चढण

चढण
-क्रांति साडेकर

तोल सावरावा अशी नव्हतीच ती चढण
आणि ओलांडून जावं असं नव्हतं वळण 
वाट नागमोडी, कुठं कडा, कुठं घसरण 
उन्मळावे, कोसळावे असे आले किती क्षण 
कुठं दिवा ना काजवा, मिट्ट काळोखी लांबण
ठाव नाही थांबा कुठं, दिशाहीन वणवण 
सैरभैर व्हावा जीव असं मुकं रितेपण 
वाटे, असेल का याच्याहून सुखाचं मरण? 
पैलतीरी बरसला अशा अवेळी श्रावण 
आणि मोहरून आला कोमेजला कणकण 
लख्ख उजळलं मन जसं सुटावं ग्रहण 
दिशादिशांत झळाळ अलौकिक, विलक्षण! 
वाट मोहमयी झाली आणि लाघवी वळण
इथंतिथं पायांखाली सोनचाफ्याचं शिंपण 
त्याच वाटेवर आता मन घालतं रिंगण 
असो चढण, वळण, घसरण, उतरण !

(Photo Credits- Sumukhi Pendse)

Category: 

About the Author

क्रांति साडेकर's picture
क्रांति साडेकर

मी सौ. क्रांति माधव साडेकर [पूर्वाश्रमीची क्रांति रामचंद्र छत्रपती], मूळची सोलापूरची, आता नागपूरला स्थायिक. 
वयाच्या १० व्या वर्षापासून काव्यलेखनास सुरुवात झाली. वडील स्व. रामचंद्र व्यंकटेश छत्रपती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सक्रीय कार्यकर्ते असल्याने साहित्यिकांच्या सहवासाचा लाभ झाला. वाचनाची आवड आणि लिखाणाची हौस यामुळे बाळबोध कथा-कविता-निबंध असं सर्वव्यापी लेखन जवळजवळ १९८६ पर्यंत सुरू होतं. संगीताचं वेड कवितेला लयीचं परिमाण देऊन गेलं. त्यामुळे काव्यात आपोआपच छंदबद्धता येत गेली. रेडीओ सिलोन, विविधभारती, ऑल इंडीया रेडिओ यांच्या सततच्या श्रवणाने उर्दू गझल मनात ठसली. तसाच प्रयत्न मराठीत आणि हिंदीत कविता लिहिताना केला. नेमका त्याच वेळी हिमांशु कुलकर्णी यांच्या गझल संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने सुरेश भट सोलापूरला आले असताना त्यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाचा लाभ झाला. गझल, तिचा आकृतिबंध, तिची बाराखडी या सगळ्या प्रकारांची ओळख वयाच्या १४ व्या वर्षी झाली. १४ ऑक्टोबर १९८४ रोजी सुरेश भट यांनी त्यांचा ‘एल्गार’ त्यांच्या आयुष्यात सुंदर गझला लिहाव्या या अशीर्वादासह सप्रेम भेट पाठवला. 
त्यानंतर तब्बल २२ वर्षं लिखाणाची नाव बंदरात नांगरून पडली. त्याच काळात सुरेश भट यांची पुन्हा भेट झाली आणि त्यांनी ‘मी लिखाण बंद केलं’ असं सांगितल्यावर ‘तू जगू शकणार नाहीस लिहिल्याशिवाय’ असा सज्जड दम भरला. तरीही काही वर्षं रितीच गेली. मग हळूहळू दोन लेकींच्या प्रोत्साहनाने प्रेरित होऊन आधी त्यांच्यासाठी आणि नंतर स्वतःसाठी पुन्हा लिखाणाची नाव प्रवाही झाली. पुढे आंतरजालावर मिसळपाव.कॉम, मायबोली, सुरेशभट.इन, मीमराठी.नेट, ऑर्कुट आणि फेसबूकवरील मराठी कविता समूह [सध्या या समूहाच्या संचालक मंडळात कार्यरत आहे] अशा सगळ्या संस्थळांवर मुक्त वावर सुरू झाला आणि तिथे भेटलेल्या जगभरातील असंख्य मित्रमैत्रिणींच्या आग्रहाखातर काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा विचार मनात भिरभिरत राहिला. नागपुरातील विजय प्रकाशनचे श्री. सचिन उपाध्याय यांच्याशी या विषयावर चर्चा करून कवितांचा एक आणि गझलचा एक असे दोन संग्रह प्रकाशित करण्याचे ठरवले आणि दि. ७-८-२०११ रोजी गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या शुभहस्ते आणि सुलभा हेर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘अग्निसखा’ हा काव्यसंग्रह आणि ‘असेही-तसेही’ हा गझलसंग्रह प्रकाशित झाले. अग्निसखाला संगीतकार आणि कवि यशवंत देव यांचे आणि गझलसंग्रहाला भीमराव पांचाळे यांचे लिखित आशीर्वाद लाभले. नुकताच १४ जानेवारी २०१२ रोजी विदर्भ साहित्य संघाचा नवोदित साहित्यासाठीचा पुरस्कार ‘असेही-तसेही’ या गझलसंग्रहाला प्राप्त झाला आहे.