मेरे वतन के लोगो

ऐ मेरे वतन के लोगो

आजही वाटतं की, ते सर्व २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट म्हणजे खरी धमाल होती! शाळेत असताना त्या दिवसाचं जेवढं महत्त्व, उत्साह विद्यार्थ्यांमध्ये असतो त्याचं स्थान वेगळंच आहे. प्रत्येकाच्या मनात त्याचा एक १५ ऑगस्ट/२६ जानेवारी असतोच.

-------------

‘‘आई, मी यावर्षीही राष्ट्रगीत म्हणायला समोर उभी राहणार आहे आणि अनुताई आहेच तिची बासरी घेऊन..’’
आई घरात शिरताच माझी मैत्रीण रुपाली तिच्या आईला म्हणाली. मी शेजारीच उभी होती. मावशीने माझ्याकडे बघून विचारले, ‘‘तू काय करणार आहेस?’’
‘‘रांगेत उभे राहा, बोलू नका, हा आरडाओरडा करायचा आहे मला. मी क्लास कॅप्टन आहे!’’ मी उत्तर दिले. क्लास कॅप्टन असणंसुद्धा भारी वाटायचं. मग ड्रेसला इस्त्री केली की नाही, कुठे सुरकुती तर नाही ना. हेअर बँड, रिबिन्स नीट बघितल्या की नाहीत, याच्या तपासणीकडे आम्ही वळलो. कवायतीच्या स्टेप्स हजार वेळा केल्या तरी ऐन वेळी गडबड होईल अशी रुखरुख का लागते, याचं कोडं वाटतं.
आजही वाटतं की, ते सर्व २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट म्हणजे खरी धमाल होती! 15 ऑगस्ट ला श्रावण सुरू झालेला असतो. श्रावणातले सण असतात. श्रावण सोमवार, नागपंचमी ,पोळा .. ती यादी तुम्हाला माहिती आहे. गणपतीची चाहूल लागलेली असते .पावसामुळे हिरवा गार झालेलं असतं. जोडून सुट्टी आली तर मग तर धमालच असते. शाळेत असताना त्या दिवसाचं जेवढं महत्त्व, उत्साह विद्यार्थ्यांमध्ये असतो त्याचं स्थान वेगळंच आहे. प्रत्येकाच्या मनात त्याचा एक १५ ऑगस्ट /२६ जानेवारी असतोच.

भारतीय सेना, एनसीसी, सनिक स्कूल, घरात कुणी सरकारी अधिकारी आहे-अशा प्रकारचं काही नातं असेल तर या दिवसाचं महत्त्व आगळंच असते. लहानपणीच काय अजूनही मला हे व्यवसाय आणि त्या लोकांविषयी उत्सुकता आणि विशेष जिव्हाळा आहे.
आपला स्वतंत्र भारत! मोठय़ा लढय़ानंतर मिळालेलं स्वातंत्र्य! इतिहास शिकताना मनावर कोरलं गेलेलं त्या दिवसाचं महत्त्व. एक गारूडच मनावर. देशातील राजकारणाचा परिचय नसताना समोर आलेलं या दिवसाचं रूप. शाळेतला प्रोग्रॅम झाला की, धावतपळत घरी यायचं आणि टीव्हीवर दिसणा-या परेड्स, झलकिया बघायच्या. अनेकदा घरी येईपर्यंत ते सर्व प्रक्षेपण संपलेलं असे. मग बातम्यांत ते तुटकतुटक बघायचं. जेव्हा पेपर हातात यायचा तेव्हा आधाशीपणे मी सगळी छायाचित्रं, वृत्तांत वाचून काढायचे.
जानेवारी आणि ऑगस्ट सुरू होत नाहीत, तोवर आपण छान गणवेश घालून शाळेत निघालो आणि चिखलात धडपडलो, कुठल्याशा खिळ्यात अडकून ड्रेसला खोचा पडला असं भयस्वप्न पडू लागतं. कुणाचं तरी असं काही व्हायचंच. आपलं एकदा झालं तर काय फार फरक पडतो, असं कधी मनात आलं नाही. उलट सगळ्यांसारखं वागायचं, पण तरी उठून दिसेल असं राहण्याची ही धडपड मनात किती खोलवर रुजलेली होती.

२६ जानेवारी हा दिवस आणि त्याकरता लागणारी एक शिस्त मनात पक्की बसली होती. ज्या कुणी स्वातंत्र्यलढय़ात प्राण दिले, त्यांचा मान राखण्याकरता किमान एवढे दोन दिवस नीट वागलंच पाहिजे, अशी टोचणीसुद्धा होती मनाला. शाळेतली काही निवडक मुलं राष्ट्रगीत म्हणायला समोर उभी असत. इतर मुलं नेहमीप्रमाणे आपापल्या जागेवर रांगेत उभी राहत. सर्व शिक्षक-शिक्षिका त्यांच्या खास वेशात रूबाबदार वाटायच्या. मला किंवा आणखी काही मुलांना दोन स्कूल युनिफॉर्म होते. त्यामुळे २६ जानेवारीला किमान एक तरी चांगलाच असे. काही मुलांकडे एकच ड्रेस होता, ते मला माहीत होतं. अशा वेळी माझा युनिफॉर्म किती चांगला, नवा वा स्वच्छ अशा बढाया किती क्लेशकारक ठरू शकतात, ते मला जाणवलं होतं. १६ जानेवारीला थंडी असे. काही मुलं मुद्दाम आतून स्वेटर घालत आणि वर आमचा युनिफॉर्म किती छान अस दर्शवत. स्वेटरचा समावेश युनिफॉर्ममध्ये लवकरच झाला, हे बरं झालं. ज्या मुलाशी पटत नसे, त्याचा युनिफॉर्म कशा प्रकारे खराब करता येईल याचे सर्व प्रयत्न होत. अर्थात हे सर्व आमच्या दृष्टीने २६ जानेवारीचा अविभाज्य भाग होता. मी क्लास कॅप्टन होते त्यामुळे भांडखोर, दंगेखोर, टारगट आणि हुशार पण डँबिस अशा सर्व स्वभावाची मुलं माहिती मला होती. नाकासमोर चालणारा गट सर्वात सोपा, हुशार पण डँबिस हाताळायला सर्वात अवघड हे लक्षात आलं होतं. विविधतेतली एकता, एकतेमधली स्पर्धा, गटबाजी अशा प्रवाहांची नकळत ओळख होत होती.

२६ जानेवारी येणार, या विचाराने मला एक आणखी वेगळीच गोष्ट छळायची. आमच्या वर्गातल्या एका मुलाचे वडील खूप लवकर गेले होते. तो आईचा एकुलता एक मुलगा. अभ्यासात ब-यापैकी चांगला. घरची परिस्थिती अगदीच साधारण. मुलगा बेताच्या उंचीचा होता, त्याच्या आईसारखा. तो मुलगा कमीच बोलायचा. अतिशय मानी तर होताच, पण तो गर्विष्ठ होता की त्याच्या आईसारखा अबोल, ते मला उलगडलं नाही. तेवढे त्याच्याशी बोलायची कधी संधी मिळाली नाही. एका मुलीचे वडीलही असेच लवकर गेलेले. पण तिच्या घरची परिस्थिती तशी चांगली. तिची आई सगळीकडे दिसायची. मुलीची बाजू घेऊन तिला सगळीकडे प्रवेश मिळेल, याची खबरदारी घ्यायची. २६ जानेवारीला ही दोन्ही मुलं एकाच ग्रुपमध्ये उभी राहत, राष्ट्रगीत म्हणायला! त्यांचे स्कूल युनिफॉर्म, त्यांची देहबोली याची नकळत तुलना व्हायची. ती होऊ नये असं मला वाटत असे. किमान कुठलाही दोष नसताना त्या मुलाला अजिबात पडतं घ्यावं लागू नये असं वाटे. दिसायली चांगली, मुलगी आणि थोडं पुढे पुढे करणारी. अशी व्यक्ती आजूबाजूला असणं म्हणजे एक वेगळंच आव्हान! हे कळायला शाळा व एकंदर वातावरण पुरेसं होतं. अंगात गुण असावे लागतात, पण नमके कोणते? असो. एकदाच कॉलेज सुरू झालं आणि ते दोघे वेगळ्या कॉलेजात गेले. मी कदाचित अशा घटना मनाला लावून घेणं कमी केलं असावं.

आमच्या शाळेच्या इमारतीलगत एक नगरपालिकेची मुलींची शाळा होती. मी चौथी-पाचवीत होते, तेव्हा माझी आजी त्या शाळेची मुख्याध्यापक होती. तिच्या शाळेत अधूनमधून माझी फेरी असे. पण २६ जाने किंवा १५ ऑगस्ट या दिवशी मी तिच्या शाळेत जात असे. आजी तिथे येणा-या मुलींच्या गोष्टी सांगायची. त्या दहावी झाल्या तरी नशीब, असे आजीला वाटे. त्यांचे लग्न त्याआधी करू नका, म्हणून कुठल्या तरी पालकाची मनधरणी व जरा समज द्यायची वेळ तिच्यावर दरवर्षी यायची. त्याने कदाचित आठवीतलं लग्न दहावीपर्यंत पुढे जात असावं. मी शाळेत जायचे, तेव्हा त्या मुलींशी बोलायचे. मुख्याध्यापिकेची नात म्हणून त्या माझ्याकडे बघत. माझ त्यांच विश्व वेगळं होतं. त्यांच्याशी बोलताना आपल्याला काहीही न करता दोन वेळचं जेवायला मिळतं, याची जाणीव व्हायची. मला खूप अपराध्यासारखं वाटायचं. त्या मुलींना २६ जानेवारी म्हणजे शाळेचा दिवस फुकट गेला असं वाटे. घरकामातून सुटका नाही, उगाच शाळेचा फेरा आणि शिकायला मिळायचं नाहीच. एखादी लिमलेटची गोळी मिळते, याकरता एवढा फेरा त्यांना आवडायचा नाही. दोष त्यांचा नव्हताच. ज्यांना दोन वेळचं जेवण मिळण्याची शाश्वती नसते, तिथे मी कुठलेही नियम वा मूल्यांची अपेक्षा करत नाही. पण तिथे माणुसकीचा अंश शिल्ल्क आहे, हे मोठं आश्चर्य मी स्वत: बघत आले आहे. जिथे हा जेवणाचा प्रश्न सुटला होता तिथे देशभक्ती, देशप्रेम वगरे दुस-या पातळीवर ठेवून घराघरातून व्यक्तिकेंद्रित आणि स्वत:पुरतं जगण्याची सुरुवात त्यावेळी झाली होती, असं आता वाटतं.
--
लाल किल्ल्यावर आणि शासकीय इमारतींच्या आवारात तिरंगा असतोच. त्यांना मानवंदना मिळते. सर्व चॅनेलवरील देशभर ते झेंडे फडकताना दिसतात. भारतीय सेना, राज्याच्या झलकिया बघितल्या की, लहानपणी खूप अभिमान वाटत असे. २६ जानेवारी असो की 15 ऑगस्ट- हा दिवस कुणाकरता चौकाचौकात उभं राहून, तिरंगा विकून पैसे मिळतात या दृष्टीने महत्त्वाचा असतो, हेसुद्धा वास्तव हळूहळू उमगत गेलं. हे चिमुकले ध्वज एकदा का मनात फेर धरून नाचायला लागले की, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, यातला फोलपणा स्वीकारता येत नाही. दुस-या दिवशी आपले राष्ट्रप्रेम शहरात, गावात, रस्त्यावर, कच-यात टाकलेले, चुरगळलेले, फाटलेले दिसते! कॉलेजमध्ये जाईस्तोवर पाश्चात्त्यांचं सगळं भव्यदिव्य आहे, असं मत मनात शिरकाव करतं. देशात राहिलो तरी मनाने परदेशात राहणारे आम्ही देशप्रेमाची लक्तरंही आमची नाहीत, हे मनाशी पक्क ठरवून टाकतो. तसे देशप्रेमाचे सोंग करायला फार वेळ किंवा कष्ट लागत नाहीत हेसुद्धा बघत असतो. अनुदान, सवलती इत्यादीकरता अशी सोंगं फार उपयोगी असतात. आपल्याच देशात सोंग घेत आम्ही असे तयार होतो की, मग देशाबाहेर पडल्यावर खर देशप्रेम आहे की सोंग ते कळतं तोवर उशीर झालेला असतो. या सर्वाच्या कोलाहलात विखुरलेले कागदी, प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज किती शांतपणे निळ्या आकाशाकडे बघत असतात!

-----
माझे आईवडील कॉलेजात प्राध्यापक होते. सरकारी नोकरी. शाळेतलं फंक्शन झालं की कधी कधी मला आई तिच्या कॉलेजात नेत असे. मी स्टाफ रूममध्ये मजेत चहा कॉफी पीत गप्पा मारणारे शिक्षक पाहिले आहेत. त्या शिकवण्याचा ताण वा कटकट नसल्याने त्यांच्या चेह-यावर असणारं समाधान मी बघितलं आहे. होस्टेलच्या मुलांना बोलावून एकदाचा झेंडा फडकवला, मस्टरमध्ये सही झाली की प्राध्यापकांचा हा दिवस सार्थकी लागतो. या दिवशी हजेरी नसेल तर प्रॅक्टिकलचे मार्क मिळणार नाहीत, इत्यादी शिस्तीचे बडगे त्यांना उगारावे लागतात, यातच सर्व आलं. बाकी दुपारपासूनच क्लबात बसणं, संक्रातीचं हळदीकुंकू उरकून घेणा-या अध्र्या दिवसाच्या सुटीमुळे सर्व शिक्षकी पेशातल्या लोकांना शक्य होतं, हे नाकारून चालणार नाही. शनिवार-रविवारला जोडून आलेला २६ जानेवारी वा 15 म्हणजे आउटिंगला फारच उत्तम हे समीकरण तर फार सोपं आहे.

----

गेली अनेक वर्ष खूप भारतीय भारताबाहेर आहेत. भारतीय वंशाचे अनेक लोक जगभरात विखुरले  आहेत.. त्यांना मायभूमी विषयी वाटणारी ओढ ,आपल्या माणसांविषयी असलेलं प्रेम 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी च्या निमित्ताने  नक्कीच जाणवतं... 

------

‘छायागीत’, ‘चित्रहार’मध्ये दिसणारं देशप्रेम. प्रेमाने सजलेली रंगोली. रेडियो मिरची..दिवसभराचे टीव्हीवरचे देशप्रेमाचे सिनेमा, सीरियलमधले डोस आम्हाला आवडतात. आमच्या इतिहासावर आमचं आंधळं प्रेम आहे. आमच्या सर्व अस्मिता आम्हाला प्रिय आहेत. चौकाचौकात लाउडस्पीकर लावून मोठय़ाने ‘ए मेरे वतन के लोगो..’, ‘मेरे देश की धरती..’ अशी गाणी आम्ही वाजवतो. आज महत्त्वाचा दिवस आहे हे बहि-या माणसालाही कळेल, असा आमचा समज आहे. देशप्रेम हे गृहित धरलेलं आहे. फक्त त्याचा वापर आणि अभिव्यक्ती आम्ही ठरवणार आहोत! 

गाणी वाजवा, पण विधायक कामही करा, अशी मागणी आम्ही करतो. इतरांना त्रास होणार नाही, असा आवाज असू द्या, असं मत व्यक्त करतो. दोन-चार सामाजिक उपक्रमांत भाग घेतो. हे सर्व चालयचंच. मनात एक तरी 15 ऑगस्ट वा२६ जानेवारी असेल तर काळजीचं कारण नाहीये! बस्स झेंडा ऊचा रहे हमारा

-सोनाली जोशी

About the Author

सोनाली's picture
सोनाली

मिळून सा-याजणी, मेनका , रोहिणी, अक्षर मासिकातून लेखन प्रसिद्ध.

लोकमत, लोकसत्ता, सकाळ, मटा या पेपरातून कविता, लेख 

शक्यतेच्या परिघावरून कविता संग्रह