हिरोशिमा आणि नागासाकी – तेव्हा आणि आता

पहिल्या महायुद्धानंतर अनेक युरोपीय देशांची आर्थिक व सामाजिक घडीविस्कटली होती. बेरोजगारी,महागाई, उपासमार, अनारोग्य ह्यामुळे वाढलेला असंतोष, जर्मनीत नाझीवाद आणि इटलीत फॅसिझमची वाढ अशी अनेक कारणे दुसऱ्या महायुद्धाला आमंत्रण देणारी ठरली. जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्याने हे युद्ध १ सप्टेंबर १९३९ रोजी अधिकृतपणे सुरू झाले. इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, रशिया आणि इतर दोस्त राष्ट्रे यांच्याविरुद्ध जर्मनी, जपान, इटली आणि त्यांची समर्थकराष्ट्रे यांच्यात हे युद्ध पेटले. सुरुवातीला अमेरिकेने प्रत्यक्ष युद्धात भाग घेतला नव्हता. जपानला जगातील महासत्ता होण्याची इच्छा होती. जपानने डच व ब्रिटीश वसाहतींवर आक्रमण केले व जगाच्या पूर्व भागातील युद्धाला तोंड फुटले.सुरुवातीला तटस्थ असलेल्या अमेरिकेने दोस्त राष्ट्रांना जर्मनीविरुद्ध आर्थिक मदत करणे चालूच ठेवले होते. जपानने डिसेंबर १९४१मध्ये अमेरिकेच्या पर्ल हार्बर वर हल्ला केला. आणि त्याला प्रत्युत्तर देताना अमेरिकेने युद्धात सक्रीय भाग घेतला व येथून युद्ध जगभर पसरले. 7 मे 1945 रोजी, जर्मनीने अधिकृतरीत्या शरणागती पत्करली. परंतु जपान बरोबरचे युद्ध सुरूच होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन, ह्यांना त्यांच्या काही सल्लागारांनी इशारा दिला की जपानबरोबरचे युद्ध असेच लांबले तर अमेरिकेन सेनेचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे आणि एखादा मोठा धक्का दिला तर जपान बिनशर्त शरण येईल आणि जगाला आपली ताकद कळेल. त्यामुळे अणुबॉम्ब टाकण्याचा निर्णय झाला.

हिरोशिमा, कोकुरा, निईगाटा आणि नागासाकी या जपानी शहरांपैकी कोणत्याही एका लक्ष्यावर ३ ऑगस्टनंतर योग्य हवामान पाहून अणुबॉम्ब टाकण्याची योजना आखली गेली. जपानला मित्रराष्ट्रांकडून शरणागतीचे इशारे देण्यात आले होते. १९४५ मधील ६ ऑगस्ट ह्या दिवशी हिरोशिमा शहरावर अणुबाँबचा हल्ला झाला. पॉल वॉरफील्ड तिबेट्स ज्युनियर हे अमेरिकेच्या वायुसेनेतील ब्रिगेडियर जनरल होते. ज्यांनी एनोला गे (त्यांच्या आईचे नाव विमानाला दिले गेले होते.) ह्या बी.२९ प्रकारच्या विमानाचे पायलट म्हणून भूमिका बजावली. ह्या विमानाने लिटल बॉय असे नामकरण केलेला परमाणु बॉम्ब हिरोशिमावर टाकण्यात आला. अंदाजे ८०,००० च्या लोकांनी तात्काळ प्राण गमावले. १९५० पर्यंत अंदाजे ६०,००० लोक स्फोटामुळे झालेल्या अणुउत्सर्जनामुळे मरण पावले.

बॉम्बचा स्फोट जमिनीपासून २००० फुटावर झाला. शहरातील प्रेफ़ेक्चुअल कमर्शिअल एक्झिबिशन हॉलची घुमटाकार बिल्डींग ही ग्राउंड झिरोपासून म्हणजे बॉम्बस्फोटाच्या स्थानापासून अगदी जवळ होती. तिचा घुमट आणि बराचसा भाग स्फोटानंतरसुद्धा तसाच उभा होता. त्याला आता हिरोशिमा पीस स्मारक म्हणून ओळखले जाते. ही इमारत युनेस्कोने  वर्ल्ड  हेरिटेज म्हणून घोषित केली आहे.

हिरोशिमा शहराची निर्मिती जपानी सरदार मोरी तेरुमोटोने केली होती. चीन-जपानच्या युद्धादरम्यान, हिरोशिमा शहरात सरकारचे मुख्यालय होते आणि इथल्या बंदर आणि रेल्वेचा वापर सैन्य उद्देशांसाठी करण्यात आला होता. पहिल्या महायुद्धात हिरोशिमा हे एक महत्त्वाचे लष्करी तळ होते. शहराबद्दलचे आणखी एक महत्वाचे आकर्षण म्हणजे इथल्या नागरिकांचे बहुभाषिकत्व! हिरोशिमाला महत्त्वाच्या सैन्य डेपो आणि शहरी औद्योगिक क्षेत्राचा दर्जा असल्यामुळे त्याची निवड झाली.त्याचप्रमाणे ते जपानी सैन्याच्या पुरवठा आणि लॉजिस्टिक्सचे महत्वाचे तळ होते. अणुस्फोट करेपर्यंत हिरोशिमावर मित्र राष्ट्रांनी बॉम्ब हल्ला केला नव्हता.

--

९ ऑगस्ट ला नागासाकी शहरावर हेच अस्मानी संकट कोसळले. नागासाकीमध्ये  ३५,००० च्या आसपास लोक लगेच मरण पावले; परंतु स्फोट, उष्णता किंवा रेडिएशनमुळे मरण पावलेल्यांची संख्या अचूकपणे कळलीच नाही. १५४३ मध्ये पोर्तुगीज शोधकांशी संपर्क होईपर्यंत निर्जन बंदरांपैकी असलेल्या ह्या लहान मासेमारी करणाऱ्या गावाला फारसे ऐतिहासिक महत्व नव्हते. पोर्तुगीज जहाजांचे येणे जाणे आणि नियमित माल वाहून नेणे सुरू झाल्यामुळे जपानचा इतर देशांशी संपर्क तर वाढलाच त्याचबरोबर व्यापार संबंध सुद्धा वाढत गेले. हे छोटेसे गाव लवकरच एक महत्त्वाचे बंदर म्हणून ओळखले जाऊ लागले. नंतरच्या काळात ते नौका बांधणीसाठी एक मोक्याचे ठिकाण बनले.
अणुहल्ल्याच्या काही दिवस आधी नागासाकीवर छोट्या प्रमाणात बॉम्बहल्ले झाले होते. त्यामुळे बऱ्याच लोकांना  मुख्यतः लहान मुलांना सुरक्षिततेसाठी ग्रामीण भागात हलवण्यात आले, त्यामुळे अणुहल्ल्याच्या वेळी जीवितहानी थोडी कमी प्रमाणात झाली.

या दोन्ही शहरांत मरण पावलेल्या लोकांतील बहुतेक लोक हे बॉम्ब टाकलेल्या दिवशीच मरण पावले. त्यानंतरच्या महिन्यात अनेक जण भाजलेल्या जखमांमुळे, उत्सर्जित किरणाच्या आजारामुळे, अन्य जखमा, अपुरा आहार व इतर आजार यामुळे मृत्यू पावले.  हिरोशिमात अधिक संख्येने मिलिटरीचे लोक लष्करांच्या शिबंदीमध्ये राहात होते. २ सप्टेंबर १९४५ रोजी जपानने बिनशर्त शरणागती पत्करल्यावर दुसरे महायुद्ध संपले.

अणुबॉम्ब स्फोट झाल्यानंतर महिन्याभरात हिरोशिमावर तीव्र चक्रीवादळाचे अजून एक संकट कोसळले ह्या लागोपाठच्या आपत्तींमुळे शहर आणि परिसराचे आणखी नुकसान झाले. ह्या स्फोटांमुळे अनेक व्याधी, व्यंग, आजार पसरले. अनेक संशोधकांनी ह्यावर अभ्यास करून निष्कर्ष काढले. या बॉम्बस्फोटांपासून वाचलेल्यांना हिबाकुशा म्हणतात. हिरोशिमा आणि नागासाकी मधील स्मारकांमध्ये अश्या लोकांची नावे लिहलेली आहे जी ह्या स्फोटांच्या परिणामामुळे मरण पावली आहेत.
दोन्ही शहरातील हसती खेळती घरे, गजबजलेले रस्ते चिवचिवणाऱ्या शाळा नेस्तनाबूत झाल्या.  माणसाने वसवलेल्या संस्कृतीची स्फोटाने राखरांगोळी करत   सगळे सजीव निर्जीव आपल्या पोटात घेतले. दोन्ही शहरांना स्मशानाची कळा  आली. जपानी सरकारने लगेचच वाचलेल्या लोकांसाठी मदत कार्य सुरू केलं वैद्यकीय मदत सर्वात  महत्त्वाची होती. वेगवेगळ्या व्याधी अणुउत्सर्जनामुळे निर्माण होत होत्या त्याचे परिणाम पुढे अनेक पिढ्यांवर दिसून येत राहिले आणि  अजून सुद्धा काही प्रमाणात दिसत आहेत.
---
 कालांतराने सरकारच्या मदतीने दोन्ही शहरांचे पुनर्निर्माणाचे काम सुरु करण्यात आले. अथक आणि अविश्रांत प्रयत्नानंतर तिथे पुन्हा जनजीवन फुलवले गेले.
पुनर्बांधणी करताना नागरिकांच्या मतांना विचारात घेण्यात आले. हिरोशिमामध्ये आता विमानतळ आहे. हायवे आणि ट्रेनसेवा आहे. सध्याच्या काळात हिरोशिमाचे हवामान उष्ण कटिबंधीय असते म्हणजेच तेथे सौम्य हिवाळा आणि तीव्र उन्हाळा असतो. हिरोशिमा हे पर्यटकांसाठी कुतुहलाचे ठिकाण आहे. संपूर्ण विनाश झालेल्या शहराचे पुनरुज्जीवन तिथल्या नागरिकांनी कसे केले हे समजून घेण्यात त्यांना रस असतो. नागासाकीची पुनर्बांधणी त्या मानाने हळूहळू झाली. पुनर्विकासावर लक्ष केंद्रित करताना परदेशी व्यापार, जहाजबांधणी व मासेमारी यांसारख्या उद्योगांची पुनर्बांधणी करण्यात आली. नवीन मंदिरे बांधली गेली, तसेच त्या बागातील ख्रिश्चन धर्माची अनुकूलता लक्षात घेऊन नवीन चर्चेस उभी राहिली. नागासाकीचे हवामान साधारण हिरोशिमा शहरासारखेच उष्णकटिबंधीय आहे.
आपले लाडके भूतपूर्व राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम म्हणून गेलेत, “War is never a lasting solution for any problem”. पण तरीही युगानुयुगे अनेक देश एकमेकांशी लढत आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचा महासंहार अनुभवूनही आज अनेक देश सर्व प्राथमिक गरजा बाजूला ठेवून अण्वस्त्रसज्जतेला महत्व देत आहेत. माणसाची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि सकारात्मकता ह्यांमुळे ह्या दोन्ही शहरांनी राखेतून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेतली आहे. हिरोशिमा आणि नागासाकी ही आज आधुनिक, व्यस्त, आणि संपन्न संस्कृती असलेली शहरे आहेत. अणुबॉम्बच्या आक्रमणानंतरही शहराला पुन्हा वसवता येऊ शकते आणि चैतन्य आणता येऊ शकते हे जगाला त्यांनी दाखवून दिले आहे. अशी उदाहरणे ही माणसाच्या दुर्दम्य आशावादाचे प्रतीकच मानावे लागेल.
-    निर्मिती कोलते. 

 

About the Author

Nirmiti Kolte's picture
Nirmiti Kolte

 

सांगली 

M.com
E tutor म्हणून कार्यरत 
गझल लेखन, मासिकात लेख, कविता, भाषांतर प्रकाशित.