नये दौर मै लिखेंगे मिलके नयी कहानी

देशाबद्दल वाटणारी भावना, अभिमान किंवा देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने चित्रपटांमध्ये दाखवण्यात येते. चित्रपट माध्यम हे समाजजीवनाचे चित्रण करणारे आणि समाजाला प्रेरणा देणारे एक प्रभावी माध्यम आहे. स्वातंत्र्यलढा न पाहिलेली  किंवा अनुभवलेली  आजची तरुण पिढी  देश या संकल्पनेकडे कसे बघते याची अनेक उदाहरणे आजच्या चित्रपटांमध्ये दिसतात. अनेक चित्रपट पारंपारिक पद्धतीने या विषयाला न हाताळता वेगळा दृष्टीकोन देतात.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

नया है ज़माना मेरी नयी है डगर

देश को बनाऊंगा मशीनों का नगर

भारत किसी से न रहेगा कम

आगे ही आगे बढ़ाउंगा कदम

हे गाणे स्वतंत्र भारताच्या तरुणाचे स्वगतच आहे! आजच्या तरुण पिढीने स्वातंत्र्यलढा, त्यासाठी अनेकांनी दिलेली आहुती, सोसलेले कष्ट पाहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांना देशप्रेमाची जाणीव नाही असे बऱ्याचवेळा ऐकायला मिळते. त्यांना त्या काळातील पराकोटीचा तो त्याग, जीवाची बाजी लावणे ह्या गोष्टींशी कदाचित एकदम रिलेट होता येणार नाही. पण जसे आपण आजूबाजूला डोळे आणि कान उघडे ठेऊन पाहू, तसे लक्षात येते दृष्टीकोन थोडाफार बदलला असला तरी देशाबद्दल आत्मीयता तीच आहे. जरी आजच्या तरुणाईची मते, व्यक्त होण्याची पद्धत, निष्ठा वेगळी वाटत असली तरी देशाबद्दलची आत्मीयता मनात रुजलेली असते. आजच्या तरुणांसाठी, देशभक्तीचा अर्थ एक नवी विचारसरणी follow करणे हा आहे. स्वतःची प्रगती होत असताना सर्वसमावेशक दृष्टीकोन ठेवणे, आपल्या जबाबदाऱ्या सचोटीने पार पडणे, नवी नवी आव्हाने स्वीकारणे हे सुद्धा देशाला संपन्न करण्याचा, देशाबद्दलचे प्रेम दाखवण्याचा एक मार्ग आहे. त्यांनी देशाला संपन्न बनविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आज आपल्याकडे पायाभूत सुविधामध्ये सुधारणा होते आहे, एक स्थिर अर्थव्यवस्था आहे, मीडिया उद्योगात वाढ झाली आहे ह्या सगळ्यांच्या मुळाशी ह्या नवीन उर्जेचा सहभाग आहे.

हीच देशाबद्दल वाटणारी भावना, अभिमान किंवा देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा अनेक वेगवेगळ्या पद्धतीने चित्रपटांमध्ये दाखवण्यात येते. चित्रपट माध्यम हे समाजजीवनाचे चित्रण करणारे आणि समाजाला प्रेरणा देणारे एक प्रभावी माध्यम आहे. स्वातंत्र्यलढा न पाहिलेली  किंवा अनुभवलेली  आजची तरुण पिढी  देश या संकल्पनेकडे कसे बघते याची अनेक उदाहरणे आजच्या चित्रपटांमध्ये दिसतात. अनेक चित्रपट पारंपारिक पद्धतीने या विषयाला न हाताळता वेगळा दृष्टीकोन देतात.

रोजा” चित्रपटातला इंजिनिअर नायक! अगदी साधा, चारचौघांसारखी नोकरी करणारा! छोटेसे सुखी कुटुंब असलेला. सैन्याला मदत करायला काश्मीरसारख्या संवेदनशील जागी जातो आणि त्याचे अपहरण होते. एरवी शांत असणारा हा तरुण  जेव्हा दहशतवादी  तिरंग्याला जाळण्याचा प्रयत्न करतात तेव्हा धावत जाऊन त्या तिरंग्याला वाचवायचा प्रयत्न करतो. अश्यावेळी अंगावर रोमांच उभे राहतात. आपल्यासारखा सामान्य माणूससुद्धा असं काहीतरी अनपेक्षित करण्याची ताकद ठेऊन असतो ह्याची जाणीव होते!

आज अनेक सुशिक्षित तरुण बेरोजगार आहेत. त्यांना आपला मार्ग सापडलेला नाहीये. बऱ्याचवेळा चांगले मार्क्स पडूनसुद्धा निर्णय घेता न आल्यामुळे ते दिशाहीन असतात! “लक्ष्य” मधल्या सुखासीन तरुणाला सुद्धा कुठलेही ध्येय नसते. भरकटलेला, आयुष्याला सिरीअसली न घेतलेला एक तरुण, करण शेरगिल! मित्रांच्या नादात आर्मी जॉईन करतो आणि तिथल्या शिस्तीला, कष्टांना कंटाळून परत येतो! पण तो पळपुटेपणा जिव्हारी लागून पुन्हा नव्या जोमाने ट्रेनिंग पूर्ण करतो. त्याच्या निवडीमागे कुठेही देशप्रेम नसते. पण हळूहळू त्याला त्याचे लक्ष्य सापडते. सैन्य दलात करिअर करणारी, त्यासाठी वेगवेगळ्या कसोट्यांना सामोरी जाणारी कितीतरी उदाहरणे आपल्या भोवताली असतात! त्यांचे लक्ष्य सुरवातीला वेगळे असत असेलही पण शेवटी देशासाठी प्राण पणाला लावताना ते मागेपुढे बघत नाहीतच!

अजून एक प्रेरणादायी नायक म्हणजे “सरफरोश” मधला अजय सिंग राठोड! वडिलांवर आणि भावावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रेरणा बनवून पोलीस दलात जातो. एसीपी बनतो. जेव्हा तो म्हणतो,  “मै हर एक मुजरिम को कानून के सामने भिखारी की तरह खडा देखना चाहता हूँ!” तेव्हा त्याची सचोटी, प्रामाणिकपणा प्रेरणा देतो. निडर होऊन, प्रामाणिकपणाने आपले काम करणाऱ्या आजच्या तरुणाईचे अजयसिंग प्रतिनिधित्व करतो. २६/११ सारख्या घटनेच्या वेळी कर्तव्य बजावणाऱ्या आपल्या पोलीस दलातील वीरांची अश्या वेळी आठवण येतेच!

----

आपल्या खेळातून देशाचे नाव उंच करणारे तर अगणित खेळाडू आहेत! एखादी मानाची स्पर्धा जिंकल्यानंतर हातात तिरंगा घेऊन आपला आनंद व्यक्त करतात तेव्हा त्याचे देशाबद्दलचे प्रेम तय्न्च्या डोळ्यात दिसते. “चक  दे इंडिया” हीच गोष्ट सांगतो !! राष्ट्रीय महिला हॉकी संघाला जागतिक विजेता बनण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या एका हॉकी प्रशिक्षकाच्या प्रवासाची कथा असलेल्या ह्या चित्रपटाने केवळ देशभक्तीपर दृष्टिकोनाचेच नव्हे तर देशांत लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्याची गरज यावरही प्रकाश टाकला. त्यातल्या मुलींचे कष्ट, जिद्द, पारिवारिक पातळीवरील समस्या, त्यातून काढलेले मार्ग कितीतरी जणींना खेळाला करिअर बनवताना प्रेरणादायक ठरले असतील. नुकतीच World Junior Athletics Championship जिंकणारी आणि राष्ट्रगीत गाताना भावूक झालेली हिमा दास ह्याच तरुणींचे प्रतिनिधित्व करते. “कबीर खान” शेवटची मॅच जिंकल्यावर जेव्हा तिरंग्याकडे बघतो तेव्हा त्याच्या डोळ्यातला अभिमान देशाला समर्पित असतो. आपल्या भूतकाळातील डागाळलेल्या प्रतिमेला उजळवताना देशाची प्रतिमा सुद्धा त्याला उजळायची होती. असे कितीतरी खेळाडू, प्रशिक्षक दिवसरात्र झटत असतात आपल्या देशाचे नाव त्यांच्या खेळामध्ये उंचावण्यासाठी!

अजून एक सध्याचा प्रश्न! परदेशी जाणारी आणि स्थायिक होणारी तरुणाई! तिची खरंच देशाशी नाळ तुटते का? अनेक जण आपापल्या परीने छोट्या मोठ्या मार्गाने देशासाठी काही गोष्टी करत असतात. पण “स्वदेस” मधला मोहन भार्गव  नासा मध्ये काम करत असताना, एका वेगळ्या कारणासाठी एका छोट्या गावात येतो काय आणि त्या गावाचा कायापालट करायला मदत करतो काय!  इतर असंख्य भारतीय तरुणांप्रमाणे तोसुद्धा इथल्या व्यवस्थेला सरकारला सुरुवातीला  नावेच ठेवतो पण हळूहळू आपण स्वतःही काहीतरी करायला पाहिजे याची जाणीव त्याला होते आणि  तो  गावाच्या बेसिक समस्यांवर तोडगा काढायचा प्रयत्न करायला लागतो. एका छोटया सुट्टीत आपल्या बालपणाची ओळख करून घेण्यासाठी आलेल्या आणि पुन्हा एकदा आपल्या देशाच्या प्रेमात पडलेल्या आपल्या मुळाचा शोध घेणाऱ्या मोहन भार्गव मध्ये परदेशात जाऊन काही वर्षांनी परत येऊन आपल्या देशात नव्या संधी शोधणारे असंख्य तरुण दिसतात.

----

असाच “रंग दे बसंती” मधला अजय हा सुद्धा हा आजच्या क्लिअर व्हिजन असलेल्या युगाचा प्रतिनिधी! भारतीय हवाई दलातील एक पायलट! ज्याला आपल्या  कामाविषयी, देशाविषयी प्रचंड अभिमान आहे. पण त्याचे बाकीचे मित्र परिस्थितीला नावे ठेवण्यात,  भ्रष्टाचाराची टर  उडवण्यात धन्यता मानतात. भरकटलेल्या, दिशा नसलेल्या वर्गाचे प्रतिनिधत्व करतात! पण ह्याच अजयच्या अपघाती मृत्यूनंतर, त्या मृत्यूला जबादार असलेल्या व्यवस्थेविरुद्ध आवाज  उठवतात, सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करतात. भगतसिंहची विचार सांगणारी एक कल्पक कथा स्वातंत्र्यपूर्व तरुणाला आणि आजच्या तरुणाला किती सुन्दर प्रकारे कनेक्ट करते!

अनेक स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करताना आपल्या हक्कांसाठी, न्यायासाठी छोट्या मोठ्या लढाया रोज लढत असतात. बदल घडवत असतात! “नो वन किल्ड जेसिका” मधील टीव्हीवरील निवेदिका मीरा आणि जेसिकाची बहिण सबरीना लाल या देखील अन्यायाविरुद्ध लढून, जेसिकावर झालेल्या हल्ल्याच्या केसचा पाठपुरावा करून न्यायव्यवस्थेला न्याय द्यायला भाग पाडतात. घरात बसून स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांवर नुसती हळहळ व्यक्त न करता रस्त्यावर उतरून आवाज उठवण्याची शिकवण देतात. स्त्रीला मान देणारा समाजच एका सक्षम आणि खऱ्या अर्थाने पुढारलेल्या देशाची ओळख असतो!

देशाचे संरक्षण करताना तर फक्त काम म्हणून ते करता येतच नाही! आपल्या मातीचे प्रेम आणि अभिमान असल्याशिवाय जीवावर उदार होणे अशक्यच. “बेबी” चित्रपटातील मधील स्पेशल टास्क फोर्सची टीम देशा बाहेर पडून, स्वत:ची ओळख लपवत, दहशतवादी संघटना आणि त्यांचे म्होरके यांना जेरबंद करण्यासाठी जीवाची बाजी लावतात. परक्या देशात कारवाई करताना सापडलो तर माग काढला जाऊ नये म्हणून स्वत:ची संपूर्ण ओळख पुसायला तयार असतात. देशावर संकट येऊ नये म्हणून अशी जोखीम घेणारी ह्या क्षेत्रातील तरुणाई आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी झटत असते! ते ही कुठेही देशप्रेमाचा डांगोरा न पिटता!

“राजी” चित्रपटातील सहमत अवघ्या विशीत पाकिस्तानात जाऊन  आपल्या देशासाठी हेरगिरी करते. ती  म्हणते जेव्हा म्हणते की, “मुल्क के आगे कुछ भी नही,खुद भी नही” तेव्हा अश्या अनेक हेरगिरी करणाऱ्या लोकांचे आश्चर्य वाटते. क्षणोक्षणी मरणाच्या छायेत काम करताना हे काम ते आपल्या देशाच्या संरक्षणासाठी करत आहेत ह्याचे कौतुक तर वाटतेच पण त्यासाठी लागणारी निष्ठा, साहस बाळगून जीवावर उदार होणाऱ्या अश्या लोकांचा अभिमान सुद्धा वाटतो !  

जॉनी एलएलबी” मधला  सामान्य वकील  रस्त्यावरच्या गरीब माणसासाठी न्याय संस्थेसमोर पाय रोवून उभा राहतो, “युवा” मधले सामान्य, आपल्यापैकीच वाटणारे तरुण निवडणुकीच्या रिंगणात उतरून व्यवस्थेत बदल करायला निघतात, “गंगाजल” मधला पोलीस ऑफिसर आपल्या तत्वांशी तडजोड करायला तयार नसतो! अशी अनेक उदाहरणे आजच्या तरुणाचे वेगळेपण, त्याची कामातली निष्ठा, देशाशी बांधिलकी दाखवून देतात! हे सगळे नायक आपल्या आसपासच आहेत. अनेक ज्ञात अज्ञात लोकांनी आपल्या आयुष्याची आहुती देऊन स्वतंत्र केलेला आपला देश आज तरुणाईच्या हातात आहे. आजच्या पिढीने त्या हाल अपेष्टा, लाठीमार अनुभवला नसेलही, पण आपल्या हातात आलेल्या ह्या स्वतंत्र भारताला जगात मानाचे स्थान मिळवायला ती नक्कीच धडपडते आहे! आणि नवनवीन क्षेत्रात सक्षम पाऊल ठेवताना म्हणते आहे,

छोडो कल की बाते, कल की बात पुरानी

नये दौर मै लिखेंगे मिलके नयी कहानी!!

निर्मिती कोलते

About the Author

Nirmiti Kolte's picture
Nirmiti Kolte

 

सांगली 

M.com
E tutor म्हणून कार्यरत 
गझल लेखन, मासिकात लेख, कविता, भाषांतर प्रकाशित.