आदरांजली- वासंती मुझुमदार

श्रुती मुझुमदार पंडित  यांच्याशी झालेला हा संवाद खास साहित्यसंस्कृतीच्या वाचकांकरता! 

साहित्यसंस्कृती प्रकाशनातर्फे वासंती मुझुमदारांना ही आदरांजली.

वासंती मुझुमदार (१९३९-२००३) 

कवितासंग्रह -सहेला रे,सनेही ( मौज प्रकाशन)

ललित लेख संग्रह - नदीकाठी, झळाळ( मौज प्रकाशन)

दमाणी पुरस्कार, सानेगुरुजी पुरस्कार, बहिणाबाई चौधरी पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार.

ग्रंथाली प्रकाशनाची सुरुवात करण्यामागे महत्त्वाचे योगदान. 
----

 - श्रुती मुझुमदार या  १८ वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेत आहेत. अशिएन एज, द पायोनियर, द आफ्टरनून, नवभारत टाईम्स, महाराष्ट्र टाईम्सध्ये त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहे.---

वासंती मुझुमदारांच्या कवितांमध्ये एक सहज आणि मोहक लय आढळते. संगीताची जाण वा आवड असेल तर ती लय दिसून येते असे म्हणतात. आईच्या कवितेत लय असावी याची  नेमकी कारणे काय असावी? तो काळ छंदबद्ध कवितांचा, संस्कृतप्रचूर भाषेचाही होता. हे गृहित धरले तरी त्यावेळी मुक्तछंद किंवा गद्य म्ह्णाव्यात अशा कविता मुद्दाम लिहिणारे सुद्धा होते. वासंती मुझुमदारांनी तसे प्रयत्न केले का?

श्रुती-  आईने वृत्तबद्ध कवितेसाठी किंवा कवितेत लय असावी याकरता मुद्दाम असे काही प्रयत्न केले नाहीत. तिच्या कवितांना लय होती याचा तिच्यावरच्या संस्कारांशी संबंध असावा. तिने केलेला संस्कृतचा अभ्यास, तिच्या घरातले वातावरण त्याला कारणीभूत असावे. आईचा पाणिनीचे काव्य तसेच त्याचे व्याकरणासंबंधी लेखन या दोन्हीचा अभ्यास होता.  तिने छंदात लिहिण्याचा कधी जाणिवपूर्वक प्रयत्न केल्याचे मला आठवत नाही. तसेच तिला वेगळेपणाचा हव्यासही नव्हता. त्यामुळे तिने मुद्दाम मुक्तछंद वा गद्यसदृश कविता केल्या नाहीत. पण नेमक्या एका वृत्तात नसलेल्या तरी लय असलेल्या काही कविता सनेही या कवितासंग्रहात आहेत. मुद्दाम वेगळ लिहायच अशी तिची धारणा नव्हती. तिच्या मनाला पटणारं ती लिहायची.

 सहेला आणि सनेही या दोन कविता संग्रहातील कोणती कविता/ कविता तुला आवडतात? 

 श्रुती-  नेमकी एक अशी कविता मला खरतर सांगता येणार नाही. पण मला "सनेही" हा संग्रहच खूप आवडतो. त्यातला romance खूप आवडतो. आई निसर्गप्रतिमांमधून उत्कटतेने भावना व्यक्त करायची. ते मला आवडत. सहेला या संग्रहातील काही कविताही मला जास्त आवडतात. आईच्या कवितेमध्ये दिसणारी पावसाची रूपं मला आवडतात. उदाहरण द्यायच झाल तर सहेला रे मधली 'झड घाली पाऊसपान' ही कविता मला आवडते. 

माझ्या लक्षात आहेत त्या ही ओळी  अशा आहेत

झड घाली पाउसपान

कौलावर चार पारवे

उखाण्यांतले कदंब हिरवे

हिरवी कृष्णा

हिरवे डोंगर

हिरवा तनुल पिसारा भवती

झड घाली पाउसपान

त्या काळात पुरुषांनी लिहिलेल्या कविता पाहिल्या तर हळुवार प्रेमकवितांबरोबरच त्यात दु:ख आळवणे, त्याचप्रमाणे विरह अशा भावना प्रामुख्याने दिसतात. आईच्या कवितेतला रोमांन्स कसा होता? लेखनात अनेक मानवी भावना येतात. पण एखादी भावना वारंवार दिसते, तिचा प्रभाव जाणवतो तस आईच्या लेखनात तुला दु:ख दिसत का?

नाही. दु:ख आळवण्याचा तिचा स्वभाव नव्ह्ता. याउलट तिला विनोदाची उत्तम जाण होती.  तशा दु:खी कविताही कमी आहेत.  अगदी आनंदी, तरल कवितांबरोबर तिच्या कवितेत उदास होण , निराश होण या भावना मात्र होत्या अस मला आठवतय. काही ओळी चटकन आठवल्या त्या- 

"असे धुमारे फुटत असतात

फिरून फिरून रडू दाटते 

वीज दिव्यातली लवलवती तार

पेटून काच फुटेल वाटते"

 या किंवा 

"अशा जळत्या उन्हात

अर्धा मोहोर जळावा,

मुक्या आंब्याच्या शाखेने

अश्रू एकला सांडावा"

लेखकाच्या लेखनासंबंधीच्या सवयी वा मांडणी , व्यवस्था याविषयी वाचकांना कुतुहल असत. कविता करतांना वा लेख लिहितांना आईची एखादी लकब किंवा आवश्यक वस्तू/ गोष्ट जवळ असावी अस काही होत का? 

श्रुती- आईला लिहायला दिवसभर वेळ मिळणं तस सोप नव्हत. मला आठवत की आई रात्रीच जास्त लेखन करत असे. आपल्यामुळे कुणाची गैरसोय होतं आहे वा काही कामे खोळंबली आहेत अस होऊ नये म्ह्णून तिने तशी निवड केली असावी. लिहितांना तासन तास ती एकाग्र होऊन लिहायची.  तिच्या oldfashioned desk वर बसून लिहिणं आईला जास्त आवडायचं. बेडवर बसून डेस्क जवळ घेवून ती  लिहायची. त्यावेळी वजनावर कागद मिळत. तसे तिने वजनावर कागद आणलेले असायचे. बरेचदा एका बैठकीत ती लेख पूर्ण करायची. 

लेखन करणारे पुरुष लेखक आणि स्त्री लेखक यांच्या लेखनसंबंधी सवयी किंवा सोयी याकडे बघितले तर पुरुष मंडळींची घरी बडदास्त ठेवली जात असे अस चित्र दिसत. त्याउलट सर्व स्त्री लेखिकांचा अभ्यास, वाचन वा लेखन कौटुंबिक जबाबदा-या प्रथम अशा चौकटीत होते. त्यावेळी समकालीन स्त्रियांना अधिक चिकाटी आणि निश्चय अंगी बाणवावा लागला असं दिसतं. 

श्रुती-   मी साधारण बारा वर्षाची होते तेव्हा आई एम. ए. करत होती. तिची परीक्षा होती तेव्हाची ही गोष्ट. दुस-या दिवशी सकाळी आईचा पेपर होता. आदल्या रात्री १५ एक मित्रमंडळी घरी जेवायला होती. रात्री दीड्च्या सुमारास सर्व घरी गेले. मागच सगळं आवरल्यावर मग कुठे आईला अभ्यासाला वेळ मिळाला. रात्रभर जागरण करून सकाळी आई पेपरला गेली होती. ही परीक्षा लक्षात राहण्याच कारण असं की आईला एम एला गोल्ड मेडल होत. तिचा हा निश्चयी स्वभाव शेवटपर्यंत होता. 

तुमच्याकडे मुंबईला लेखक आणि कलावंताच येण जाण होत. त्याबद्दल काही सांगशील का?

श्रुती-इंदिरा संत आमच्याकडे येत. आमच्याकडे राहत. त्या आईला मुलगी मानत असत. मंगेश पाडगावकर, वसंत बापट, कुमार गंधर्व आमच्याघरी येत असत. पु.ल. देशपांडे आमच्याकडे येत. लेखन व्याकरण याविषयी गप्पा आणि चर्चा रंगत. लेखना व्यतिरिक्त एक इंदिरा संतांची एक गोष्ट माझ्या लक्षात राहिली आहे. त्यांना तेव्हा ऐकू कमी येत असे. त्या कानाला यंत्र लावत. कमी ऐकू येत अशी माणसं आपल बोलण नीट ऐकू याव म्हणून मोठ्य़ान बोलतात अस आपण पाहतो. ते नकळत होत असत. इंदिरा संताच्या मनात  आपण तसे खूप मोठ्यान बोलत नाही ना? तसे होऊ नये असे होते. म्हणून इंदिरा संत खूप काळजी घेत. त्याचा परिणाम असा व्हायचा की त्याच अनेकदा खूप हळू आवाजात बोलत.

आईच्या कविता, ललित लेखन यामध्ये तुला कोणत लेखन अधिक आवडत?

मला आईचं ललित लेखन जास्त आवडत. आईचा जन्म आणि बालपण क-हाडमध्ये. कॉलेजच शिक्षण पुण्याला फर्ग्युसनला. त्यानंतर सर्व आयुष्य़ मुंबईला गेल. लेखनाची आवड, चित्रकला आणि विविध कलांमध्ये तिला रस होता. ती उत्तम चित्र काढायची. ही सर्व आवड होती आणि त्या निमित्त्याने तिन भटकंती सुद्धा केली. वेगवेगळ्या प्रांतातली मराठी माणस तिला जवळून बघता आली. अनेक पुस्तकांची मुखपृष्ठ तिनं केली.(नदीकाठी, सहेला आणि पाडगावंकरांच्या काही पुस्तकांची मुखपृष्ठे) तिला विनोदाची उत्तम जाण होती. ती स्वत:वरही सहज विनोद करायची. या सर्वांच प्रतिबिंब तिच्या ललित लेखनात दिसत. तिच्या ललित लेखनात तिच निसर्गाच प्रेम, तिच्यावर झालेले संस्कार अशी स्वभाव वैशिष्ट्ये दिसतात. मौज प्रकाशनाने प्रकाशित केलेला "नदीकाठी" हा तिच्या लेखांचा संग्रह आता ऑडियो पुस्तक म्हणूनही उपलब्ध आहे. स्वाती सुब्रमण्यम हिने तो दीड वर्षापूर्वी प्रकाशित केला आहे.(निर्मिती-स्वाती सुब्रमण्यम)

लेखक, प्रकाशक, समीक्षक आणि वाचन मिळून होणा-या प्रकाशन व्यवहाराकडे बघण्याचा आईचा दृष्टीकोन काय होता?आपली पुस्तके एखाद्या ठराविक पद्धतीने व्हावी असा तिचा हट्ट होता का?

श्रुती-आईचे लेखन दीपावली, दीपलक्ष्मी, अनुष्ठुभ अशा अनेक मासिकांतून आले. ती दिवाळी अंकात शेवटपर्यंत लिहित होती. अगदी आजारपणातही तिच लेखन सुरु होत.

आपली पुस्तके एखाद्या ठराविक पद्धतीने व्हावी असा तिचा हट्ट वगैरे नव्हता. किंबहुना तसं काही नव्हत. पण तिची चारही पुस्तके मौजेने - भागवतांनी तिची पुस्तक केली.  एक लेखिका म्हणून तिची लॉयल्टी मात्र भागवत कुटुंबाशी होती असं म्हणेन. 

आजारी असतांना आईच लेखन सुरु होत असं म्हणालीस.तेव्हा लेखन सुरु ठेवणे हे खूप चिकाटीचे काम आहे. 

श्रुती- हो, आईची चिकाटी खूप होती. ती आय.सी.यू.मध्ये होती. दोनदा कोमातून बाहेर आली होती.  ती वेंटीलेटरवर काही काळ होती. कोमातून आल्यावर आपण पुन्हा कोमात जाऊ ही शक्यता तिला माहिती होती. कॅन्सर झाला होता, त्यामुळे तस म्हणायच तर आईकरता आपण उद्या जिवंत असू ही गोष्टसुद्धा स्वप्नवत होती. पण या सर्व काळात तिची लिहिण्याची जिद्द कायम होती. दिवाळी अंकाचे तीन लेख, पाच कविता तिन शेवटच्या आजारपणात लिहून मला दिल्या होत्या. तिचा मेंदू काम करत होता ही आनंदाची गोष्ट होती. दिवाळी अंकाच लेखनच नाही तर पाडगावकरांच्या "आनंदयात्री" या पुस्तकाच मुखपृष्ठही तिनंच केल.त्यांच्या ब-याच पुस्तकाची मुखपृष्ठ तिने केली आहेत. पाडगावकरांच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ आपण करावं असा तिचा थोडा हट्ट होता म्हटल तरी चालेल.

गायक, वादक आणि साहित्यिक अशा मंडळींची उठबस असलेल्या घरात आपण कोणत क्षेत्र निवडावे असा तुझा निर्णय केव्हा आणि कसा झाला? 

श्रुती-  मी फार उशीरा काय करायच हा निर्णय घेतला. आधी ज्याकडे मी छंद म्हणून बघायचे तेच माझे प्रोफेशन झाले. मी नाटकात काम करायचे थोडफार... लेखन करायचे..पण मी  focused नव्हते. मी तीन भाषांमध्ये लेखन करत होते. बा.भ बोरकर आणि पु.ल.देशपांडे यांनी सगळ्या भाषांमधून ते सुरु ठेव अस मला सांगितल होत. .मी अमूक या एका क्षेत्रात करियर करावे असा कधी आईने कधी आग्रह ठेवला नाही. मला निवड करण्याचं स्वातंत्र्य होत. 

टाईम्सच्या पत्रकारितेच्या संबंधात आईशी तुझ्या काही गप्पा व्हायच्या का? तुझ्या लेखनाबद्दल आईची प्रतिक्रिया काय होती? 

श्रुती- मी मुंबई टाईम्सची संपादक होते,तेव्हाची एक आठवण आहे. मुंबई टाईम्सचा उद्देश हा यंग वर्गाला मराठीकडे खेचून घेण हा होत. त्यामुळे त्या लेखनाचा ग्राफ ठरलेला होता. आधी इंग्रजाळलेली मराठी आणि नंतर मग हळूहळू बोलीभाषेपर्यंत मराठीकरण होणं अपेक्षित होत. पण इंग्रजाळलेल लिहित असतांना एकदा आईन फोन करून मला चांगल झापल होत. "तुझी भाषा, किंवा तू ज्यांच्याकडून लिहून घेतेस त्यांच्या लेखनाकडे डोळे उघडून बघ. त्याविषयी मला माझ्या मैत्रिणींकडूनही ऐकून घ्याव लागत." असं ती म्हणाली होती.

तेव्हा मग मी आईला त्यामागे काय कारण आहेत ते नीट समजावून सांगितल होत. शुद्धलेखनाबाबत ती नेहमी काटेकोर होती. शाळेत असतांना व नंतरही मी पत्र लिहायचे. सुटीत कुठे गेले की घरी पत्र पाठवायचे. घरी परत आले की आईने त्यातल्या चुका काढलेल्या असत त्या ती दाखवायची. त्या नीट करून घ्यायची. त्यामुळे लेखनात चुका वा इंग्रजी शब्द येण हे तिला खटकत असे. त्या पार्श्वभूमीवर मी मुंबई टाईम्समध्ये लिहितांना योग्य भाषा वापरत नाही याच आईला वाईट वाटण साहजिक होत. मी पुढच वर्षभर माझं लेखन पहा असं तिला सांगितल तेव्हा तिची खात्री पटली होती. नदीकाठी मधली ओघवती भाषा, शब्दचित्रे, व्यक्तिचित्रे ज्यांना माहिती आहे त्यांना तिला माझे मुंबई टाईम्सचे लेखन आवडले नसेल हे वेगळे सांगायला नको. 

पण ह्या व्यतिरिक्त कधी माझ्या कामाबद्दल चर्चा झाली नाही.
---

वासंती मुजुमदार यांच्या ७५व्या जन्मदिवसाच्या निमित्त्याने त्यांच्या स्मृतीला अभिवादन. तरल संवेदना जपणा-या ,निसर्ग आणि माणसांवरच प्रेम- चित्र आणि लेखनाच्या माध्यमातून उलगडून दाखवणा-या या लेखिकाचा परिचय वाचकांकरता प्रेरणादायी ठरेल.

या मनमोकळ्या संवादाकरता श्रुती मुझुमदार यांचे आभार मानते.

सोनाली जोशी

-----

About copyright- सर्व पुस्तके ©श्रुती मुझुमदार पंडित

About the Author

साहित्यसंस्कृती