होळीचा उत्सव

दशकुमार चरित, मालती माधव तसेच रत्नावली (हर्षवर्धन) या संस्कृत साहित्यात 'होळीच्या' उत्सवाचे वर्णन आढळते. मृच्छकटिक या संस्कृत नाटकात होळीला 'मदनोत्सव' असेही संबोधिलेले दिसून येते. कालिदासानेही मदनोत्सव असा शब्दप्रयोग करीत प्रेमीजन आणि होळीचा सण यांचा संबंध जोडून दाखविला आहे. तामिळ भाषेत यालाच 'कामन विला' - म्हणजे वसंताच्या स्वागताचा कामाचा उत्सव असे म्हणतात.

 

भारतातील आदिम समाजात होळीच्या दिवशी मातृदेवतेची पूजा करण्याचा प्रघात आहे. या दिवशी शितला नावाच्या देवीची पूजा करून तिने आजार, संकटे दूर करावीत अशी तिला प्रार्थना केली जाते. या पूजेला 'मायेर पूजा' म्हणजेच मातृदेवतेची पूजा असे म्हटले जाते.

पारंपरिक वाद्यांच्या गजरात फेर धरून केली जाणारी लोकनृत्ये स्त्री-पुरुषांना उल्लसित करतात.

एकुणातच माणसाच्या शरीर मनाला उल्लसित करणारा, वसंत ॠतूचे स्वागत करणारा, वाईट विचारांची आणि प्रवृत्तींची राखरांगोळी करायला शिकविणारा होळीचा सण! निसर्ग काटेसावर, पळस, पांगारा यांनी सजलेला असतो.

भारताच्या विविध भागात होळीचा उत्सव होळी रंगपंचमी आणि धुळवड अशा वेगवेगळ्या नावाने साजरा होतो.   उत्तर भारतात होळीच्या उत्सवाचे आगळेच महत्त्व आहे. मथुरा वृंदावन या सर्व ठिकाणी होळीचा उत्सव अतिशय उत्साहात साजरा होतो.  धर्म परंपरेने विधवांना कुठलेही सण-उत्सव साजरे करण्यावर बंधन आहे. परंतु वृंदावन मधल्या सर्व विधवांना रंग खेळण्यास, होळीचा उत्सव साजरा करण्यास आवर्जून बोलावणे, त्यांना होळी खेळा करता सर्व साहित्य देणे याकरिता सुलभ इंटरनॅशनल या एनजीओने  खास पुढाकार घेतला आहे. ज्या विधवांना त्यांच्या घरात मानाचे व आदराचे स्थान मिळत नाही त्यांच्या नातेवाईकांना नकोसे झालेले असतात अशा सर्व विधवा देशभरातून वृंदावनात आश्रय घेतात. त्यांच्या आयुष्यात आनंदाचे चार क्षण निर्माण करण्याचे श्रेय या NGO ला जाते.

कविता/ लेखन पाठवण्यासाठी पत्ता-eksakhee@gmail.com

 

About the Author

साहित्यसंस्कृती