'युगंधराचा' परीस स्पर्श

'युगंधराचा' परीस स्पर्श

 

यंदाची दिवाळी हि माझ्यासाठी खूप विशेष होती, कारण बाबांनी लिहिलेल्या 'युगंधर' या भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रात्मक कादंबरीचा मी केलेला इंग्रजी अनुवाद ऐन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पुस्तक रूपात प्रकाशित झाला. बाबांनी अनेक वर्ष श्रीकृष्ण चरित्रावर केलेले चिंतन-मनन, अभ्यासू पर्यटन, संदर्भ शोधनासाठी केलेले प्रचंड वाचन-टिपण, अनेक जाणकारांशी वेळोवेळी केलेली चर्चा, आणि बाबांची सिद्धहस्त लेखणी यातून 'युगंधर' साकारलं. २००० साली 'युगंधर' ची प्रथमावृत्ती प्रकाशित झाली आणि तिची घोडदौड आजतागायत चालूच आहे. 

ही श्रीकृष्ण कथा जगभरातल्या कृष्णभक्तांना आणि विदेशातील युवा पिढीला उपलब्ध करून देण्यासाठी तिचा इंग्रजी अनुवाद आपण करावा अशी माझी अनेक वर्षांची मनीषा होती, परंतु कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे या कामासाठी मला हवा तसा वेळ देता येत नव्हता. अखेरीस युगंधर प्रकाशित झाल्यानंतर तब्बल १२ वर्षांनी म्हणजे २०१२ साली मी युगंधरचा इंग्रजी अनुवाद करायला घेतला. कामाला आरंभ करतानाच माझ्या लक्षात आलं कि हे प्रचंड आव्हान पेलण्यासाठी मला एक मदतनीस लागणार. ही मदतनीस शोधण्याच्या कामी मला माझी शालेय मैत्रीण उमा जोशी बोडस हिने मोलाची मदत केली, आणि मधुरा फडके हिच्याशी माझी गाठ घालून दिली. ई-मेल वरून एकमेकींशी संपर्क ठेऊन, तासन तास फोन वर चर्चा करून, माझी आई, मृणालिनी सावंत हिच्या मार्गदर्शनाखाली मी आणि मधुरानं सुमारे दीड वर्षाच्या कालावधीत अनुवादाचा पहिला आराखडा तयार केला. पण काम अजून पूर्ण झालं नव्हतं. पुन्हा एक व्यावसायिक मदतनीस शोधून तिच्या साहाय्यानं संपूर्ण कादंबरीचं पुनः संपादन करून घेण्यात पूर्ण एक वर्षं  गेलं. म्हणजे आमच्या कामाची पूर्ती होण्यासाठी तब्बल अडीच वर्षांचा काळ गेला. त्यानंतर काही इंग्रजी प्रकाशकांकडून नकार मिळाल्यानंतर, मेहता प्रकाशनचे सर्वेसर्वा सुनील मेहता यांनी पुस्तक काढण्याची तयारी दर्शवली आणि दोन-अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर यंदाच्या दिवाळीत हे पुस्तक प्रकाशित झालं.
 
अनुवाद करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव. आणि या पहिल्याच खेपेत ही खूप मोठी झेप घेणं शक्य झालं ते केवळ युगंधर श्रीकृष्णाच्या आशिर्वादानंच असा माझा विश्वास आहे. नाहीतर बाबांच्या निधनानंतर २००२ सालापासून २०१२ सालापर्यंत या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद का बरं झाला नसावा? मधल्या काळात माझ्याही मनाची मशागत झाली होती. आणि ही संधी जणू काही माझीच वाट पाहत होती असं मला मनापासून वाटतं. 
युगंधरचा अनुवाद करणं हा माझ्यासाठी अतिशय आव्हानात्मक आणि त्याचबरोबर अत्यंत आनंददायी असा अनुभव होता. एक तर या निमित्तानं मला मधुरासारखी एक उत्तम मैत्रीण लाभली. शिवाय दुसरा फायदा म्हणजे एका भाषेतली चरित्रकथा दुसऱ्या भाषेत अनुवादित करताना येणारी आव्हानं माझ्या भाषा ज्ञानात भर घालत होती. बाबांची अलंकारिक मराठी भाषा इंग्रजी मध्ये जशीच्या तशी उतरवणं अवघड नव्हे अशक्यच होतं. त्यामुळे आम्ही भाषेतील अलंकारिकतेवर भर न देता त्यातील आशय इंग्रजीमध्ये शक्य तितका उतरवायचा असं मधलं धोरण पत्करलं. शिवाय आपल्या प्राचीन संस्कृतीतील अनेक संकल्पनाही पाश्चिमात्य संस्कृतीत अस्तित्वातच नाहीत. उदा: अर्घ्य, आचमन, गुरुदक्षिणा इ. अशा शब्दांचा अनुवाद न करता ते तसेच ठेऊन त्यांच्या अर्थाचे स्पष्टीकरण देणारी सूची तयार करायची असं आम्ही ठरवलं. 
असे छोटे मोठे निर्णय घेत घेत पुढे जात असतानाच माझ्याही नकळत श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्वानं मला अगदी झपाटून टाकलं. ज्या निष्काम कर्मयोगाचा त्यानं भग्वद्गीतेमध्ये पुरस्कार केला तो निष्काम कर्मयोग तो स्वतः आयुष्यभर शब्दशः जगला हे मला पदोपदी जाणवत राहिलं. माझ्याही नकळत माझ्या अडचणीच्या काळात मी त्याच्याशी संवाद साधू लागले, त्याच्या चरित्रातून प्रेरणा घेऊ लागले. तो जणू माझा हृदयस्थ सखा बनला आणि मला वेळोवेळी मार्गदर्शन करू लागला. तसं तर या पूर्वीही अनेक वेळा मी श्रीकृष्णकथा वाचलेली होती; युगंधर कादंबरीही वाचलेली होतीच, पण या निमित्तानं मला सखोल जाणवलं की खरोखरच श्रीकृष्णाच्या जगण्यावर गेली हजारो वर्षं चढलेली चमत्कारांची पुटं काढून टाकली तर तो केवळ देव्हाऱ्यात बसवून पूजत राहण्याचा देव न राहता आपला हात धरून आपल्या बरोबर चालणारा आपला सखा, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक बनू शकतो. 
या भाषांतराच्या निमित्तानं जगभरातल्या लहान थोर वाचकांपर्यंत जर ही श्रीकृष्णकथा मी पोहोचवू शकले तर माझ्या जगण्याला झालेल्या या परीस स्पर्शाचं सार्थक होईल असं मी समजते. 
इति. श्रीकृष्णार्पणमस्तु. 

About the Author

कादंबिनी धारप