अमूर्त चित्रं काय सांगताहेत?

शरद आणि सुचिता तरडे दांपत्याची चित्रं (प्रदर्शन मुख्यत्वे श्री. शरद यांच्या चित्रांचं आहे) बघण्याच्या निमित्ताने आमची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट. शुभाताईच्या ‘बाजार’ प्रदर्शनाच्या वेळी त्या दोघांशी झाली होती ती केवळ तोंडओळख होती.

अमूर्त चित्रं चितारता-रंगवताना चित्रकाराच्या मनातील भाव त्या-त्या कॅन्व्हासवर - बोर्डावर उतरतो. रेषांना वा रंगांच्या फटकार्‍यांना मनातल्या ‘त्यावेळच्या’ भावनांचं रूप येतं. चित्रं बघताना प्रेक्षकालाही ती त्याच्या मनात बघतानाच्यावेळी असणार्‍या भावनांसारखीच दिसतात का? की चित्रं बघता-बघता मनातील भाव झरझर बदलतात? मला तरी वाटतं की हे व्यक्तीसापेक्ष असणार. मी ह्या दोन्हीचा अनुभव घेतला.

विषयांतराचा धोका पत्करूनही मला हे इथे सांगणं गरजेचं वाटतंय. ज्या दिवशी ह्या प्रदर्शनाचं उद्घाटन होतं त्याच दिवशी मी पुण्याला गेले होते ती मुख्यत्वेकरून दोन संपूर्ण दिवसांच्या कॉन्फरन्ससाठी! २५-३० वर्षांपूर्वी प्रामाणिक मेहनतीने अभ्यास करून जे व्यावसायिक पात्रता व प्रमाणपत्र मिळवलं त्या व्यवसायाचं आजचं स्वरूप, तेही मुख्यत्त्वेकरून स्त्रियांच्या संदर्भात, काय आहे ते मला ह्यानिमित्ताने अनुभवायचं होतं. पुण्याच्या व पिंपरी चिंचवडच्या महिला चार्टर्ड अकाऊंटंट्सनी केवळ महिला चार्टर्ड अकाऊंटंट्साठी आयोजित केलेली ही परिषद होती. वित्तीय क्षेत्रातील जवळजवळ दोन-अडीचशे स्त्रिया.. बऱ्याचशा प्रत्यक्ष पूर्णवेळ काम करणाऱ्या. त्याचप्रमाणे माझ्यासारख्या अर्धवेळ काम करणाऱ्या व नवीन काय करू शकतो याचा शोध घेणाऱ्यासुद्धा! मात्र एक समानता, जी सर्व स्त्रियांच्या बाबतीतच असते, ती म्हणजे सगळ्याच अनेकावधानी. घर-संसार आणि व्यवसाय-नोकरी यांचा मेळ राखत काम करणाऱ्या. अनुभवांची देवाण-घेवाण करत, ह्या क्षेत्रात नवीन जे जे दिसतंय ते दाखवून एकमेकींना प्रोत्साहित करत एकेक सेशन संपत होता. आपण ह्यात कुठे सामावल्या जातोय याचा अंदाज घेत माझं मन स्वत:ला निरखत राहिलं. प्रत्येकीचं तसंच काहीसं होत असावं असं नंतर जाणवत राहिलं.

एक संपूर्ण दिवस अशा स्त्रियांच्या सहवासात संपवून, पुण्यातील रिक्षात बसून गुगल-मॅपवर लक्ष ठेवत स्टुडिओ शोधत मी प्रदर्शन बघायला निघाले. 
पहिला आनंदाश्चर्याचा धक्का बसला तो उमा-विरूपाक्ष कुलकर्णी दांपत्य-भेटीचा! मी लिफ्टची वाट बघत खाली थांबले होते आणि वरून आलेल्या लिफ्टमधून हे दोघे बाहेर पडले. (त्यांच्यासोबत असणारे ते श्री. सुहास एकबोटे होते हे मला नंतर समजलं. माझी-त्यांची ओळख नाही.)
नुकतंच उमाताईंचं ‘संवादु अनुवादु’ वाचलेलं असल्याने त्यांच्याशी माझी जणूकाही जुनी ओळख असल्याप्रमाणे मला वाटत होतं. त्यांना पुस्तक वाचल्या-आवडल्याचं सांगितलं. त्यांनीही आवर्जून गप्पा मारायला येण्यासाठी निमंत्रण दिलं.
वरती गेल्यावर दुसरा आनंदाश्चर्याचा धक्का म्हणजे कोल्हापूरच्या आर्कीटेक्ट नरहर कुलकर्णींशी झालेला परिचय. डॉ. शरद भुताडीया साकारत असलेल्या विंदा करंदीकरांनी अनुवाद केलेल्या शेक्सपिअरच्या `राजा लिअर' ह्या नाटकाचे पार्श्वसंगीतकार.

जेव्हा ‘कलायडो’च्या चित्र-दालनात शिरले तेव्हा सर्वांत पहिल्यांदा नजरेत भरला तो रंगांच्या सुवासासह वेढलेला पांढराशुभ्र ताजेपणा! सर्व भिंतींवर लावलेली रंगीबेरंगी अमूर्त, आपापल्या समजुतीनुसार बघण्याची चित्रं! नजरेत भरत होते फक्त रंग, गडद-फिके, सुटे वा निरनिराळ्या रंगसंगतीत एकमेकांच्या सहाय्याने उठावदार ठरणारे!
'मला त्यातलं काही समजत नाही' असा भाव टक्क जागा होत चित्रं बघितली जात होती. पण त्या चित्रांची जादू म्हणा वा तीव्रता म्हणा, इतकी प्रभावशाली की ती सगळी मनात अलगद उतरलीच... 
गप्पा मारल्या. फेसबुक फ्रेंड्स म्हणून अपरिहार्य असणारा फोटो-सेशन झाला. श्री. तरडे म्हणाले, "तुम्हांला जे चित्र सर्वांत जास्त आवडलं आहे त्यासोबत तुमचा फोटो काढतो." मला तर सगळीच चित्रं जाम आवडलेली! एखाद्याच्या चांगुलपणाचा किती फायदा घ्यायचा? मोजक्या दोन चित्रांसोबत उभी राहिले आणि बाहेर येऊन सुचिताताईंसोबत सेल्फीही घेतला!

आता जेव्हा ही चित्रं पुन्हा-पुन्हा बघते तेव्हा प्रत्येकवेळी ती वेगळी दिसतात व नवीच भासतात. त्यावेळी न दिसलेले अर्थ त्यात दिसू लागतात. 
कधी आजीची गोधडी दिसते तर कधी प्रकाश-किरणांचं झाड! कधी ठोकळ्यांच्या उंच-उंच इमारती दिसतात तर कधी रुपया वेडावाकडा होत त्याची पुस्तकं होतात. कधी धीरगंभीर निळा-करडा शांत समुद्र दिसतो तर कधी त्या समुद्रापल्याड पसरलेलं अवकाश नजरेस येतं. कधी भरलेले काचेचे ग्लास दिसतात तर कधी पारदर्शक काचेतून बाहेरच्या जगातला प्रकाश नजरेत भरतो.
खोलीच्या एका टोकाला एकाच चौकटीत स्वत:भोवती फिरणारी तीन चित्रं आहेत... तेच रंग वेगळ्या दिशेत, वेगळ्या कोनात, इतरांच्या जोडीने वेगळेच दिसत राहतात.

वाटतं, आपलं जगणंही एक प्रकारे अमूर्तच की! कोणताही ठराविक करिअर-गोल न ठरवता, त्या त्या वेळेला उपलब्ध असलेल्या व्यक्तींची मदत घेत जे जसं महत्त्वपूर्ण वाटलं ते ते शिकणं-करणं, आपल्या स्वत:च्या जगण्याकडे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कोनांतून बघणं, त्यासाठी दिशा बदलणं, लख्ख उजेडात वा काळ्याकुट्ट अंधारात शिरणं... थोडक्यात काय तर निरनिराळ्या नजरांतून आपलं आपल्यालाच न्याहाळताना प्रत्येकवेळी नवीनच काही दिसणं---
ह्यासाठी ना सवय करावी लागत ना सराव! आपल्या जाणीवा जाग्या असल्या की हे आपोआप घडत रहातं.

अमूर्त चित्र हेच तर सांगताहेत...

-चित्रा राजेन्द्र जोशी 

About the Author

Chitra Rajendra Joshi's picture
Chitra Rajendra...