नावडत्या लोकांबरोबर कसे काम कराल?

नावडत्या लोकांबरोबर कसे काम कराल?

जी मंडळी आपल्याला आवडत नाहीत, ज्या लोकांना आपण आवडत नाही, जी लोक आपल्याला सहकार्य करत नाही अशा लोकांबरोबर एखादे काम करणे अवघड असते. त्यातून त्यांना रोज सामोरे जाणे म्हणजे कळसच. पण रोजच्या जगण्यात आपल्याला अशा परिस्थितीला अनेकदा सामोरे जावे लागते. अशा नावडत्या लोकांबरोबर वावरतांना तुमची उपयुक्तता अणि मनाची शांती टिकवून ठेवण्यासाठी पुढील पाऊले उचला.

१. स्वत:पासून सुरुवात करा
माझे काहीच चुकत नाही आणि लोक उगाच नावे ठेवतात वा सहकार्य करत नाहीत असा पावित्रा घेऊ नये.. आपण मुद्दाम कुणाचा अपमान करतो का, त्यांचा चुगल्या करतो का, त्यांच्या कामात अडथळा होतो का? याचा तपास घ्यावा. चुकत असेल तर ती चूक सुधारावी. एखाद्या विश्वासू मित्राला वा सहका-याचे याविषयी मत घ्यावे. आपल्या वागण्यात योग्य बदल करावे आणि काय अनुभव येतात त्याची पडताळणी करा्वी.

२.मतभेद मान्य करा
तुम्ही सर्वांशी कायम सहमत असणे शक्य नाही. तसेच इतरही तुमच्याशी सह्मत असतील असे नाही. हे स्वीकारणे उत्तम. मुळात प्रत्येकाला प्रत्येकजण आवडणार नाही हे लक्षात घेतलेले बरे. एखादे मत आवडलेच पाहिजे याचा अट्टाहास करू नये. तुमची मते वेगळी असतील आणि ती प्रोजेक्ट/ कंपनी वा जॉबच्या फायद्याची असतील तर तसे स्पष्ट सांगून बाजूला व्हावे.मुळात कुणीच परफेक्ट नसते हे ध्यानात ठेवलेले बरे.

३. मतभेद असलेल्या व्यक्तीबरोबर मुद्दाम वेळ घालवू नका
 मतभेद आहेत पण ते पटवून, बोलून बाजूला होतील असे वाटणे साहजिक आहे. थोडा प्रयत्न करून फरक पडत नसेल तर वाद वाढवण्यात फक्त ऊर्जा वाया जाते.  दोन्ही बाजूंनी वाद सुरु राह्णे फार हिताचे नाहीच. शक्य असेल तर दूर राहावे, त्या सहका-यांच्या वाटेला जाऊ नये. असे मतभेद मैत्रीमध्ये असतील तर काही काळाकरता दूर राहणे उत्तम. 

४. दुसरीकडे लक्ष केंद्रित करा
ज्या लोकांमुळे/ सहका-यांमुळे तुम्हाला तुमची ऊर्जा आणि वेळ वाया जातो असे वाटते त्यांच्यापासून कालांतराने दूर राहणे उत्तम आहे. जी कुणी एक दोन सहकारी/ मित्रमंडळी असतील त्यांच्याबरोबर वेळ घालवा. कुणी नसेल तर इतर काय शिकता येईल, काय बदल करता येईल असा विचार करावा. दुस-या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करावे. आपले काम शांतपणे आणि मन लावून करण्यासाठी ही कृती वेळीच करणे जरूरीचे आहे. जे आवडते त्याकडे लक्ष देणे, सकारात्मकता बाळगणे ह्या गोष्टी सरावाने जमू लागतात. मग त्याचा फायदा सुद्धा लक्षात येतो.

५.पूर्वग्रहाचे ओझे/बॅगेज बाळगू नका

एखादी व्यक्ती आवडत नाही, त्या व्यक्तीला आपण वा आपली मते पटत नाही असा पूर्वग्रह मनात ठेऊ नका. अशा पूर्वग्रहाने मनावर ताण येईल, प्रत्येक नवे काम, नवीन प्रोजेक्ट वा नवी संधी एक संकट वाटत राहील. त्यापेक्षा जे घडले ते मागे सारून पुन्हा नव्याने त्या व्यक्तीकडे, त्या प्रोजेक्टकडे बघणे उत्तम. त्यामुळे ताण कमी होईल, डोके अधिक चांगले चालेल. आपल्याला नावडत्या लोकांच्या बोलण्यातला उपहास कळला नाही असे दाखवणे उत्तम असते. तसे करा आणि आपले लक्ष मोठ्य़ा ध्येयावर केंद्रित करा. त्यांनी खरे/ खोटे कसेही कौतुक केले तरी त्यांचे मनापासून आभार माना.
काही वेळा ती माणसे आणि त्यांचा दृष्टीकोन बदलला आहे असे तुम्हाला जाणवेल. तसे असेल तर उत्तमच. सावध रहा पण मुद्दाम शंकेखोर वृत्ती बाळगू नका. काही वेळा बदलेली माणसे आणि त्यांचे वागणे याचा विचार करून अधिक चांगली कृती करावी.
कितीही ताण आला तरी नोकरी सोडणे वा प्रोजेक्ट बदलणे अशी कृती अविचाराने करू नका, अनेकदा हा ताण सहन करायला शिकणेच, आपल्या मतावर ठाम राहयला शिकणे ही सर्वात मोठी आघाडी असू शकते. 

-सोनाली जोशी

About the Author

सोनाली's picture
सोनाली

मिळून सा-याजणी, मेनका , रोहिणी, अक्षर मासिकातून लेखन प्रसिद्ध.

लोकमत, लोकसत्ता, सकाळ, मटा या पेपरातून कविता, लेख 

शक्यतेच्या परिघावरून कविता संग्रह