भीमरूपी महारुद्रा - एक अविस्मरणीय अनुभव

        सलील कुलकर्णी हे नावं सर्व परिचित आहेच. अग्गोबाई ढग्गोबाई, दिवस असे कि, आयुष्यावर बोलू काही, एकटी एकटी घाबरलीस ना, हे गजवदन, तुझ्या माझ्या सवे, नसतेस घरी तू, देते कोण देते, दूर देशी गेला बाबा, चिंटू मधील गाणी, क्षण अमृताचे अशी एका ना दोन, ८०० हुन अधिक सुरेल गाणी श्रोत्यांच्या मनात आजही ताजी आहेत. अगदी बाल-गोपालांपासून ते तरुण, वृद्ध, सर्वच वयोगटातील श्रोते सलीलच्या भावगीतांची, भक्तिगीतांची, चित्रपट गीतांची, आतुरतेने वाट पाहत असतात. अनेक वैशिठ्य पूर्ण प्रयोग करून नाविन्यपूर्ण, आकर्षक आणि सुरेल सांगीतिक अनुभव द्यायचा सलील कुलकर्णी यानी पायंडा रचला आहे. गायक, संगीत दिग्दर्शक, लेखक, संगीत संयोजक, कवी, आणि वैद्यकीय शाखेचे पदवीधर अश्या अनेक भूमिकेत सलील लोकांसमोर येतो आणि अनेक मान्यवर संगीतकारांमध्ये त्याची निश्चितच गणना होते. सलील चं दिलखुलास, हसरं, मन मिळवू, खोडकर, सखोल आणि तितकंच सांगीतिक व्यक्तिमत्वं नेहमीच सर्वांना आपलंस करून टाकतं. 

                आजवर अनेक गाण्यांचे कार्यक्रम, चित्रपट, मराठी मालिका (मधली सुट्टी, सा रे ग म प), कविता, पुस्तक (लपवलेल्या काचा, शहाण्या माणसांची फॅक्टरी) अश्या अनेक माध्यमातून सलील ला पाहायचा ऐकायचा, योग नेहमीच आला आहे. या वर्षी 'अभिजात' नावाचा नवीन उपक्रम - अनेक नाविन्यपूर्ण आणि 'अभिजात' गाण्यांची शृंखला घेऊन सलील रसिक प्रेक्षकांसमोर येत आहे. अभिजात ही एक आगळीवेगळी संकल्पना फेसबुक वर प्रसारित केली गेली. यात जगाच्या कानाकोपऱ्यातून गायक सहभागी होऊ शकतात आणि त्यातील एक किंवा अनेक गायक गीताचे मूळ गायक बनू शकतात. आज पर्यंत अभिजात मध्ये शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे, देवकी पंडित अश्या मातब्बर गायकांनीही गाणी गायली असून, 'सूर नवे हे गीत नवे' ,'घनवदन', ही गाणी फेसबुक द्वारे निवड झालेल्या जगभरातील गायकांनी गायली आहेत. अभिजात मधील ६ वे गाणे 'भीमरूपी महारुद्रा' हे समर्थांनी रचलेले स्तोत्र, सलीलने बालकलाकारांसाठी संगीतबद्ध केले असून हे गीत गाण्यासाठी जगभरातून तब्बल २४ मुला-मुलींची निवड झाली आहे. जेंव्हा माझी मुलगी सायली लिमये हिचे नाव सलील ने घोषित केले त्यावेळेस सायली आणि आम्ही सर्वच आनंदून गेलो. कवी समीर सामंत याने भीमरूपी ला समर्पक असे स्फूर्ती गीत शब्दबद्ध केले असून, सलीलने तितक्याच समर्थपणे आणि सक्षमपणे समर्थ रामदासांच्या दैवी गीताला संगीत बद्ध केले आहे. सायली ची गुरु सौ. ऋचा जांभेकर हिची निवड अभिजात मधील ५ थे गाणे 'घनवदन' या ब. भा. बोरकरांच्या गीतासाठी झाली आणि सायलीची निवड अभिजात च्या ६ व्या गाण्यासाठी झाली हा एक गोड योगायोगच म्हणावा लागेल. 

        २४ मुलांपैकी ६ मुलं - हे अगदी चिमुकले बाळ-गोपाळ, त्यांचे ध्वनिमुद्रण आणि चित्रीकरण सलील ने आधीच करून घेतले. १८ मुलांची (वय वर्षे ६-१३) निवड झाल्यावर पुढील अशक्यप्राय वाटणारं काम होतं ते म्हणजे सर्व मुलांना एकत्र एका ठिकाणी आणणं आणि गीताचे ध्वनिमुद्रण आणि चित्रीकरण करणं. सलील चा याबाबतीतला अनुभव वाखाणण्याजोगा असून त्याने अतिशय सक्षमपणे विविध गावातील पालकांशी संवाद साधून एक सर्वमान्य वेळापत्रक तयार केले आणि एका आठवड्यात गीताचे ध्वनिमुद्रण आणि चित्रीकरण करण्याचे ठरविले. अमेरिकेतील सर्व ४ मुलांना हे आव्हान होतं, पण तरीही सर्व पालकांनी तत्परतेने व्यवस्था करून मुलांना नियोजित वेळी पुण्यात हजर केले. भारतातील १४ मुलांच्या पालकांनीही आपापल्या मुलांना नियोजित वेळेत हजर करून अभिजात उपक्रमात महत्वाचा वाटा उचलला. १ ल्या दिवशी, १२ जुन ला, सलील ने सर्व १८ मुलांची तालीम त्याच्या घरी घेतली. सर्व मुलं, त्यांचे पालक आणि सलील यांची ही पहिलीच भेट, पण सलील ने सर्वानाच पहिल्या भेटीतच आपलंस करून घेतलं. मुलांचे त्यांच्या त्यांच्या आवाजाच्या पट्टीप्रमाणे विभाग करून तालमी झाल्या आणि सर्व मुलांना यथायोग्य ठराविक ओळी सुद्धा दिल्या गेल्या. या सर्व बाबतीतला सलील चा हातखंडा आहे हे प्रकर्षांनं जाणवतं. २ ऱ्या दिवशी 'DAWN' या नामांकित स्टुडियो मध्ये ध्वनीमुद्रण झाले. बहुतांशी मुलांची ही ध्वनिमुद्रणाची पहिलीच वेळ, तरीही, सर्व मुलांनी आणि ध्वनिमुद्रक तुषार पंडित, व संगीत संयोजक सलील कुलकर्णी यांच्या टीम ने ध्वनिमुद्रणाचे अत्यंत महत्वाचे काम न कंटाळता अचूकपणे पार पाडले. मुलांची जिद्द, प्रामाणिकपणा, सचोटी आणि जिज्ञासू वृत्ती प्रकर्षाने दिसून येत होती. सलील ने या सर्व मुलांना सहज सुंदर आणि हळुवारपणे मार्गदर्शन केले आणि एक सुरेल सांगीतिक अविष्कार निर्माण केला. 

        पुढचा टप्पा होता गाण्याच्या चित्रीकरणाचा - 'सज्जनगड' म्हणजे समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैवी स्पर्शाने पावन झालेले पवित्र ठिकाण चित्रीकरणासाठी निश्चित झाले होते. ही कल्पनाच सुखद आणि अंगावर शहारे आणणारी होती. माझी आत्या डॉ प्राध्यापक इंदुमती लिमये ही सज्जनगड आणि समर्थ रामदास स्वामी प्रतिष्ठानशी अनेक वर्षे निगडित असल्यामुळे माझ्यालेखी समर्थांचे आणि सज्जनगडाचे विशेष महत्व आहेच पण आता 'अभिजात - भीमरूपी' च्या निमित्ताने या पवित्र वास्तूवर जाण्याचा पुन्हा योग आला हे विधी लिखितच असावे. सकाळी ५ ला बसने पुण्याहून निघालो आणि ८-८:१५ च्या सुमारास सज्जनगडाच्या पायथ्याशी पोहोचलो. पायथ्यापासून सज्जनगडावर जाण्यासाठी जवळजवळ २५० पायऱ्या चढून जावे लागते. अनेक गावांच्या नावे १२ हून अधिक हनुमान मूर्ती (मसूर मारुती, पारगावचा मारुती, धाब्याचा मारुती, ... ) या मार्गात स्थानापन्न आहेत हे वैशिष्ठ्य. श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वारातून गडावर प्रवेश केला. एक विलक्षण प्रेरणादायी, अभिमान वाटावा असा क्षण होता तो. जवळजवळ ३५० वर्षांपूर्वी असंख्य शत्रूंना समोर जाऊन सस्वराज्य आणि एकसंध सुराज्य निर्माण करणाऱ्या भीमपराक्रमी समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांच्या सन्मुख नकळत नतमस्तक झालो. सज्जनगड हे ठिकाण चित्रीकरणासाठी निवडल्याबद्दल अंतरी सुखावलो आणि सलील च्या कल्पनाशक्ती आणि विचारबुद्धीला मनोमन सलाम केला. गडावर श्री अजित गोसावी आणि समर्थ वंशज भूषण स्वामींच्या वतीने पोहे आणि चहापानाची विशेष सोय केली होती. अजित गोसावींनी सर्व मुलांना तयार होण्यासाठी निवास गृहाची व्यवस्था केली होती. प्रथम समर्थांच्या पवित्र वस्तूंचे दर्शन घेऊन, समाधीचे दर्शन घेऊन मग चित्रीकरणाला प्रारंभ झाला. समर्थ वंशज भूषण स्वामींचे गडावर असणे हाही एक सुवर्णयोगच होता. भूषण स्वामींनी समाधी मंदिरात भीमरूपी या समर्थांच्या रचनेचे महत्व अत्यंत विस्ताराने आणि सहज सोप्या भाषेत सांगितले. समर्थ रामदास रोज १२०० सूर्यनमस्कार घालत, काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत समर्थानी ११०० हुन अधिक हनुमान मंदिरं स्थापन करून शक्तिपूजेचं महत्व जनमानसात रुजवलं होतं, असे अनेक किस्से ऐकल्यावर समर्थांच्या भीम पराक्रमाची कल्पना येते. सलील आणि सर्व मुलांना भूषण स्वामींनी आशिर्वाद दिले. सलीलला काहीतरी गाण्याचे आवाहन केल्यावर सलीलने उत्सफुर्तपणे आणि अत्यंत आदरपूर्वक शिव रायांचे 'शिवकल्याणराजा' हे गाणे सादर केले - हाही एक योगच ! चित्रीकरणाचा पहिला टप्पा गडाच्या पायऱ्यांवर विविध ठिकाणी पार पडला. मुलांचे सहकार्य हे विशेष उल्लेखनीय होतेच पण सलील ची इतक्या मुलांबरोबर एकत्रपणे काम करण्याची हातोटी पुन्हा पुन्हा नमूद करण्यासारखी आहे. दुपारी १:३०-२:०० च्या सुमारास गडावर सर्वानी महाप्रसाद घेतला. आमटी, भात, गव्हल्यांची खीर आणि ताक असा साधाच पण पोटभर आणि चविष्ट मेनू. 'जय जय रघुवीर समर्थ' च्या जय घोषात सर्व प्रसाद दुमदुमून गेला होता. भोजनानंतर श्री अजित गोसावी यांनी समर्थांच्या समाधी ला अर्पण करावयाचा 'विडा' सलील ला दिला हाही एक योगच, सलील ने तो विडा आम्हां सर्वांबरोबर वाटून घेतला. पुढच्या टप्प्यातील चित्रीकरण गडाच्या मागच्या बाजूस असणाऱ्या पठारावर झाले. अत्यंत सुंदर, निसर्गरम्य असा तो परिसर आहे. वेळोवेळी निसर्गाच्या भव्यतेची, उंचीची, खोलीची आणि सौंदर्याची अनुभूती देत सज्जनगड, प्रेरित आणि अचंबित करतो. वेळोवेळी हनुमंताच्या सवंगड्यांनी चित्रीकरणात हजेरी लावून अखंड भीमरूपी टीम ला जणू आशीर्वादच दिले ! उत्तम संगीत, संगीत दिग्दर्शन आणि संकलन, संर्पक गीताची भीमरूपी स्तोत्राला जोड, लहान आणि गोड गायक, यथायोग्य ध्वनिमुद्रण अन चित्रीकरण, सज्जनगडाची साथ - या सर्वातून एका विलक्षण, अविस्मरणीय आणि सुरेल भीम-पराक्रमाची अनुभूती येते यात शंकाच नाही - आणि म्हणूनच सलील ला म्हणावेसे वाटते - 

" भीमरूपी सार्थ उमटे, अर्थ समर्थही वंदिती
शब्द वर्मी मूर्त होती, भाव सार्थही दाटती
चित्र-दर्शी भाव-मुद्रा, स्पर्श हनुमंताचे दाविती ।।

‘अभिजात’ कल्पना स्फुरते, भीम पराक्रम गर्जतो
विश्वव्यापी शक्ति साठे, अठरा उड्डाणेही लांघती
भीमरूपी आर्त स्मरते, अन देव अंतरी संचारतो ।। "

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

 

 

-अवनीश लिमये 

 

 

 

About the Author

avaneeshlimaye