
महाभारताचा लेखनिक, सुखकर्ता, संकटांचे हरण करणारा, मांगल्याचे प्रतिक असलेला आपला गणपतीबाप्पा आपल्याला दरवर्षीप्रमाणे भेटायला येतोय! माघ महिन्यातील चतुर्थीला माघी चतुर्थी असे म्हटले जाते. हाच आपल्या बाप्पाचा जन्मदिवस! आणि भाद्रपद चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत आपल्याकडे मुक्कामाला येतो आपला बाप्पा ! लहान मोठ्यांचा लाडका देव! महाराष्ट्रातील प्रत्येक गावात गणरायाची एक-दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात. त्या मंदिरांतून गणेशाची हजारो रूपे आबालवृद्धाना भुरळ पाडत असतात. पण तरीसुद्धा काही ठिकाणचे गणपती आपले महत्त्व राखून आहेत! महाराष्ट्रातील या विशिष्ट ‘आठ’ ठिकाणच्या गणेश मंदिरांना खास महत्त्व आहे. या आठ मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. ह्या सर्व मूर्ती स्वयंभू आहेत.
पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महड, पाली) व अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) या ठिकाणी ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत. या गणपतींपैकी महडचा व रांजणगावचा गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत. बाकीचे डाव्या सोंडेचे. ह्या ठिकाणांची थोडक्यात माहिती करून घेऊया!
श्री मोरेश्वर:
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर आहे. जवळच कऱ्हा ही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीवर उत्पात माजवला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली त्यांची हाक ऐकून गणपतीने मयूरावर आरूढ होऊन ह्या असुराचा वध केला.त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असे नाव पडले. मूर्तीच्या डोळ्यांत व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. देवाच्या मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूस ऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती आहेत. या मंदिराच्या भोवती बुरूजसदृश दगडी बांधकाम आहे.
चिंतामणी:
थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. हे मंदिर पूर्णपणे लाकडापासून बनवले आहे. पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील या ठिकाणी आहे.
सिद्धिविनायक:
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून १९ कि. मी. अंतरावर आहे. भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे हे स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. राणी अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरुड यांच्या प्रतिमा आहेत. असे म्हणतात की मधु व कैटभ या राक्षसांशी विष्णू अनेक वर्षे लढत होते. परंतु तरीही यश मिळत नव्हते तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली. याच ठिकाणी गणपतीची आराधना करून विष्णूने असुरांचा वध केला.
महागणपती:
पुणे-अहमदनगर रस्त्यावर व पुण्यापासून ५० किलोमीटरवर रांजणगाव येथे हे देऊळ आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून, मंदिरात दिशासाधन केले आहे. उगवत्या सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतील, अशी मंदिराची रचना आहे. त्यामुळे उत्तरायणात, दक्षिणायनात व माध्यान्हकाळी गणेशाच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात. त्रिपुरासुर या राक्षसाला शंकराने काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासुर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. तेच हे ठिकाण!
विघ्नेश्वर:
अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. श्रींच्या मूर्तीच्या डोळ्यात माणिक आणि कपाळावर हिरा आहे. अशी ही प्रसन्न मूर्ती श्रीगणेश भक्तांच्या विघ्नांचे हरण करते म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात.
गिरिजात्मज:
अष्टविनायकापैकी हा सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज. जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिरातील दगडी खांबांवर कोरीवकाम केलेले आहे. वाघ, सिंह, हत्ती कोरलेले आहेत. पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे. दगडामध्ये कोरलेली सुंदर मूर्ती हे ह्या स्थानाचे महत्त्व आहे.
वरदविनायक:
महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. महड हे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली – खालापूरच्या दरम्यान आहे. इ.स. १७२५ च्या सुमारास पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले. श्री वरदविनायकाचे मंदिर अगदी साधे आणि कौलारू असून मंदिराला घुमट आहे आणि सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे. असे सांगतात की एका भक्ताला स्वप्न पडले आणि त्यात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात मूर्ती पडलेली दिसली. त्याप्रमाणे शोध घेतला आणि खरेच मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती. मंदिरात दगडी महिरप आहे. गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडेची आहे.
बल्लाळेश्वर:
पाली हे ठिकाण खोपोलीपासून ३८ कि. मी. अंतरावर आहे तर पुण्यापासून १११ कि. मी. अंतरावर आहे. इथले बल्लाळेश्वराचे मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे बसवलेले आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी मंदिराला अर्पण केली आहे. अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे.
महाराष्ट्रातील हे अष्टविनायक संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. वेगवेगळ्या रूपातील स्वयंभू गणेशमूर्ती भाविकांना आकृष्ट करतात. ह्यातील बरीचशी मंदिरे निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळे देवदर्शना बरोबरच पर्यटनाचा आनंदसुद्धा लुटता येतो.
(माहिती आंतरजालावरील विविध संकेतस्थळांच्या सौजन्यानं.)