मार्गारेट मिचेल

मार्गारेट मिचेल...लेखिका ~ केवळ एकच कादंबरी....तीन कोटी प्रतींचा खप...!

आजची तारीख आहे १६ ऑगस्ट २०१८.... आणि १६ ऑगस्ट १९४९ रोजी एक अबोल अशी ख्याती झालेली अमेरिकन लेखिका “मार्गारेट मिचेल” स्वर्गवासी झाल्या. इंग्लिश भाषेत केवळ एकच कादंबरी लिहून विक्रमी खपाचे आकडे गाठणारी, तसेच त्यावर तिला मिळालेली रॉयल्टी लक्षावधीची .... कादंबरीवर १९३९ मध्ये मेट्रोने निर्माण केलेल्या तब्बल साडेतीन तासाच्या प्रदीर्घ चित्रपटाने मिळविलेली प्रचंड लोकप्रियता, कमालीची म्हणावी अशी त्याचीही आर्थिक कमाई तसेच ऑस्कर्स मिळकत या सर्वांच्या बातम्यांनी सतत जगभरातील साहित्य प्रेमी आणि प्रकाशकांच्या चर्चेत राहिलेली ही लेखिका, अमेरिकन साहित्यप्रेमी रसिकांच्या गळ्यातील ताईत बनली होती (तेही केवळ एकच कादंबरी लिहून). मृत्यूपूर्वी चारच दिवस अगोदर पतीसमवेत रस्ता ओलांडत असताना रॉन्ग साईडने येणार्‍या आणि दारूच्या नशेत असलेल्या एका ड्रायव्हरने आपल्या कारने श्रीमती मार्गारेट याना जोराने धडक दिली. मार्गारेट याना बेशुद्ध अवस्थेत दवाखान्यात लागलीच दाखल केले. कवटीला खोलवर अशी दुखापत झाल्यामुळे त्यांच्या जगण्याची आशा नव्हतीच तरीही चार दिवस डॉक्टर्स टीमने शर्थीचे प्रयत्न केले पण मार्गारेट शेवटपर्यंत शुद्धीवर आल्याच नाहीत आणि १६ ऑगस्टच्या दुपारी त्यानी जगाचा कायमचा निरोप घेतला. अमेरिकेतील एखाद्या राजकीय नेत्याला मिळाली नसेल इतकी लोकप्रियता मार्गारेट मिचेल यानी मिळविली होती आपल्या एकाच कादंबरीने...तिचे नाव “गॉन वुईथ द विंड” आणि त्यांचा मान अटलांटाच्या गर्व्हनर यानी राखला. मार्गारेट यांच्या मृत्यूप्रित्यर्थ सात दिवस शासकीय इमारतीवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविले गेले होते.

मार्गारेट मिचेल संदर्भात आज त्यांच्या स्मृतिदिन निमित्ताने थोडीशी माहिती देत आहे.

 

नोव्हेम्बर १९०० मध्ये अटलांटा प्रांतात जन्म घेतलेल्या मार्गारेटचे वडील वकिल होते. त्यांच्या देखरेखीखाली तिचे अटलांटा पब्लिक स्कूल आणि वॉशिंग्टन सेमिनरी इथे शालेय शिक्षण झाले. पदवीसाठी मॅसेच्युट्स प्रांतातील स्मिथ कॉलेजमध्ये प्रवेश केला....पण एक वर्षातच आईच्या मृत्युमुळे तिला कॉलेज सोडून घरची देखभाल करण्यासाठी अटलांटा इथे परतावे लागले. लिखाणाची आवड असल्यामुळे स्थानिक रविवारच्या पुरवणी अंकातून साप्ताहिक पद्धतीचे लेखन चालू ठेवले ते १९२६ पर्यंत चालू होते. त्यापूर्वी तिचा जॉन मार्श यांच्याशी विवाह झाला होता. पूर्ण वेळ ती लिखाणाला देत असली तरी आपण लेखन करतोय एका कादंबरीचे हे कुणालाच सांगितले नव्हते. हस्ताक्षरात लेखन असल्याने तिला शारीरिक त्रास सहन होत नाही असे दिसल्यामुळे तिच्या नवर्‍याने तिला एक सुबक असा टाईपरायटर घेऊन दिला. ती टायपिंग शिकली आणि त्यानंतर वेगाने (वेळ मिळेल तसा) ती कादंबरी लेखन करू लागली.

“गॉन वुईथ द विंड” चे कच्चे कथानक तिच्या मनी अगोदरपासून होतेच. तिच्या वडिलांनी सांगितलेल्या अमेरिकन यादवी युद्धाच्या कथा, नातेवाईकांकडून आणि मित्रांकडून निग्रो सेवकांकडून त्यांनी जे ऐकले होते ते निश्चित्तपणे तिच्या मनातल्या कादंबरीत प्रवेश करू लागले होते. तिच्या विवाहामुळे तिला एक निवांत अशी जीवनशैली लाभली होती आणि तिने लिहिण्यास सुरुवात केली. कादंबरीचे “गॉन वुईथ द विंड” हेच इतके आकर्षक झाले होते की वाचकांचे त्यामुळेच की काय तिकडे लक्ष वेधले गेले. पुढे अनेक मुलाखतीमधून हेच नाव कादंबरीला कसे सुचले ? या प्रश्नाला उत्तर देताना मार्गारेट मिचेल यानी सांगून टाकले की “मला लेखनापूर्वी अगदी वयाच्या दहाव्या वर्षापासून वाचनाची खूप, त्यातही कविता, आवड होती...”. आवडते कवी म्हणून तिने “अर्नेस्ट डॉसन” या इंग्लिश कवीचे नाव घेतले होते आणि त्यांच्या १८९४ मध्ये छापल्या गेलेल्या एका प्रसिद्ध कवितेतील चार ओळी तिला खूप आवडत असेल....त्या अशा :

"I have forgot much, Cynara ! Gone with the wind,
Flung roses, roses riotously with the throng,
Dancing, to put thy pale, lost lilies out of mind;
But I was desolate and sick of an old passion..."

विशेष म्हणजे त्यापूर्वी केवळ स्फ़ुटलेखन इतकेच माहीत असल्याने कादंबरी कशी लिहायची असते हे देखील तिला माहीत नसल्याने त्याबाबत काही कुणाचे मार्गदर्शन घेणेही तिच्या मुळातील लाजर्‍या स्वभावामुळे जमले नाही ....बरे ती लिहून झाल्यावर प्रसिद्धीसाठी, पुस्तकरुपात यावी असा कोणताही हेतू तिच्या मनात नव्हता. बस्स आहे मनी एक कथानक त्याला अटलांटा भोवतालचा परिसरातील मनातील पात्रांच्या जीवनातील घडामोडी आणि ते अमेरिकेतील प्रसिद्ध असे यादवी युद्ध जुळवून एक कादंबरी लिहायची आणि जणू स्वत:लाच ती नायिका रुपड्यात पाहात असावी....त्यामुळे कादंबरीचा सारा डोलारा “स्कार्लेट ओ’हारा” या तरुणीवरच केन्द्रीत करून तिने लिखाण सुरू केले होते. प्रारंभिक परिच्छेद कसे खुलवायचे याचे जणू द्न्यान नसल्याने तिने एक युक्ती केली ती अशी की कादंबरीचा शेवट काय आहे तो भाग विस्ताराने तिने लिहून काढला...शेवट तिच्या मनी अगोदर तयारच होता. अखेरचे अध्याय आधी आणि त्यानंतर त्यावर बेतलेले सुरुवातीची प्रकरणे असा हा आगळावेगळा प्रकार मार्गारेटने केला आणि नेमका हाच मार्ग तिच्या कादंबरीत सर्वच घटकांचे आणि घटनांचे जे विस्तृत वर्णन आले आहे ते तिची लेखनशैली म्हणावे लागेल. तब्बल १०३७ पानांची ही कादंबरी ती तब्बल नऊ वर्षे लिहित होती...टाईप करत होती...कच्चे लेखन कसल्याही पानांवर...अगदी दिसेल त्या कागदावर उतरविणे हेच तिला कळत होते.

कागदांचा तो ढिगारा पतीदेव जॉन मार्श यानी जपून ठेवले म्हणून निदान प्रकाशकांना काहीतरी देता तरी आले. प्रकाशक मॅकमिलन कंपनीचे संबंधित व्यवस्थापक मंडळी मार्गारेट मिचेलला तिच्या रविवारच्या पुरवण्यातील लेखनामुळे जरी ओळखत असले तरी ही गेली दहाएक वर्षे काहीतरी लिहित आहे इतकेच त्याना माहीत होते. शेवटी १९३५ मध्ये वाचनासाठी जॉन मार्श यानी एका सूटकेसमध्ये टायपिंग केलेली ती पाने, अन्य हस्ताक्षरातील एक मोठा साठा मॅकमिलन यांच्याकडे दिला. प्रकाशकांना यादवी युद्धाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली ही कादंबरी लागलीच पसंत पडली आणि त्यानी तातडीने ती छापण्यासाठी घेतली. मार्गारेट मिचेल याना वाटत होते की पाच हजार प्रती छापल्या तरी पुष्कळ झाले. पण त्याना ही कल्पना नव्हती की प्रकाशनाच्या पहिल्याच महिन्यात कादंबरीचा सर्वत्र इतका बोलबाला झाली की त्याच्या पुढच्याच महिन्यात चक्क पन्नास हजार प्रती छापाव्या लागल्या. १९३७ मध्ये या कादंबरीला मानाचे असे “पुलित्झर प्राईझ” मिळाल्यावर विक्रीने उच्चांक गाठले. १९४० च्या सुमारास (त्या अगोदर कादंबरीवर आधारीत “गॉन वुईथ द विंड” चित्रपटाने देखील उत्पन्न आणि लोकप्रियतेचे रेकॉर्ड करणे सुरू केले होतेच) १९४०-४१ मध्ये तर या कादंबरीच्या आठ लाखांपेक्षा जास्त प्रती जगातील चाळीस राष्ट्रांतील तीस भाषांतून अनुवादित झाल्या आणि गिनेसच्या रेकॉर्डप्रमाणे "गॉन वुईथ द विंड" च्या जगभर तीन कोटी प्रती खपल्या गेल्या आहेत. आजदेखील एकट्या अमेरिकेत मार्गारेट मिचेलच्या या कादंबरीच्या दरवर्षी पन्नास हजार प्रती विकल्या जात असून प्रकाशन व्यवसायातील हा एक लक्षणीय असा विक्रमच मानला जातो.

अविश्वसनीय अशी लोकप्रियता मिळविलेल्या मार्गारेट मिचेल यानी त्यानंतर नव्या कादंबरीचे एक पानही लिहिले नाही. त्यांच्या मृत्यूनंतर तिच्या चाहत्यांनी आणि प्रकाशकानी (तिला अपत्य नव्हते आणि पती जॉन मार्श देखील पत्नीच्या मृत्यूनंतर धक्क्याने आजारी पडले व १९५२ मध्ये मरण पावले) तिच्या घरातील विविध कपाटातून जे हस्तलिखित वा टंकन केलेले लिखाण मिळविले त्या आधारे “लॉस्ट लेसेन” नामक एक छोटी कादंबरीका १९९४ मध्ये प्रसिद्ध केली. मात्र तिच्या हयातीत तिच्या नावावर “गॉन वुईथ द विंड” ही एकमेव साहित्यकृती आहे.

आजच्या तिच्या स्मृतिदिनानिमित्ताने मार्गारेट मिचेल आणि त्यांच्या जगप्रसिद्ध अशा कादंबरीची ही आठवण.

-अशोक पाटील

About the Author

अशोक पाटील's picture
अशोक पाटील