बहुस्तरीय सर्जनाचा संगम

बहुस्तरीय सर्जनाचा संगम .... ...याआधी प्रभाकर कोलतेंचं चित्रकलेविषयीचं लिखाण वाचलं होतं. चित्रकार प्रभाकर बरवे यांच्या ‘कोरा कॅनव्हास’बद्दलही बरंच एेकलं होतं. फेसबुकवर किंवा एखाद्या लेखामध्ये कोरा कॅनव्हासमधले काही अंशा किंवा काही ओळी कोणीतरी वापरल्याने, स्टेटस म्हणून टाकल्याने, त्या वाचल्या होत्या. (ते पुस्तक बाजारात उपलब्ध नसल्याने वाचता मात्र आलेलं नाही.) सुभाष अवचटांचं ‘स्टुडिओ’ हातात पडलं आणि ते फारच आवडलं. त्या पुस्तकाचा आठवणीवजाचिंतनकाव्यात्मतेचा बाज आणि सोबत स्केचेस, चित्रं यामुंळे ते पुस्तक भावलं, विशेष म्हणजे ते वेगळं वाटलं ते वर उल्लेखलेल्या बाजामुळे. प्रत्येक माणसाचा जग पाहण्याचा, अनुभवण्याचा अँगल वेगळा असतो. त्यात चित्रकलेसारख्या दृश्यात्मक कलेच्या क्षेत्रात काम करणार्‍या माणसाचा अँगल काय असेल किंवा तो जग किती अँगल्सनी पाहत असेल याची उत्सुकता स्टुडिओ वाचल्यावर अधिकच वाढली. 

इंग्रजीत अशी पुस्तकं आहेत. चित्रकारांच्या डायर्‍या आहेत. पण मराठीत असं लिखाण अजून फारसं नाही असं शोध घेतल्यावर लक्षात आलं. आणि आहे ते मग कुठेतरी, कोणाच्यातरी ब्लॉगवर (बहुतेक लेखिका-चित्रकार कविता महाजन यांच्या) ‘कॉल ऑफ द सीज’ या पुस्तकाबद्दल वाचलं आणि नावाने मी थोडा आकर्षित झालो... कॉल ऑफ द सीज.... लेखक-चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी. सुमद्राची गाज किंवा समुद्राची गाज हीच आपल्याला दिलेली हाक... असं काहीसं मनात उमटलं. पहिल्यांदा वाटलं की पुस्तक इंग्रजीत असावं, पण पाहू तरी काय आहे या उत्सुकतेने पुस्तक पाहिलं तर मराठीत असा प्रयोग करणारा या चित्रकाराचं कौतुक वाटलं. (आणि वाचल्यावर त्याच्याविषयीचं कौतुक संपलं आणि त्याची जागा एखाद्या चांगल्या कलावंताविषयी वाटतो तशा त्या आदराने घेतली.) 

लहान मुलांच्या पुस्तकांसाठी चित्र काढणारा चित्रकार किंवा इलस्ट्रेटर किंवा मुखपृष्ठ करणारा कमर्शियल आर्टिस्ट एवढ्यापुरतेच मला चंद्रमोहन कुलकर्णी ठाऊक होती. ते एक चित्रकार आहेत हे माहिती होते पण ती चित्र पाहण्याचा अनुभव मात्र नव्हता. पण हे पुस्तक वाचणं आणि पाहणं म्हणजे ‘तोचि सोहळा अनुपम’ या उक्तीची प्रचिती आणणारा होता. या पुस्तकाने मी भारावून गेलो नाही, त्याच्या प्रेमातही पडलो नाही (म्हणजे काय ग्रेट आहे, तोड नाही, मरण्याआधी वाचलंच पाहिजे वगैरे असं माझं होत नाही.) तर या पुस्तकाने मला दृश्यात्म कलेकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन दिला. समुद्र म्हणजे पाणी, पाण्याचा मोठा आकार किंवा मास. (चित्रकलेच्या भाषेत चित्रकार दृश्यातले मासेस काढतो आणि ते काढतो, रंग भरतो असं म्हटलं जातं. म्हणजे तो पान काढताना, पानाचा आकार – मास म्हणजे पानावर पडलेल्या छायाप्रकाशाने तयार झालेले मासेस काढतो.) या आकाराने अनेक कलावंतांना आजपर्यंत साद घातली असेल आणि त्यातून अनेक कलाकृतीही निर्माण झालेल्या असतील. हा झाला कलेचा मामला. समुद्राने कलाकाराला दिलेली प्रेरणा. 

पण वास्तवात किंवा व्यावहारिक जगात पाहिलं तर आपल्याला जाणवेल की, समुद्राने माणसांनाही प्रेरणा दिली आहे, त्याच्या भोवती संस्कृती-चालीरीती गुंफल्या गेल्या आहेत. या समुद्राने माणसांना तयार केलं आहे. त्यांना व्यवसाय दिला आहे. त्याच्याभोवती सण-उत्सव-जीवनपद्धती तयार झाल्या आहेत. या समुद्राभोवती लोकांचं एक विश्व तयार झालंय. हे जे विश्व असतं ते कला टिपत असते. कला ही गोष्टच मुळात व्यापक असते. ती केवळ एका केंद्रबिंदूपाशी घुटमळत नाही. त्यामुळे ती कोणत्याही एका वादामध्ये, विचासरणीमध्ये अडकत नाही. ती सर्जन करते, नवनिर्मिती करते आणि हे करताना त्या काळातल्या जीवनाचं, माणसांचं, त्यांच्या जीवनपद्धतींचं डॉक्युमेंटेशनही करत असते. जगण्याचा विविध अंगांनी शोध घेत असते. पाहण्याचे नवे अँगल्स दाखवत असते. तर समुद्र आणि त्यामुळे घडलेलं जीवन, ती माणसं, त्यांच्या क्रिया, प्रतिक्रिया, कामं करण्याच्या पद्धती, त्यांच्या भावभावना या सगळ्याला आपल्या कलेच्या कवेत घेण्याचा प्रयत्न चंद्रमोहन यांनी केला आहे. 
कोकणच्या पार्श्वभूमीवर चंद्रमोहन यांनी काढलेली ही चित्रं कोकणची राहत नाही तर ती कोणत्याही माणसांची किंवा समुद्राची होतात. निव्वळ कोकणदर्शन करणं किंवा समुद्रदर्शन करवणं हा या चित्रांचा हेतू नसून माणसांच्या अंतरंगांचे, सभ्यतेचा शोध घेण्याचा प्रयत्न यात आहे. आणि त्यासोबत एका कलाकाराच्या सर्जनाच्या प्रक्रियेचा शोध या चंद्रमोहन घेतात, नव्हे या सर्जनाला थेट भिडतात! समुद्राला साद घालताना ते स्वतःतल्या सर्जनशीलतेलाही साद घालतात. या पुस्तकात होड्या आहेत, ती चालवणारी माणसं आहेत, इतर माणसं आहेत, मासे आहेत, त्यांच्या जाळ्या आहेत, बाजार आहे, फुलं आहेत आणि समुद्र आहे. ही प्रत्येक गोष्टी चितारण्याची चंद्रमोहन यांची खास अशी शैली आहे. ती त्यांनी स्वतःहून कमावलेली आहे. समुद्र काढताना ते लाटा चितारत नाहीत तर मोठ्ठा ग्रेइश ब्लू रंगाचा पट्टा कॅनव्हासवर लावतात. असे दोन चार प्लॅट पट्टे मारून ते समुद्राचा मोठ्ठा आकार अत्यंत कमी तपशिलांत चितारतात. एक एक पट्टा किंवा आकार वेगवेगळा करत पाहिला तर काहीतरी अमूर्त जाणवतं आणि सगळे आकार एकत्र पाहिलं की समुद्र, डुचमळणारा, हिंदळकणारा मोठ्ठा मास! 

समुद्रातून बाहेर काढलेली ताजी मासळी म्हणजे अगदी हुबेहुब चांदी! हात लावला तरीदेखील तो चमचमता रंग आपल्या हाताला लागतो. जेव्हा या पुस्तकातली माश्यांची चित्र पाहिली तेव्हा वाटलं की हात लावला तर कदाचित या माशांचाही रंग आपल्या हाताला लागेल! याचा अर्थ ती हुबेहुब आहेत का तर नाहीत. आकार, प्रपोर्शनने डिट्टो नसतील, (त्यात मला शिरायचेही नाही.) तर त्या माश्याचं अस्तित्व, त्यांचा ओला चमकदारपणा चंद्रमोहन बरोब्बर हेरतात आणि तो रंगामधून मांडतात. आणि त्यांनी या पुस्तकांत म्हटलंच आहे की, ही मासळी म्हणजे मच्छिमारांसाठी सोनंचांदी असते! कारण एक तर त्यांचा रंग आणि दुसरं म्हणजे, या मासळीमुळेच त्यांना पैसा मिळतो, त्याचं पोट भरतं. या मासळीमुळेच त्यांचं जीवन चालतं, त्यावर ते आधारलेलंय. जसं सोनंचांदी हे मौल्यवान धातू आपण प्रॉपर्टी म्हणून ठेवतो, तशीच ही त्यांची प्रॉपर्टी. या प्रॉपर्टीची त्या कोळ्यांसाठी असलेली ‘किंमत’ चंद्रमोहन यांना योग्यप्रकारे ठाऊक आहे. चंद्रमोहन यांनी चितारलेली माणसं हा या पुस्तकातला विलक्षण प्रेक्षणीय भाग आहे. माणसं, त्यांची अनॉटॉमी, पोश्चर्स, बसण्याची पद्धत, हसणं किंवा काम करताना केल्या जाणार्‍या हालचाली यांची टिपलेली निरीक्षणं सुंदर आहेत. एका हातात एखाद्या जड वस्तूची पाटी किंवा टोपली घेऊन जाताना होणारी माणसांची पोजिशन असो किंवा जाळं फेकताना होणारी खाद्यांची, मानेची लयदार अॅक्शन असो किंवा होडी पाण्यात ढकलताना पायाची, पाठीचं आणि हाताचं होणारं असो पोश्चर चंद्रमोहन अचूकपणे टिपतात. ती पाहताना असं वाटतं की आत्ता दोन मिनिटांत हा माणूस जाळं फेकेल किंवा आत्ता लगेच ही कमरेवर हात ठेवलेली बाई आपल्याला म्हणेल, फुलं घेता का म्हणून! 

हे पुस्तक पाहताना जाणवलं की ही सगळी चित्रं स्टॅटिक म्हणजे स्थिर आहेत पण ती पाहताना ती हालताहेत आणि काहीतर घडतंय किंवा मूव्ह होतंय की काय किंवा कॅमेरातून पाहतोय की काय. द्विमीतय चित्राला काही मोजक्याच पण विशिष्ट तपशिलांद्वारे त्रिमितीय करण्याचं किंवा जिवंत करण्याचं हे सामर्थ्य आहे चंद्रमोहन यांच्या कुंचल्याचं, त्यांच्या कॉम्पोशिनचं आणि सर्जनशील विचारांचं आहे, त्यातून निर्माण झालेल्या स्ट्रोक्सचं. पुस्तकातली सगळी चित्र अक्रॅलिक या माध्यमामध्ये केलेली आहे. या माध्यामाची खासियत म्हणजे पारदर्शक, ओपेक - अपारदर्शक किंवा अर्धपारदर्शक अशा प्रकारे या माध्यमात करता येतं. त्याचा वापर चंद्रमोहन करतात. समुद्र किनार्‍यावरचा ओलसरपणा दाखवण्यासाठी अत्यंत तरल, पारदर्शक रंग वापरले आहे. तर टेक्श्चर हवं असेल तिथे जाड थर दिले देऊन खोली, डेप्थ निर्माण केली आहे. बर्‍याच ठिकाणी तर अपेक्षित परिणाम मिळवण्यासाठी ब्रशच्या मागील बाजूंची टोकेही कॅनव्हासवर घासली आहेत. पुस्तकामध्ये चित्रांसोबत आठ कविता किंवा मुक्तआत्मचिंतनात्मक उतारे आहेत. हे पुस्तक आवडण्यामागचं हेही एक कारण. कारण या चिंतनाची जातकुळी काव्यात्म आहे. शिवाय त्यात त्या परिसराची, माणसांची, समुद्राची सूक्ष्म निरीक्षणंही टिपली आहेत. यातला पहिला भागाचं शीर्षकच आहे – आता बोटी येतील. या बोटी शब्दावर मी थांबलो. मग प्रश्न पडला बोटी म्हणजे काय? तर समुद्रातून मासे काढण्याचं माध्यम आहे. समुद्राच्या तळातून मासे आणून ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम बोटी करतात. त्याप्रमाणेच चित्रकारही रंग, आकार आणि रेषा हे माध्यम वापरून मनाचा, जगण्याचा शोध घेऊन स्वतःला सापडलेलं सर्जन लोकांसमोर मांडतो. आणि या सगळ्याची सुरुवात होते अस्वस्थेतून – हर्णैवर रेषा शांत नव्हत्या मालवणातही रेषा शांत नाहीत. रेषा ‘केवळ’ रेषा नाहीत. रेषा, एकट्या ‘रेषा’ म्हणून कागदावर थांबायला तयार नाहीत. भिजू म्हणतात. 

सर्जनशील प्रवास सुरू होतो आणि एखाद्या कॅमेर्‍याप्रमाणे चंद्रमोहन किनार्‍यावरची लगबग, हातगाड्यांची निरीक्षणं, कपड्यांचे, झेड्यांचे रंग, समुद्राचे रंग टिपतात. चंद्रमोहन चित्र काढत असताना करत असलेले विचार मांडतात, चौघे एकदम टोकाला उभं राहून तो ऑरेंज कपडेवाला जाळं फेकताना. वळून फेकलं. वळल्यावर हात जरासा वर गेला तेव्हा दिसलेले त्याचे खांदे! संथसंथ पांढर्‍या लांब रेषा उमटल्या करड्या पार्श्वभूमी(पाण्या?)वर! जाळं काढताना फाटणार आहे! ग्रे बॅकग्राउंडवर व्हाइटच्या रेघारेघांनी काम केलं तर कृत्रिम दिसणार. ब्रशच्या रेघा फार पातळ होणार. बारीकबारीक काम करत बसायला लागणार. रटाळ. आणि बारीक कामाचा आणखीन एक प्रॉब्लेम : सगळं झाल्यावर कळतं की हे बेकार झालंय. शिवाय सिन्थेटिक दिसणार. जाळ्याकडेच लक्ष जाणार. डिझाइन होणार. जाळं फेकल्याचा फील जाणार. या चित्रात जाळं फेकणारा माणूस आणि समुद्राची पार्श्वभूमी काढताना चंद्रमोहननी कमाल केली आहे! जाळं तर अत्यंत कमी स्ट्रोक्समध्ये काढलंय किंवा जाळं न काढता जाळं काढलंय पण जाळ्याचा भास तर होतो. (हा अनुभव केवळ पाहण्याचाच!) कलावंत ज्या माध्यमातून व्यक्त होत असतो ते माध्यमच बरेचदा त्याच्या अभिव्यक्तीला मर्यादा आणतं. काम करता असताना ते माध्यम कलावंताला तोकडं, मर्यादित वाटतं. ही मर्यादा आणि सर्जन यांच्यात घर्षण होत असतं. चंद्रमोहन लिहितात, आता रेषा पुरत नाहीत. फरकाटे होऊ पाहतात. पेन्सिल पुरत नाही. कागद अपुरा पडतो. ब्रश पुरत नाही. ब्रशचे केस अपुरे पडतात. ओघळ. ओघळात ब्रश बुडवून फराफरा ओढावा वाटतोय. तोही पुरत नाही. ब्रशची मागची बाजू ओघळात बुडवून घासावीशी वाटतेय, कागदावर. कागद फाटतोय. फोरबी थुंकी लावून काही होतंय की, ते पाहू! का ग द ठे वू न दि ला पा हि जे. यातला ‘फुलं’ हे चिंतन तरल आणि काव्यात्म आहे. चंद्रमोहन यांच्यातला कवी यामध्ये प्रत्ययाला येतो- फुलांची, पानांची रेखाटनं करावीत. हलक्याशा, वळणदार रेषांनी कळ्यांना स्पर्श करावा तळहाताच्या रेषांवर पानांची जाळी. हातकागद, जलरंग. मॅजेंटा, पिंक, व्हर्मिलिन, क्रिमझन, कामाइन, लाइट ग्रीन, सॅप ग्रीन, विविड ग्रीन, एमरल्ड ग्रीन, प्रशियन ब्ल्यू, अलगद काळा, हलका ग्रे, लेमन, कॅडमियम, गोल्डन यलो, यलो ऑकर. व्हायोलेटची टिंबं अधूनमधून. ओलसर. 

असा हा चित्रांचा आणि शब्दांचा प्रवास संपतो तो इथे पुन्हा येण्यासाठी. म्हणजे पुन्हा सर्जनशीलतेकडे जाणारा – कोकणात जावं, किनार्‍यावर जावं. जमिनीवर जावं. समुद्राची हाक एकावी, त्याप्रमाणं वागावं. ० पुन्हा एकदा समुद्राकडे जावं. हे पुस्तक पाहिलं आणि वाचलं तेव्हा वाटलं, चित्रात काय काय असतं तर रेषा असतात, रेषांचे आकार होतात, आकारांमध्ये रंग भरले जातात, आकारांच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेमुळे त्या आकाराला अस्तित्व प्राप्त होतं. या आकारातून आपल्याला काहीतरी 'दिसतं.' जे आपण आपल्या मनात- मेंदूत रिलेट करतो. त्यातून काही जाणिवा आपल्या मेंदूत निर्माण होऊन आपण आपापला अर्थ लावतो. आणि लिखित किंवा बोलताना शब्दांचं काय असतं? तर लिखित शब्द ही चिन्ह म्हणजे आकार असतात. त्या आकाराशी काहीतरी प्रतिमा आपल्या मेंदूत निगडीत असतात. अशा चिन्हाच्या जोडणीतून वाक्य, ओळी तयार होतात. त्यामुळे मेंदूत काही प्रतिमा तयार होतात आणि त्यातून आपण अर्थ लावतो. दोन्ही प्रक्रिया तशा अमूर्त असल्या तरी चिन्हांशी, आकारांशी निगडीत आहेत. या दोन्ही गोष्टींचा हेतू व्यक्त होणं हा असतो. 

           चंद्रमोहन यांनी वर सांगितलेल्या दोन्ही गोष्टींचे दोन प्रवाह निर्माण केलेत. यांच्या संगमातून एक तिसरा प्रवाह निर्माण होतो. हे पुस्तक तीन पातळ्यांवर - त्रिस्तरीय आहे. चित्र, रंग, आकार हा दृश्यरूपातला एक प्रवाह. आणि दुसरा प्रवाह सर्जननिर्मिती होत असताना चित्रकाराने केलेल्या विचारांचा, चिंतनाचा. गंमत अशी की हा दुसरा प्रवाह आहे शब्दांचा... म्हणजे इथे सर्जननिर्मिती आहे चित्रांची - दृश्यात्मक. आता या सर्जननिर्मितीचा शोध आहे शब्दांतून... आणि त्याहीपुढे हा शोध म्हणजेही एक सर्जन, जो आहे तिसरा प्रवाह! आणि या तीनही प्रवाहातून आपण आलो की आपल्या मनात-मेंदूत तयार झालेला चवथा प्रवाह आपल्या अर्थाचा किंवा इंटरप्रिटेशन्सचा... असे अर्थांचे, त्यांच्या शक्यतांचे अनेक प्रवाह... ... - प्रणव सखदेव कॉल ऑफ द सीज लेखक-चित्रकार – चंद्रमोहन कुलकर्णी किंमत – ४०० रु. (लवकरच या पुस्तकाचा इंग्रजी अनुवादही प्रसिद्ध होत आहे.)

About the Author

प्रणव