भारतातली IT Parks आणि विश्वरुपदर्शन!

भव्य टोलेजंग आधुनिक इमारती. त्यांना जोडणारे स्वच्छ मोठे रस्ते. त्यांच्या आजुबाजूला व्यवस्थित मेंटेन केलेली उद्यानं आणि हिरवळ. त्यात अधेमधे असलेली व्हॉलीबॉल-बास्केटबॉलची कॉर्ट्स किंवा ओपन जिम्स. अन ह्या स्वच्छ सुंदर आधुनिक परिसरांमध्ये वावरणारी, गळ्यात कंपन्यांची आयडी कार्ड कम मंगळसूत्रं घालून फिरणारी 'ऐटीत' काम करणारी तरुणाई.

ह्या IT Parks मध्ये उच्चशिक्षित आणि अफाट पगार कमावणारी इंजिनियर, ऍनालिस्ट, मॅनेजर वगैरे 'व्हाईट कॉलर' काम करणारी मंडळी असतात तशीच टॉयलेट्स साफ करणाऱ्यांपासून ते सिक्युरिटीचं काम करणारी 'ब्लू कॉलर'वाली मंडळीही असतात. त्यांनाही स्वच्छ निटनेटके युनिफॉर्म्स असतात. त्यांचं कामाचं स्वरूप अत्यंत शारिरिक कष्टाचं असलं तरी कामाची जागा, वर्क एनव्हायरमेंट चकचकित आणि सुखकारक असतं.

भारतातल्या कोणत्याही शहरातल्या IT Park मधलं हे दृश्य! हिंजवडी पुणे पासून व्हाईटफील्ड बंगलोर पर्यंत, गुरगावपासून चेन्नई पर्यंत सगळ्या IT Parks मध्ये हेच दृश्य दिसतं. स्वच्छ, सुंदर, अत्याधुनिक भारताचं दृश्य. आपल्याकडे पैसा आला आणि त्याचं योग्य नियोजन केलं तर काय होऊ शकतं ह्याचं नितांत सुंदर दृश्य.

प्रत्येक IT Park च्या कंपाउंडच्या बाहेर चहा-नाष्ट्याच्या टपऱ्या असतात. अवाच्यासवा भाडं घेणाऱ्या रिक्शांचे स्टँड्स असतात. इन्शुरन्स आणि कर्जं विकणाऱ्या एजंट लोकांचे स्टॉल्स असतात. रस्त्याच्या कडेला भाडं मिळण्यासाठी ताटकळत उभे असलेले उबर-ओलावाले असतात.

श्रीमंत आधुनिक बुद्धिजिवी India वर अवलंबून असलेला कष्टकरी भारतही ह्या IT Parks च्या कंपाउंडच्या बाहेर उभा असतो. आणि ह्या IT Parks मधून येणाऱ्या सुबत्तेमधला स्वतःचा हिस्सा घेत असतो.

ह्या IT Parks मध्ये व्हाईट कॉलर काम करणाऱ्यांना 'प्रवासाचा वेळ', 'बैठं बिनकष्टाचं काम', 'वर्क लाईफ बॅलन्स' वगैरे First World problems असतात. तर ब्लू कॉलर काम करणाऱ्यांना आणि कंपाउंड बाहेरच्या सेवादात्यांना अफाट कष्ट करून पोटाची खळगी भरायची कशी हा Third world problem असतो.

भारतातलं कोणतंही IT Park बघणं, अनुभवणं हा विश्वरुपदर्शनाचा अनुभव असतो. इथे जगातली अत्यंत क्लिष्ट संगणकीय समस्या सोडवणारा वीस-बावीस वर्षांचा युवकही भेटतो आणि स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी अत्यंत चविष्ट अंडाभुर्जी करून विकणारा सत्तर वर्षांचा म्हाताराही. इथे अत्यंत चकचकित कपड्यांत वावरणारे, पण बौद्धिक हमाली करणारे लोकंही भेटतात आणि आपल्या वाट्याची शारिरिक कष्टाची कामं अगदी मनापासून आणि आनंदानं करणारेही भेटतात.

भारतातलं कोणतंही IT Park बघणं, अनुभवणं हा विश्वरुपदर्शनाचा अनुभव असतो.

त्यात मिसळून, पण त्याहून अलिप्त राहून आपण बघितलं तर... !!

-प्रसाद शिरगांवकर

Tags: 

About the Author

प्रसाद शिरगांवकर's picture
प्रसाद शिरगांवकर

Writer, Poet, Photographer, Drupaler!!