कावड

 आज रामभाऊ वसईवाला नेहेमीसारखा खांद्यावर कावड घेऊन आला होता ताज्या ताज्या भाजीची. हाफ शर्ट, लेंगा आणि शर्टावर काळ्या रंगाचं जाकीट असा त्याचा पेहेराव असे. घाईघाई पावलं उचलून तो चालत असे जवळ जवळ धावल्यासारखाच. त्याच्या त्या चालीसरशी कावडीच्या मधला दांडा आणि तागड्या  करकर करकर आवाज करत वर खाली, वर खाली होत असत. त्यात एक प्रकारची लय असे. त्याच्या चालण्याचं आणि त्या हेलकाव्याचं एक गणित होतं. कुणी हाक मारली कि तो हलकेच खाली झुकून खांद्यावरचा दांडा काढून कावड खाली ठेवी. तराजूने भाजी तोलून देई आणि परत खांद्यावर कावड घेऊन पुढे निघे. पण त्याच्या मागल्या बाजूनं कुणी हाक मारली की चटकन मागे वळतांना ते गणित चुके. आणि ते चुकलं कि त्या तागड्या वेड्या वाकड्या हेलकावे खात. मग तो थोडा वेळ जागच्या जागी थांबून त्या स्थिर होऊ देई. आणि मग लग्गेच परत ती लयदार हालचाल सुरु. मला नेहेमी वाटत असे कि कधी याचं व्यक्तिचित्र मी रेखाटलं तर ती लय पकडता आली पाहिजे चित्रात. कारण वसईवाला म्हणजे ताजी भाजी आणि त्याच्या सकट खांद्यावरची एका लयीत हलणारी ती कावड हे समीकरणच होतं. कधी कधी भाजी मोजकी असेल तर तो पोत्यात भरून घेऊन येई. त्या दिवशी त्याच्याकडे पाहताना इतकं चुकल्यासारखं वाटे कारण ती कावड हा त्याच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग होता. माझ्या मनात असा सगळा विचार चालू होता एवढ्यात तिसऱ्या मजल्यावर राहाण्याऱ्या साने आजींनी गॅलरीतून त्याला हाक मारली. आलो गे माय आलो म्हणत त्याने जिने चढायला सुरुवात केली. दर गुरुवार चा हा नेम होता. संधिवाताने जखडल्यामुळे  साने आजी बाहेर हिंडू फिरू शकत नव्हत्या. घरातल्या घरात कशातरी वावरत. एकुलता एक मुलगा तो बोटीवर असे. दर सहा आठ महिन्यांनी महिन्याभराच्या रजेवर येई. पण आला तरी त्याचा पाय घरात ठरत नसे. साने काका जाऊन चार वर्ष झाली होती. घरकामाला चोवीस तासाची कमल नावाची एक बाई होती आणि एक मुलगी ठेवली होती पेइंग गेस्ट म्हणून. ती आयटी कंपनीत नोकरीला. सक्काळी जायची ती रात्री डोकं टेकण्यापुरती घरी यायची. त्यामुळे घरात इनमीन दोनच माणसं. मजल्यावर नवीन राहायला आलेल्या पाटलांचं कुटुंब सोडलं तर बाकी दोन्ही घरं बंदच असत.एकंदरीत काय तर घरी आणि दारी दोन्हीकडे 'शुकशुकाटच'. दर गुरुवारी आजी वसईवाल्याकडून तीन चार भाज्या घेत आणि उरलेल्या दिवशी कधी खिचडी कधी पोहे आणि कधीतरी उसळ असं करत आठवडा ढकलत. त्या सगळी मिळून फार फार तर किलोभर भाजी घेत त्याच्याकडून पण त्या तेवढ्या वेळात किमान दहा किलो तरी गप्पा मारत. तराजूत मोजल्या तर नक्कीच तेवढ्या भरतील. आठवडाभराची कसर भरून काढत त्या. आणि तरीसुद्धा ती एवढी जड कावड पेलत कसरत करत तो त्यांच्यासाठी सहा जिने चढून यायचाच. शेजारच्या पाटील वहिनींना वसईवाल्याचा भयंकर राग. मी बोलावते तेंव्हा हा ऐकलं न ऐकल्यासारखं करून पुढे निघून जातो किंवा तुम्ही सांगाल तेवढीच भाजी वरती घेऊन येतो असं म्हणे. पण साने आजींच्या किलोभर भाजीसाठी बरा एवढा गड चढून येतो आणि तेसुद्धा अक्खी कावड घेऊन. म्हणून आज त्यांनी जरा रागातच त्याला जाब विचारला.
               तसं तो म्हणाला; त्याचं कारण वेगळं आहे वहीनी sss . हि म्हातारी माझ्या गावचीच. सफ़ाळ्याला हिच्या बापाचा मोठ्ठा मळा होता. हि स्वतः खपून वाफे करायची, खतपाणी बघायची. भाज्या खुडायची. झाडपाल्याची लई आवड होती बघा तिला. लग्न होऊन इथे दादरला आली. माहेरी यायची तेंव्हा कित्येकदा मळ्यामध्ये झाडापानांवरून हात फिरवतांना पाहिलंय तिला मी. पुढे तिच्या भावाने मळा विकून पैका केला. फार दुःख झालं तिला. खंतावली बिचारी. आणि आता तर काय.. मंडईत पण नाही जाऊ शकत ती. वाहिनी आलं का लक्षात तुमच्या; अहोsss भाजी विकायला नाही येत मी तिच्याकडे!!! मी इथंवर येतो तो त्या माऊलीच्या चेहेऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी. मंडईतला तो हिरव्या लाल पिवळ्या रंगांचा उत्सव, ताजेपणाचा, टवटवीतपणाचा अनुभव, टोपल्या, माणसं, आवाजाचा गलका, भाजीपाल्याचा तो हिरवा ओला वास या सगळ्या गोष्टीतला आनंद हिरावला ना हो तिच्या दुखण्यानं. म्हणून मी ठरवलं आपण तिच्यासाठी छोटीशी का होईना मंडई च उचलून घेऊन जाऊ कि. तिलाही होऊ दे थोडंसं ताजतवानं. कशी एकेक भाजी उचलून घेऊन ती निरखून बघते. कसल्या रे जून शेंगा आणल्यास म्हणते. पुढच्या वेळेस कोवळ्या आण बरं ..नाहीतर नको मला तुझी भाजी असं म्हणून दम सुद्धा देते. जणू काही ती खरंच तसं करणार असते..! ती जेंव्हा माझ्या भाजीच्या टोपल्याकडे बघते ना तेंव्हा तिच्या मलूल चेहेऱ्यावर 'भाज्यांचा रसरशीतपणा' पाहायला मिळतो मला. फुललेला मळा दिसतो ना अगदी तस्सा. डोळे समाधानाने भरलेले दिसतात तिचे. तेच पाहायला येतो मी. उगाच तिच्याशी भावाची घासाघीस सुद्धा करतो आणि शेवटी ती म्हणेल त्या भावाने तिला भाजी देतो. तिच्या चेहेऱ्यावरचा तो आनंद मला एक वेगळंच समाधान देतो बघा. त्याने दिलेलं उत्तर ऐकून पाटील वहिनींचा राग कुठच्या कुठे पळाला. त्यांना भाजी देऊन वसईवाला आपल्या दुडक्या चालीने खांद्यावरच्या कावडीचा तोल सांभाळत जिने उतरत होता. पुढच्या गुरुवारी केळफूल आण रेsss. माझा लेक यायचाय; त्याला फार आवडते ती भाजी. त्याला करून घालते. इति साने आजी. गे माय मला सुद्धा द्यावी लागेल हां.. तरच आणेन.  देत्ये रे बाबा तुला सुद्धा देईन... त्यांचा तो संवाद ऐकून वहिनींच्या चेहेऱ्यावर एक मंद स्मित पसरलं. आपल्या अंध मातापित्याला कावडीत बसवून तहान भागवण्यासाठी नेणारा श्रावण बाळच जणू असं म्हणत पाटील वाहिनी एक वेगळंच समाधान घेऊन घरात शिरल्या.  
               माणूस वृद्ध होतो तसं प्रत्येकाचंच आरोग्य कमी जास्त प्रमाणात जवाब देऊ लागतं, कुणाकुणाला काही अंशी अपंगत्वही येतं; आणि या सगळ्याशी जमवून घेतांना तो कणाकणाने जीवनापासून तोडला जातो, छोट्या छोट्या गोष्टीतल्या आनंदाला मुकतो. पण याच छोट्या गोष्टी माणसाचं आयुष्य समृद्ध करत असतात जगण्याची उमेद देत असतात. ती उमेदच हि दुखणी हिरावून घेतात. एखाद्याच्या वाट्याला आलेल्या जीवनाच्या या संध्या छाया थोड्या जरी आपल्याला उजळता आल्या तर सोन्याहून पिवळं नाही का? रामभाऊंनी नेमकं तेच केलं होतं. साने आजींच्या आयुष्यातलं हरवलेलं एक टवटवीत हिरवं पान शोधून आणून त्यांचे काही क्षण ताजेतवाने, रसभरे करण्याचा प्रयत्न केला होता आणि तेही अगदी सहजपणे.. आजींना कुठचीही उपकाराची जाणीव होऊ न देता. जिवंतपणाची सळसळ, माणसात असल्याची जाणीव त्याने दिली होती त्यांना.                 
               अशी एखादी सुखाची हरीभरी कावड कुणासाठी उचलता आली तर...लई भारीच की !! पण त्यासाठी रामभाऊसारखं संवेदनशील मन आणि कावड पेलणारा दमदार खांदा आपल्याला तयार करता यायला हवा...नाही का? आज रामभाऊ आणि त्याची ती कावड मला जास्तच डौलदार भासली.
संगीता मुकुंद परांजपे
image credit-PDpics on Pixabay
Category: 

About the Author

Sangeeta