नूतन

शंभर वर्षाचा इतिहास झाला आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीला. किती चित्रपट आले गेले...त्यातील किती स्मरणी राहिले वा काळाच्या ओघात जुने झाले नाहीत याची यादी मर्यादित आकड्याची असते. दुसरीकडे स्मरणात न राहिलेल्या चित्रपटांची संख्या अचाट असते (असणारच) आणि त्याची फ़िकिर सहसा कुणी करताना दिसत नाही. चित्रपटाबरोबर संगीत मात्र....मग भले तो चित्रपट ए ग्रेडचा असो वा बी/सी ग्रेड्सचे, पण सुरेख संगीत जर असेल (ते कुणी दिले ते महत्वाचे नसते) तर मात्र वर्षानुवर्षे ते चित्रपट स्मरणात राहातात रसिक वर्गाच्या. या दोन घटकांच्या जोडीने स्मरणात जर कुणी राहात असेल तर नायक आणि नायिका. अर्थात त्यासाठीही चित्रपट आर्थिकदृष्ट्या संपन्न किंवा लोकप्रिय झालेला नसला तरी चालते...”काल लीडर पाह्यला आम्ही... काय सांगायचं तर पिक्चर एकदम बंडल पण आमचा दिलप्या क्या बात है ! कायम लक्षात राहाणार आपल्या !” ~ या वाक्यातील रसिकाने म्हटलेले “आमचा दिलप्या” हे खरे तर महत्वाचे. नायकाच्याबाबतीत असे प्रेम म्हणजे त्याची करीअरमधील सर्वात मोठी मिळकत. अशा देवाहूनी अधिक प्रिय नायकाच्या सोबतीला असलेल्या नायिकांना मात्र दुय्यम रुपड्यातील भूमिकेत वावरावे लागे (नर्गीसचा काही प्रमाणात अपवाद. कारण ती दिलीपकुमारच्या बरोबरीचीच होती.) मग ती नायिका दिलीपकुमार इतकी महत्वाची वा लोकप्रिय असली तरी त्याच्यासमोर ती नेहमी दुय्यमच दिसणार किंवा दिग्दर्शक मंडळी तिला त्याच्यापेक्षा “वरची” पातळी दिली जाणार नाही अशीच खबरदारी जणू घेत. मधुबाला, वैजयंतीमाला, मीनाकुमारी, निम्मी अशी काही नावे. या झगझगीत नावाना एक सणसणीत अपवाद म्हणजे.....नूतन.

आज या लेखमालेसाठी मी “नूतन” ही अभिनेत्री एवढ्यासाठीच निवडली की वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षापासून हिने हिंदी चित्रपट कारकिर्दीत ते नमुने सादर केले अभिनयाचे ते पाहाता वा अभ्यास करता थक्क व्हायला हवे. आजही “फ़िल्मफ़ेअर” पारितोषिकांचा तक्ता तपासला तर नूतनने तब्बल पाच वेळा “सर्वोत्कृष्ट अभिनेत्री” चा सन्मान मिळविला आणि तो जवळजवळ तीस वर्षे कायम राहिला. तिच्या या विक्रमाची नंतर बरोबरी केली काजोलने जी नूतनचीच भाची. नूतनने ज्या भूमिका केल्या त्या केवळ प्रमुख नायिका म्हणून नव्हे तर चित्रपटाच्या कथानकाची ती केन्दबिंदू झाली होती. त्यामुळे चित्रपटाचे शीर्षक वाचताक्षणीच लक्षात यावे की हा पूर्णपणे नायिकाप्रधान चित्रपट.....”सीमा”....सन १९५५...त्यावेळेचे वय १९. नंतर “सुजाता”, सन १९५९ आणि त्यानंतर “बंदिनी”, सन १९६३. तिचा प्रवास या नंतरही सुरू होताच. पण लेखासाठी ही तीन नावे पुरेशी आहेत. ही तिन्ही नावे हेच दर्शवितात की निर्माते आणि दिग्दर्शक यांच्या नजरेसमोर ही तीन पात्रे पडद्यावर साकारण्यासाठी “नूतन” शिवाय कुणी पात्र नाही.

यातील “बंदिनी” तील कल्याणी ही सर्वार्थाने “एकमेव” अशी भूमिका नूतनने केली हे त्यावेळेच्या समस्त चित्रपटसृष्टीतील जाणकारांनी आणि समीक्षकांनी एकमुखाने मान्य केली होती. कारण ही भूमिका कुठल्या ग्रामीण भागातील चारचौघी साध्या युवतीची नसून जिने आपल्या प्रियकराच्या आजारी पत्नीचा ठरवून खून केला आहे, विष पाजून. १९६० च्या दशकातील चित्रपटाची नायिका....ती देखील नूतनसारखी प्रथम क्रमांकाची...ही चक्क खूनी दाखवून (विष पाजते...आणि नंतर पोलिसांसमोर “होय” अशी कबुलीही देते) कायद्याने दिलेली शिक्षा तुरुंगात भोगत आहे आणि अन्य कैद्यांच्यासमवेत खाली मान घालून, सांगतील ती कष्टाची कामे करत आहे...मुकाट्याने. असे चित्र त्यापूर्वी कधीही आलेले नव्हते. आता शिक्षा झाली आहे आणि कैद्याची कपडे घालून ती तेथील कामकाज अन्य स्त्रियांच्या संगतीने करत आहे. सुटकेची कसलीही आशा नव्हे. शिक्षा कधी संपणार हे माहीत नाही किंबहुना त्या दिवसाची ती वाटसुद्धा पाहाणार नाही. कारण जगात आता तिचे कोण आहे ? वडील गेले...अन्य कुटुंब सदस्य कुणी नाही. ज्याच्या खांद्यावर विश्वासाने आपण डोके ठेवले, त्याच्याशी गावात देवळात लग्नही केले आहे तिने....उद्याची स्वप्ने पाहिली....त्याच्या कठीण परिस्थितीत त्याला अविरत साथ दिली....तो त्या खेडेगावात का आला होता ते कारण संपल्यानंतर करूणाला आणि तिच्या वडिलाना सांगतो “मी जाऊन येतो”....म्हणजे काय ? गेला तो आणि ही वाट पाहात बसते... धर्म परंपरेचे गाव प्रमुख त्या बापाला शिव्या घालतात तर कल्याणीची व्यभिचारी जणू अशी निर्भत्सना करतात. भ्रमिष्टासारखा झालेला बाप आपल्या एकुलत्या एक पोरीच्या कपाळी ही कसली अवहेलना आली या विचाराने सैरभैर झाला आहे आणि तशातच एका मोटारीखाली येऊन जीव गमावतो. करूणा शहरात येऊन कुठेतरी काम करून पोटात अन्नाचा तुकडा तरी टाकायला हवा म्हणून एका घरात नोकराणीचे काम करते तर नंतर कळते की ही बाईच आपल्या पतीची प्रथम पत्नी...कायम आजारी असणारी. जो पर्यंत ही आहे तो पर्यंत आपला प्रियकर मला स्वीकारणे शक्य नाही असे साधे गणित मांडून अगदी ठरवून त्या आजारी स्त्रिला ही विष देते एका धुंदीतच आणि पुढे त्या प्रियकरासमोरच पोलिसांना “होय, मी खून केला आहे या स्त्रीचा...” अशी थेट कबुली. त्यावेळेचा नूतनचा अभिनय पाहाणे वा अनुभवणे जणू एक चमत्कार होय. पूर्ण कथा सांगत नाही मी मुद्दाम कारण एवढ्यासाठीच की कायद्याने सुनावलेली शिक्षा भोगत असलेल्या कल्याणीचे आता पुढे काय ? हा प्रश्न दिसतो तितका सोपा वा साधा नसून त्यात कोण आणि कसे कोण अडकत जाणार आहेत, त्या विचारांचीही खळबळ नूतनने विलक्षण अभिनय क्षमतेने दाखविली आहे. “सीमा....सुजाता.... बंदिनी” या तिन्ही चित्रपटात नूतनने एका अत्यंत साध्यासुध्या आणि केवळ एकच साडी वापरणार्‍या तरुणीची भूमिका केली असल्याने तिच्या व्यक्तिमत्वात कसलेही ग्लॅमर आढळणार नाही. आपल्या अभिनय कौशल्याने या अभिनेत्रीने सर्वांना जिंकले होते. त्या त्या थिएटरमधील हाऊसफ़ुल्ल गर्दी असलेल्या थिएटर्स मधून कितीही फ़िरले तर प्रेक्षकांच्या तोंडी फ़क्त तिच्याविषयीच बोलणे चालले आहे हे प्रत्ययास आले होते.

ज्या सदस्यांनी “बंदिनी” पाहिला आहे त्यानी पुन्हा पाहिला तर तिच्या अभिनय कौशल्याचा पुन्हा आनंद घेतला असेच होईल आणि ज्यानी पाहिलेला नाही त्यानी खास नूतनसाठीच पाहावा.
#तिची गोष्ट

About the Author

अशोक पाटील's picture
अशोक पाटील