
“अहो, मी खूप आरडाओरडा करून दमले आता. पण त्यालाच शिकायचं नाहीय, तर आता मी तरी काय करू?” माझ्या मित्राकडे घरकामाला येणाऱ्या बाई रडून सांगत होत्या. तीन-चार घरची धुणी-भांडी, केर-फरशी करून त्या त्यांचा संसार चालवतात. नवरा नाही. मुलगा नुकताच दहावी पास झाला. त्याला दहावीची वह्या-पुस्तकं, शाळेची फी आणि शिकवणीचा खर्चही माझ्या मित्रानंच केला. या मुलाला दहावीत ५०% गुण मिळाले.
दहावीचा निकाल लागल्यापासून त्या मुलानं कुठलीही माहिती मिळवलेली नाही, कोणताही फाॅर्म भरला नाही आणि पुढे काय शिकणार हेही ठरवलेलं नाही.
माझ्या मित्राची बायको सांगत होती की, “तो दिवसभर इकडे-तिकडे फिरत असतो. मित्रांबरोबर उनाडक्या करत असतो.”
आश्चर्याची किंवा धक्काच बसेल अशी गोष्ट म्हणजे, साधारण एक महिन्याभरापूर्वी त्या मुलाच्या खिशात त्याच्या आईला सहा हजार रूपये मिळाले. घरची एकूण परिस्थिती पाहता, ही रक्कम बरीच मोठी होती आणि एवढे पैसे आपल्या मुलाकडे कसे काय? या विचारानं त्या अस्वस्थ झाल्या होत्या.
मित्राच्या बायकोनं त्यांना सांगितलं की, ‘तुम्ही त्याला स्पष्ट विचारा आणि समोरासमोरच सोक्षमोक्ष लावून टाका.’ त्यांनी घरी जाऊन मुलाला विचारलं तर, तो मुलगा त्यांच्या अंगावरच धावून आला आणि त्यानं घरात खूप तमाशा केला, आदळआपट केली. याच्याशी कुठं वाद घालत बसायचं, म्हणून यांनी तो विषयच सोडून दिला.
काल अचानकच त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक, त्यांनी घरातलं कपाट उघडून पाहिलं तेव्हा लक्षात आलं की त्यांची सोन्याची अंगठी जागेवर नाहीय... सगळा प्रकार त्यांच्या लक्षात आला. पण करणार तरी काय? घडायचं ते घडून गेलं होतं. नशीबाला दोष देत बसण्याव्यतिरिक्त त्या काहीच करू शकत नव्हत्या.
स्वत:च्याच घरात, हाॅस्टेलमध्ये, नातेवाईकांकडे, मित्रांकडे चोऱ्या करण्याचं प्रमाण वाढतंय. आमच्या सोसायटीमधून काही महिन्यांपूर्वी सायकली चोरीला गेल्या, गाड्यांचे आरसे-बॅटऱ्या वगैरे गोष्टी चोरीला जात होत्या, मागच्या महिन्यात एक कुत्र्याचं पिल्लू चोरीला गेलं. (ते साधंसुधं नव्हतं हो, चांगलं पंधरा-वीस हजार रूपयांचं होतं.) सीसीटीव्ही बसवले आणि चोर सापडला. शेजारच्या सोसायटीमधलाच एक मुलगा आमच्या सोसायटीतल्या दोन-चार पोरांना हाताशी धरून हे उद्योग करतोय असं लक्षात आलं.
अशीच एक मुलगी घरातून पैसे चोरून तिच्या सो काॅल्ड प्रियकराला द्यायची. त्याच पैशांमधून त्यांचं हाॅटेलिंग, इकडं-तिकडं फिरणं, सिनेमाला जाणं वगैरे चालायचं. मुलगा उनाडच होता आणि केवळ मजा मारण्यासाठीच ही असली प्रेमाबिमाची नाटकं करत होता. दोन्ही उदाहरणांमधली मुलं चांगल्या घरची, सुशिक्षित कुटुंबांमधली आहेत. तसं पहायला गेलं तर, घरात कशालाच कमतरता नाहीय, सगळं भरभरून आहे. तरीसुद्धा ही चोरी करण्याची इच्छा का व्हावी?
दुसरा प्रश्न असाही पडतो की, एखाद्या बऱ्यापैकी सधन घरातल्या मुलीला नादी लावून तिच्याचकडच्या पैशांवर आपण चैन करायची, असं त्या मुलाला तरी का वाटलं असेल? स्वत:च्या हौसामौजा भागवण्याकरिता कष्टांपेक्षा हा मार्ग त्याला सोयीचा का वाटला असेल?
समाजातल्या वातावरणातली कुरूपता आणि असुरक्षितता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, याचीच ही पावती ! ही कुरूपता का वाढतेय? आपण नैतिकतेपेक्षा भौतिक श्रीमंतीलाच जास्त जास्त महत्व द्यायला लागलो आहोत. कारण, ‘मला श्रीमंत व्हायचंय’ हे ध्येय आता समाजमान्य झालंय..
आपली मुलं अशी का वागतात? त्यांना नेमकं काय हवं असतं? पैशाविषयी त्यांच्या मनात इतकं आकर्षण का असतं? आणि केवळ मौजमजेकरिता पैसे हवेत, म्हणून मुलं स्वत:च्या घरातच चोरी करण्यापर्यंतच्या पातळीपर्यंत का जातात? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याकरिता पालकांकडे वेळच नाही.
अनेक चांगल्या,सुशिक्षित कुटुंबांमधल्या मुला-मुलींनीही अशा प्रकारच्या लहानमोठ्या चोऱ्या केल्या आहेत, हे काही नवीन राहिलेलं नाही. आपल्याच घरातले दागिने-पैसे चोरणं, वस्तू चोरणं ही एक काॅमन गोष्ट होत चालली आहे. मित्रमैत्रिणींच्या गोष्टी चोरणं हेही अनेकदा दिसतं. हाॅस्टेल्समधून किंवा काॅट बेसिसवर राहणाऱ्यांच्या अनेक गोष्टी चोरीला जातात. अशा प्रकारच्या चोऱ्या करणारी मुलं-मुली पुष्कळदा चांगल्या घरातलीच असल्याचं दिसतं. प्रश्न आर्थिक परिस्थितीचा नाहीच, प्रश्न आहे तो वृत्तीचा...!
वयाच्या चौथ्या वर्षी शाळेत घातलं आणि ते मूल दहावीपर्यंत शिकलं तरी, शालेय शिक्षणाचा जवळपास बारा वर्षांचा कालावधी त्या मुलाला मिळालेला असतो. देशातला प्रत्येक मुलगा-मुलगी शिक्षणाकरिता तिच्या आयुष्यातली ही बारा वर्षं देणारच आहे, असं जरी ढोबळमानानं गृहित धरलं तरी, या बारा वर्षांत त्याच्यात किमान कोणता सकारात्मक बदल होणं अपेक्षित आहे, याची पुरेशी स्पष्टता आपल्याला आहे का? आपल्याकडे याची स्पष्टताच नाही, हे दुर्दैवी पण शंभर टक्के सत्य उत्तर आहे.
आयुष्यातली किमान बारा वर्षं केवळ ‘शिक्षण घेणं’ या एकाच हेतूनं शिक्षणव्यवस्थेच्या हातात असणाऱ्या मुलांकडून आपण ही मुलं वाहतुकीचे नियम शंभर टक्के पाळतील, एवढी साधी माफक अपेक्षा सुद्धा करू शकत नाही. पाणी, पेट्रोल आणि वीज अतिशय काटेकोरपणे जपून वापरतील, अशी अपेक्षा करू शकत नाही. सार्वजनिक मालमत्ता अत्यंत व्यवस्थित आणि काळजीपूर्वक वापरतील, अशी अपेक्षा करू शकत नाही. या बारा वर्षांच्या शैक्षणिक प्रवासानंतर देशातील प्रत्येक मुलगी सुरक्षित आणि निर्भय असेल, अशीही अपेक्षा करू शकत नाही. ही फार कडवट पण सत्य परिस्थिती आहे.
जी गोष्ट आपली नाही, आपल्या मालकीची नाही किंवा सार्वजनिक मालमत्ता आहे, तिला हात लावू नये, हा एक साधा व्यक्तिगत नियम मुलांच्या मनावर ठसवण्यातसुद्धा आपली शिक्षणव्यवस्था यशस्वी होऊ शकली नाही, ह्या परिस्थितीतलं गांभीर्य आपल्या लक्षातच येत नाही का?
शाळेतले विद्यार्थी आपल्याच वर्गमित्राचा डोक्यात दगड घालून खून करतात, पदवीपर्यंत शिकलेल्यांची टोळी वाहनांची चोरी करताना पकडली जाते, शिक्षण घेतलेल्या व्यक्ती गर्भलिंग निदानाच्या चाचण्या करताना पकडल्या जातात, शिकलेले विद्यार्थी काॅपी केसेसमध्ये रंगेहाथ पकडले जातात, सुशिक्षित माणसं डुप्लिकेट डिग्री सर्टीफिकेट्स च्या गैरव्यवहारात पुराव्यानिशी सापडतात, शिकलेल्या नागरिकांच्या लाखो खोट्या व अवैध कंपन्या सापडतात, मंदिरांच्या दानपेट्या सुद्धा फोडल्या जातात, या सगळ्या गोष्टींचं अपयश कुणाचं? याचं दायित्व कुणी ना कुणीतरी स्वीकारलंच पाहिजे.
दलाई लामांनी एके ठिकाणी स्पष्टच म्हटलेलं आहे की, “युवा पिढीला शिक्षित करत असतानाच, त्यांच्या मानसिकतेला वळण लावण्याच्या जबाबदारीचा आपल्याला विसर पडता कामा नये.”
या वाक्याला खूप मोठा अर्थ आहे. दलाई लामा ज्याअर्थी असं म्हणतात, त्याअर्थी या प्रश्नाची तीव्रता किती वाढलेली आहे, हे समजून घेण्यासारखं आहे. खोटारडेपणा, अप्पलपोटेपणा आणि झटपट श्रीमंतीचा हव्यास या गोष्टी वेगानं समाजमान्य होत चालल्या आहेत, हेही खरं आहे.
आपण आपल्या मुला-मुलींना अनेक अनावश्यक गोष्टी प्रचंड प्रमाणात विनाकारणच देत आहोत, असं निरीक्षण केल्यावर आपल्याच लक्षात येईल. कपड्यांनी कपाटं भरलेली असतात, चपला-बुटांनी शू रॅक्स भरलेले असतात, भरभक्कम पाॅकेटमनीने पाकीटं भरलेली असतात, खिशात स्मार्टफोन असतो आणि २४ तासांकरिता दीड-दोन जीबी इंटरनेट डेटा असतो. अगदी सहज म्हणून हजार-दोन हजार रूपये खर्च करण्यात त्यांना काहीच वाटत नाही. कित्येक मुलामुलींची फक्त सिगारेटची महिन्याची अंदाजपत्रकंच मुळात अडीच-तीन हजारांच्या घरात असतात. बाहेरचं खाल्ल्याशिवाय कित्येकांचा दिवस जात नाही.
माझ्या माहितीतली कितीतरी मुलंमुली आठवड्यातले तीन-चार दिवस तरी रात्रीच्या जेवणाला घरी नसतातच. आठवड्यातले तीन दिवस म्हणजे वर्षभरातले १५६ दिवस. आपल्या मुलाचे किंवा मुलीची वर्षभरातली १५६ रात्रीची जेवणं नक्की कोणाबरोबर होतात? याचा आईवडीलांना पत्ता तरी असतो का?
मला हाच प्रश्न पडतो की, इतके पैसे या मुलांकडे येतात तरी कुठून आणि जर पालकच पैसे देत असतील तर त्या पैशांचा हिशोब मागितला जातो का? मुलांकडून मिळालेला हिशोब पालकांद्वारे तपासून पाहिला जातो का? या प्रश्नांची समाधानकारक उत्तरंच मिळत नाहीत.
वयवर्षे १३ ते २० या वयोगटातली मुलं-मुली इंटरनेटचा वापर कोणकोणत्या गोष्टींकरिता करतात, यातलं तथ्य आपल्याला माहित नाही का? अगदी लहान-लहान शहरांमध्येदेखील तरूण-तरूणींसाठीचे विशेष पार्टी इव्हेंट्स आयोजित केले जातात, त्याचे परिणाम काय होतात, हे समजून घेण्याचीसुद्धा आपली बौद्धिक कुवत राहिलेली नाही का? की या गोष्टींकडे आपण जाणूनबुजून मुद्दामच दुर्लक्ष करत आहोत?
सोनसाखळी चोर, मोबाईल्स चोर, पाकीटमार, दुचाकी चोर, घरफोड्या करणारे, दुचाकी-चारचाकीच्या डिकी फोडणारे, दुकानांची शटर्स उचकटणारे यांच्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांनी गुन्हेगाराचं केवळ नाव आणि वय न देता, त्याचं शिक्षणही जाहीर करावं. त्याच्या कुटुंबियांचं किंवा पालकांचं शिक्षणही जाहीर करावं. समाजाला या गोष्टी समजणं आवश्यक आहे.
शिक्षणव्यवस्था मुला-मुलींना असले उद्योग करायला शिकवत नाही, हे १००% मान्य. पण, आमच्या शिक्षणसंस्थेतला एकही मुलगा किंवा मुलगी तिच्या आयुष्यात एकही चुकीचं काम करणार नाही, याची खात्री कुणी देऊ शकेल का? आमच्या एकाही विद्यार्थ्याची पेन्सिलसुद्धा चोरीला जात नाही, असं एखादी शाळा किंवा काॅलेज ठामपणे म्हणू शकतं का? अनेक शाळा-काॅलेजेस मधून सर्रास चोऱ्या-माऱ्यांचे प्रकार चालतात. शिक्षकांचे पैसे, मोबाईल्स सुद्धा चोरीला जातात. मग आता नग्नसत्याची जबाबदारी नेमकी कुणाची?
शिक्षणव्यवस्थेकडून किंवा कुटुंबव्यवस्थेकडून समाजानं काहीच अपेक्षा करायची नाही का? संपूर्ण समाजाचं स्वास्थ्य याच दोन्ही व्यवस्थांवर अवलंबून आहे. आम्ही शिक्षणातून काय साध्य करू पाहतो आहोत, याविषयीची निश्चित ठाम भूमिका समाजासमोर कुणी मांडणार आहे का? आम्हाला साक्षर नागरिक हवा आहे की सुसंस्कृत व सभ्य नागरिक हवा आहे, या विषयी समाजाचं मत काय आहे? ते मत जाणून घेण्याचा किंवा त्यावर रिपोर्ट तयार करण्याचा प्रयत्न कधी कुण्या वृत्तवाहिनीने केला आहे का?
माझ्याकडे एखादी गोष्ट नसली तरी चालेल पण मी ती गोष्ट अवैध मार्गानं मिळवणार नाही, असा विचार करणं हे बिनडोकपणाचं लक्षण आहे, असं मानणारा तरूण-तरूणींचा वर्ग वेगानं वाढत चालला आहे. याउलट, “वाटेल त्या मार्गानं, काहीही करून मी अमुक अमुक गोष्ट मिळवेनच” अशीच वृत्ती घराघरातून वाढीस लागल्याचं दिसतं. एखाद्याला आई-वडीलांच्या नावानं जाहीरपणे शिव्या देणं आता गैर मानलं जात नाही. आई, वडील आणि मुलं एकाच टेबलाभोवती एकत्र बसून दारू पितात, हे चित्र आपल्यापैकी अनेकांनी पाहिलंही असेल. कोणत्याही सबळ कारणाशिवाय घरातली मुलगी मध्यरात्रीपर्यंत घराबाहेर राहते, हे पालकांनीच स्वीकारलेलं आहे. यालाच आधुनिकता किंवा प्रगती असं म्हणायचं का? यात समाजाला काहीच धोकादायक वाटत नाही का?
शिक्षणव्यवस्थेत नक्की काय चालतं, किंवा कुटुंबात नक्की काय चालतं? याकडं कुणाचं लक्ष आहे का? दोन्ही व्यवस्थांची चौकट पूर्वी फार भक्कम होती, आज तिची अवस्था काय आहे? हे जाणीवपूर्वक उघड्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे. या दोन्ही व्यवस्थांमधले कच्चे दुवे शोधून काढले पाहिजेत आणि ते तातडीनं दुरूस्तही केले पाहिजेत. मला वेळच नाही, हे काय माझं काम आहे का, मी एकट्यानं करून काय फरक पडणार आहे, जाऊ दे तिकडं-मला या सगळ्याशी काय देणंघेणं आहे, ही भूमिका आतातरी सोडून दिली पाहिजे आणि ‘समाजातला नागरिक’ म्हणून जबाबदारी घेतली पाहिजे.
राज्याच्या किंवा देशाच्या प्रगतीचा आलेख उंचावला, किती जणांना रोजगार मिळाला, किती लाख कोटींची गुंतवणूक झाली, किती उद्योगधंदे आणि कंपन्या आल्या याचीच चर्चा वारंवार होते. पण, माणसातल्या चारित्र्याचं काय करायचं? प्रामाणिकपणाचाच दुष्काळ पडलाय, त्याचं काय करायचं? तरूण पिढीच्या अवास्तव अपेक्षा वाढतायत आणि त्यापोटी ही मुलं वाटेल त्या थराला जायला तयार होतायत, त्याचं काय करायचं?
हे सगळं सुखसुविधांचं वातावरण उपभोगण्यासाठीची पात्रता आपल्या समाजात आहे का? ही पात्रता यावी यासाठीची योजना कोणत्या सरकारकडे आहे? ही सभ्यता सामान्य नागरिकांतच नसेल तर या भौतिक प्रगतीची किंमत काय?
आपल्या समाजाला त्यांच्या अधिकारांची आणि हक्कांची जाणीव करून देण्यात सगळे पटाईत आहेत. पण यांच्यापैकी कर्तव्यांची जाणीव तितक्याच तीव्रतेनं आणि पोटतिडकीनं करून देणारे कुणी आहेत का?
‘आमच्या राज्यात एकही जण रस्त्यावर थुंकणार नाही, याची जबाबदारी आमची’ असं कुणी म्हणतो का? पण, ‘अमुक गोष्ट झाली नाही तर पूर्ण राज्यभर धुमाकूळ घालू’ असं जाहीरपणे म्हणणाऱ्यांची मात्र संख्या किती आहे? या प्रश्नाचं खरं आणि स्पष्ट उत्तर समाजासमोर मांडण्याची आणि त्यावर चर्चा करण्याची मीडीयाची तयारी आहे का?
संपूर्ण जगभरात सामाजिक सभ्यता आणि शिष्टाचाराच्या बाबतीत भारतीय समाजाचा नंबर कितवा असेल? याचा पब्लिक पोल मीडीयाकडे आहे का? फार लांब कशाला जायचं, संपूर्ण राज्यातली प्रत्येक एसटी बस बघा, त्यातल्या प्रत्येक सीटचा कोपरा बघा आणि मग आपल्या राज्यातल्या नागरिकांच्या सामाजिक जाणीवेची पातळी बघा. सभ्यतेचा दुष्काळ पावलोपावली, प्रत्येक क्षेत्रात दिसेल.
“सभ्यतेशिवाय प्रगतीची किंमत शून्यच असते” हे आपल्या समाजाच्या मानसिकतेत रूजत नाही, भिनत नाही, तोवर देशाच्या प्रगतीविषयीचं भाष्य करणंच अशक्य आहे. आता यक्षप्रश्न हाच आहे की, हे ‘सभ्यतेचं दुर्भिक्ष्य’ संपवायचं कसं? ते संपवणार कसं? ते संपवायचं कुणी? ते संपवण्याची नेमकी निश्चित योजना कोण करणार? आणि अशी योजना कुणी केलीच तर त्याची १००% अंमलबजावणीची जबाबदारी समाज स्वीकारणार का?
®️मयुरेश डंके
मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख
आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.