'कोल्ड शोल्डर' उर्फ बिनखांद्यांचे कपडे!

गेल्या वर्षभरात, बॉस्टनपासून बंगलोर पर्यंत, जगात सगळीकडे दिसलेली बायकांच्या कपड्यांची फॅशन म्हणजे, 'उघड्या खांद्याचे' ड्रेसेस! बऱ्यापैकी अंगभर असलेला ड्रेस, त्याला हाफ किंवा फुल बाहीही जोडलेली, पण खांद्यावर तेवढं फाटलेलं (किंवा न शिवलेलं).

जगातली प्रत्येक नवी फॅशन पुढे नेण्याची जबाबदारी आपल्याच खांद्यावर असल्याचा आविर्भाव घेऊन अनेक जणींनी आपल्या कपड्यांचा खांदेपालट केलेला दिसला या वर्षात!

म्हणजे, कोणीही कसलेही कपडे घालावेत, त्याला हरकत घ्यायची धुरा स्वयंघोषित संस्कृती रक्षकांच्या खांद्यावर असते, आपल्या नाही, पण तरीही काही प्रश्न पडतातच...

उदाहरणार्थ, 
एखादीच्या खांद्यावर डोकं ठेवून तिचा प्रेमिक निवांत बसत असेल तर खांद्याच्या टोकाची हाडं डायरेक्ट टोचत असतील का?

किंवा उदाहरणार्थ, 
एखाद्या घळाघळा रडणाऱ्या मित्र किंवा मैत्रिणीला बिनखांद्याच्या कपडेवालीनं डोकं टेकवून रडण्यासाठी आपला खांदा ऑफर केला तर त्या अश्रूंचा खांद्यावर डायरेक्ट अभिषेक होत असेल का?

किंवा उदाहरणार्थ, 
कडाक्याच्या थंडीत असे कपडे घातल्यावर फक्त खांद्याला जास्त थंडी वाजत असेल का?

किंवा उदाहरणार्थ
चेहऱ्यासारखाच खांदाही गोरा दिसावा म्हणून काही फेअरनेस क्रीम्स मिळायला लागली आहेत का?

जाऊंद्या, आपल्याला काय करायचंय, कारण फॅशनची खंदा पुरस्कार करणारी माणसं अशा किरकोळ प्रश्नांना नेहमीच खांदा देतात!

या कोल्ड शोल्डर ड्रेसेसवरून एक गंमत आठवली.

लहानपणी Black & White मराठी सिनेमे बघताना, त्यात मद्यधुंद व्हीलन जाड्याभरड्या हिरॉईनच्या अंगावर हात टाकायचा. त्यानं टाकलेल्या हातानं हिरॉईनचं ब्लाऊज खांद्यावर फाटायचं.

पण मग तिथेच सीन कट होऊन पुढच्या सीनमध्ये हिरॉईनची 'इज्जत लुटली’गेल्याची चर्चा असल्याचा सीन असायचा.

तर लहानपणची अनेक वर्षं, 'खांद्यावर ब्लाउज फाटणं म्हणजे इज्जत लुटली जाणं’ असा माझा समज होता!!

कोल्ड शोल्डरवरून हे आठवलं इतकंच.

आपली कशालाच काही हरकत नाही. उगाच माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून कमेंटीच्या गोळ्या झाडू नका!!

- प्रसाद शिरगांवकर

About the Author

प्रसाद शिरगांवकर's picture
प्रसाद शिरगांवकर

Writer, Poet, Photographer, Drupaler!!