्ता असेल तर तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज नाही. अनेक घरांमधून ‘आमच्या यांना सगळं वेळेत आणि नीटच लागतं’ हे बोलणं फक्त डेली सोपमध्ये नसतं तर प्रत्येक घरातही दिसतं. एका माणसाने वेळ पाळायची याकरता सर्व घर राबतं ही आपली वेळ पाळण्याची व्याख्या आहे. ती पुरेशी नाही. वेळ पाळण्याबरोबर स्वावलंबनसुद्धा गृहित धरलं आहे. खरंच व्यग्र असणं आणि तसा आभास निर्माण करणं हे दोन वेगळे मुद्दे. कृपया कोणताही, कशाचाही अतिरेक टाळा. सर्व प्रकारच्या वेळा पाळताना या वेळ पाळण्यात आपण आपल्या जिवाभावाच्या माणसांकरता किमान वेळ काढतो का, एवढा प्रश्न नक्की विचारा!

-सोनाली जोशी

About the Author

सोनाली's picture
सोनाली

मिळून सा-याजणी, मेनका , रोहिणी, अक्षर मासिकातून लेखन प्रसिद्ध.

लोकमत, लोकसत्ता, सकाळ, मटा या पेपरातून कविता, लेख 

शक्यतेच्या परिघावरून कविता संग्रह