नेटके लिखाण

Good writing is clear thinking made visible”: Bill Wheeler.

किती खरे आहे! आपल्या मनातले विचार योग्यप्रकारे मांडता आले तर लिहिण्याचे समाधान तर मिळतेच पण वाचणाऱ्यापर्यंत सुद्धा ते विचार सहज पोहोचवता येतात. शालेय आणि महाविद्यालीयीन जीवनात आपल्याला अनेकदा निबंध, पत्रे लिहावी लागतात. शिक्षण संपल्यानंतर सुद्धा काही न काही निमित्ताने अनेक जणांना लेख, माहितीपर टिप्पणे लिहावी लागतात. बऱ्याचवेळा चांगले मुद्दे असूनही विस्कळीत लिखाणामुळे आपल्याला हवे ते हवे तसे वाचकापर्यंत पोहोचत नाही. लेखनाचे अनेक प्रकार आहेत. अनुभवांवर आधारलेले(Narrative), शोध निबंध(Research), विवरणात्मक(Expository / Explainotary Essay),  माहितीपर(Informative), वर्णनात्मक(Descriptive), समीक्षात्मक(Analytical).   ह्यातील प्रत्येक प्रकार  हाताळताना मांडणीची थोडी काळजी घेतली तर आपल्याला काय म्हणायचंय हे वाचणाऱ्याच्या सहज आणि व्यवस्थित लक्षात येते आणि विचार करण्यास भाग पाडते. वरीलपैकी कोणताही लेखनप्रकार हाताळताना खालील टप्पे विचारात घेतले तर दर्जेदार लिखाणाला चांगल्या मांडणीची जोड मिळून तयार झालेला एक नेटका लेख वाचकांच्या दीर्घकाळ स्मरणात नक्कीच राहील.

विचारमंथन : (Brain Storming)

विषय ठरल्यानंतर तो जर माहितीचा नसेल तर त्यासंबंधी थोडे वाचन, त्या विषयातील ज्यांना माहिती आहे अश्यांबरोबर बोलून माहिती गोळा करणे आवश्यक असते. त्यावर विचार करून त्यावरची आपले मते स्पष्ट करणे हे सुद्धा गरजेचे असते. अगोदरच माहिती असलेल्या विषयावर लिहायचे म्हटले तर डोक्यामध्ये विचारांचा गोंधळ उडतो. काय लिहावे, कसे लिहावे, किती लिहावे हे समजेनासे होते. आधी त्या विचारप्रक्रियेत सुसूत्रता आणणे गरजेचे असते. विषयाच्या अनुषंगाने हजारो विचार मुद्दे डोक्यात रुंजी घालायला लागतात. त्यांना एक दिशा देऊन आपल्या डोक्यात आपला एक विचार पक्का केला तर पुढची प्रक्रिया सोपी होते.

 

कच्चा आराखडा : (Rough plan)

आपल्या डोक्यात येणाऱ्या कल्पनांचा आराखडा मांडावा. मांडलेल्या मुद्द्यांपैकी जास्त महत्त्वाचे आणि कमी महत्त्वाचे मुद्दे ठरवले म्हणजे कशाला प्राधान्य द्यायचे हे ठरवता येते. मुद्द्यांचे एकमेकांशी असलेले कनेक्शन अधिक स्पष्टपणे कसे मांडता येईल याचा विचार देखील महत्त्वाचा असतो. त्या विषयाशी निगडीत  उदाहरणांची ढोबळ यादी तयार असावी. ह्या सगळ्याचा एक कच्चा मसुदा तयार केल्यावर प्रत्यक्ष लेख लिहिलायला घेतल्यास वेळ तर वाचतोच पण एक स्पष्ट रचना डोळ्यासमोर तयार राहते.

एका चांगल्या, मुद्देसूद, सुबक लेखासाठी खालील गोष्टी फार महत्वाच्या आहेत.

प्रस्तावना: (Introduction)

पहिला परिच्छेद हा नेहमी आपल्या विषयाची ओळख करून देणारा असावा. इंटरेस्टिंग   आणि   नेटकी

सुरुवात अतिशय महत्त्वाची असते.  अर्धी लढाई आपण इथेच जिंकतो. आपला लेख ज्या विषयावर आहे त्या विषयाची थोडक्यात ओळख म्हणजे झलक पहिल्या परिच्छेदात असावी.

एक सामान्य पद्धत म्हणजे त्या विषयाशी संबंधित आकडेवारीने सुरुवात करणे. हा दृष्टिकोन वर्तमान विषयांशी निगडीत असलेल्या निबंधांसाठी किंवा लेखांसाठी सर्वात उपयुक्त आहे. उदाहरणार्थ, “ केंद्रीय मंत्रिमंडळात स्त्रियांचे स्थान” हा विषय असेल तर सुरुवातीला स्त्रियांची आत्ताची राजकारणातील सहभागाची किंवा महत्त्वाची पदे हाताळण्याची टक्केवारी दिल्यास विषयाचे महत्त्व अधोरेखित  होईल.

अजून एक पद्धत म्हणजे निवडलेल्या विषयाबद्दलची पार्श्वभूमी सांगून सुरुवात करता येते. उदाहरणार्थ, जर कोणी इच्छामरण या विषयावर लिहीत असेल तर पहिल्या एक दोन ओळीत माणसाचे आणि मृत्यूचे नाते किंवा मरणाचे अटळ स्थान हे सांगून मग इच्छामरण म्हणजे नक्की काय?  तो वादाचा  मुद्दा  का आहे?  हे थोडक्यात सुरुवातीला मांडल्यास वाचकाची त्या विषयाची मानसिकता तयार व्हायला मदत होते.

त्याचप्रमाणे जर ललित लेखन असेल  तर त्या विषयाला अनुसरून एखाद्या कवितेच्या साजेश्या दोन ओळी,  प्रसिद्ध  व्यक्तीचे  त्या विषयाशी निगडित विधान,  किंवा विषयाला अनुरूप एखादी म्हण सुरुवातीला आली तर वाचणाऱ्याला पुढे वाचण्यात  इंटरेस्ट निर्माण होतो.

उदाहरणार्थ, “माझा आवडता ऋतू ” ह्या लेखाची सुरुवात “चक्क डोळय़ांसमोर ऋतू कूस बदलून येतो..ढगांमधे पावसाआधी कुठून गारवा येतो? ह्या कवी सौमित्रच्या ओळींनी केल्यास वाचकाला पुढे काहीतरी छान वाचायला मिळणार आहे ह्याची चुणूक दाखवल्या जाईल.

विषय उलगडणारे मुद्दे:  (Body paragraphs)

आपल्या विषयाबद्दल आपल्याला जे जे म्हणायचे आहे. ते पुढच्या परिच्छेदांमध्ये नेटकेपणाने मांडलेले असावे.  परिच्छेदाच्या सुरुवातीला आपला मुद्दा  लिहावा.  त्याचे समर्थन करण्यासाठी एखादे उदाहरण,  त्या विषयातील तज्ज्ञाचे मत  दिल्यास त्याची सत्यता पटवण्यास मदत होते.  असे उदाहरण देताना, किंवा दुसऱ्या व्यक्तीचे मत लिहितांना  त्याचे क्रेडिट त्यांना जरूर द्यावे म्हणजे ती माहिती देताना त्यांचा उल्लेख करावा. शेवटच्या  एक दोन ओळींमध्ये  आपले त्या मुद्द्याबद्दलचे मत  लिहावे. खूप मोठे मोठे   परिच्छेद करण्यापेक्षा  छोटे सुटसुटीत परिच्छेद असावेत.  म्हणजे लेखाला एक सुबकपणा येतो.अनावश्यक माहिती टाळावी. आटोपशीर माहितीचा प्रभाव जास्त चांगला पडतो. एकाच परिच्छेदामध्ये अनेक मुद्द्यांची सरमिसळ करू नये. त्यामुळे वाचणाऱ्याचा  गोंधळ होऊ शकतो. एका परिच्छेदात एकच विषय उलगडून  सांगावा. एका मुद्द्यावरून दुसऱ्या मुद्द्याकडे जाताना होणारा बदल हा सहज आणि सुसंगत वाटायला हवा.

उदाहरणार्थ, एका परिच्छेदात इच्छामरणाचे मानसिक फायदे सांगताना एक एक फायदा सांगावा. त्याबद्दलचे तज्ज्ञांचे मत विचारात घ्यावे. त्या अनुषंगाने आपले मत मांडावे. ते उलगडून सांगावे. ह्या विषयची आर्थिक बाजू मात्र इथे मांडू नये. त्यासाठी वेगळा परिच्छेद असावा. आपली बाजू पटवून देण्यासाठी किमान ३-४ मुद्दे असले तर आपला सखोल अभ्यास दिसून येतो.

 

प्रतिवाद: (Counter Argument)

एखाद्या सामाजिक मुद्द्याबद्दल लिहिताना, किंवा एखाद्या विषयाचे महत्त्व अधोरेखित करताना त्याच्या विरुद्ध बाजूचा विचार करणे सुद्धा मह्त्त्वाचे आहे. म्हणजे लेखात जर इच्छामरणाचा पुरस्कार करत असू तर काही लोकांचा ह्या मुद्द्याला विरोध का आहे ह्याचा थोडक्यात उहापोह केलेला असावा. म्हणजे आपण विषयाचा सर्व बाजूने विचार केलेला आहे हे वाचकाच्या ध्यानात येते. ह्यातून आपला तौलनिक अभ्यास दिसून येतो.

समारोप: (Conclusion)

शेवटचा परिच्छेद हा तितकाच महत्त्वाचा भाग. आकर्षक सुरुवातीमुळे जसे वाचकाला पुढे वाचण्यासाठी उद्युक्त करता येते तसेच चांगल्या शेवटामुळे त्याला आपल्या विषयावर विचार करण्यास प्रवृत्त करता येते. शेवट करताना आपल्या लेखातील प्रमुख मुद्दे वेगळ्या शब्दात मांडून थोडक्यात सारांश लिहावा. आपले त्या विषयाबद्दलचे मत लिहावे. हा परिच्छेद शेवटी असल्याने वाचकाच्या मनात रेंगाळणार आहे त्यामुळे तिथे त्याला विचार करायला प्रवृत्त करणे गरजेचे असते. एक अनुकूल छाप गरजेची असते. उदाहरणार्थ, आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग लिहिताना शेवटी त्या प्रसंगातून आपण काय शिकलो हे सांगितले तर वाचकाला सुद्धा त्या अनुभवातून काहीतरी मिळेल. इच्छामरण ह्या विषयावर असेल तर आधी मांडलेल्या मुद्द्यावरून लेखकाचा निष्कर्ष शेवटच्या परिच्छेदात असावा. वाचकाला त्या विषयावर विचार करण्यासाठी भाग पाडणारा शेवट असेल तर लिखाणासाठी घेतलेल्या मेहेनतीचे ह्याहून चांगले फळ काय असेल?

ह्याशिवाय,

लेखास अनुरूप भाषाशैली, अचूक व्याकरण, योग्य विरामचिन्हे,  शब्दसंख्या,  ह्यांचे भान सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते. आपल्याकडे असलेली माहिती आपण कशा पद्धतीने मांडतो ह्यावर आपल्या लेखाचे यश अवलंबून असते. मुद्देसूद, सुटसुटीत, सोप्या शब्दात लिहिलेला लेख, भाषण, निबंध किंवा पत्र  जास्त परिणामकारक होते. वाचणाऱ्याला विचार करायला भाग  पाडते. आणि आपल्याला सुद्धा लेखनाचे समाधान देते.

ह्या सगळ्यामुळे गोष्टींचा विचार करता करता आपल्या लेखनात सुधारणा तर होतेच पण विचारांमध्ये सुद्धा सुसूत्रता यायला मदत होते. आपल्या भावना आणि विचार प्रकट होताना त्या योग्य पद्धतीने वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी थोडा विचार आणि थोडे कष्ट घेणे इष्ट नाही का? समर्थ रामदास म्हणून गेले आहेत,

अभ्यासोनी प्रकटावे | ना तरी झाकोनी असावे

प्रकाटोनी नासावे | हे बरे नव्हे ||

 

 

About the Author

Nirmiti Kolte's picture
Nirmiti Kolte

 

सांगली 

M.com
E tutor म्हणून कार्यरत 
गझल लेखन, मासिकात लेख, कविता, भाषांतर प्रकाशित.