डॉक्टर जिवागो -बोरीस पास्तरनाक

”डॉक्टर जिवागो” -बोरीस पास्तरनाक 

साहित्यप्रेमी (त्यातही काव्य ही विशेष आवडीचा विषय) मात्र शिक्षण आणि व्यवसायाने डॉक्टर युरी जिवागो, त्याची पत्नी टोनिया आणि युद्ध आघाडीवर जखमी सैनिकांची शुश्रुषा करताना मदतीला आलेली एक नर्स लरिसा गीशर (जिला लारा असे प्रेमाने म्हटले गेले) या तिघांची जीवनकहाणी. 

डॉक्टर जिवागो ही कादंबरी एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनचा कालखण्ड घेते, कादंबरीचा शेवट 1940 चा कालखंड आहे. रशियाच्या इतिहासातील अतिशय अनिश्चित, पण अस्थिर कालखंडातून कथा पुढे जाते. त्यात क्रांतिंनंतर भविष्यातल्या रशियाची दिशा दाखवणारा काळही  दर्शवला आहे. या कादंबरीमध्ये कुठलेच पात्र  परफेक्ट नाही. माणूसपणाच्या, अपूर्णत्वाच्या खुणा जागोजागी दिसून येतात.

या कादंबरीमध्ये असणाऱ्या प्रत्येक पात्र रसरशीत आहे, अपूर्ण मनुष्य म्हणून त्याच्या होणाऱ्या चुका या कादंबरीमध्ये ठिकंठिकाणी दिसतात.  ही कादंबरी म्हणजे युद्धाच्या पार्श्वभूमीवर असणारी प्रेम कथा आहे की एक प्रेम कथा सुरू असताना त्याच्या पार्श्व भूमीवर युद्ध सुरू आहे.  याचा नेमका निर्णय घेता येत नाही अशाप्रकारे प्रेम कथा आणि युद्धाशी संबंधित घटना एकमेकांमध्ये इतक्या घट्ट गुंतलेल्या आहेत. या कादंबरीत जवळजवळ पन्नास एक पाने  भरली आहेत ती रेल्वेच्या बोगीमध्ये लिहीलेल्या वर्णनाने. या कादंबरीत अनेक सुरेख वर्णने आहेतच. पण त्यातल्या कविता तर अतिशय तरल आहेत. 

पास्तरनाक वयाच्या सत्तरीपर्यंत जीवन जगले तरी त्याना त्याच्या राजकीय विचारामुळे रशियाच्या कम्युनिस्ट पार्टीकडून...म्हणजेच राज्यकर्त्याकडून कधीच साहित्यातील पोच वा मानपान मिळाले नाहीत, इतकेच नव्हे तर त्याना जेव्हा साहित्यसेवेबद्द्ल जगप्रसिद्ध असे “नोबेल प्राईझ” मिळाले ते स्वीकारण्यास जाण्यास मनाई तर केलीच शिवाय त्या अगोदरच डॉक्टर जिवागो (मूळ रशियन उच्चार -शिवागो )या कादंबरीवर वितरण बंदीही घालण्यात आली. रशियन कामगार क्रांती आणि पहिले जागतिक महायुद्ध या दरम्यानच्या घटनांवर बेतलेली ही जगप्रसिद्ध अशी कादंबरी लिहिली गेली. समाजवादावरील लेखकाचे विचार सत्ताधार्यांहना कधीच पटणारे नव्हते, म्हणून रशियात तिच्या छपाईवर बंदी घालण्यात आली. काही साहित्यप्रेमी आणि समाजवादावर भक्ती असलेल्या गटाने त्यामुळे डॉक्टर जिवागोचे हस्तलिखित चोरून मिलान, इटली इथे आणले आणि तिथे ही कादंबरी प्रसिद्ध प्रकाशित करण्यात आली जी जगभर गाजली हे खरे पण इकडे राज्यकर्ते खवळले आणि त्यानंतर बोरीस पास्तरनाक जणू अद्न्यातवासातच गेले आणि ३० मे १९६० मध्ये त्यांचे दु:खद निधन झाले.

 कथानक तर सांगू शकत नसलो तरी लाराच्या संदर्भात एकदा युरी जो विचार करतो ते एक वाक्य इथे देतो..... “...Nothing equalled her spiritual beauty. Her hands were stunning like a sublime idea. Her shadow on the wall of the hotel room was like the outline of her innocence. ... 'Lara’.

-अशोक पाटील

 

About the Author

अशोक पाटील's picture
अशोक पाटील