ड्रेस कोडचं कोडं

ड्रेस कोडचं कोडं
सुषमा दातार

तिचं लेखन पूर्ण होऊन सेव्ह झालं. तोवर पहाटेच्या पक्षांच्या किलबिलीची जागा हलके हलके माणसांच्या आणि वहानांच्या आवाजानं घ्यायला सुरवात झाली होती. समाजसेवी संस्थांबद्दल लिहिलेल्या लेखमालेतला शेवटचा लेखही मनासारखा पूर्ण झाला होता. मोठ्याश्या सुट्टीसाठी अमेरिकेला जाण्याआधी काम संपलं म्हणून ताण हलका झाला. ईमेल उघडून तिनं तयार झालेले तीनही लेख पाठवून दिले.तिच्या या लेखांमुळे काही संस्थांना देणग्या मिळाल्याची माहिती आणि धन्यवाद देणाऱ्या तीन चार मेल आलेल्या दिसल्या.त्या पाहून लेखनाचं चीज झाल्याचं समाधान वाटलं.तरीही तिच्या एका मित्राचे स्पष्टपणे ठणकावणारे शब्द कानात घुमलेच "क्षमता आहे पण तू प्रत्यक्ष कुठल्याच संस्थेचं काम करण्याची तोशीस घेत नाहीस.नुसतं पोशाखी आहे तुझं काम" बोचतं ते पण तीही तो आरोप चेष्टेत टोलवते "माझा पोशाख कुठे फॅबइंडिया छापाच्या साड्या,कुर्त्यांचा असतो! मी अगदी लिमिटेड वॉर्डरोबवाली झालेय आता." तरी बोच राहतेच.आत्ता ती कमी होण्यासाठी त्या धन्यवादाच्या मेल तिनं पुन्हा वाचल्या.पण पोशाख हा शब्द मनात रेंगाळलाच आणि ती दचकली "आपलं पोशाखांचं पॅकिंग राहिलंय.आता जायला फक्त चोवीस तास राहिलेत तेव्हा पोस्टपोन करायला वावच नाही.कसलं हे ड्रेसकोडचं झंझट" असं म्हणत लॅपटॉप बंद केला. स्वयपाघरातला अजयच्या वावरण्याचा कानोसा घेतला.थोड्या वेळानं त्याच्या स्पेशल हर्बल चहाचा सुगंध यायला लागेल म्हणून इन ञॅंटिसिपेशन ती खुश झाली. पण तेवढीच ती खुशी. बेडरूमकडे जाताना ड्रेसचं कोडं सोडवायचा प्रयत्न चालूच."तीन चार साड्याच तर पॅक करायच्या. इतकं काय टेन्शन? आपण काही सुनामुलींच्या बाळंतपणाला चाललो नाहीये. पाचपन्नास वस्तू, एक्सेस बॅगेज भरून नेणाऱ्या मैत्रिणींसारखं. इथे मुलामुलीच्या लग्नाचाच पत्ता नाहीये.तर बाळंतपण कुठलं.लेकीच्या ऑलमोस्ट होणाऱ्या अमेरिकन नवऱ्याच्या बहिणीचं फक्त लग्न अटेंड करायचंय.पण ड्रेस कोड असतो म्हणे तिकडे.ञॅज इफ इथे नसतो! " असं मनात म्हणत ती बेडरूममधे शिरली. बेड खालची अर्धी रिकामी बॅग पुढे ओढली.दोन दिवसापूर्वीच पूर्ण पॅक होऊन,तयार असलेली अजयची बॅग दिसली शेजारी.दोन्हीला नीटसपणे लेबलं लावलेली.

कौतुकानं त्याकडे पहात तिनं कपाट उघडलं......एरवी "कल करे सो आज" या पद्धतीनं काम करणाऱ्या आपण, सहा-सात मधल्या कोणत्या तीन साड्या घ्यायच्या ते ठरवू शकत नाही? कमाल आहे आपली पण. असं स्वतःलाच टोचत ती साड्यांवरून हात फिरवू लागली. आणि तिला मागच्या महिन्यात तनुजानं फोनवरून दिलेली तंबी आठवली. आईचं बौध्दिक घेण्यासाठीचा सूर आणि त्यासाठीचं स्पेशल संबोधन वापरून ती म्हणाली होती (खरं म्हणजे 'करवादली होती' हे जास्त योग्य होईल.ऑफिसात बॉसशी आणि नंतर स्टीव्हशी वाद झालेला असणार.बाय द वे,तनुजा तिची लेक आणि स्टीव्ह तनुजाचा स्पेशल मित्र.) "ममा,जेनीनं स्टीव्हच्या थ्रू ड्रेस कोड कळवलाय.जेनीच्या नवऱ्याच्या साईडलाही इंडियन कनेक्शन आहे.इंडियन बायका साड्या नेसतील असं तिनं गृहित धरलंय.तुझ्या त्या जाडजूड आणि डार्क कलर्सच्या ट्रॅडिशनल पैठणी-कांजीवरम वगैरे नको हा आणूस.टेक्श्चचरला हलक्या आणि पेस्टल कलर्समधे नव्या घे.रिच क्रेप सिल्क किंवा किंचित जरीची शिफॉन अशा दोन-तीन साड्या घे नवीन.नाही तर सरळ फॅब इंडियातून खादी सिल्कचे सलवार कमीज घे तिथला मीडियम साईज होईल तुला.थॅंक गॉड तू अजून शेप मधे आहेस. सिव्हिल सेरिमनी असला तरी वेडिंगसाठी पेस्टल रंग हे लक्षात ठेव.प्री आणि पोस्ट वेडिंग डिनरसाठीही दोन साड्या लागतील." जरा जास्तच बोलत होती तनु.हे सगळं स्पीकर फोनवर चाललेलं असल्यानं अजय सगळं ऐकत होता.

आई-लेकीच्या चकमकीचा फक्त श्रोता म्हणून एन्जॉय करणं हा त्याचा जन्मसिध्द हक्क. "अमेरिकन स्टीव्हच्या बहिणीच्या लग्नासाठी येणारी भारतीय आई आऊट ऑफ प्लेस दिसू नये म्हणून कोण हा आटापिटा.मोठी आलीये अमेरिकन.इथे असताना विटक्या ट्रॅक पॅंट्स आणि ढगळे टॉप हा जिचा राष्ट्रीय पेहराव, तिनं मला शिकवावा ड्रेस सेन्स!! आणि साड्यांमधले बारकावे हिला कधीपासून कळायला लागले? लग्न करायचा, तेही भारतीय पद्धतीनं करायचा विचार आहे की काय?" या विचारामुळे आपल्या रागाचं नक्की कारण काय अशा गोंधळात ती पडली. म्हणजे मुलगी आपल्याला ड्रेस सेन्स नाही, असं सुचवून शिकवतीय म्हणून, का तिचं आणि स्टीव्हचं नातं अजून लग्नाच्या मुक्कामाला जात नाहिये म्हणून आपल्याला राग येतोय हे काही तिला कळेना.तनुच्या फेसबुक पेजवरचं "इट्स कॉम्पलिकेटेड" हे स्टेटस आठवलं. तिच्या कपाळावरच्या आठ्या, रागाचा चढणारा पारा दर्शवू लागलेल्या पाहून ,अजय हसत हसत तिला हातानं 'कीप कूल' अशी खूण करू लागला होता.त्याच्या खाणाखुणा पाहून रागाची जागा आठवणीच्या प्लेझंट पुराव्यानं घेतली होती. लग्नानंतरच्या पहिल्या महिन्यातली आठवण. सासूबाईंबरोबर कुठल्यातरी फंक्शनला जायला मनाविरुध्दच पण ती छान तयार होऊन निघाली होती.तेव्हा त्यानं अशीच खुणेनं पावती दिली होती. फंक्शनला आणि सासूला योग्य अशी पोक्त साडी निवडल्या बद्दल.अर्थातच ती पहिली आणि शेवटची कॉम्प्लिमेंट. "अरेच्चा आपण ती इतकी लक्षात ठेवलीय? म्हणजे कॉम्प्लिमेंट्सचं अजून महत्व वाटतं की काय आपल्याला?"असा प्रश्न पडला तिला.

तिकडे तनुच्या इन्स्ट्रक्शन्सचा धबधबा चालू होता.आणि तिला आठवत होत्या कॉलेजातल्या विद्यार्थिनींच्या कॉम्प्लिमेंट्स.एक धीट,हुशार मुलगी एकदा चक्क म्हणाली होती "मॅडम तुमचं शिकवणं मला आवडतं. आम्हाला काही कळत नाही असं समजून नाही शिकवत तुम्ही आणि तुमच्या ड्रेस सेन्समुळे अधिक डिग्फाईड टीचर वाटता.बॉईज ऑलसो नोटिस इट हं." तेव्हा आपण चक्क लाजलो होतो.नंतर सोय म्हणून आणि हौस कमी झाली म्हणून सलवार कमीज स्वीकारले आणि साड्यांचा जमाना मागे पडला.असं सगळं आठवत असताना तनुच्या बोलण्यात 'डिझायनर साडी' असा शब्द आल्यानं ती मनानं परत जागेवर आली होती. "पमी मावशीला माहीत आहे कुठे मिळतील ते.तुला कामात वेळ होणार नसला तर सरळ पमीमावशीला आणायला सांग.अगदी डिझायनर नकोत पण ब्लाऊज काकूबाई फॅशनचे नको शिवूस.इकडे समर आहे.म्हणून रिसॉर्टमधे आहे वेडिंग.म्हणजे आऊट डोअर." हे सगळं ऐकताना तिला राहून राहून आश्चर्य वाटत होतं. "माझ्या साड्या हा हिच्या प्रतिष्ठेचा प्रश्न कधी पासून झाला?" अजयचा हेवाही वाटला. त्याला फक्त दोन वाक्यांची सूचना. "बाबा तुझ्यासाठी नेहमीचे फॉर्मल्स.तू माझ्या मित्रांची एक दोन फॉर्मल जॅकेट बॉरो सुध्दा करू शकतोस." हे बरंय 'सूट'सुटीत. असा विचार येऊन,सूट घातलेली स्वतःची छबी पटकन तरळून गेली तिच्या डोळ्या समोरून आणि खुदकन हसू आलं.तनु तिकडून ओरडली "प्लीज ममा, लाईटली घेऊ नकोस.प्रॉपर ड्रेस कोड वगैरेची तुला सवय नाहीये." असं म्हणून तिनं सेलफोन बंद करून फेकला असणार बेडवर आणि दणादणा खोली आवरायला घेतली असणार.टेन्स असली की ती असंच करते हे तिला मागच्या अमेरिका भेटीत चांगलं लक्षात आलं होतं.पण हिच्याही मनात धुसफुस चालूच होती " व्वा ड्रेस कोडची माहिती नाही म्हणे.लग्न होईपर्यंत आणि नंतर एकत्र रहात होतो तोवर 'मुलीच्या जातीनं कसं स्थळकाळाला शोभतील असे कपडे घालावेत.' असली वाक्यं ऐकतच तर मोठ्या झालो.तरी आपले आपण शिवायला शिकून लिमिटेड बजेटात इतर काहीजणींसारखे लेटेस्ट कपडे घातलेच आपण.आणि ही मला शिकवतेय ड्रेस कोड." असा सगळा फ्लॅशबॅक इन टु फ्लॅशबॅक चाललेला असताना अजय बेडरूममधे डोकावला आणि चहा झाल्याचं सांगितलं. बरोबर चहाचा सुगंधही आला पण मूड काही आला नाही परत.

तिनं बॅग परत बेड खाली ढकलली आणि चहा घ्यायला किचनमधे गेली.तिचा लांब चेहरा पाहून अजयनं आणखीनच खिजवलं. "ए तू जेनीच्या लग्नासाठी वेस्टर्न ड्रेस घेना एखादा.यू स्टिल लुक यंग." तिनं चहाचा कप खसकन पुढे ओढला आणि म्हणाली "हो ना तिशीत पोचायला आलेल्या मुलीची यंग आई.इथे आत्ता कुठे पॅंट्स झेपायला लागल्या आहेत मला आणि तू भलतं काही तरी बोलू नकोस." पुन्हा तोच गोंधळ राग नक्की कशाचा !! तीशीतही अनमॅरीड असलेल्या मुलीचा की तिनं सोडलेल्या फर्मानांचा? अजयचा चेहराही क्वश्चन मार्क झाला.पण चेष्टा कुठे थांबवायची हे त्याला लग्नानंतरच्या पस्तीस वर्षात चांगलंच कळलेलं असल्यानं त्यानं आपल्या वेस्टर्न क्लोद्जच्या पुढच्या सजेशन्स गिळून टाकल्या आणि म्हणाला "तू तनुजाच्या ड्रेस कोडचं एवढं मनावर घेऊ नकोस.तुला मनीषाच्या लग्नातली तनुजाची आणि तुषारची गंमत आठवते?" तिला धाकट्या नणदेच्या लग्नातला "कपडे-पट" सीन बाय सीन चांगला डोळ्यासमोर आला. तिनं स्वतः डिझाईन करून तनुसाठी एक छानसा परकर पोलका शिवून घेतला होता. त्यावर शिफॉनची ओढणी.तुषारसाठी शिवलेलं धोतर,कुडता आणि छानसं जाकीट.अशी जय्य्द तयारी केली होती तिनं, आपल्या साड्यांबरोबरच.

घरचं लग्न म्हटल्यावर येवढं हवंच करायला अशी आईनं आणि सासूबाईंनी तंबीच दिली होती तशी.अजयलाही शब्दशः आठवला तो प्रसंग "लग्नाच्या दिवशी दोघांनी कधी नव्हे ते एका सुरात डिक्लेर केलं होतं 'हे कपडे आम्ही घालणार नाही.बावळट आहेत ते आणि ते घालून हॉलवर आम्हाला खेळता येणार नाही.' तेव्हा तू इतकी अपसेट झालीस.तुला मला काही सुचायच्या आत आईनं त्यांना तंबी दिली होती 'घरचं लग्न आहे आणि त्यासाठी हेच कपडे घालायचेत.मुकाट्यानं घाला.' " तिलाही लख्ख आठवत होतंच. "अरे हो ना.लग्न लागलतं न लागतं तोच दोघांनी येऊन चक्क बाजावलं होतं आईंना 'आता आत्याचं लग्न झालंय.आम्ही आमचे नेहमीचे कपडे घालणार.' आणि खोलीत जाऊन त्यातल्या त्यात बरे पण त्यांना हवे ते कपडे घालूनच आले.बॅगेत कधी पॅक केले होते ते कळलंही नव्हतं आपल्याला.ही ह्याची मनमानी आणि ही आता मला ड्रेस कोड शिकवतेय.तरी बरं तुषार नाहीये येणार या सगळ्या फंक्शनना.नाही तर आपल्याला किती बावळट ठरवलं असतं कुणास ठाऊक." यावर अजयनं तिच्याकडे बघून मजेशीर चेहरा केला आणि म्हणाला "सोssssमोठ्यांचं फक्त पार्शली ऐकणाऱ्या या मुलांकडून काय धडा घ्यायचा आई बापांनी?" एकदम डोक्यात प्रकाश पडला तिच्या आणि ती खुदकन हसली. "जाडी न वाढल्यानं ब्लाउजच्या मापात बदल नाहिये ते एक बरं झालं." असं म्हणत तिनं कपाटातल्या हॅंगर वरच्या आणि घड्यांमधल्या कपड्यांकडे वरून खाली,डावीकडून उजवीकडे असं पाहून घेतलं.मग भराभर घड्या काढल्या.एका कॉलेजच्या फंक्शनसाठी घेतलेली मोतिया रंगाची नक्षीदार कांथा,तुषारची घरगुती मुंज केली तेव्हा सासूबाईंनी घेतलेली रेशमी अबोली बुट्ट्यांची पांढरी बनारसी आणि अजयनं कधी नव्हे ती पन्नासाव्या वाढदिवसाला आणलेली इवल्या सोनेरी काठाची गुलाबी कांजीवरम.तेव्हाचाच सख्ख्या मैत्रिणीनं कशिदा करून दिलेला सिल्कचा सलवार कमीज.पॅकिंग करतानाच तिला या सगळ्याची इन्स्पेक्शन करणारी तनु दिसायला आणि ऐकायलाही येऊ लागली."काय ममा जरा या निमित्तानं नव्या साड्या घेतल्या असत्यास तर एनव्हायरॉनमेंट डॅमेज नसतं झालं.तशा ठीक आहेत पण दे कुड हॅव बीन बेटर."इत्यादी इत्यादी. त्याचाच एक्झॅक्ट रीटेक झाला तिथे पोचल्यावर.

ती स्वतः वेस्टर्न,इंडो-वेस्टर्न,इंडियन असं काय काय केव्हा घालणार,इतर कोण काय घालणार अशी बरीच बदबद झाली.तिनं वाद घातला नाही.यावेळी तनुला लग्नाबद्दल काही म्हणजे काही विचारायचं नाही असं तिनं आणि अजयनं ठरवलं होतं त्यामुळे.त्या ग्राउंडवरही वादाचा प्रश्न नव्हता.आईच्या हातच्या आयत्या घरगुती जेवणानं तनु जरा शांतही झाल्यासारखी वाटली.स्टीव्हही अधून मधून डिनरला यायचा आणि तिच्या कुकिंगचं कौतुक करून ब्राउनी पॉइंन्ट्स मिळवून जायचा.पहिल्या फंक्शनचा दिवस उजाडे पर्यंत तरी एकुणात 'स्टेटस को' राहिला. जाण्याची वेळ झाली. खोलीतून बाहेर आलेल्या आईला तनुजानं पूर्ण वरखाली,उभं आडवं निरखून घेतलं.काही बोलली नाही.तिनंही काही विचारलं नाही.तिनंही तनुला नीटच पाहून घेतलं. ञॅंकल लेंग्थ वेस्टर्न ड्रेस आणि त्यावरच्या शूज मुळे तनुला ड्रायव्हिंग अवघड जाणार होतं म्हणून अजयला ड्राईव्ह करायची परवानगी कधी नव्हे ती दिली होती तिनं.त्यामुळे की कुणास ठाऊक पण टेन्स वाटली तिला.आकाशी सिल्कच्या छान फिटिंगच्या ड्रेसमधे दिसत मात्र होती छान डौलदार.या बदलाचं कौतुक वाटलं तिला.हॉटेल पर्यंतचा प्रवास न बोलताच झाला.लाउंजमधे प्रवेश करताच सूट घातलेला स्टीव्ह स्वागताला पुढे आला आणि कधी नव्हे ते त्यानं त्यांच्या समोर तनुजाला जवळ घेतलं आणि काही तरी पुटपुटला कानात."बाकी सगळे आलेत.आपण आत जाऊया" असं म्हणत तिच्या आणि अजयच्या खांद्यावर हात ठेवून लाउंजकडे नेलं.आणि......तनुचा चेहरा पडलाच. भरजरी भारतीय कपड्यांमधला जथा त्यांच्या भोवती जमा झाला.स्टीव्हची आई,वडील,जेनी,तिचा इंडियन कनेक्शन असलेला होणारा नवरा,त्याचे आई-वडील सगळे साड्या कुर्ते अशा भारतीय कपड्यात.

"सॉरी हे मला माहीत नव्हतं.सरप्राईज आहे माझ्यासाठी सुध्दा" असं काहीसं पुटपुटत तिनं आईकडे आणि स्टीव्हकडे पाहिलं.तोही तसाच चेहरा करून सॉरी म्हणत असल्या सारखा. पण हा धक्का कमी की काय त्या नटलेल्या लोकांनी त्यांच्या भोवती जमून स्टीव्हकडे पाहून "कमॉन स्टीव्ह,कमॉन स्टीव्ह असा घोष सुरू केला." त्यानं बावरल्यासारखं ञॅक्टिंग करत खिशातून अंगठी काढली आणि तनुच्या समोर गुडघ्यावर बसून अमेरिकन ञॅक्सेंटवाल्या शुध्द मराठीत विचारलं "तनुजा माझ्याशी लग्न करशील?" आणि तिच्याकडे आणि अजयकडे वळून म्हणाला "आई बाबा तुमची परवानगी आहे?" हे सगळ्यांना माहीत होतं म्हणजे ही मागणी मात्र तनुजाला सरप्राईज नसणार. आणि..... अचानक तिला ड्रेसकोडच्या आत लपलेलं तनुजाच्या तणावाचं कोडं सुटलं.प्लेझंट उत्तर असलेलं कोडं.तिनं त्या प्लेझंट उत्तराला जवळ घेतलं.

About the Author

सुषमा दातार's picture
सुषमा दातार

Pune India
Education- Msc(Botony-Uni Pune),PG Dip.communication and journalism.PG Dip.Communication media for children.
Work experience.-teaching Mass Com.as a faculty at S.N.D.T. Pune(5 years)now as visiting faculty Uni.Pune.
Edited and designed Trimonthly 'Palak-Shikshak' for 10 years.member of editorial group for 'Nirmal Ranwara' (children's magazine) and 'Palaneeti'. Conduct training programs communication,relationship skills,film appreciation etc.Chairperson of 'Saath Saath Vivah Abhyas Mandal'.Founder member of 'Samwad' group of women puppeteers.freelance writer.
Publications-'Samwad Vishva' comprehensiveness book on Mass communication in Marathi. translation- ' Chitrapatache Saundarya Shastr' booklets on puppetry and parenting skills. translation published in series -'Vedi' by Ved Mehta. for children- ' Maza Tarangta Ghar' (sea farer's stories in form of travelogue )
email sushamadatar@gmail.com