सोशल मीडियाच्या माध्यमातून नोकरी(job)

केवळ पोस्ट टाकणं, व्हिडिओ अपलोड करणं यापुरताच सोशल मीडियाचा वापर होतो असं नाही. तर नोकरी शोधण्यासाठी, इंटर्नशिपसाठी, करिअरमध्ये बदल करतानाही सोशल मीडियाचा वापर करता येतो. यासंबंधीच्या काही टिप्स आजच्या लेखात...

नोकरी शोधताना करिअर वेबसाइटबरोबर सोशल मीडियाचा वापरही गरजेचा आहे. वेगवेगळे व्यवसाय करणारे तसेच कंपन्या, जागा भरायच्या असतील तेव्हा तेव्हा सोशल मीडियाचा वापर करत असतात. रिक्रूटिंग एजन्सीज सोशल मीडियाचा वापर करतात. फ्रीलान्स काम करणारे किंवा त्यांच्याकडून काम करून घेणारे त्यांच्या अपेक्षा सोशल मीडियावर पोस्ट करतात. त्यामुळे तुम्ही जर नवीन नोकरी शोधत असाल किंवा तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर सोशल मीडियावर त्याचा शोध घेणे शक्य आणि आवश्यक झाले आहे. नोकरी शोधण्याकरिता किंवा इंटर्नशिप शोधण्यासाठीसुद्धा सोशल मीडियाचा वापर पुढीलप्रमाणे करता येतो.

अनुभव नसताना नोकरी शोधण्याकरिता : तुम्ही जर पहिलीच नोकरी शोधत असलात तर तुमचं कौशल्य/शिक्षण असलेल्या क्षेत्रांमध्ये कुठल्या कंपन्या आहेत याची माहिती इंटरनेटवर शोधून अवश्य वाचावी. त्या कंपन्या सोशल मीडियावरसुद्धा हीच माहिती देतात. सोशल मीडियामध्ये कोणत्या कंपन्या सध्या अर्ज स्वीकारत आहेत, तसेच कुठल्या कंपन्यांमध्ये नोकरीच्या जागा उपलब्ध आहेत याचा शोध घेता येतो. Linkedin या वेबसाइटवर खास करून नोकऱ्या पोस्ट केल्या जातात, त्या माध्यमाचे सदस्य होणे आवश्यक आहे. समजा, तुम्ही कॉलेजमध्ये आहात, त्याच कॉलेजातून किंवा त्याच शिक्षण संस्थेचे/विद्यापीठाचे जे माजी विद्यार्थी आहेत त्यांच्याशी तुम्ही सोशल मीडियातून संपर्क साधणेही फायद्याचे आहे. त्यांच्याशी माहितीची देवाण-घेवाण करावी. त्यामुळे एखादी नोकरी किंवा एखादी इंटर्नशिप असेल तर त्याकरता तुम्ही योग्य व्यक्ती आहात का, याची कल्पना त्यांना येऊ शकते. अगदी नवीन वा माहिती नसलेल्या एखाद्या व्यक्तीला काम देण्यापेक्षा सर्वसाधारण जी माहिती असते त्या व्यक्तीला काम दिले जाते. हा ओळख वाढवण्याचा उद्देश सोशल माध्यमातून साध्य करता येतो. दुसऱ्या गावात, दुसऱ्या राज्यात, वा दुसऱ्या देशात सोशल माध्यमातून संपर्क साधता येतो. कालांतराने अनोळखी असलेली व्यक्ती ओळखीची होऊ शकते. तुम्ही जर एवढा विश्वास संपादन करू शकला तर सोशल माध्यमातून योग्य नोकरीपर्यंत पोहोचता येणे शक्य आहे.

तुम्हाला असलेला नोकरी बदलायची आहे किंवा नवीन नोकरी शोधायची आहे तर ज्या प्रकारे तुम्ही एखाद्या नेटवर्किंगचा म्हणजेच प्रत्यक्ष ओळखीचा उपयोग करता तसाच उपयोग या सोशल माध्यमाचासुद्धा करता येतो. तुम्ही नियमितपणे जर काही ठरावीक लोकांशी संपर्क साधत असला आणि तुम्ही विश्वासार्ह वाटत असाल तर त्या व्यक्ती तुमचं नाव नक्कीच विचारात घेतील. Linkedin सारखे माध्यम तर मुद्दाम नोकरी आणि व्यवसाय याकरिता तयार केले गेले आहे. ते लक्षात ठेवावे.

अनुभवी म्हणून नोकरी शोधण्याकरिता :तुमच्याच कंपनीतले, बदलून गेलेले माजी वरिष्ठ तुम्हाला त्याच्या नव्या कंपनीत काम देऊ शकतात. अशा प्रकारे अनेकांना नोकरी मिळते. तशाच प्रकारे या सोशल माध्यमात असलेल्या ओळखीतली माणसं ज्या कंपन्यांमध्ये जातील तिथे तिथे तुम्हाला नोकरीची संधी मिळू शकते याची नोंद घ्यावी. त्याकरता तुमचा सोशल मीडियावरचा वावर योग्य असावा. प्रोफाइल अद्ययावत असावी. जी कौशल्ये आहेत, पदव्या आहेत, माहिती आहे ती सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये सहज दिसायला हवी. तुम्ही जर LinkedIn सारखे माध्यम वापरत असलात तर तुम्हाला विचारले जाणारे प्रश्न किंवा व्यक्तिगत निरोपातून योग्य वेळी संपर्क करणे, प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्याविषयी योग्य अंदाज बांधता येतात. तुमची विश्वासार्हता ही सगळ्यात महत्त्वाची जमेची बाजू आहे. ती कायम ठेवायला हवी.

इंटर्नशिप :अभ्यासाच्या क्षेत्रात ज्या कंपन्या आहेत तिथे नोकरी करणाऱ्यांच्या प्रोफाइल तुम्ही बघू शकता. त्यांची छाननी तुम्ही करू शकता आणि त्यानुसार फक्त नोकरीला अर्ज करण्यापेक्षा शिक्षणाच्या दुसऱ्या वा पहिल्या वर्षापासूनच इंटर्नशिप करता येते. अनुभव मिळतोच, त्याशिवाय ही तयारी करताना एक ध्येय समोर राहते. एक, दोन ते तीन वर्षांपासूनचा कंपनी डेटा तुमच्यासमोर असेल तर योग्य पदावर, योग्य जागेवर, योग्य कंपनीत असणारी व्यक्ती तुम्हाला माहिती असेल. त्यामुळे इंटर्नशिपनंतर संपर्कच नाही, तर नोकरी मिळायलासुद्धा फायदा होतो.

करिअरमध्ये बदल करताना : करिअरमध्ये बदल करताना, तुम्हाला त्या नव्या क्षेत्रांमध्ये कुणाशी संपर्क करणे अवघड असते. अशा वेळी एखादी शिक्षण संस्था, एखादा कोचिंग क्लास, तुमचा मार्गदर्शक यांच्या ओळखीतून तुम्हाला नोकरी मिळू शकतो. तसेच सोशल मीडियावर या नव्या क्षेत्रात जेवढ्या ओळखी तुम्ही करून घ्याल तेवढं तुम्हाला करिअरमध्ये बदल करणं सोपं जातं. करिअरमध्ये बदल करताना सोशल नेटवर्किंगचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करावा. आपल्या प्रोफाइलमध्ये अनुभव तसेच नव्या क्षेत्रांमधले असलेली कौशल्यं यांचा समावेश करावा.

आयटी क्षेत्रामधून आर्टिस्ट होणारे, लेखक म्हणून विविध माध्यमांत यशस्वी होणारे, आपल्या छंदाचा वापर अर्थाजनासाठी करणारे या सर्वांनी करिअर बदल करताना किंवा एखादे जोड-करिअर स्वीकारताना सोशल मीडियाचा अतिशय यशस्वी वापर केलेला आढळतो.

सोशल मीडियावर वावर करताना घ्यायची काळजी
- तुम्ही जर नोकरी शोधण्याकरता मीडियाचा वापर करत असाल तर एक किंवा दोन अशा विशिष्ट सोशल मीडियावरच अकाउंट जास्त प्रमाणात वापरावे.
- माहिती आणि तंत्रज्ञान व्यवस्थापन या क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर राजकीय, धार्मिक अथवा कोणत्याही वादाच्या विषयावर वारंवार आपल्या प्रोफाइलवर पोस्ट करू नये.
- तुमची नोकरीसंबंधी जी काही कौशल्यं आहेत, पदव्या आहेत, जी माहिती आहे ती अद्ययावत ठेवावी. सोशल मीडियावर वावर करताना तुमचे खरे नाव वापरावे. 
- नोकरीसंबंधीचा सर्व संपर्क अतिशय व्यावसायिक पद्धतीने, शक्यतो ईमेलद्वारे करावा. सोशल मीडियावरती संपर्क करता येऊ शकतो परंतु नोकरीला अर्ज करताना मात्र कंपनीने दिलेल्या नियमानुसारच संपर्क करावा.
- नोकरीविषयी वारंवार संपर्क करून संबंधित अधिकारी व्यक्तींना त्रास होईल असे वागू नये.

About the Author

सोनाली's picture
सोनाली

मिळून सा-याजणी, मेनका , रोहिणी, अक्षर मासिकातून लेखन प्रसिद्ध.

लोकमत, लोकसत्ता, सकाळ, मटा या पेपरातून कविता, लेख 

शक्यतेच्या परिघावरून कविता संग्रह