स्पर्श

स्पर्श

आपल्याकडे अगदी चाकोरीबद्ध define केलेला element . लहानपणी सहजपणे होणारे स्पर्श. जसे जसे मोठे होत जातो तसे कमी कमी होत जातात. त्यातल्या त्यात मित्र (आजकाल मैत्रिणींमध्ये पण)  physical दंगामस्ती होते. पण आईला, बहिणीला, भावाला, आणि specially वडिलांना आपण जवळजवळ स्पर्श करतच नाही. कधी हात हातात घेतल्या जात नाही.मिठी मारली जात नाही.प्रेम दाखवायची काय गरज ? हा आपल्या कडचा तकिया कलाम आहे..

उलट मुलांना healthy स्पर्श कळावेत म्हणून असे स्पर्श वारंवार व्हायला हवेत. उमलत्या वयात मुलामुलींना स्पर्शाचे आकर्षण वाटायला लागते. आपल्याकडे मुले ५-६ वर्षांची झाली की लहानपणी सहज होणारे स्पर्श बंद होऊन जातात. कौतुक म्हणून जवळ घेणे, त्यांना भीती वाटली तर हात धरणे हे हळूहळू कमी होत जाते. जसेजसे ते मोठे होतात ते स्पर्शांचे आपले अर्थ लावत जातात. मित्र मैत्रिणींमध्ये टाळ्या देणे, shake hand करणे, ह्या गोष्टी सहज म्हणून झाल्या तर त्याचे अप्रूप राहणार नाही आणि पुढे वेगवेगळ्या नात्यांमध्ये हे स्पर्श विपर्यास करणार नाहीत. हे त्यांना सहज वाटण्यासाठी आधी पालकांनी सहज स्वीकारले पाहिजे. एखाद्या गोष्टीचा आनंद share करण्यासाठी मारलेली मिठी आणि प्रेम व्यक्त करताना मारलेली मिठी ह्यातला फरक मोठ्यांनीही समजून घेतला पाहिजे.मुलामुलींच्या सहज स्पर्शांचे अर्थ लावून त्यांना conscious करू नये. लक्ष ठेवावे आणि काही वेगळेपण जाणवलंच तर समजावून सांगावे. अश्या मोकळ्या वातावरणामुळे कदाचित जाणत्या वयात स्पर्शाची ओढ कमी होऊन विनयभंगासारख्या घटना कमी व्हायला मदत होईल.

एखादं जवळचं माणूस जेव्हा मोठ्या आजारामुळे समोर निपचित झोपून असतं तेव्हा ह्या न केलेल्या स्पर्शांची सल टोचायला लागते. स्पर्शांचे अर्थ आपण लावू नयेत. त्यांचे त्यांना शोधू द्यावेत नात्यांचे अर्थ छोट्या  छोट्या आनंदाला celebrate करायला आणि मोठ्या मोठ्या दु:खाना  आधार द्यायला मिठी हवीच. दु:खाच्या क्षणी समजुतीचे शंभर शब्द करणार नाहीत ते काम एखादी मिठी, एखादा हातात धरलेला हात सहज करून जातो. आधार देऊन जातो. खूप वर्षांनी खूप जवळच्या एखादा व्यक्तीला भेटल्यावर झालेला आनंद हा स्पर्शातूनच जास्त जाणवतो.

लग्न झाल्यावर किंवा प्रेमात पडल्यावर ह्या स्पर्शांचे संदर्भ बदलतात. पण काही जोडपी फक्त शय्यासोबत करताना किंवा एकांतातच एकमेकांजवळ येतात. इतर वेळी अगदी शेजारी बसत सुद्धा नाहीत. खरं म्हणजे येत जाता केलेले सहज स्पर्श नातं फुलवायला मदत करतात. हातात हात घेणे, केसातून हात फिरवणे ह्या छोट्या छोट्या कृतीतून एकमेकांबद्दल जिव्हाळा वाढतो आणि टिकतो सुद्धा!

 

माझ्या दोन्ही आजोबांना मिठी मारायची राहिली माझी. दोघांचीही मी खूप लाडकी होते. खरंच आठवण आभास देते फक्त. आता आहेत त्या आठवणी, त्यांच्या कडेवर बसण्याच्या, कुशीत झोपण्याच्या!

माझ्या बाबांकडे आजोबांची एक खुर्ची आहे अगदी जीर्ण शीर्ण झाली आहे. विका विका म्हणून मागे लागायचो आम्ही आधी. पण काहीतरी कारण काढून बाबा काही विकू देत नाहीत. वर्षानुवर्षे ती आहे  आमच्याकडे. आभास देत असेल बहुतेक ती स्पर्शाचा, त्यांच्या वडिलांच्या स्पर्शाचा ! असे अनेक जणांचे जीव अनेक गोष्टींमध्ये अडकलेले असतात त्याचे कारण हा स्पर्शाचा संवाद ! काही लोक आईच्या जुन्या साडीत तो स्पर्श शोधतात, जुन्या पुस्तकांमध्ये मित्रमैत्रिणींचे स्पर्श शोधतात.

ज्या व्यक्तींना दिसत नाही त्यांचे आयुष्य स्पर्शावर बरेच अवलंबून असते. वस्तूंचे, माणसांचे निकष ते स्पर्शावरूनच लावतात. नसिरुद्धीन शाह यांचा स्पर्श चित्रपट पाहताना ह्या गोष्टीची पदोपदी जाणीव होत जाते.

स्टीफन गास्कीन म्हणतो, “Touch is the first language we speak”. किती खरं आहे !

 

लहान बाळांसाठी आईचा स्पर्श म्हणजे आनंदाचा ठेवा. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला आई छातीशी कवटाळते तो तिच्यासाठी आनंदाचा परमोच्च क्षण! लहानपणी तर आपण फक्त स्पर्शाचीच भाषा बोलतो. नवीन माणसाला स्पर्शानेच ओळखतो. पक्षी आणि प्राणी सुद्धा त्यांचे प्रेम स्पर्शातूनच जाणवून देतात.  

एका मैत्रिणीच्या आईला सिरिअस आजारपण आलं. मोठं operation होतं. काकूला ऑपरेशनसाठी जेव्हा आत नेत होते , ती बेशुद्ध होती. तेव्हा तिला पाहताना माझ्या मैत्रिणीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. आजवरचे वाद विवाद, आनंदाचे क्षण, आजारपणात घेतलेली काळजी ह्या सगळ्या आठवणींना तिने स्पर्शातून आईपर्यंत पोहोचवलं. स्पर्शातून माया करता येते. आई पुन्हा भेटेल की नाही ही भीती पण असेल तिच्या मनात. काकू बरी झाली हळूहळू आणि हे स्पर्शाचं नातं फुलत गेलं. आता त्या दोघी अधूनमधून मिठी मारतात, टाळ्या देतात. शब्दांशिवाय माया करतात.

 

माणूस समोर आहे तोवर जे जे करायचं आहे ते करून घ्यावं..नोकरी सांभाळून, कामं सांभाळून आपले मूड सांभाळून त्यांना वेळ द्यावा त्यांना अजून काही नको असतं.

सदानंद बेंद्रे यांचा एक शेर आहे:

बाप असताना मिठी मारून घ्या रे 
आठवण आभास देते स्पर्श नाही 

 

About the Author

Nirmiti Kolte's picture
Nirmiti Kolte

 

सांगली 

M.com
E tutor म्हणून कार्यरत 
गझल लेखन, मासिकात लेख, कविता, भाषांतर प्रकाशित.