रेशम की डोर

 

“ बहनाने भाई की कलाई पे प्यार बांधा है, प्यार के दो धागोंसे संसार बांधा है”

खरंच राखी हा नुसता धागा नसतो तर बहिण भावाला प्रेमानं बांधून ठेवणारे एक गोड बंधन असते! छोट्यांसाठी छान छान कपडे घालून इटुकल्या भावाला पिटुकल्या बहिणीने राखी बांधून गिफ्ट घ्यायचा दिवस आणि  मोठ्यांसाठी लहानपणीच्या गप्पांच्या, रुसव्या- फुगव्यांच्या आठवणी काढायची संधी!

जुन्या चित्रपटात “अगर मेरी बहन की तरफ आँख उठाके भी देखा तो मै तेरा खून पी जाऊंगा” हे असे भाऊ ओरडून गुंडांना सांगायचा आणि बहिण, “भैय्या तुम मेरे लिये अपनी जान की बाजी मत लगाओ म्हणायची”. संकट काळात बहिणीने भावाला हाक मारायची आणि भावाने तिच्या रक्षणाला धावून जायचे हे द्रौपदी –कृष्णाच्या गोष्टीत म्हणजे अगदी महाभारताच्या काळापासून दिसून येते. मोठ्या किंवा लहान भावाने सुद्धा बहिणीचे रक्षण करायचे, आधार द्यायचा, लाड करायचे हे तर ठरलेलेच. बहिणीसाठी स्थळे आली की त्यांची चौकशी करायची, तिच्यामागे लागून कोणी जर तिला त्रास देत असेल तर त्याला जाब विचारायचा, रात्रीची तिला सोबत करायची हे भावाचे काम असतेच. पण कधी कधी ह्या भावनेचा अतिरेक होतो. त्याला पुरुषी अहंकाराचा स्पर्श होतो. बहिण भरकटू नये, भलतेसलते निर्णय घेऊ नये म्हणून तिला धाकात ठेवणारे भाऊ अजून सुद्धा छोट्याच काय पण मोठ्या शहरांमध्ये सुद्धा आढळतात. मुळात ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे, तिची तिला मते आहेत हे बाळकडू मुलांना घरातच आईवडिलांच्या वागण्यातून मिळायला हवे. अजूनही अनेक घरांमध्ये मुलांना जी मोकळीक असते ती मुलींना नसते. त्यामुळे आपोआपच आपण वरचढ असल्याची भावना मूळ धरू लागते. प्रामुख्याने तिने आयुष्याचा साथीदार स्वत:च्या आवडीने शोधला की भरकटणारे सैराट मधल्या प्रिन्स सारखे भाऊ अजूनसुद्धा बघायला मिळतात. नितीश कटारा हत्याकांडात बहिणीच्या प्रियकराला मारणाऱ्या भावांचा असाच काहीसा रोल आहे. बहिणीने केलेल्या निवडीचा व्यवस्थित विचार करून, तिच्याशी, तिने निवडलेल्या मुलाशी चर्चा करून मग योग्य अयोग्य चा विचार करून तिला पाठींबा द्यायचा की निर्णयापासून परावृत्त करायचे हे भावाने ठरवले तर कितीतरी अप्रिय घटना टाळता येऊ शकतील. आई वडिलांसमोर तिची बाजू पटवून देऊन तिला हक्काचे पाठबळ देणारा भाऊ मिळण्यासारखे दुसरे भाग्य नाही.

स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी करताना घरातल्या पुरुषांचा प्रामुख्याने भावाचा दृष्टीकोन फार महत्त्वाचा असतो. भावाची पारंपारिक कर्तव्ये महत्वाची आहेतच पण बदलत्या काळानुसार त्यांचे संदर्भ बदलायला हवेत. हळूहळू का होईना ते बदलत सुद्धा आहेत. काही घरांमध्ये हा balance साधला जातो. खेळीमेळीचे वातावरण, घरातील स्त्रियांचा मान, त्यांच्या मताला मिळणारी किमत लहानपणापासूनच मुले बघत मोठी होतात. कामांची वाटणी सुद्धा gender वर अवलंबून न ठेवता पडेल ते काम समोर असेल त्याने करायचे ह्या बेसिस वर केली जाते. बहिणीला हवे ते शिक्षण घेण्याचे, करिअर निवडण्याचे, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य घ्यायला सक्षम बनवणे हे आजच्या काळात भावाचे सर्वात महत्त्वाचे कर्तव्य आहे. आजकाल नोकरीच्या, संसाराच्या निमित्ताने भाऊ बहिण एकमेकांच्या जवळ राहू शकतीलच असे नाही, कधी कधी तर ते सातासुद्रापार असतात. अश्या वेळी काही संकट आले तर प्रत्यक्ष मदतीसाठी भाऊ धावून येऊ शकेलच असे नाही. तेव्हा तिला अश्या प्रसंगासाठी मानसिक, शारीरिक दृष्ट्या सक्षम बनवलेले असावे. आयुष्यातल्या प्रत्येक संकटाला सामोरे जाताना तिने हिंमतीने उभे रहावे ह्यासाठी भावाने तिला तयार करायला हवे.

काही बहिण भाऊ खरंच खूप close असतात. एकमेकांच्या अडचणी share करतात. एकमेकांना वेळ देतात, अगदी एकमेकांच्या प्रेम प्रकरणांमध्ये चिठ्ठ्या पोचवण्याचे काम सुद्धा करतात. नाते टिकवण्यासाठी त्यांना वेगळे कष्ट करावे लागत नाहीत. काहीवेळा भावा बहिणींमध्ये फारश्या गप्पा, फोन होत नाहीत पण वेळ आल्यावर ते एकमेकांसाठी उभे राहतात. काही वेळा हेच नाते समज- गैरसमजांच्या गुंत्यात अडकून दुरावा निर्माण होतो. पण मनात खोलवर कुठेतरी आठवणीचे झाड तग धरून राहते. कधी हे गुंते सुटतात तर कधी तसेच अडकून राहतात. आणि एक कोवळे नाते कोमेजलेलेच राहते.

भावा बहिणीच्या प्रेमाच्या किती छटा आपल्या अवतीभवती दिसतात. गाण्यांमधून, चित्रपटातून, पौराणिक गोष्टींतून! दादा मला एक वहिनी आण, तुझ्या गळा माझ्या गळा, गोड गोजिरी लाज लाजरी अशी किती गाणी लहानपणापासून आपण गुणगुणत मोठे होतो. हिंदीमधले फुलोंका तारोंका तर हातवाऱ्यांसकट लहानपणी अनेकांनी perform केलेले असते. आपल्या अडचणीत असलेल्या कंपनीला सावरण्यासाठी बिझनेस ची आवड असलेली बहिणच योग्य वारसदार आहे हे सांगणारा “दिल धडकने दो” मधला भाऊ. “इक़्बाल” मधली भावाच्या स्वप्नाच्या पूर्णत्वासाठी धडपडणारी बहिण “भाग मिल्खा भाग” मधली भावाला जेलमधून सोडवण्यासाठी सोन्याचे कानातले गहाण टाकणारी बहिण, आणि परिस्थिती सुधारल्यानंतर ते कानातले सोडवून तिला सरप्राइज देणारा तिचा भाऊ, “फिजा” मधली भावाला शोधण्यासाठी जंग जंग पछाडणारी बहिण, “जाने तू या जाने ना” मधला बहिणीला तिच्या निर्णयाबद्दल फेरविचार करायला सांगणारा भाऊ हे आजच्या काळातल्या भावा बहिणीच्या मित्रत्वाच्या नात्याची उदाहरणे आहेत. काही वेळा काही निर्णय जगाच्या, संस्कारांच्या चौकटीत बसणारे नसतात अश्यावेळी आपल्या भावंडाच्या मागे उभे राहणे तर अजूनच कठीण. पॉर्न अॅक्ट्रेसचा भाऊ असणं ही जगातली सगळ्यात अवघड गोष्ट. संदीप वोहरा हा सनी लिओनी अर्थात करणजीत कौरचा भाऊ. ती पॉर्न अॅक्ट्रेस आहे आणि अडल्ट सिनेमात काम करतेय  ही गोष्ट सनीने परिवारात सर्वप्रथम आपल्या समजूतदार भावालाच सांगितली. तो सनीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. अश्या वेळी एक भाऊ म्हणून किती सहन करावे लागले असेल? टोमणे, चेष्टा अन काय काय !पण कदाचित बहिण भावाच्या घट्ट नात्यामुळे लोकांच्या प्रतिक्रिया सहन करणे सोपे गेले असेल. सचिन तेंडूलकरला त्याची पहिली बॅट त्याच्या मोठ्या बहिणीनेच दिली होती. लता मंगेशकर- हृदयनाथ मंगेशकर ही अशीच एक जोडी! एकाचे संगीत आणि दुसरीचे स्वर दुधात साखरेसारखे विरघळले आणि किती अविस्मरणीय गाणी जन्माला आली. झोया अख्तर- फरहान अख्तर, संजय दत्त- प्रिया दत्त, राहुल गांधी- प्रियांका वडेरा ह्या काही जोड्या ज्या आपल्या क्षेत्रात एकमेकांना समजून घेत, वेळप्रसंगी आधार देत आपल्या आपले नाते फुलवत आहेत.

बहिणीसुद्धा आपल्या भावांना कधी लपूनछपून तर कधी समोरून मदत करतात. मानसिक आधार देतात. वेळ पडली तर आर्थिक मदत करायला पण मागे पुढे पाहत नाहीत. सासरी गेल्यावर सुद्धा जमेल तशी माहेराशी नाळ जोडून असतात त्यात सगळ्यात महत्त्वाचा दुवा असतो तो भाऊच!

‘जीव भोळा खुळा, कसा लावू लळा

देवा उदंड त्याला औक्ष मिळू दे

माझ्या भावाला माझी माया कळू दे’

 

अशीच बहिणीची प्रार्थना असते.

 

आजच्या अतिशय धकाधकीच्या काळात जिथे कामाचे, अभ्यासाचे, नातेसंबंधांचे एकूणच आयुष्याचे टेन्शन वाढत चालले आहे. वैयक्तिक नाती वेळेअभावी सुकत चालली आहेत अश्यावेळी एकमेकांसाठी वेळ काढून, एकमेकांच्या आवडीच्या गोष्टी, चेष्टा मस्करी करून ह्या नात्याला अधूनमधून उजळवत राहायला हवे. कधीतरी भावा बहिणींनी फक्त त्यांचाच असा siblings day out  ठरवावा आणि धम्माल करावी. आयुष्यातल्या निरपेक्ष नात्यांपैकी असलेले हे एक नाते! वयाची, परिस्थितीची कसलीही सीमा नसलेले चिरंतन नाते ! भांडावे, रुसावे, चिडावे पण राखीच्या अदृश्य धाग्याने जन्मभर एकमेकांना बांधून ठेवावे हीच रक्षाबंधनाचे खरी शिकवण !

ह्या कुण्या कवीने किती सार्थ लिहिले आहे

‘संवसारामधी किती असती नाती गोती ।

बहीण-भाऊ ही तर मोलाची माणिक मोती ।।

निर्मिती.

 

 

About the Author

Nirmiti Kolte's picture
Nirmiti Kolte

 

सांगली 

M.com
E tutor म्हणून कार्यरत 
गझल लेखन, मासिकात लेख, कविता, भाषांतर प्रकाशित.