सखी,सहेली,मैत्रीण --

 

            एखाद्या गाण्यात “मै भी जानू रे” असं  मधुबाला आपल्या मैत्रिणीच्या कानात सांगते किंवा “मेरे मेहबूब में क्या नही” अशी एकमेकींच्या  प्रियकराचे वर्णन करणाऱ्या  करणाऱ्या मैत्रिणी  रुपेरी पडद्यावर आपण नेहमी बघत आलो आहोत. मराठी चित्रपटांमध्ये बिनधास्त, ‘सातच्या आत घरात’ ह्या चित्रपटांमध्ये मुलींमधली निखळ आणि घट्ट मैत्री उलगडली आहे. ‘फ्रेंड्स’ सीरिअल मधल्या रेचल, मोनिका आणि फीबीची मैत्री, ‘ सेक्स एंड द  सिटी’ सारख्या चित्रपटांमध्ये स्त्रियांच्या  मैत्रीचे अनेक पैलू दिसतात.

                   दोन मैत्रिणींच्या मैत्रीची गोष्ट बहुतेक सिनेमांमध्ये  प्रेमाच्या त्रिकोणात  आटपते.  बऱ्याचदा दोघांचा प्रियकर एकच असतो आणि मग त्यात त्याग किंवा चढाओढ या दोन  धाग्यांमध्येच त्यांचे नाते  गुंडाळलेले असते. जय वीरू सारखी मैत्री किंवा जीवाला जीव देईल अशी मैत्री  हाच गाभा असलेले हिंदी चित्रपट एकूणच चित्रपट फार कमी आहेत. पण असे चित्रपट आठवताना  प्रामुख्याने आठवतो  तो   ‘डोर’ चित्रपट.  एक तरुण वयात विधवा झालेली ग्रामीण मुलगी आणि एक अतिशय पुढारलेल्या आणि मोकळ्या विचारांची दुसरी मुलगी. त्या दोघी एकमेकींना भेटतात त्या एका विचित्र कारणामुळे! तिच्या नवऱ्याचा दुसरीच्या नवऱ्याकडून  चुकून खून झालेला असतो. जिचा नवरा जेलमध्ये असतो तिला दुसरीकडून माफीनामा लिहून हवा असतो. तिचा विश्वास जिंकून मग हा मुद्दा मांडायचा असतो. त्या दरम्यान त्यांच्यात फुललेली मैत्री चित्रपटामध्ये नितांतसुंदर हाताळलेली आहे. नवीन  चित्रपटांमध्ये  विरे  दि वेडिंग  सारखा चित्रपट  मैत्रिणींची गोष्ट इतक्या ठळकपणे सांगतो.  एका कुठल्यातरी मुलाखतीत आघाडीची अभिनेत्री आलिया भट हिने म्हटले आहे की फरहान अख्तरने दिल चाहता है सारखे कथानक  घेऊन   मैत्रिणीची गोष्ट सांगणारा  एक चित्रपट बनवावा.  आजच्या काळात तिला हे सांगावे लागणे यातच हा विषय किती  कमी हाताळला गेला आहे हे कळते.पण आता हे चित्र नक्कीच बदलते आहे. फक्त अश्या चित्रपटांची संख्या वाढत जायला हवीये!

             पूर्वीच्या म्हणजे आपल्या पणजीच्या किंवा त्याधीच्या काळात बायका बाहेर पडत नसत. घरातल्या लोकांचे हवे-नको बघणे, प्रापंचिक जबाबदाऱ्या,  मुलेबाळे, आजारपण, सुश्रुषा, देवधर्म, यातच त्यांचा सगळा वेळ निघून जाई. लग्न सुद्धा फार लवकर होत त्यामुळे लहानपणीच्या मैत्रिणी नंतर भेटण्याची शाश्वती नसे. मग घरातल्या इतर नातेवाईक बायका किंवा शेजारणीच  जिवाभावाच्या सख्या होत. बऱ्याच वेळा एकमेकांची मुले एकाच वयाची असल्यामुळे बोलणे चालणे  वाढत जाऊन त्यातून मैत्री फुलत असे. संध्याकाळी एकत्र बसून भाज्या निवडणे, वाती वळणे,  साठवण  वाळवणीचे पदार्थ करणे,  आणि ही कामे करता करता सुखदुःखाच्या गोष्टी बोलणे हाच त्यांच्या दैनंदिन  आयुष्यातला विरंगुळा. सत्यनारायण, डोहाळजेवण, हळदी कुंकू  अशा कार्यक्रमांच्या जेवणावळी आसपासच्या मैत्रिणींच्या मदतीने पार पडून संसारातले व्याप सांभाळून मैत्री करणे आणि निभावणे कठीण जात असेल नाही?

 नंतर हळूहळू स्त्रिया  महाविद्यालयीन शिक्षण घेऊ लागल्या नोकरी करू लागल्या घराबाहेर पडू लागल्या  आणि त्यांचे संवादाचे क्षेत्र विस्तारले. ऑफिसमधल्या मैत्रिणी, वर्गातल्या मैत्रिणी,  घराजवळ राहणार्‍या मैत्रिणी अशी मैत्रिणींची वर्गवारी  होऊ लागली. जाता येताना सोबत म्हणून, अभ्यासाला मदत म्हणून हाकेला ओ  देणारी मैत्रीण लग्न होऊन दूर जाईपर्यंत तरी हक्काचा आधार  असायची. ह्यातून फुलत जाणारी जन्मभर आठवणीत राहत असणार. 

                लग्न झाल्यानंतर मात्र  ह्या जवळच्या सख्या कधी अंतरामुळे, कधी लग्नानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यांमुळे दूरदूर  होत जायच्या. नंतर नवीन गावातल्या नवे शहरातल्या  शेजारी राहणाऱ्या स्त्रियांशी ओळख होऊन नवीन मैत्री फुलायची पण तरीही या मैत्रीला खूप बंधनं असायची आज जसे मोकळे वातावरण आहे तसे नसल्यामुळे एकमेकींना भेटणे बाहेर पडणे याला विशिष्ट मर्यादा होत्या आज सारखे फोन मोबाईल नसल्यामुळे हवे तेव्हा हवे ते मन मोकळे बोलता येत  नसणार आणि त्याचा नक्कीच त्रास होत असणार.मला आठवतंय माझ्या आईलाही फारशा मैत्रिणी नव्हत्या.मुळात तेव्हा आपले घर सोडून उठून   सारखे दुसरीकडे जाऊन बसणे हे फार चांगले लक्षण मानले जात नव्हते. या सगळ्यावर उपाय म्हणूनच की काय  भिशी  ची संकल्पना  रुजली असणार. घरखर्च वाचवून जमलेले पैसे गुंतवायचे आणि थोडा वेळ एकत्र जमून गप्पा मारायच्या  अशी  साधी सोपी व्यवस्था महिन्यातून एकदा तरी वेगळे काहीतरी करण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरत असणार.

                        आता काळ बदलला मुली जास्त मोकळ्या झाल्या. घराबाहेरच काय गावाबाहेर शहराबाहेर शिक्षणासाठी नोकरीसाठी  पडू लागल्या.  मैत्रीच महत्त्व  काही काळापुरतं न राहता ते जन्मभर टिकले पाहिजे याच्यासाठी त्या प्रयत्न करू लागल्या. एकमेकींच्या संकटांमध्ये मदतीला धावून  जाऊ लागल्या.   मोबाईल फोन या माध्यमांमुळे दूर असूनही मैत्री टिकवू लागल्या. शाळेत मैत्री स्टाफरूम मधून वह्या आणायला सुद्धा एकीला दोन्ही लागतात, आजारी असतांना घरी सोडायला शाळेतून मैत्रीणच लागते. पळून जाऊन लग्न करायचा निर्णय घेताना मैत्रिणीचा सल्ला आणि मदत मोलाची असते. भलेही मित्राला मित्र करतो तितकी मदत ती करू शकत नसेल. पण तिच्या चौकटीत राहून जमेल ते ती करतेच.तरीही पुरुषांच्या मैत्रीइतकी स्त्रियांची मैत्री  सहज नाही.  आपला भाऊ, वडील, नवरा त्यांच्या मित्रांनी हाक मारली की आलोच पाच मिनिटात असं म्हणून बाहेर पडू शकतो किंवा एखाद्या ट्रीपला जाऊ शकतो  तितक्या सहजतेने घरातील बाईमाणूस बाहेर पडू शकत नाही. घरातल्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था, कोणी आजारी असेल तर त्याची काळजी, मुलांच्या परीक्षा, इतर   सणवार या सगळ्यांचा विचार घरातल्या स्त्रीला  आधी करावा लागतो.  मैत्रिणीसाठी कितीही जीव तुटत असला तरी प्रापंचिक जबाबदाऱ्या पूर्ण केल्यानंतरच तिला त्याच्याकडे लक्ष देता येते.

बऱ्याच वेळा लग्नानंतर काही वर्षांनी इमोशनल सपोर्टची कमतरता भासू लागते. अशावेळी जवळच्या मैत्रिणी  ही गॅप भरून काढतात. आपल्या आयुष्यात येणाऱ्या लहान मोठ्या समस्या कुणासमोर व्यक्त करणं किंवा आपलं कुणीतरी ऐकणं हे स्त्रियांना भावनिक पाठिंबा देणारं वाटतं. पुरुषांनाही आपलं कुणीतरी ऐकावं असं वाटतं.  पण त्या संभाषणामधून समस्या कशी सुटेल यावर लक्ष केंद्रित करणं ते पसंत करतात.

रुसवे-फुगवे , वाद -विवाद कधीतरी मैत्रिणीची एखादी comment  मोराल डाऊन करायला पुरेशी असते. अनेकदा एकमेकींच्या चुगल्या, समज गैरसमज नात्यात तेढ निर्माण करतात. अनेकदा स्त्रिया ते गैरसमज सहज आणि लवकर मिटवून टाकू शकत नाहीत. पुरुषमंडळी कदाचित थेट बोलून, भांडून मोकळे होऊन दोन चार दिवसात पुन्हा बोलायला लागतील. पण हेच दोन मैत्रीणमध्ये इतके सहजपणे होईल असे नाही.

दोन स्त्रिया जर मोकळ्या, तेढ निर्माण न करता, समंजसपणे वागणार्‍या असतील तर हीच मैत्री अतिशय आनंदाची बाब होते. बहुतांशी स्त्रिया सोशल असतात. त्यांचे टीमवर्क चांगले असते.  त्यामुळे ऑफिसमध्येसुद्धा ताणतणाव कमी करण्यासाठी त्यांची मैत्री मदत करते. जर एकमेकींबरोबर निस्पृह आणि निस्वार्थी मैत्री असेल तर एकमेकांच्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वास निर्माण करायला मदत होते. छोटे छोटे क्षण आनंदात जातात. एक मार्गदर्शक मिळतो. आजकाल गेट-टुगेदर, गर्ल्स डे आऊट यासारख्या संकल्पना सगळ्या मैत्रिणींना एकत्र यायला मदत  करतात. सोशल मिडियामुळे दूर दूर राहून सुद्धा संपर्क कायम ठेवता येतो. आजच्या मैत्रिणी एकमेकींना संकटात आधार द्यायला, आनंदाचे क्षण साजरे करायला शहरे, गावेच काय पण देश सुद्धा ओलांडून जातात. प्रसंगी घरच्यांना पटवून देऊन किंवा दुर्लक्ष करून गरजेला धावून जातात. स्त्रियांकरिता , समाजाकरता अशी स्त्रियांची निखळ मैत्री खूप पोषक आहे.

'क्वीन' मधल्या राणी ला भेटलेल्या विजयालक्ष्मी सारखी, 'डोर' मधल्या मीराला भेटलेल्या झीनत सारखी एखादी मैत्रीण हवीच! 'पिंक' मधल्या अन्यायाविरुद्ध एकजूट होणाऱ्या तिघी, 'पार्चेड' मधल्या मनमोकळ्या चौघी ह्या आपल्या सारख्या करोडो मैत्रिणींचे प्रतिनिधित्वच करतात !!!

तुम्हाला अशी एखादी मैत्रीण असेल तर हा लेख वाचताना तिची आठवण येईल. अशी मैत्रीण नसेल तर मिळावी ही मैत्रीदिनाची शुभेच्छा!

 

-निर्मिती कोलते

 

 

 

About the Author

Nirmiti Kolte's picture
Nirmiti Kolte

 

सांगली 

M.com
E tutor म्हणून कार्यरत 
गझल लेखन, मासिकात लेख, कविता, भाषांतर प्रकाशित.