खेळ-खंडोबा!

-उत्पल

आसमंत शांत आहे. भूकंपानंतर जशी असह्य आणि हताश शांतता पसरत असेल तशीच शांतता! पानवाल्यांच्या दुकानापुढील टाळकी फक्त पान घेऊन, कसलीही चर्चा न करता गाडीला किक मारतायत. पाठीला दप्तर अडकवलेली शाळकरी मंडळी शाळा सुटल्यावर कसलेही वाद न घालता निमूटपणे परत जातायत. कॉलेजमध्ये प्राध्यापकांना आश्चर्याचे धक्के बसतायत, कारण वर्गात काही अनोळखी मुलं येऊन बसू लागली आहेत आणि चौकशीअंती ते याच वर्गाचे विद्यार्थी अहेत असं लक्षात आलं आहे. सकाळ-संध्याकाळचे टेकडी क्लब, हास्य क्लब गप्पांना फाटा मारून फक्त आरोग्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. मुंबईच्या लोकलमध्ये लोक खालमानेनी पेपर वाचतायत किंवा पत्ते खेळतायत. त्यांच्या गप्पा बंद आहेत. ऑफिसमधून रंगणाऱ्या गप्पात साहेबाला आणि कम्पनीला शिव्या देणे एवढा एकच कार्यक्रम उरला आहे.....

हे सगळं असं झालं आहे कारण भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियामधला पराभव आणि आशिया चषकातील एकूण परफॉर्मन्स! मी सहसा क्रिकेटच्या वाट्याला फारसे जात नाही. काही तास टी.व्ही.समोर ठाण मांडून बसायची आणि खेळावर आवेशाने बोलायची साधना मला जमलेली नाही. त्यातल्या त्यात पाहिलाच तर वन-डे सामना. तोही शेवटच्या तासाभरात. 'एकंदरीत काय हाल-हवाल' या उद्देशाने टी.व्ही. ऑन करून बघणे एवढंच मी करतो. (मात्र गेल्या वर्षीची वर्ल्ड कप फायनल बघितली. धोनीच्या षटकाराने मौज आली. षटकार हा प्रकार मला आवडतो. चेंडूला असं बाहेर भिरकावून द्यायचं म्हणजे कमालच! दर वेळेला मला रा.रा.नेमाड्यांची आठवण होते.) तर क्रिकेटविषयक घडामोडीत मला फारसा रस नाही. मात्र भारतीय मुलखात क्रिकेट ही काय चीज आहे याची मला कल्पना आहे. भारतासारख्या कृषीप्रधान (हे क्लीशेड आहे की झूठ आहे की अवघड वर्तमान आहे? जाणकारांनी खुलासा करावाच एकदा. निखील वागळे यांच्याशी कुणाची ओळख असल्यास 'आजचा सवाल' मध्ये घ्यायला सांगा त्यांना. आणि हातवारे न करता सिद्ध करायला सांगा.) देशाचे कृषिमंत्री क्रिकेट नियामक मंडळाचे सर्वेसर्वा असतात यातच नांगर आणि  बॅट यातलं नातं दिसून येतं. शिवाय सध्याची परिस्थिती पाहता, भारताच्या पुढील संघासाठीचे खेळाडू गावोगावच्या शेतातून, बांधावरून चक्कर मारली तर नक्की मिळू शकतील असं मला विश्वास वाटतो. ग्रामीण मराठीने जशी मराठीला नवीन शैली दिली तसंच हे ग्रामीण कौशल्य गोफणीतल्या दगडासारखं सुसाट वेगाने वाहत प्रतिस्पर्धी संघाला गारद करेल! असो.

सांगायची गोष्ट म्हणजे आसमंत दुःखी आहे. लोक उदास आहेत. वृत्तपत्रे, टी.व्ही., इंटरनेट - सगळीकडे 'हे असं कसं झालं?' च्या चर्चा सुरु आहेत. अर्थात पाकिस्तानविरुद्धचा 'विराट' विजय, सचिनचे महाशतक वगैरे जमेच्या बाजू आहेत. पण एकूणात काय? तर चिंता. सचिनने शंभरावे शतक ठोकले ते बांग्लादेशविरुद्ध याचा नाही म्हटलं तरी थोडा त्रास झालाच काही जणांना. त्यात तसं किंचित तथ्यही आहे. हे म्हणजे उद्या 'हिंदू'चा पुढचा खंड यावा आणि नंदा खरे, विश्राम गुप्ते, सुहास पळशीकर यांची एकही प्रतिक्रिया न येता कोथरूडमधील एखाद्या महिला मंडळानेच फक्त त्याची दखल घेऊन चर्चासत्र आयोजित करावे अशापैकी होते. मला काही हे सहन झालं नाही. इतका आनंदी आणि दिलखुलास असा आमचा देश, फक्त दहा जणांनी त्याला इतका दुःखी करावं? मी ठरवलं की याचा अभ्यास केला पाहिजे. लोकांशी बोललं पाहिजे. हे मनोगत बायकोपाशी व्यक्त केल्यावर तिने 'बाईकवरून जाणार असलास तर हेल्मेट घालून जा आणि शक्यतो काढू नकोस' असं सल्ला दिला. तो का ते मला कळलं नाही. पण बायकोचा सल्ला घ्यायचा असतो, त्यावर प्रश्न करायचे नसतात हे मला अनुभवाने कळले आहे.

सुरेश उर्फ सुऱ्या हा आमचा नेहमीचा पानवाला. त्याला परिसरातील अनेक मंडळींची सुखदुःख ठाऊक असतात. कारण सांसारिक तापांना विरघळायला लावणारं पान त्याच्याकडे मिळतं. विशेषतः रात्रीच्या जेवणाच्या वेळी किंवा जेवणानंतरच्या परस्परांतील प्रेमळ संवादातून सांसारिक ताप जेव्हा जोरात चढू लागतो तेव्हा तो कमी करायला हमखास उपयोगी म्हणजे हे पान. मी पहिला मोर्चा सुरेशकडेच नेला. मला पाहिल्या पाहिल्या सुरेशने आमचं पान लावायला घेतलं. प्रसन्न होत मी त्याला विचारलं, "कसं काय?"
"झकास". सुऱ्या.
"गर्दी दिसत नाही आज."
"तुम्ही लवकर आले नेहमीपेक्षा."
"असं असं. बरं...काय मग? काय म्हणतात मॅचेस? "
इथे सुऱ्याने चुना लावणे थांबवून माझ्याकडे एक घायाळ नजर टाकली.
"हो. बघतोय."<br वाईट ना? आशिया कपमधून बाहेर... ऑस्ट्रेलियात माती..."

"काय सांगायचं? ह्यांना फक्त अॅडमधूनच एवढे पैशे भेटतात....ह्यांना काय पडलंय? आणि हरतो तो खेळाडू असतोच हो..पण जिंकण्यासाठी ट्रायपण करत नाही तो कसला खेळाडू?"

पराभवाने सुऱ्याच्या तोंडी तत्वज्ञान बसवलं हे माझ्या लक्षात आलं.

"घ्या." त्याने पान पुढे केलं."

' आता बघा. तुम्ही माझ्याकडे पान खाता इतकी वर्षं. कधी कम्प्लेन आली का? ज्या दिवशी पान जमणार नाही त्या दिवशी आपल्या तोंडात मारा. आपलं काम आपण चोख करतो. ह्यांच्यासारखं नाही." हे म्हणजे आपली टीम हे लक्षात आलं होतं माझ्या.सुऱ्या बिचारा बांध फोडून बोलत होता. आणि मॅस्लोच्या हायरारकिला धक्का देणारं सुऱ्याचं मानसशास्त्र मी समजावून घेऊ पाहत होतो. पानाचं दुकान चालवणाऱ्या या माणसाने ही गोष्ट एवढी जिव्हारी लावून घ्यावी?"फाइटिंग स्पिरीटचं नाही सालं..." नेहमीच्या थांब्यावर त्याची गाडी थांबली आणि तो एकदम "या साहेब..." म्हणाला...हे पान खायला आलेल्या वाहतूक पोलिसाला उद्देशून होतं. मिशा आणि ओसंडून वाहणारं पोट या पोलीस व्हायच्या किमान पात्रतेत कमाल गुण मिळवलेले हे गृहस्थ चौकात अधूनमधून दिसतात. सुऱ्याने त्यांचं पान लावायला घेतलं. पोलीसमुद्रा भलतीच गंभीर दिसत होती. मी पान चघळत शांत उभा होतो. सुऱ्याही शांत झाला होता. साहेबसुद्धा बराच वेळ काही न बोलता मर्यादशील सुनेसारखे बाजूला उभे होते. पण अखेरीस त्यांनी त्यांच्या डोक्यातल्या शाब्दिक वाहतुकीची कोंडी फोडली आणि एकदम दुकानाकडे वळून म्हणाले,"तेंडुलकर संपलाच होता हो. या सेंच्युरीने वाचला..." हे बहुधा सुऱ्याला पटलं नसावं. कारण तो लगेच म्हणाला, " पण  कॅप्टनचं काय? आणि कोच? त्यांनी घ्यायला पाहिजे रिस्पानसिबिलिटी. चॅपेल कसा परत गेला होता मागच्या एका वर्ल्ड कपला..आठवतं का?" <मला 'त्या' वर्ल्ड कपची आठवण झाली. तिसऱ्याच सामन्यानंतर पॅड्स सोडून भारतीय संघ मायदेशी परतला होता. त्यानंतरच्या बांगलादेश वारीत भारताने यजमानांचा पराभव केला होता. पण ते म्हणजे ऐन युद्धभूमीवरून आपली घोडी उलटी फिरवून नंतर गल्लीतल्या मुलांसमोर धनुर्विद्येतले विक्रम प्रस्थापित करण्यापैकी होतं"अरे पण हा टापिक नुसत्या कोचच्या जाण्याने सुटणार नाही." पोलीस मग काय 'कोचावर' बसणाऱ्या निवड समितीतल्या धुरंधरांच्या जाण्याने? मी मनात विनोद करून घेतला. असं मी बरेचदा करतो. 'आतल्या आवाजा'सारखाच एक 'आतला हशा' असतो. त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. "ते तर आहेच हो. आता कमिटीवाले पण एक्शन घेतीलच ना..." सुऱ्या. कमिटीवाले म्हणजे बीसीसीआय हे मी ताडलं. "हां. ते महत्वाचं. काहीतरी सॉलिड फैसला करायला पाहिजे...." पोलीस."म्हणजे मागे काही निर्बंध घातले होते तसं काही.." मी.निर्बंध शब्दावर दोघेही स्पीडब्रेकर आल्यासारखे थांबले हे माझ्या लक्षात आलं. "म्हणजे नवीन नियम वगैरे. जाहिराती किती करायच्या, चांगला खेळ झाला नाही तर पैसे कापणार असं काही." मी."ते काय खरं नसतं हो. आणि मायला पैसे कापले तर कापू देत की. ह्यांना काय फरक पडतोय?" सुऱ्या पुन्हा 'हे'च्या भाषेवर आला. "अरे मग समजा हरलो आपण तर तुम्हांला तरी काय फरक पडतोय?" मी.इथे  शांतता पसरली. पोलीसदादांनी पान चघळंणं थांबवून माझ्याकडे एक नजर टाकली आणि आपली विजार सारखी केली. सुऱ्याने पान रंगवणं थांबवलं."काय बोलता राव? क्रिकेट हा आपला गेम आहे." पोलीस."बरं." मला याहून काही बोलणं शक्य झालं नाही. "हां मग. हा प्रश्न आवडीचा आहे. तुम्ही विचारा कोणालापण...कुठला गेम आवडतो म्हणून.. शंभरातले नव्याण्णव म्हणणार क्रिकेट...."  सुऱ्याचं वाक्य ऐकून मी चमकलो. शंभरातले नव्याण्णव? नेमाडे, देशी खेळांचं काय होणार हो? कोसला तुम्ही शंभरातील नव्याण्णवांना अर्पण केलीत. पण त्या सगळ्यांना क्रिकेटच आवडतं की. "क्रिकेट हा भारी गेम आहे साहेब. ते काय कोणाचंपण काम नाही." पोलीस."पण जरा जास्त नाही का होत?" मी."आम्ही जास्त कुठे मागतोय? आता ते आयपीएल. यावर्षी बघा. लोकांचा इंट्रेस कमी होणार. मागच्या वर्षीतरी कुठे होता एवढा? आम्ही म्हणतो, कमी खेळा पण चांगलं खेळा." पोलीस.एक उत्तर मिळाल्याच्या समाधानात आम्ही तिथून निघालो. 'कमी खेळा पण चांगलं खेळा'च्या धर्तीवर 'कमी लिहा पण चांगलं लिहा', 'कमी बोला पण चांगलं बोला', 'कमी शिका पण चांगलं शिका' वगैरे घोषणा माझ्या मनात आकार घेत होत्या. यानंतर मी पालेकरांना भेटलो. पालेकर हे आमचे जुने शेजारी. व्यायामाची आवड असणारे. व्यायाम ही मूलतः आवडीचीच गोष्ट आहे. त्यामुळे ती काही विशिष्ट लोकांकडूनच नियमितपणे केली जाऊ शकते. माझे व्यायामाचे मनसुबे हा एक स्वतंत्र विषय आहे. त्याच्या खोलात शिरण्यात अर्थ नाही. जमेल तसे बलसंवर्धन करायचे प्रयत्न मी करत असतो. पण त्यातले सातत्य अवर्णनीय असते. असो.एका सकाळी पालेकर धापा टाकत परतत असताना मी त्यांना गाठलं."सुप्रभात!""अरे वा! आज तुम्ही मैदानात?""येतो अधूनमधून.""छे! छे! हे काही खरं नाही. व्यायामात नियमितपणा हवाच...""प्रयत्न करतो...पण जमत नाही काही ना काही कारणांनी..."अहो जमत नाहीच. जमवावं लागतं. हे लग्नासारखं आहे. काय?"यावर माफक हसून मी मूळ प्रश्नाला हात घातला"पालेकर तुम्ही बॅडमिंटनवाले ना?"प्रश्नच नाही. अहो वीस मिनिटं खेळून बघा आणि मग कसं वाटतं ते सांगा मला.""क्रिकेट खेळलात की नाही कधी?""कॉलेजात खेळायचो. पण नंतर फारसं नाही. आणि सध्या तर बोलूच नका. आय टेल यू...दे डोंट डिझर्व टु बी इन द टीम. इट इज शीअर वेस्ट ऑफ मनी. डिड यू एव्हर ऑब्झर्व द्रविडस फेस? आय मीन नाऊ ही इज रिटायर्ड, बट व्हेन ही वॉज हेडिंग द टीम बिफोर. वॉल अँड ऑल इज ओके, बट ही वॉज नेव्हर अ स्पिरीटेड प्लेयर.....लेट मी टेल यू धिस..."पालेकर सुटलेच होते. क्रिकेट ही एक किल्ली आहे याचा प्रत्यय येत होता."मान्य. पण लोकांकडून जरा अतिरेकच होतो हे तर खरं?""अहो हे शेवटी लोकांचं क्रिकेटवरचं प्रेम आहे...त्यांना आवडतो तो खेळ, मला सांगा तेंडुलकरांच्या पुढल्या वीस पिढ्या बसून खातील एवढा पैसा आज सचिनने एकट्याने कमावून ठेवला आहे. बट अॅन अॅव्हरेज इंडियन, हू लिव्हज इन वन रूम किचन ब्लॉक इज नॉट कन्सर्ड विथ इट. व्हॉट ही वाँट्स टू सी इज द ग्रँड क्रिकेट! असं बघा...पॉप्युलर गोष्टींचं मार्केटिंग जोरात होतं यात नवीन ते काय? (हो. 'हिंदू' साक्ष आहे!)...आणि मग लोक मनापासून प्रेम करतात तसं मनापासून रागावतातही...(सारखी सारखी नेमाड्यांची आठवण का होतेय मला?)""अहो पण इतकं टोकाचं वागणं?""मान्य. आपण लोक मूर्खासारखं आयडॉल वर्शिपिंग करतो. पण अगदी माझ्यासारख्या माणसालाही सचिन किंवा सेहवाग बोलिंगची पिसं काढतात तेव्हा सॉलिड वाटतं. त्यांच्या काही इनिंगमध्ये तर मी बसल्या जागी उड्या मारायच्या बाकी ठेवल्या होत्या. एक लक्षात घ्या. खेळामध्ये खेळाडू स्वतःला सिद्ध करत असतो, 'वर्चस्व' सिद्ध करत असतो. ते सरळ सरळ क्षमतांचं युद्ध असतं. तू किंवा मी! माणसाच्या अंगभूत 'अॅनिमल इंस्टिंक्ट'चं खेळ हे अत्यंत सिव्हिलाईज्ड एक्सप्रेशन आहे!""वा! काय बोललात पालेकर..." पालेकर इतके सखोल असतील याची आम्हांला कल्पना नव्हती."मग! अहो तुम्ही सकाळी येत नाही..भेटत नाही...जरा घाम गाळून बघा आणि मग बघा डोकं कसं तरतरीत राहतं ते...."अॅनिमल इंस्टिंक्ट! अजून एक उत्तर......आणि हे बऱ्याच बाबतीत लागू होतं का? एरवी सिनेमानटाचं देऊळ बांधावं असं कुणाला का वाटावं? ऐश्वर्याला मूल होणार यात जनतेला का रस? आपल्याहून सुंदर, श्रीमंत, यशस्वी लोकांबद्दल वाटणारं आकर्षण? की निसर्ग नियमानुसारच प्रस्थापितांचा, बलिष्ठांचा अनुनय? तेही अॅनिमल इंस्टिंक्टच का? अमिताभच्या दर्शनासाठी 'प्रतीक्षा'च्या बाहेर ताटकळत उभे असलेले किंवा शाहरुख खानच्या दर्शनासाठी 'मन्नत'च्या बाहेर उभे असलेले जीव दर्शन झालं की स्वतःला लोकलमध्ये लिंपून घेऊन घरी जाणार असतात. 'दर्शना'मागची त्यांची प्रेरणा कोणती? 'प्रेरणा' घेणे हीच प्रेरणा? असं करून खरंच प्रेरणा मिळते? क्रिकेट, सिनेमा, राजकारण - या सगळ्यात 'मर मिटने को तैय्यार' असणारी मंडळी कुठल्या रसायनाची असतात..?घरी आलो तेव्हा बायको एका मासिकावरचा आमीर खानचा फोटो प्रेमाने बघत होती. मी तिच्याकडे बघताच तिने विचारलं, "चिडलास वाटतं?"छे! चिडतो कसला? तुला आमीर खान काय मागणी घालायला येणार आहे?""पण त्याने मागणी घातली तर मी 'हो' म्हणेन असं तुला वाटतं?"म्हणजे? तुला आवडतो ना तो?""अरे ते कल्पनेतलं आवडणं. तो आवडतो पण तो 'माहीत' नाहीये....""आणि मी 'माहीत' आहे?"अर्थात. जो 'माहीत' आहे तो आवडतो तेव्हा ते खरं आवडणं. बाकी सगळं क्षणिक. भुलवणारं." बायको मौलिक विचार मांडत होती."हं..म्हणजे तो आमीर खान असेल की अजून कुणी...पण लोक त्यापायी स्वतःच्या आयुष्याकडे दुर्लक्ष करतात ना....""तसं आहे खरं. पण आता हा दोष कुणाचा? तुला सांगू का? आपले लोक इमोशनल फूल्स आहेत..."मी स्तब्ध झालो.

'अॅव्हरेज इंडियन' मूर्ख खराच. आणि भावनाशीलही बराच. पोट भरायची भ्रांत असली तरी रजनीकांतचा सिनेमा चुकता कामा नये, सचिनच्या फॉर्मबद्दल आणि अमक्याला काढून तमक्याला टीममध्ये घेण्याबद्दल वादावादी करता आलीच पाहिजे. हा 'अॅव्हरेज इंडियन' लोकशाहीला तयार आहे का असं एक मूलभूत प्रश्न (अनेक दिग्गजांना पडतो तसाच) आम्हालाही पडला (आयडॉल वर्शिपिंग ब्रिटीश माणूससुद्धा करतो. डेव्हिड बेकहॅमवर जीव ओवाळणारे लोक तिथेही असतीलच, आहेतच. पण दोन दिवस लंडन म.न.पा. ने एखादी रस्ता दुरुस्ती लांबवली तर ब्रिटीश माणूस बहुधा रस्त्यावर येत असेल. असो.) क्रिकेट हा एक भाग. पण जनता जिथे जीव रमवते अशी बरीच ठिकाणं आहेत. मग तो हिंदी सिनेमा असो, राजकीय पक्षांच्या निवडणूक यात्रा असोत, भिकार मालिकांची रोज भरणारी जत्रा असो किंवा राखी सावंतची मापे असोत. 'अॅव्हरेज इंडियन' सगळीकडे हजेरी लावून आहे. मायभूमीची बरीचशी लेकरं तिच्या दुखण्यापेक्षा तिच्या कळाहीन हसण्यामध्येच जीव रमवतात त्याला काय करायचं? 'कार्यकर्ता' या मनुष्यविशेषाविषयी आमच्या मनात अनुकंपा दाटून येऊ लागली होती. 'पक्षाचा आज्ञाधारक' या नात्याने करायची जी अनंत कामे असतात त्यात बिचाऱ्याचं लोकशाहीबद्दलचं शिक्षण जरा राहूनच गेलंय का?'अॅव्हरेज इंडियन'ची बाजारपेठ सगळ्यांना खुणावते यात नवल ते काय? इथे सगळं नीटच विकलं जातं. मग ते क्रिकेट असो, बिग बॉस असो, श्री श्री रविशंकर असोत, तिरुपतीचा बालाजी असो, अमिताभचा आवाज असो की सचिनची बॅटिंग असो.

क्रिकेटच्या निमित्ताने सुरु झालेलं माझं चिंतन भारतीय लोकशाहीपाशी येऊन थांबलं होतं. मात्र निराश झालो नाही. 'रथ'कार रंगनाथ पठारेंच्या शब्दात स्वतःशी बोललो...."हा जगन्नाथाचा रथ आहे...हा ओढायला हजारो हात हवे आहेत!"

About the Author

उत्पल's picture
उत्पल

जन्मतारीख : १० फेब्रुवारी १९७७
शिक्षण : डिप्लोमा (मेकॅनिकल इंजिनियरिंग), बी.ए. (समाजशास्त्र), एम.बी.ए. (मार्केटिंग)

१९९५ पासून ७ वर्षे इन्डस्ट्रिअल सेल्स आणि मार्केटिंगमध्ये काम. त्यानंतर मार्केट रीसर्च व जाहिरात क्षेत्राचा ८ वर्षांचा अनुभव. सप्टेंबर २०१० पासून कंटेंट रायटर व कॉपीरायटर (मराठी व इंग्लिश) म्हणून काम. 'मिळून साऱ्याजणी' या मासिकात संपादन साहाय्यक म्हणून काम. 'आजचा सुधारक' या मासिकाचा प्रतिनिधी, साहाय्यक.

कविता आणि वैचारिक, ललित लेखनात रुची. हंस, मौज, अंतर्नाद, साप्ताहिक सकाळ, परिवर्तनाचा वाटसरू, पुरुष उवाच, मिळून साऱ्याजणी या नियतकालिकांतून कविता व लेख प्रकाशित.