
तीन कविता
-अनिरुद्ध अभ्यंकर
स्थानबद्ध
हल्ली
मध्यरात्रीच्या एखाद्या बेसावध प्रहरी
शब्दांचा दंगा सुरू होतो
मग सकाळी घेतो त्यांची ओळखपरेड
सगळेच माझ्याकडे बघून हसतात निरागस, निर्विकार , अनोळखी
आता कधीतरी त्यांना रंगे हातच पकडून
वहीत स्थानबद्ध करावे लागेल
खबऱ्या
कित्तेक रात्री
मी दबा धरून बसलो
शब्दांचा दंगा सुरू व्हायची वाट बघत...
पहाट झाली तरी कोणीच येत नाही...
नक्कीच त्यांना लागला असेल सुगावा माझा मनसुब्याचा...
म्हणजे आता खबऱ्या शोधणं आलं...
स्वतःचा आवाज
ह्या भीषण निरव शांतते पेक्षा तो शब्दांचा दंगा कधीही परवडला ...
निदान तेव्हढच मन राहत विचलित आणि ऐकू हि येत नाही स्वतःचा आवाज
Category: