टेलिफोननं दिलेलं जीवदान

कथा- जिरो अकागवा,अनुवाद- निस्सिम बेडेकर

चुकीच्या नंबरवरून टेलिफोन येणं ही खरोखर डोक्याला वैताग आणणारी गोष्ट आहे. राँग नंबरवरून फोन आल्यानं खूष होणारी व्यक्ती या जगात अस्तित्वात नसेल. पण त्यामुळे केवळ कटकटच होते आणि फायदा कधीच  होत नाही असं म्हणावं तर तसंही नाही. आता मला तसं का वाटतं हे जरा सांगायला हवं. त्या वेळी मी एका पार रिकाम्या, वापरात नसलेल्या एका खोलीत एका खुर्चीवर बसलो होतो. ती खुर्चीसुद्धा कधीच बसू नये वाटावं अशी. बाहेर जाणंही मला शक्य नव्हतं. कारण माझ्यापासून जेमतेम तीन मीटरवर पिस्तुलाची एक नळी जणू  आ वासून माझ्यावर नजर ठेवून होती. माझ्यावरच रोखलेली होती ती. ते पिस्तुल ज्याच्या हातात होतं, तो होता एक पोरगेलासा मामुली गुंड. त्याचं नाव होतं 'कात्सुजी', पण सगळे त्याला 'कात्सु ' म्हणूनच ओळखायचे. त्याच्या बाजूलाच एक लाकडी टेबल होतं, आणि टेबलावर टेलिफोन होता. गेला अर्धा तास आम्ही दोघं एकमेकांशी एक शब्दही न बोलता वाट बघत होतो-फोनची. माझं जगनं किंवा मरनं आता त्या फोनवर अवलंबून होतं.   या खोलीतून जाताना कात्सुच्या बॉसनं-अंगापिंडानं चांगला धिप्पाड गडी होता तो-त्याला बजावलं होतं. "कात्सु, नीट ऐक. याला बिलकुल निसटू देऊ नको, कळलं? करडी नजर ठेव साल्यावर. मी जरा मोठ्या बॉसशी बोलून घेतो, याचं काय करायचं ते. काय ते ठरलं की इथे फोन करून तुला सांगतो. "त्सुदोन!! एक दे गोळी साल्याच्या मेंदूत!" असं म्हटलं, की ताबडतोब दाब घोडा पिस्तुलाचा! ठीक?" कात्सुनं होकारार्थी मान डोलावली. त्याचा चेहरा चांगलाच ताणलेला होता.    तर अशा प्रकारे आम्ही 'निर्णया'ची वाट बघत होतो. पण मी तसा शांत होतो. आमच्या गान्गच्या पैशांची व्यवस्था बघण्याचं काम माझ्याकडे होतं, आणि मी त्यातल्या बऱ्याच पैशांवर डल्ला मारला होता. ती गोष्ट आता उघडकीला आली होती, त्यामुळे आता हाच आपला शेवट असं समजून मी जगण्याची आशा सोडून दिली होती. भेदरलेला होता तो कात्सु. अर्थात त्यात वावगं काहीच नव्हतं म्हणा. आधीच तो होता कोवळा पोरगा, त्यात त्यानं अजून कुणाला उडवलंसुद्धा नव्हतं. त्याची बोबडीच वळली होती. मी त्याला विचारलं, सिगरेट ओढू का म्हणून. तर तेवढ्यानंही तो किंचाळला, "हलू नको! गोळी घालीन नाहीतर!" मी खांदे उडवले आणि तो नाद सोडून दिला.

तेवढ्यात टेलिफोन खणखणला.   एखाद्यानं थप्पड मारावी तसा कात्सु एकदम दचकला आणि काही वेळ वाजणाऱ्या फोनकडे तसाच बघत बसला. "अरे फोन घे की गध्ध्या लवकर!" असं मी म्हणताच त्यानं एकदम झडप घालून रिसिव्हर उचलला. " हलो...काय? दोन वाडगे नूडल्स?....मस्करी करतोस होय? कुठेही फोन करतो हरामखोर!" मी स्वतःशीच हसलो. ही खोली म्हणजे माझं गुप्त ऑफिस होतं, पण या फोनचा नंबर आणि कुठल्यातरी नूडल्सच्या हॉटेलचा नंबर बराचसा सारखा होता. त्यामुळे बऱ्याचदा या फोनवर गिऱ्हाइकांचे चुकून फोन यायचे. पुन्हा एकदा पंधरा मिनिटांची जीवघेणी शांतता. त्याचं दडपण आणि वैताग अधिकाधिक वाढत होता की काय, त्याचा चेहरा अक्षरशः पांढराफटक पडला होता. पुन्हा एकदा फोन. "हलो-- काय?...'ओयाकोदोन' एक?...अरे हे काय नूडल्सचं हॉटेल नाहीये!!" त्यानं दणकन रिसिव्हर आपटला. आता त्याच्या चेहऱ्यावर घामाचे टपोरे बिंदू  जमले होते. "काय रे पोरा, बरा आहेस ना?" मला आता खरच त्याची काळजी वाटायला लागली होती. "ए ! गप!" तो खेकसला. आता तो कुठल्याही क्षणी गोळी मारेल असं वाटत होतं. त्याच मिनिटाला टेलिफोन खणखणला.   "हलो....ठी..ठी...ठीक आहे!!" आला का एकदाचा त्याचा फोन. आता मी मरणाची तयारी केली. कात्सुनं रिसिव्हर ठेवला. "आला रे फोन! 'त्सुदोन! एक...' म्हणून!...हो...हो...तयार..."   पण काहीतरी विचित्रच घडलं. अचानक कन्ह्ल्यासारखा आवाज करून -जणू  हृदय पिळवटून निघत असावं तसा- कात्सु धाड्कन जमिनीवर कोसळला आणि तत्क्षणीच त्याची हालचाल बंद पडली. जवळ जाऊन बघावं तर...ठार मेला होता तो! मुळातच त्याचं हृदय कमकुवत असणार नक्की---तेवढ्यात पुन्हा एकदा फोन. रिसिव्हर उचलला, तर तो होता त्याच्या बॉसचा आवाज.   "कोण कात्सु का? बराच वेळ ताटकळत ठेवलं तुला. मोठा बॉस म्हणला, की मला स्वतःच्या डोळ्यांनी  त्या साल्याचे तुकडे तुकडे होताना बघायचंय. तर त्याला ये घेऊन इकडे. कळलं?" ----क्षणभर माझा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसेना.

मग काही वेळापूर्वीचा कात्सुनं घेतलेला तो फोन होता तरी कुणाचा? तसाच आ वासून उभा होतो, तेवढ्यात पुन्हा एकदा फोन वाजला. " ए मूर्खा! मघाशी कात्सुदोन एक असं म्हणालो, तर साधं नावही न विचारता फोन ठेवलास होय रे लेका! दोन नंबर विभागात राहतो मी. माझं नाव वातानाबे. काय कळलं?" मी हलकेच मान डोलावली. मामला असा होता तर!   ताणामुळे आणि दडपणामुळे 'कात्सुदोन एक' असं म्हटलेलं त्याला 'त्सुदोन! एक' असं ऐकू आलेलं असणार नक्की! मी नकळतच हसत सुटलो. जर...चेहराही कधी न पाहिलेल्या त्या कोणा वातानाबेनं 'कात्सुदोन' ऐवजी 'तेन्दोन'ची ऑर्डर दिली असती, तर माझं आयुष्य नक्कीच संपलं असतं. मग त्यानंतर? अर्थातच मी धूम ठोकली. म्हणूनच तर आज हे तुम्हाला सांगतोय मी..... आता कळलं का तुम्हाला, कधीकधी चुकून आलेला फोनही कसा उपयोगी पडतो ते?---फक्त एकाच रुखरुख लागून राहिलीये हो मनाला. माझा जीवनदाता असलेला तो कोण वातानाबे...बिचाऱ्याला कात्सुदोन काही खायला मिळालं नाही हो.

टीप:

कात्सुदोन:  वाडगा भरून भात आणि वर तळलेलं पोर्क कटलेट असा जपानी खाद्यप्रकार.

तेन्दोन : वाडगा भरून भात आणि वर तळलेले मासे व भाज्या असा जपानी खाद्यप्रकार.

त्सुदोन: ढिशांव! अशा अर्थाचा जपानी उद्गार.

कथा- जिरो अकागवा

अनुवाद- निस्सिम बेडेकर

Category: 

About the Author

निसीम बेडेकर's picture
निसीम बेडेकर