फीलिंग हैप्पी अँड ब्लेस्स्ड

     आज सकाळपासूनच पावसानं संतत धार धरली होती. श्रावण लागून संपायची वेळ आली अन आज हा आषाढा सारखा धोधो कोसळत होता. हवामानखात्यानं मुसळधार पावसाचं भविष्य वर्तवलं होतंच आणि चक्क याने आज ते खरं केलं होतं. अनेक जणं काही नाही पडत पाऊस बीउस इतका अश्या ज्यादा आत्मविश्वासानं घरून निघाले होते ऑफिसला जायला ; त्यांना यानं वाटेतच गाठून त्यांचा तो ज्यादाचा आत्मविश्वास पार भिजल्या सश्यागत ओला चिंब करून टाकला. अन वर सोसाट्याचा वादळ वारा फुल स्पीड वर लावलेल्या पंख्यासारखा सोडून हुडहुडीसुद्धा भरवली होती. आमचं घर असलेली बिल्डिंग तशी आतल्या बाजूला होती पण अलीकडे मुख्य रस्त्याला असलेल्या ट्राफिक पायी आमच्या रस्त्यावरची रहदारी अंमळ वाढलीच होती. वाहनांची आणि माणसांचीसुद्धा. आमच्या रस्त्याला भर दुपारी इतकी छान सावली असे कि हातगाडीवाले, धुण्या भांड्याची कामं करणाऱ्या बाया, शाळेतली पोरं हमखास कुणी ना कुणी त्या गुलमोहोराच्या आश्रयाला आलेलं दिसे. डेरेदार अन दिमाखदार दिसे तो वृक्ष अगदी. उन्हाळयाच्या दिवसांत गुंजेसारख्या लाल भडक रंगाच्या फुलांनी डवरला कि मूर्तिमंत वैशाख दिसे तो परंतू त्या लाल भगव्या हातांनी सावली मात्र थंड्गारच धरे. आज पावसाच्या रंगानं मात्र त्याची ती लाल भडक फुले पार कुस्करून चेंदामेंदा चिखल करून टाकली होती नुसती. खोड फार रुंद नव्हतं त्याचं असेल दिड एक फूट व्यासाचं पण उंच झालं होतं चांगलं आणि फांद्या मात्र भरदार गच्च. त्याच्या बाजूलाच एक तगरीच झाड उगवलं होतं. ते सुद्धा त्याच्या गडद हिरव्या तकतकीत पानांनी आणि शुभ्र फुलांनी डवरलेलं असे नेहेमीच. एकाचं शरीर गुलमोहोराचं, दुसऱ्याचं तगरीचं पण दोघांचा आत्मा मात्र सदाफुलीचा. कायम फुललेला.

           पाऊस थांबण्याचं काही चिन्ह दिसत नव्हतं. उलट जोर वाढलांच होता त्याचा. मी जेऊन खाऊन जरा आडवं होण्याचं ठरवलं. हवेत अत्यंत सुखद गारवा आला होता. आवरासावर करून पांघरूण घेऊन मी पलंगावर लवंडले. आणि वर्तमानपत्र वाचतां वाचतां मला कधी डोळा लागला ते कळलंच नाही. दुपारची अशी झोप लागली कि हमखास मला काहीतरी विचित्र स्वप्नं पडत. पण आज मात्र झोपेत मला बाहेरचे धुंवाधार पावसाचेच दृश्य दिसत होते. गावाकडून मुंबईत शिकायला आणि म्हणून माझ्याकडे वास्तव्यास असलेल्या भाच्याची काळजी मी झोपेत देखील करत होते. दहा वेळेला त्याला फोन करत होते कुठपर्यंत पोहोचलाय ते विचारायला. पण फोन काही केल्या लागत नव्हता. घरात एक विषण्णता पसरलेली मी अनुभवत होते. भगभगीत प्रकाश घरात आला होता पण त्यात चैतन्य नव्हतं. त्याला औदासिन्याचा स्पर्श होता. मी सतत बाल्कनीत येरझारा घालत होते आणि रस्त्यावर डोकावून बघत होते नजर जाईल तिथपर्यंत. त्याची वाट बघणं चालू होतं स्वप्नातच बरं का. आणि इतक्यात त्या साऱ्या दृश्यामध्ये मला प्रचंड काहीतरी उणीव जाणवली. तो माझ्या घराखालचा रस्ता आहे असं मला वाटतच नव्हतं . जणू काही दुसऱ्याच रस्त्याचं दृश्य मी पाहत होते. पण कोपऱ्यावरचं फायर ब्रिगेड च स्टेशन दिसत होतं. बाजूची इमारतही तीच होती अगदी सावंत वहिनींनी वाळत घातलेल्या कपड्यांसकट सगळं मला दिसत होतं. पण तरीही अनोळखी वाटत होत. आणि एवढ्यात एका काssङ्कन झालेल्या जोराच्या आवाजानं मला दचकून जाग आली. रस्त्यावर आरडा ओरडा ऐकू आला. काहीतरी अपघात झाला होता नक्कीच. क्षणभर मला समजेच ना कि मी तर बाल्कनीत सुमित ची वाट बघत होते मग इथे पलंगावर कशी? पण मग माझ्या लक्षात आलं कि मी स्वप्नात होते. पण रस्त्यावर चा गदारोळ तर ऐकू येत होता त्या जोराच्या आवाजापाठोपाठ चा. मी ताबडतोब धावतच बाल्कनीत गेले. आणि ते दृश्य बघून मट्कन खालीच बसले. तो स्वप्नात दिसलेलाच रस्ता मला माझ्या घराखाली दिसत होता की. काय बरं दृश्य होतं ते?

            दक्षिणेकडून संतत धार मारणाऱ्या पावसानं कमरेत लचक भरलेल्या वयस्क माणसाप्रमाणे उजव्या बाजूला कललेला तो भगवा तपस्वी आज उन्मळून पडला होता. त्याच्या त्या डेरेदार भरगच्च फांद्या विकलांग झाल्याप्रमाणे रस्त्यावर वेड्या वाकड्या विखुरल्या होत्या. लाल हिरवा चिखल दिसत होता रस्ताभर. त्याची पानं सोसाट्याच्या वाऱ्यानं अजूनही हालत होती थोडीशी धुगधुगी असल्याप्रमाणे. आणि ते सारं पाहून आता मात्र मला उमाळा आवरेना. तीन तपाचं नातं होत त्याच्याशी माझं. माझ्या आयुष्यातले कितीतरी प्रसंग त्याने माझ्या बाल्कनीतून डोकावून पहिले होते. पण मला कधीच तो आगंतुक वाटला नाही. आपल्या धूम्रवर्णीय फुलांनी त्याने माझ्या मनाला नेहेमीच एक रसरशीत ऊर्जा दिली होती. आणि आज तीच ऊर्जा एका कलेवराच्या रूपात निव्वळ 'लाकडं' होऊन माझ्या डोळ्यासमोर निर्जीव पडली होती. फांद्यांचा पसारा अचानक हटल्यामुळे माझ्या घरात तो स्वप्नात पाहिलेला भगभगीत प्रकाश अवतरला होता. उघडा बोडका सहन न होणारा उजेड.

        आज गणपतींचे विसर्जन होते. अश्या वेळेस आधीच मन उदास असते त्यात आज ह्या ऋषीमुनींनी पण प्रस्थान ठेवले होते.कसे सहन करणार होतो आम्ही हे गमन? म्युनिसिपालिटीच्या लोकांनी त्याची लाकडं कापून रस्ता साफ करायला सुरुवात केली होती. त्या लाकूड कापायच्या मशीनच्या आवाजानं पुन्हा पुन्हा माझी जखम ओली होत होती. गौरीगणपती विसर्जन म्हणून सुमित लौकर घरी आला. पावसाने तर अचानक पोबारा केला होता एकदम. जणू त्या गुलमोहोराचे विसर्जन करण्यापुरताच आलेला. तो पडलेला वृक्ष आणि गणपती विसर्जन यांचा परिणाम म्हणून सुमितचा सुद्धा चेहरा पडला होता. त्याने त्यांचा फोटो काढून फेसबूक वर अपलोड करून "फीलिंग डिप्रेस्ड" असे स्टेटस टाकले. संध्याकाळी विसर्जनाच्या वेळी गणेशाला "पुढच्या वर्षी लौकर या " म्हणतांना अचानक एक कल्पना माझ्या मनात चमकून गेली. ती मी सुमित ला सांगितल्यावर त्याचेही डोळे चमकले.

        रात्री स्वप्नात मला तो भगवा तेजस्वी तपस्वी भेटला आणि म्हणाला अगं वेडे रडू नकोस, येईन कि मी परत! .. हास बघू आता.. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आणि सुमित दोघंही शुचिर्भूत होऊन खाली उतरलो आणि त्या गुलमोहोराची एक फांदी जी मी काल घरी आणून तात्पुरती पाण्यात ठेवली होती ती आमच्या इमारतीच्या आवारातच खड्डा करून व्यवस्थितपणे लावली. माती घातली आणि खड्डा नीट भरला. त्याला थोडं पाणी घातलं आणि "पुनरागमनायच" म्हणून त्याला हात जोडून प्रार्थना केली आणि मरगळ झटकून हसत मुखानं घरी आलो. मला खात्री होती 'तो नक्की रुजणार होता पुन्हा'. आता माझं मन शांत झालं होतं. सुमित नं ही त्या फांदीचा आणि आमचा एक सेल्फी कडून फेसबुक वर टाकला आणि स्टेटस अपलोड केलं "फीलिंग हैप्पी अँड ब्लेस्स्ड"....

संगीता मुकुंद परांजपे

About the Author

Sangeeta