शब्दांच्या पलीकडले

काही ओळी, शेर वाचल्या वाचल्या त्यांच्या अर्थाचे कंगोरे आपल्याला आपल्याच आयुष्यात, अवतीभवतीच्या लोकांच्या आयुष्यात, भूतकाळात, वर्तमानकाळात, वृत्तपत्रात, एखाद्या गोष्टीत असे कुठे कुठे सापडतात. एखाद्या बाणासारखे त्यातले शब्द मनात रुतून बसतात. एखाद्या वाईट आठवणीची खपली काढतात किंवा एखाद्या सुखद क्षणाचे मोरपीस फिरवून जातात.

त्यापैकीच ह्या खालच्या शेरातल्या ओळी!

तसे बोललो खूप काही परंतु, तरी राहिले खूप बोलायचे
कळाले तुला दु:ख माझे तरीही, कळाले तुला बारकावे कुठे?

-ज्ञानेश पाटील. 

 

आपली एखाद्या व्यक्तीशी ओळख होते, हळूहळू गप्पा व्हायला लागतात. मैत्री फुलते. सिनेमा, गाणी, शॉपिंग, आवडीनिवडी अश्या कितीतरी विषयांवर तासनतास बोलणे होत असते.पण बऱ्याचदा एकमेकांचे स्वभाव, मनात दडवून ठेवलेले अप्रिय क्षण, दु:खद  आठवणी सांगायच्या राहून जातात.कधी ठरवून तर कधी विषय निघत नाही म्हणून. पण अचानक येणाऱ्या एखाद्या कठीण प्रसंगी समोरच्याचे खरे अंतरंग कळते आणि वाटते इतके दिवस आपण बोलत होतो हे कसे काय समजले नाही आपल्याला?

"I can understand".सहज म्हणून जातो आपण जेव्हा समोरचा आपल्याला त्याचं दु:ख सांगत असतो. किंवा मनातली एखादी सल बोलून दाखवत असतो. बऱ्याच वेळा generalise करतो आपण दु:ख .एखाद्याचा घटस्फोट झाला किंवा जवळचं कोणी गेलं की होणारा त्रास हा वरवर सारखा दिसत असला तरी त्या वेदनांचे कंगोरे आपल्याला कुठे माहित असतात? त्या दोघांचं एकमेकांशी असलेलं bonding. दुराव्यामुळे होणारे त्रास. मनात, आत होणारी उलथापालथ समजून घेतो आपण? की वरवर समजूत घालत राहतो. एखाद्याला अनिच्छेने घ्यावा लागलेला एखादा निर्णय. त्याच्या मागची कारणे नसतात माहित आपल्याला. एखाद्याची आई किंवा वडील किंवा कोणी जवळची व्यक्ती दगावल्यावर येणारी निराशा. त्यामागे त्या नात्याचे ऋणानुबंध, आठवणी, वाद विवाद ह्या सगळ्यांचा कोलाज असतो.  कोणाला घट्ट मिठीची गरज असते. कोणाला बोलून मन मोकळं करायची इच्छा असते. कोणाला हंबरडा फोडून आतल्या कल्लोळाला शांत करायचं असतं. पण हे लक्षात येतं आपल्या? वरवर एकसारख्या वाटणाऱ्या वेदनेचे बारकावे समजून घ्यायचा आपण प्रयत्न करतो की सगळ्यांना एकच मोजमाप लावून एकसारखे दिलासे देत बसतो? जेव्हा एखादा माणूस समोरच्याला म्हणतो की तुला कळत नाहीये मला काय होतंय..तेव्हा एखाद्यावेळी खरंच कळलेलं नसतं. कारण जे खरं बोलायला हवं ते कधी बोलल्याच जात नाही. कधी संकोचामुळे, कधी परिणामांच्या भीतीने, कधी गरज वाटत नाही म्हणून. जवळच्याच माणसांमध्ये दुरावलेला हा संवाद सहज सोप्या ओळींमध्ये मांडला गेलाय. दु:खात बारकावे असतातच !!आणि समोरच्याला ते न कळण्याचं दु:ख ही असतंच.आणि हे दु:ख बऱ्याचदा नात्यांमधल्या दुराव्याला कारणीभूत ठरतं. आपल्याला आतबाहेर ओळखण्याची हमी देणाऱ्या माणसाला हे बारकावे कळू नयेत ह्याची सल टोचत राहते. त्यामुळे नाजूक प्रसंगात अमक्याच्या आयुष्यात सेम असंच झालं किंवा  तमक्याला सुद्धा असाच अनुभव आला असं सरसकट मूल्यमापन करता समोरच्या जीवलगाच्या परिस्थितीचे कंगोरे समजून घेतले तर त्याला खरा आधार वाटेल.

 

काही लोकांनी जसे मनमोकळे होऊन योग्य शब्दात समोरच्याला समजून घेतले पाहिजे तसेच काही लोकांनी शांत राहून आयुष्याची मजा घेतली पाहिजे. ह्या  मानवी स्वभावाची बाजू  सांगणारा हा वेगळा एक शेर:

उगाचच लांबतो रस्ता 

नको चर्चा प्रवासाची 

- माधुरी चव्हाण जोशी 

एखादी गोष्ट उगाळत बसणे हा काही लोकांचा स्थायीभाव असतो. मग ते सुख असो, दु:ख असो की आणखी काही. तेच तेच विचार करायचे आणि त्यातच गुंतून रहायचं. कोणी जवळचं भेटायला आलं काय  किंवा कोणी पहिल्यांदा भेटत असलं काय. आपण आपलं एकच एक विषय काढून चघळत बसायचं.कितीही बोलून हलकं वाटलं तरी गुंते सुटत नाहीतच! प्रश्नांना उत्तरं मिळतीलच असं नाही. फक्त ताणल्या जातील गोष्टी! एखादा मोठा आजार झालेल्या माणसाला डॉक्टर काय सांगतात? आपल्याला काय झालंय त्याचा सतत विचार न करता त्यातून बाहेर येऊन त्याच्याशी लढा. तेच तेच आठवून आणि बोलून बरं होता आलं असतं तर सगळे दोन चार दिवसात बरे नसते का झाले? आपल्याकडे नातेवाईक तेच तर करतात.

या शरिरांच्या आणि मनांच्या न संपणाऱ्या दुखण्यापलीकडे घडणाऱ्या कितीतरी गोष्टी असतात ज्या बोलायच्या राहून जातात कारण आपण लक्षच देत नाही तिकडे. उलट आणखी अडकत जातो स्वत:शी नाहीतर लोकांशी होणाऱ्या चर्चेत. छान पाऊस पडत असताना चाललेल्या प्रवासातसुद्धा एखादा माणूस किती चिकचिक आहे, चिखलामुळे कपडे खराब होतात, छत्री सांभाळावी लागते, कंटाळा येतो असेच बोलत राहिला तर?  

तसंच एखादं बिनसलेलं नातं.  न जमलेली नोकरी, न पचलेले अपमान ह्यातच एखादी व्यक्ती घुटमळत राहते.  किंवा  आयुष्याच्या एखाद्या वळणावर हरवलेली माणसं,  सतत येणारी संकटं यातच मनाला भिरभिरत ठेवते.अशाने    आयुष्याचा प्रवास हा न संपणारा रटाळ  आणि कंटाळवाणा वाटायला लागेल नाहीतर काय!

उलट वेगवेगळी माणसं, बदलत जाणारे आकाशाचे रंग, मातीची रूपं, झाडांचे आकार , सावल्यांचे थांबे, अगदी रस्त्याकडेची रानफुलं सुद्धा एकसारख्या लांबलचक रस्त्याला नवा अर्थ देतात. संकटाच्या चर्चेपेक्षा भेटणारी नवी माणसे, भोवतीचा निसर्ग, पुढच्या आयुष्याची स्वप्ने ह्यात जीव रमवला तर नवी उभारी येते.

आयुष्याचा प्रवास असा रमतगमत करावा की खाचखळग्यांची जाणीव कमीत कमी व्हावी.रस्ता कधी संपला हे कळूच नये. प्रवास ही चर्चा करायची गोष्टच नाही मुळी, अनुभवयाची गंमत आहे!!!

ह्या दोन शेरातून माणसाच्या वेगवेगळे स्वभावविशेष दिसून येतात. आपल्या अवतीभवती घडणाऱ्या गोष्टींना दोन ओळींमध्ये गुंफूणे खरच कठीण! पण त्यातून वाचणाऱ्याने आपापले अर्थ शोधले की त्या ओळी आयुष्याशी समरस होऊन जातात! आणि हीच खरी गंमत !

-निर्मिती कोलते

 

 

About the Author

Nirmiti Kolte's picture
Nirmiti Kolte

 

सांगली 

M.com
E tutor म्हणून कार्यरत 
गझल लेखन, मासिकात लेख, कविता, भाषांतर प्रकाशित.