अर्थ
-अनिरुद्ध अभ्यंकर
दिसू लागली पाने पिवळी गळतिल आता
झाडे सगळी ओकीबोकी बनतिल आता
पहाट झाली सर्व चांदण्या परत निघाल्या
आठवणी रात्रीच्या नुसत्या उरतिल आता
माया जमवत जगला अन् एकाकी मेला
मायेपोटी त्याच्या सगळे जमतिल आता
बरेच झाले सर्व संकटे अताच आली
खरे आपले कोण सोबती कळतिल आता
इतिहासाचा अर्थ नव्याने चला लावु या
(म्हणजे अपुली पोटे नक्की भरतिल आता !)
संवादाचा अपुल्यामधला पूल बुडाला
कसे किनारे सांग आपले मिळतिल आता?
किती जपुन मी संदर्भांना शब्द निवडले
अर्थ तरी मज नवीन त्यांचे छळतिल आता
Category: