नवरोज च्या निमित्ताने पारशी समाजाची ओळख

 नवरोज च्या निमित्ताने पारशी समाजाची ओळख:  

पु.लं च्या पुस्तकात भेटलेले पेस्तनकाका, मुन्नाभाई एम बी बी एस मधले कॅरम खेळणारे बावाजी, किंवा खट्टा-मिठा मधला गोड बाप होमी मिस्त्री आणि त्याची छोटीशी गोड बायको नर्गिस इतकीच पारशी समाजाची आणि आपल्यासारख्या अनेक लोकांची तुटपुंजी ओळख! पण त्यांच्या खाण्यापिण्याविषयी, संस्कृतीविषयी कुतूहल पण तितकेच! कुठून आले असतील हे लोक आपल्या देशात?

पारशी शब्दाची ची व्युत्पत्ती "पर्शियन" पासून झाली असणार. हजारो वर्षांपूर्वी अरब मुस्लिमांचा धार्मिक छळ टाळण्यासाठी इराण सोडलेल्या आणि नंतर भारतात स्थलांतरित झालेल्या पारसी लोकांना मराठीमध्ये आपण पारशी म्हणतो. हे लोक झोरोआस्ट्रियानिझम धर्माचा मूळ संस्थापक झोरोआस्टर (झरतुष्ट्र) यास मानतात. आचारविचारांच्या बाबतीत पारशी धर्मात ऋजुता, प्रामाणिकपणा, सत्यनिष्ठा ह्या गुणांना अतिशय महत्त्व आहे. अग्निदेवाचे भक्त असलेले पारशी लोक अग्यारीमध्ये अखंड अग्नी तेवत ठेवतात. प्राचीन काळी पर्शियातून आणलेला अग्नी गुजरात राज्यातील ‘उदवाडा’ या येथे अद्यापही अखंडपणे तेवत आहे. अवेस्ता’ हा त्यांचा धर्मग्रंथ! त्यांचा असा विश्वास आहे की चांगली ताकद (प्रकाशाची ताकद) आणि दुष्ट शक्ती (अंधारातील शक्ती) यांच्यामध्ये सतत युद्ध चालू आहे. त्यांच्यामध्ये पंचमहाभूतांची देखील पूजा केली जाते.

जगभरातील पारशी धर्मीयांची सर्वाधिक लोकसंख्या ही भारतात आहे. मुंबई आणि मुख्यतः मुंबईच्या दक्षिणेस असलेल्या काही शहरे आणि गावांमध्ये त्यांची लोकसंख्या जास्त आहे, तसेच भारतातील इतर काही शहरे, अमेरिका, कॅनडा, पाकिस्तान अश्या ठिकाणी सुद्धा काही मोजके लोक स्थिरावले आहेत. मुंबई आणि आसपासच्या उपनगरात 50च्या जवळपास अग्यारी आहेत.

भारतात ते सर्वात आधी संजन ह्या गुजरातमधील गावात उतरले अशी माहिती उपलब्ध आहे. तेथे त्यांनी जाधव राणा स्थानिक शासक स्थायिक होण्याची परवानगी मागितली. असे म्हणतात की पारशी शिष्टमंडळ राजाला भेटायला गेले. आपल्या राज्यात नवीन समुदायाला सामावून घ्यायला जागा नाही हे सांगण्यासाठी एक प्रतिकात्मक भेट म्हणून राजा दुधाने काठोकाठ भरलेला जग त्यांच्यासमोर ठेवतो. हुशार पारशी पुरोहित त्यामध्ये थोडी साखर मिसळून हे दाखवून देतो की आम्ही असेच तुमच्या लोकांमध्ये मिसळून जाऊ. असेही सांगतात की अभय देण्याआधी अटी लागू केल्या होत्या: ह्या लोकांनी फक्त स्थानिक भाषेचा उपयोग करावा, स्त्रियांनी स्थानिक पोशाख स्वीकारावा, त्यांनी शस्त्रत्याग करावा. शांतता आणि समरसता अनुसरून ते तिथल्या लोकांमध्ये मिसळून गेले.

हा समाज राजकारणात, क्रिकेटच्या मैदानावर, संशोधनात ,समाजकारणात भाग घेणारा आहे, कलाक्षेत्रात आणि उद्योगधंद्यात पण कार्यरत आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये या समाजाचा सक्रिय सहभाग होता. दादाभाई नवरोजी आणि बिकाजी कामा ह्यांचे योगदान खूप मोठे आहे. अणुऊर्जा विकास कार्यक्रमाचा पाया रचणारे अणुभौतिकशास्त्रज्ञ होमी भाभा हे भारतीय संशोधन क्षेत्रातील एक महत्वाचे नाव आहे. असेच अजून एक नाव म्हणजे टाटा उद्योगसमूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा! ज्यांना आपण “भारतीय उद्योगाचे जनक” म्हणून ओळखतो! जमशेदपूर येथील पोलाद कारखाना, मुंबईचे ताजमहाल हॉटेल, बंगळुरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची स्थापना त्यांच्या उद्योगसमूहाने केली. गोदरेज उद्योगसमुहाचे स्थापना करणारे अर्देशीर आणि पिरोजशा गोदरेज बंधू ह्यांचे आणि इतर अनेक पारशी उद्योजकांचे भारतीय व्यापारउद्योग क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. पॉली उम्रीगर, नरी काँट्रॅक्टर, रुसी सुरती, फारुख एंजिनीअर अशी क्रिकेटचे मैदान गाजवलेली मंडळी आजही लोक विसरलेले नाहीत. फिल्ड मार्शल सॅम माणेकशा ह्यांचे नाव कोण विसरेल? फील्ड मार्शलच्या पदावर बढती देणारे पहिले भारतीय लष्कर अधिकारी! आपल्या कारकिर्दीत त्यांनी चार दशके आणि पाच युद्धे पाहिली. अजून एक मोठे नाव म्हणजे शौर्यचक्र विजेते एअर चीफ मार्शल फली होमी मेजर! सरश होमी कपाडिया यांनी भारताचे पंधरावे सरन्यायाधीश म्हणून काम केले. भारताचे माजी अॅटर्नी जनरल आणि एक प्रख्यात विधिशास्त्रज्ञ, सोली सोराबजी ह्यांनी मानवी हक्कांच्या संरक्षणासाठीसुद्धा काम केले आहे.

चित्रपट क्षेत्रातसुद्धा अनेक उल्लेखनीय नावे आहेत. सोहराब मोदी यांच्यापासून ते अलीकडच्या अगदी बोमन इराणी आणि जॉन अब्राहम पर्यंत. बालकलाकार म्हणून नावाजलेल्या डेझी इराणी, तसेच नृत्य दिग्दर्शक शामक दावर ही नावे लगेच डोळ्यासमोर येतात. पाश्चिमात्य शास्त्रीय संगीतकार झुबेन मेहता ह्यांचे देखील खूप नाव आहे. फली एस नरीमन, जेआरडी टाटा, रतन टाटा, नानाभोय ‘नानी’ पालखीवाला, बेजान दारुवाला अशी आणि इतर अनेक नावे त्यांच्या कार्यक्षेत्रातील योगदानामुळे डोळ्यासमोर येतात.

चित्रपट क्षेत्राला सुद्धा ह्या समाजाच्या स्वभाव विशेषांची भुरळ न पडली तरच नवल! पेस्तनजी, खट्टामिठा ,बातो बातोंमे, फेरारी की सवारी, शिरीन फरहाद की तो निकल पडी अश्या अनेक चित्रपटात पारशी जीवनाचे चित्रण दाखवले आहे. इतरही अनेक चित्रपटांमध्ये दुय्यम असलेले पारशी व्यक्तिचित्र भाव खाऊन जातेच!

पारशी खाद्यसंस्कृती तर अनेक शतके लोकांच्या जिभेवर राज्य करते आहे. अनेक पारशी कॅफे, हॉटेल्स त्यांच्या अनेकविध डिशेससाठी प्रसिद्ध आहेत. धानसाक, अकुरी, पात्रादी मच्छी, सल्ली बोटी, रावो असे अनेक प्रकार आहेत. इराणी कॅफे मध्ये मिळणारे बन मस्का, खिमा सामोसे, केक्स, बिस्किट्स ह्या लोकप्रिय पदार्थांच्या रेलचेलीमुळे तिथे लोक भेटीचे अड्डे ठरवून चहाची वेळ सार्थकी लावतात.

पारशी लोकांच्या सणांची संख्या मर्यादित आहे. पारशी नूतन वर्षाचा प्रारंभ ‘फरवर्दीन’ मासाने होतो. भारत आणि पाकिस्तानमधील लोक शाहनशाही दिनदर्शिके प्रमाणे ऑगस्ट मध्ये नवीन वर्ष ‘नवरोज’ सुरु करतात. इतर काही भागात हा दिवस मार्च मध्ये साजरा केला जातो. खोर्दाद साल हा प्रेषित झरतुष्ट्र ह्याचा जन्मदिवस ते प्रार्थना करून साजरा करतात. इतरही छोटे मोठे सण आहेत.

हा छोटासा समाज आपल्या वैयक्तिक आचारविचारांची मुळे घट्ट धरून सुद्धा दुधातल्या साखरेप्रमाणे भारतीय समाजात विरघळून गेलाय. सध्या वृद्धांची जास्त संख्या,

उशिरा होणारी लग्न,

घटता प्रजननदर

अविवाहितांची वाढणारी संख्या

ह्या त्यांच्या समाजाच्या प्रमुख समस्या आहेत.

त्यांची लोकसंख्या झपाट्याने कमी होत आहे. अमेरिका कॅनडा सारख्या देशांमध्ये होणारे स्थलांतर सुद्धा ह्यासाठी कारणीभूत आहे. अल्पसंख्य असूनही उगीच धार्मिक किंवा इतर वाद विवाद करून आपल्या समाजाकडे लक्ष वेधून घेण्याकडे सहसा त्यांचा कल नसतो. भारताच्या उभारणीत आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणाच्या मानाने खूप जास्त योगदान देणाऱ्या ह्या समाजाचे खरेच फार महत्वाचे स्थान आहे. खरेच दुधात साखरेसारखे मिसळून त्यांनी आपले गोड अस्तित्व टिकवून ठेवले आहे.

(माहिती आंतरजालावरील विविध संकेतस्थळांच्या सौजन्यानं.

 
Tags: 

About the Author

Nirmiti Kolte's picture
Nirmiti Kolte

 

सांगली 

M.com
E tutor म्हणून कार्यरत 
गझल लेखन, मासिकात लेख, कविता, भाषांतर प्रकाशित.