खरी स्त्री आणि माध्यमातली स्त्री

          मध्यंतरी एक व्हिडीओ पाहिला. कॉलेजच्या एका वर्गात एका तरुण मुलीचा फोटो दाखवण्यात येतो. शिडशिडीत, मोकळे सोडलेले पण स्टायलिश केस, हलक्या शेडची लिपस्टिक, वेस्टर्न ड्रेस. सर्वांनाच काही ऑप्शन्स दिले जातात तिचे करिअर ओळखायचे. काहीजण म्हणतात नटण्याची आवड आहे म्हणून मॉडेल असावी. काही म्हणतात नाजुकशी आहे तर आर्टिस्ट असेल. डान्सर, गायिका बरीच उत्तरे येतात. काही क्षणात ती येते आणि स्वत:ची ओळख करून देते. ती असते एक यशस्वी गिर्यारोहक. आणि मग ती तिचा प्रश्न टाकते..माझ्या राहणीवरून किंवा कपड्यांवरून, एकूणच फक्त appearance बघून मी काय आहे ह्याचा अंदाज कसा येणार? पण असे अंदाज सर्रास लावले जातात. अगदी रोजच्या आयुष्यातला प्रसंग वाटतो हा मला.

फार judgemental असतो आपण. आणि tv सिनेमा हे माध्यम ह्यात जास्तच भर घालत असते. मुलीच्या बाबतीत तर फारच. लांब केस, चुडीदार, अंगभर ओढणी किंवा साडी म्हणजे ती सालस, गृह्कृत्यदक्ष, साधी.आणि जीन्स, स्कर्ट घालणारी म्हणजे मॉडर्न, करिअर ला महत्व देणारी, आई वडिलांचं न ऐकणारी (बऱ्याचदा हाताबाहेरची केस) अशी विभागणी असते.असं सरळसोट विभाजन कशासाठी? हिरव्या ब्लाउज वर निळी साडी नेसणे ही साधेपणाची कोणती व्याख्या? असे कपडे घालणाऱ्या मुली ह्या काळाच्या पुढचे विचार करू शकत नाहीत? आणि नेहेमी मॉडर्न कपडे घालणारी मुलगी आगाऊ भांडखोर का दाखवतात? अर्थात साध्या भोळ्या पण तसे कपडे घालतात पण ते स्वप्नात..(स्वप्नात त्या भोळ्या नसतात बहुतेक). समाजसेविका असेल तर खादीची किंवा कॉटनची कडक इस्त्रीची साडी. ग्रामीण स्त्री म्हणजे फक्त साडी.आता बहुतांशी गावात लग्न झालेल्या स्त्रिया सुद्धा पंजाबी ड्रेस किंवा चुडीदार घालतात. पण क्वचितच हा बदल दाखवला जातो माध्यमांमध्ये.

असंच तिच्या शरीरयष्टीच्या बाबतीत. आम्हाला हिरोईन बारीकच हवी.सगळ्या चवळीच्या शेंगा. का? हॉलीवूड चे standard नाही म्हणता आपल्या सिनेमांना पण तिथे तर सर्व वयाच्या आणि figure च्या स्त्रिया लीड रोलमध्ये असतात. कोणाला घ्यायचं हे कथेवर आणि त्यांच्या कामावर अवलंबून असतं. इथे विद्या बालन, सोनाक्षी सिन्हासारख्या अभिनेत्रींवर जोक मारण्यात जन्म जातो. सगळे सारखे कसे असतील? आणि जर समाजात इतकं वैविध्य आहे तर पडद्यावर का असू नये? २ मुलांची आई झाली तरी ती बाल विवाहिता दाखवायची. आई कुठली , मुलगी कुठली (कधीतरी तर आजी कुठली) हे ही कळत नाही. सगळ्या सारख्याच. जाड मुलींवर कोणी प्रेम करत नाही का? आणि केलं तर तो स्पेशल event म्हणून दाखवणार का? काय शिकवतो आपण ह्यातून? चांगल्या स्वभावाच्या जाड मुली नसतात का? जन्मभर आहे तश्या पण रोगमुक्त आणि active आयुष्य जगणाऱ्या आपल्या किती बहिणी, आत्या. मावश्या आपल्या भोवती असतात.पण नाही जाड बाई म्हणजे कॉमेडी factor.

आम्हाला तर लग्न झालेल्या पण लीड रोल मध्ये चालत नाहीत. समाजात आदर्श(?) पुरुष जास्त असल्यामुळे लग्न झालं की (आमचं नव्हे ..हिरोईन च) त्यांना ते पडद्यावर जागा देत नाहीत. त्यामुळे त्या कितीही चांगली अक्टिंग करोत त्या लगेच आई, मोठी बहिण, वहिनी अश्या रोल मध्ये ट्रान्स्फर होतात. आणि आम्ही मेरील स्ट्रीप या वयात सुद्धा ऑस्कर घेते ह्याचे गुणगान गात बसतो. कितीतरी सशक्त नायिका याआधी फक्त या एका कारणामुळे चांगल्या भूमिकांना मुकल्या आहेत. किंवा मध्यमवयीन स्त्रियांसाठी साजेश्या भूमिकाच लिहिल्या जात नव्हत्या. पण आता अगदी थोडा का होईना बदल घडतो आहे.

अजून एक प्रकार असतो.कमी शिकलेली बाई म्हणजे अडाणी.कोणी ठरवलं हे? तिला सारखं लोक तुला फसवतील असा सल्ला द्यायचा. स्मार्ट, सजग असण्याचा शिक्षणाशी संबंध आहे पण कमी शिकलेली बाई सुद्धा हुशार आणि चुणचुणीत असू शकते. हा प्रकार नव्यानेच आलाय. आधीच्या ग्रामीण सिनेमात असायच्या हुशार पण कमी शिकलेल्या मुली. त्यांना शिकलेल्या लोकांपेक्षा भराभर हिशोब येतात, दैनंदिन आयुष्यातल्या छोट्या अडचणींना त्या चुटकीसरशी सोडवतात.पण पडद्यावर दाखवताना मात्र त्या अडाणी, वेंधळ्या, भोळ्या जास्त दाखवतात.

एखाद्या अभ्यासू आणि अबोल मुलीने प्रेमविवाहाचा निर्णय घेतला की डायलॉग काय असतो? वाटलं नव्हतं हिचं असलं काही असेल.म्हणजे काय? असलं काही ह्यात काय अभिप्रेत असतं?एखादा निर्णय घेण्याची क्षमता नसू शकते तिच्यात? ती जास्त सोशल, बोलकी नसेल पण आपले निर्णय घेऊच शकते. अगदी लिव्ह इन सारखे निर्णय पण घेऊ शकते.

मुद्दा असा की तिच्या कपड्यांवरून, दिसण्यावरून, शरीरयष्टीवरून तीला define का करावे? साधी सरळ शालीन किंवा स्मार्ट आणि धाडसी असणं हे स्वभावाशी निगडीत असतं.पडद्यावर जर तुम्ही समाजाचं प्रतिबिंब दाखवताय तर मग सर्वसमावेशक भूमिका घ्यायला हवी.

आई म्हणजे तर आतापर्यंत त्यागाची परिसीमा म्हणूच दाखवली जाते. नाहीतर सासू म्हणून खलनायिका. आमच्या अवतीभवतीच्या नॉर्मल आयांसारख्या,सासवांसारख्या बायका सिनेमात,जाहिरातीत दिसतच नव्हत्या. तुझा तू अभ्यास कर, माझ्यामागे कटकट नको करू. किंवा मला शांतपणे तासभर ही सीरिअल पहायची आहे, तुला भूक लागली तर स्वयंपाकघरातले डबे उघड आणि असेल ते घेऊन खा. असे सांगणाऱ्या आया नसतातच जास्त करून पडद्यावर. मुलांनी भूक म्हणायच्या आधीच तत्परतेने उठून एकदम आलू पराठे लाटणाऱ्या आयाच प्रामुख्याने अजूनसुद्धा दाखवल्या जातात.

माध्यमांचा रेटा जोरदार आहे. नेहमी जे दिसतं त्याचे अनुकरण करण्याचा मोह आवरण सोपं नसतं. स्त्रियांचं अशा पद्धतीचं ठराविक साच्यातले दिसणे  आणि वागणे स्त्रियांकरता नैसर्गिक नाही. सहजरित्या शक्य सुद्धा नाहीये. माध्यमांचे अनुकरण गेल्या पिढीतही होते. अनेक वर्षे सुरू आहे.  पण जागतिकीकरणानंतर अनुकरणाचा रेटा खूपच मोठा झालाय. अपेक्षांचे दडपणही वाढले  आहे. पुरुषांवरही स्त्रियांसारखेच दडपण आहे. फक्त  अपेक्षा वेगळ्या  आहेत. चाकोरीबद्ध चित्रणातून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग नाही का? यात कुठलेच बदल होणार नाहीत का? सुदैवाने पण आता जशी जशी पुढची पिढी या क्षेत्रात येतेय तसे छोटे छोटे बदल होत आहेत.

अनेक व्हिडीओज, जाहिरातींमध्ये हे बदल दिसत आहेत. भारती सिंगने सौंदर्यप्रसाधानाच्या जाहिरातीत काम करणे, किंवा जोर लगाके हैश्या, लंचबॉक्स सारखे चित्रपट हे ह्या बदलत्या विचारसरणीचे उदाहरण आहे. येणारी तरुण पिढी ही स्त्रीचे पुर्वग्रहदुषित मूल्यमापन न करता समाजात आणि तिच्यात होणाऱ्या बदलांचे subtle चित्रण करेल असा आशावाद नक्कीच आहे!!

-निर्मिती कोलते

About the Author

Nirmiti Kolte's picture
Nirmiti Kolte

 

सांगली 

M.com
E tutor म्हणून कार्यरत 
गझल लेखन, मासिकात लेख, कविता, भाषांतर प्रकाशित.