इंटरप्रिटेशन

आज माझ्याकडे वर कामाला येणारी स्वाती म्हणाली "ताई आता या महिन्यात पुढच्या आठ पंधरा दिवसात मला कधीतरी सुट्टी घ्यावी  लागेल हं." मी तिला विचारलं का ग बाई कशासाठी सुट्टी लागणारय तुला? तर म्हणाली कि ताई माझ्या छोटी ला आता शाळेत घालायचय जून मध्ये. तर त्यासाठी ऍडमिशन चे फॉर्म्स निरनिराळ्या शाळेतून आणायचेत त्यासाठी जावे लागेल. हल्ली ऍडमिशन म्हणजे काय ताई फार कठीण काम झालंय बघा. 'नर्सरी' असो किंवा  'प्ले ग्रुप' काहीही म्हणा 'खेळ' तर पालकांचाच होतो. निरनिराळ्या शाळेत धावायचं फॉर्म आणायला, नंतर दोन अडीच वर्षाच्या मुलांची इंटरव्यू ची तयारी करून घ्या, नंतर कुठे नाव  लागेपर्यंत जीव टांगणीला. हे सगळं ऐकून मला माझ्या मुलाच्या केजी च्या ऍडमिशन च्या वेळचा किस्सा आठवून हसू आलं. 
हि गोष्ट सुमारे चोवीस पंचवीस वर्षांपूर्वीची बरं का. माझ्या मुलाचं नाव एका शाळेच्या लिस्ट मध्ये लागलं होतं. इंटरव्यू वगैरे सगळं पार करून झालं होतं. आता फक्त फी भरून ऍडमिशन तेवढी घ्यायची बाकी होती.  आणि त्या दिवशी घरी कुणीच नसल्यामुळे ऍडमिशन घेण्यासाठी मी त्यालाही माझ्याबरोबर घेऊन निघाले होते. जाता जाता तो मला त्याच्या बोबड्या बोलात विचारत होता 'आई आपण कुते  चाललोय?' तर मी त्याला सांगितले कि अरे आता तुला शाळेत घालायचे ना तर त्यासाठी 'ऍडमिशन' घ्यायला जातोय आपण तुझ्या शाळेत . शाळेत खेळायचं, गाणी म्हणायची, मज्जा मज्जा करायची. मग घ्यायची ना तुला ऍडमिशन? तर हो म्हणाला आणि अगदी गोडसं हसला. यथावकाश आम्ही शाळेत पोहोचलो. फॉर्म आणि फी च्या विंडो वर आमचा सहाव्वा  नंबर लागला. थोड्या वेळाने महाशय कंटाळले. सहाजिकच होतं ते. इकडे तिकडे बागडू लागले. मी त्याला फार लांब जाऊ देत नव्हते आणि अगदी हात धरूनही ठेवत नव्हते. माझ्या नजरेच्या टप्प्यात ठेवला होता मी त्याला. थोड्या थोड्या वेळाने येई आणि म्हणे आई चल ना जाऊया. दर वेळीस मी त्याला म्हणे झालं हं आता..  आता आपला नंबर  आला कि आपण पैसे भरायचे आणि ऍडमिशन घ्यायची आणि मग लग्गेच जाऊ आपण. असं करता करता आमचा नंबर आला एकदाचा. 
मी सारे सोपस्कार पार पाडले आणि ऍडमिशन च काम झाल्यामुळे अतिशय आनंदाने विजयी मुद्रेने त्याला कडेवर घेऊन निघाले एकदाची घरी परत जायला. त्यालाही म्हंटलं चला बाळा आता तुला आधी खाऊ घेऊया हं काहीतरी. तर गाल फुगवून मला म्हणाला "नाही मला आधी 'ऍल्मीतन ' पायजे " मी हसत हसत म्हंटले होय कि .. मिळाली ना आपल्याला 'ऍडमिशन'. त्यावर लग्गेच तो उत्तरला 'मग दे ना मला 'ऍल्मीतन' कुताय ती दे ना मला थेलायला'!!!.  त्याचं ते निरागस बोलणं ऐकून मला इतकं हसू आलं.  
 त्याच्या लेखी 'ऍडमिशन' म्हणजे एक खेळणे होते. पण त्याने 'ऍडमिशन' चे तेंव्हा केलेले हे गमतीशीर 'इंटरप्रिटेशन' आत्ताच्या काळात  किती खरे ठरलेय नाही का?? 
-संगीता मुकुंद परांजपे         
 

About the Author

Sangeeta