सोशल मिडिया -महाजाल

इंटरनेट आले. ब्लॉग सुरू झाले. जिथे वेळेची मर्यादा नाही, निवडीची अट नाही, शिवाय सर्व प्रकारच्या अभिव्यक्तीला सामावून घेता येईल असे एकच मोठे माध्यम लोकांना हवे होते. ही गरज हे सोशल मीडियाचा उदय होण्यामागे मुख्य कारण आहे.

सोशल मीडिया हा निवड वा इतर अटी यांच्याशिवाय अनेकांना एकाच वेळी व्यक्त होत येईल असे अभिव्यक्तीचे माध्यम आहे. फक्त कायदा, सुरक्षा आणि सुव्यवस्था याचे भान आपण ठेवले की झाले. सोशल मीडिया ही अनेक माध्यमांची, अधिकाधिक लोकांचे लक्ष वेधण्याचे ध्येय ठेवून आलेल्या सर्वांची शर्यत आहे. तिथे व्यक्त होणारा प्रत्येकजण त्याच्या हद्दीत राजा आहे. जगातल्या कुणाबरोबरही त्याला स्पर्धा करता येते. कुणाशीही संवाद साधता येतो.

समान विचारी मंडळी इंटरनेटवर एकत्र येतील, एकाच वेळी एकाच व्यासपीठावर व्यक्त होतील, डेटिंग करतील अशी साधी उद्दिष्टे समोर ठेवून सुरू केलेली साइट म्हणजेच facebook.com सुरू होऊन आता दशक लोटले आहे. २००७ साली सुरू झालेले फेसबुक आता जगातला प्रमुख सोशल मीडिया आहे. त्यावर २ बिलियन सदस्य आहेत हे फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गने २०१७च्या जूनमध्ये सांगितले. फेसबुक सुरू झाल्यापासून दर महिन्याला ही संख्या वाढत गेली हे त्याने नमूद केले आहे.

सोशल मीडियावर लोकांबरोबर प्रमुख प्रसिद्धीमाध्यमे आणि प्रसिद्ध व्यक्तीसुद्धा व्यक्त होतात ही लक्षणीय बाब आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती, भारताचे पंतप्रधान या सोशल मीडियावर व्यक्त होतात. तिथेच त्यांच्या बरोबरीनं दक्षिण आफ्रिकेतला एक गिटारवादक जगप्रसिद्ध होण्याचं स्वप्न बाळगून सोशल मीडियावर व्यक्त होतो ही या माध्यमाची ताकद आहे.

सामान्यांना या सोशल मीडियाने नवी स्वप्ने पाहायला शिकवले आहे. सोशल मीडियावर वाद आहे, संवाद आहे, हारजीत आहे. सोशल मीडिया म्हणजे फक्त टाइमपास वा करमणूक नाही. सोशल मीडियावर आपले व्हिडियो पोस्ट करून, आपल्या कलेचे प्रदर्शन करून लोकांनी अर्थाजन केले आहे. सोशल मीडिया आता कोणत्याही व्यवसायातील मार्केटिंग आणि जाहिरातींचा अविभाज्य घटक आहे. फेसबुकसारखेच ट्विटर, यूट्यूब, गूगल प्लस, इन्स्टाग्राम इत्यादींचा समावेशही सोशल मीडियातच होतो.

सुरू झाल्यापासून या विविध माध्यमांचे स्वरूप वर्षागणिक बदलत गेले आहे. फेसबुक, ट्विटर, गूगल प्लस, यूट्यूब, पिंटरेस्ट, टंब्लर या माध्यमातून वेगवेगळ्या स्वरूपातली अभिव्यक्ती सामावून घेता येईल या दिशेने सर्वांनी प्रयत्न केले आहेत.

सोशल मीडियाचा वापर प्रामुख्याने कसा होतो?
शेअरिंग, संपर्क व करमणूक, खरेदी-विक्री हा या माध्यमाचा प्रमुख उपयोग आहे.
सोशल मीडियावर रोज जगभरातून खूप माहिती, फोटो, पोस्ट अपलोड केल्या जातात. आपण एक शब्दही लिहिला नाही तरीही जन्मभर वाचता येईल, बघता येईल एवढा माहितीचा/करमणुकीचा साठा आताच सोशल मीडियावर उपलब्ध आहे. अभिव्यक्ती शेअर करण्याचं, तिचा आस्वाद घेण्याचंही हे एक माध्यम आहे. अनेकजण फक्त करमणुकीकरता सोशल मीडियाचा वापर करतात. आपले मित्रमैत्रिणी, नातेवाईक काय पोस्ट करत आहेत ते बघायला हा मीडिया वापरता येतो. त्यावर पेपर वाचता येतात, बातम्या ऐकता येतात आणि सिनेमाही पाहता येतो. घराघरातून संपर्कात राहण्यासाठी माणसे सोशल मीडिया वापरत आहेत.

मार्केटिंगचे साधन : सोशल मीडियाचा दुसरा प्रमुख वापर आपली कला वा व्यवसाय अनेकांपर्यंत नेण्यासाठी होतो. सोशल मीडिया हा डिजिटल मार्केटिंगचा आधारस्तंभ आहे. उत्पादनाची जाहिरात करण्यासाठी हे एक माध्यम आहे. सोशल मीडियावर जाहिरात करण्याकरता लागणारा खर्च प्रमुख माध्यमांपेक्षा नक्कीच कमी आहे. त्याची व्याप्ती मात्र जगभर आहे. निवडणूक प्रचार, सिनेमा नाटक प्रोमोशन, उद्योगधंद्याची जाहिरात, व्यवसायाची माहिती या सर्वांच्या प्रसारासाठी सोशल मीडियाचा वापर होतो.

शिकण्यासाठी : यूट्यूबवर फोटो कसे काढावेत, उत्तम आरोग्याकरता आहार कसा असावा, अशा प्रकारचे अनेक व्हिडियो असतात. अनेक विषयांची माहिती लिहिलेली असते. बालवाडीपासून पदवीपर्यंतच्या अभ्यासक्रमातल्या विषयांवर माहिती देणारे व शिकवणारे व्हिडियो असतात. प्रोग्रॅमिंग कसे शिकता येईल याचे मार्गदर्शन असते. हेच सर्व व्हिडियो व लेख फेसबुक आणि इतर सोशल मीडियावरही उपलब्ध असतात. थोडक्यात पदवी वा सर्टिफिकेटशिवाय अनेक कला आणि कौशल्ये घरबसल्या शिकण्याची सोय सोशल मीडियाने केली आहे. या माध्यमाला कोणत्याच विषयाचे वावडे नाही.

ब्रँड म्हणून वापर : एक ब्रँड म्हणून सोशल मीडियाचा वापर प्रामुख्याने व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी होतो. उत्पादनाच्या विक्रीसाठी होतो. ग्राहकसेवेचा भाग म्हणून सोशल मीडिया वापरता येतो. आपल्या गिऱ्हाइकांशी संपर्क साधण्यासाठी, त्याच्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी हे एक महत्त्वाचे माध्यम झाले आहे. एखादी कंपनी, एखादी व्यक्ती ब्रँड म्हणून समाजासमोर नेता येते. टूथ पेस्ट म्हटले की कोलगेट आठवते, अशी ओळख म्हणजे ब्रँड म्हणून मिळालेले यश आहे. नामांकित व्यक्ती त्यांचे फेसबुक पेज वा ट्विटर हँडल सुरू करतात, त्यावर ते स्वत:ला प्रसिद्धी देत असतात. असा वापर म्हणजे एक ब्रँड तयार करणे असतो.

सोशल मीडिया व्यवस्थापन : कंपन्या, सरकारी सोशल मीडिया पेजेस, सेलेब्रिटी पेजेस, व्यवसायाची वा उत्पादनाची जाहिरात अशा सर्व गोष्टींकरता सोशल मीडियावर पेजेस वा अकांउट्स सुरू होतात. ही पेजेस वा अकाउंट्स पाहणे त्या व्यक्तींना वा कंपनीच्या सीईओला कार्यबाहुल्यामुळे शक्य नसते. ते काम बघण्याकरता सोशल मीडिया व्यवस्थापन करणारी एखादी कंपनी वा सल्लागारांना नेमले जाते. डिजिटल मीडिया मॅनेजर म्हणून या व्यक्ती वा कंपन्या कामे बघतात व त्याचा मोबदला घेतात. सोशल मीडियाचे व्यवस्थापन करण्यातून उत्तम अर्थिक मोबदला मिळू शकतो हे गेल्या काही वर्षांत लोकांना समजले आहे. असे मीडिया व्यवस्थापन करण्याकरता मार्केटिंगच्या तंत्राबरोबर सोशल मीडियावरील वावराचे मर्म आणि त्याचा वापर याची माहिती व तंत्र आवश्यक आहे. मार्केटिंगमध्ये पदवी असेल/ नसेल तरी या गोष्टी अनुभवाने शिकता येतील अशा आहेत.
विविध प्रकारचा सोशल मोडिया आणि त्याच्या व्यवस्थापनाची माहिती या लेखमालेत करून घेऊ.

- सोनाली जोशी, ह्यूस्टन, अमेरिका.
sonali.manasi@gmail.com

About the Author

सोनाली's picture
सोनाली

मिळून सा-याजणी, मेनका , रोहिणी, अक्षर मासिकातून लेखन प्रसिद्ध.

लोकमत, लोकसत्ता, सकाळ, मटा या पेपरातून कविता, लेख 

शक्यतेच्या परिघावरून कविता संग्रह