'मेडिक्लेम'

'मेडिक्लेम' ही आजच्या काळातली अत्यंत गरजेची गोष्ट आहे. पण तिथे अत्यंत बजबजपुरी माजलेली आहे आणि सध्याचा तो अफाट मोठा फ्रॉड आहे असा माझा अनुभव आणि स्पष्ट मत आहे.

घरातल्या कोणालाही कोणत्याही कारणानं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं तर तिथे पहिला प्रश्न विचारतात, 'मेडिक्लेम आहे का?'. जर असेल तर पायघड्या घालून पेशंटला ऍडमिट करून घेतात आणि गरजेच्या असलेल्या आणि नसलेल्या अशा सगळ्या जगातल्या महागातल्या महाग चाचण्या आणि उपचार त्याच्यावर करायला लागतात.

चाचण्या आणि उपचारांचे पैसे मेडिक्लेमवालीच कंपनी देणार आहे असं वाटून पेशंटचे नातेवाईक सगळ्याला होकार देत रहातात. हॉस्पिटलं तूफान बिलं लावतात. इन्शुरन्सवाले त्यातली अंशतःच मंजूर करतात (किंवा सगळं नामंजूरही करतात). मग हॉस्पिटलचे पैसे भरता भरता पेशंटच्या नातेवाईकांची दमछाक होते.

ह्या सगळ्या प्रकारात हॉस्पिटलं आणि इन्शुरन्स कंपन्यांची चांदीच होते.

मात्र आधी इन्शुरन्सचे हप्ते आणि नंतर हॉस्पिटलची बिलं भरून भरून आपल्या खिशाला मोठ्ठा खड्डा पडतो. शिवाय आपल्या जिवलग पेशंटवर काय वाट वाटेल त्या चाचण्या आणि उपचार आभाळाला भिडलेल्या दरांनी केलं जाऊन त्याचं आयुष्य बेजार केलं गेलेलं असतं ते वेगळंच...

एकुणात, 'मेडिक्लेम' ही आजच्या काळातली अत्यंत गरजेची गोष्ट आहे. पण तिथे अत्यंत बजबजपुरी माजलेली आहे आणि सध्याचा तो अफाट मोठा फ्रॉड आहे असा माझा अनुभव आणि स्पष्ट मत आहे.

*****

अन आजच्या घोषणेनुसार, सरकार १० कोटी कुटुंबांना प्रत्येकी पाच लाखांचं मेडिक्लेम देणार आहे...

म्हणजे एकूण पन्नास लाख कोटींचा मेडिक्लेम...!

असो...!!

*****

जगात काहीही करा, पण आजारी पडू नका... पडलातच तर डायरेक्ट वरचं तिकीट काढून जगातून कल्टी मारा,

काहीही करा, पण ह्या मेडिक्लेम-हॉस्पिटलांच्या साडेसातीच्या फेऱ्यात सापडू नका...!

-प्रसाद शिरगांवकर

 

About the Author

प्रसाद शिरगांवकर's picture
प्रसाद शिरगांवकर

Writer, Poet, Photographer, Drupaler!!