
एकदा मुलं लहान असताना त्यांना पहिल्यांदाच चढून नेलं होतं पर्वतीवर तेव्हा इतिहासप्रेमी मुलगा चेहऱ्यावर अमाप उत्सुकता घेऊन म्हणाला होता "पुस्तकात वाचतो ते पेशवे आणि इतर लोक खर्रे खर्रे इथे येऊन गेलेत ना!" मोठं झाल्यावर अशी इतिहासाची अनुभूती येणं कमी होत असावं बहुधा.मला असे इतिहासाशी जोडण्याचे अनुभव फार क्वचित आले. हो चि मिन्ह सिटी जवळच्या कू ची प्रांतातल्या कू ची टनेल मधे अशी भूतकाळाला स्पर्श केल्याची अनुभूती मिळाली. व्हिएतकॉंग(कम्युनिस्ट रिबेल्स)गुरीला सैनिकांनी वर्षानुवर्ष राबून(१९४८ ते १९७५),साध्या आयुधांनी खणलेली आणि रचनाकारांना-तंत्रज्ञांनाही तोंडात बोटं घालायला लावतील अशी भुयारं आणि बूबी ट्रॅप्स पाहिले. जवळ जवळ १२० किमी. भुयारं आहेत ही.(नॉर्थ-साउथ व्हिएतनामच्या सीमेवरही व्हिन मॉक टनेल्स आहेत.अमेरिकन सैन्न्यानं इथली गावं उठवायचा प्रयत्न केला तेव्हा गावकऱ्यानी राहण्यासाठी खणलेली आहेत.१० मी.पासून ३०मी पर्यंत खोली आहे.गावाचे सगळे व्यवहार इथेच चालत.सगळे गावकरी वाचले आणि मुलंही जन्माला आली इथे.ही टनेल आमच्या कार्यक्रमात नव्हती.)कू ची टनेलच्या आत उतरून फक्त वीस मीटर रांगत गेलो.अंगावर काटा आणणारा अनुभव.गेल्या फक्त पंधरा ते वीस वर्षात हा भाग पर्यटकांसाठी सुरक्षित आणि योग्य केलाय व्हिटनामी सरकारनं.त्याआधी सगळं जवळजवळ मृत होतं.अगदी भुयारांच्या वरच्या जमिनीवरचं जंगल-शेतं सुद्धा.सगळं नवं लावलेलं.मूळ इकोसिस्टिमचं काय झालं? कुणास ठाऊक.
कू ची प्रदेशाकडे जाताना नेटवर वाचलेलं आठवत होते. पण गाईड कडून या प्रांताबद्दल ऐकण्याचा अनुभव वेगळा.बऱ्याच प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं(बहुधा)तो देत होता.